वीरशैव वाङ्मयाचा प्रवास

विवेक मराठी    05-Feb-2022   
Total Views |
मराठी साहित्य अतिशय प्राचीन आणि समृद्ध आहे. यामध्ये काव्य, नाटक, कादंबरी, कथा, विनोद, लघुनिबंध, प्रवासवर्णने, बालसाहित्य, चरित्रे-आत्मचरित्रे, निबंध, समीक्षा, संशोधनपर (वाङ्मयीन) साहित्य, तसेच दलित साहित्य, लोकसाहित्य, शास्त्रीय वाङ्मय, इतिहासवाङ्मय, व्याकरणग्रंथ असे साहित्यप्रकार येतात. परंतु संख्यात्मक आणि गुणात्मक दृष्टीने परिपूर्ण असलेल्या मराठी वीरशैव वाङ्मय या साहित्यप्रकाराची दखल म्हणावी तशी घेतली गेली नाही.

newss
मराठी वीरशैव साहित्यामध्ये संस्कृत-कन्नड भाषेतील ग्रंथ अनुवाद, टीकाग्रंथ, चरित्रग्रंथ, अभंगरचना, स्फुट रचना, स्वतंत्र ग्रंथ अशी वैविध्यपूर्ण साहित्यनिर्मिती झालेली आहे. मराठी साहित्य क्षेत्रात मराठी वीरशैव साहित्याने मोलाची भर घातलेली आहे. एवढी प्रगल्भ साहित्य परंपरा असली, तरी मराठी वीरशैव समाजाकडून आणि एकंदर साहित्यप्रेमींकडून मराठी वीरशैव वाङ्मय गांभीर्याने अभ्यासले जात नाही. मराठी वीरशैव वाङ्मयाबद्दलची उदासीनता दूर व्हावी, म्हणून गेल्या तीन-चार दशकांपासून वीरशैव अभ्यासक व सांप्रदायिक आचार्य-मठाधिपती प्रयत्नशील आहेत. तरीही वीरशैव समाजाची लोकसंख्या पाहता मराठी वीरशैव साहित्य जतन आणि संवर्धन करणार्यांची संख्या नगण्यच म्हणता येईल. वीरशैव आणि वीरशैवेतर नवीन अभ्यासकांचे लक्ष या अमूल्य संचिताकडे केंद्रित व्हावे, या पार्श्वभूमीवर लेखिका श्यामा घोणसे यांचे ‘मराठी वीरशैव वाङ्मय : एक अवलोकन’ हे पुस्तक स्वागतार्ह ठरते.
 
मराठी वीरशैव वाङ्मय हा एका अर्थाने संतसाहित्यात मोडणारा साहित्यप्रकार आहे. जीवनाच्या समग्रतेशी आणि समाजाशी एकरूप झालेले साहित्य म्हणजे संतसाहित्य होय. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत धर्माचे स्थान उल्लेेखनीय आहे. धर्माने जनजीवन कर्मकांडग्रस्त, अंधश्रद्ध झाले असले, तरी धर्मानेच मनुष्याच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याला आणि निर्मितिक्षमतेला स्फुरण दिले. महाराष्ट्रातील अशा नानाविध धर्म संप्रदायांनी या संतसाहित्यात आपापल्या धर्मसंप्रदायांचे आचारविचार, संप्रदायांचा इतिहास, ईश्वरभेटीची तळमळ, समाजाप्रती असलेला जिव्हाळा, समन्वयाचा, समरसतेचा सूर या प्रकारे मांडणी केली आणि जीवनपद्धतीमुळे हा वाङ्मयप्रकार साहित्यातील शिरोमणी ठरला.
 
मराठी वीरशैव वाङ्मय : एक अवलोकन
लेखिका : श्यामा घोणसे
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर
पृष्ठ : 120 मूल्य : रु. 150/-
...
 
वीरशैव पंथ हा एक शैव संप्रदाय. यालाच ‘लिंगायत पंथ’ असेही म्हणतात. शिवोपासना हा मूलाधार असलेले अनेक शैव पंथ काळाच्या ओघात निर्माण झाले. वीरशैव पंथ हा त्यांपैकीच एक होय. ‘मराठी वीरशैव वाङ्मय : एक अवलोकन’ या पुस्तकात या पंथात येणारे आचारविचार, वीरशैवांचे असणारे पाच महत्त्वपूर्ण नियम - ज्याला ‘पंचाचार’ असा शब्दप्रयोग केला जातो, याचे विवरण केले आहे. भारतव्यापी असणार्या वीरशैव धर्म-संप्रदायाच्या विस्तारामुळे केवळ मराठीतच नाही, तर कन्नड, संस्कृत, हिंदी या भाषांतही साहित्यनिर्मिती केली आहे. वीरशैव आणि महाराष्ट्र यांचा अनुबंध, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाबंध, मराठी वीरशैव वाङ्मयातील दोन परंपरा, मराठी वीरशैव साहित्याची वाङ्मयीन वैशिष्ट्ये, वीरशैव वाङ्मयाचे मराठीतील योगदान यावर ‘वीरशैवांचे मध्ययुगीन मराठी वाङ्मय’ या पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात लेखिकेने सखोल माहिती दिली आहे.
 
महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय आणि संतसाहित्य यांचे अजोड नाते आहे. संतसाहित्याची निर्मितीच वारकरी संप्रदायामुळे झाली असे म्हटले, तर ती अतिशयोक्ती नाही ठरणार. संप्रदाय हे जरी दर्शनी वेगवेगळे दिसत असले, तरी त्यांची नाळ एकच असते, पण अभिव्यक्त होण्याची त्यांची माध्यमे वेगवेगळी असतात. परस्परांशी ऋणानुबंध असलेल्या संप्रदायांमध्ये ‘वीरशैव आणि वारकरी’ संप्रदायांचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंगाचे पंढरपूर भागवतधर्मीयांचे मूळ पीठ असले, तरी ते प्रारंभी शिवपीठ म्हणूनच विख्यात होते. शिवभक्तांच्या मनातील विष्णुविरोध नाहीसा करण्यासाठी वारकरी संतांनी हरिहर ऐक्याचा पुरस्कार करून, पांडुरंगमस्तकी शिवलिंग विराजमान केले. याचेच दृश्य रूप म्हणजे मराठी संतवाङ्मय.
 
वीरशैव विचारांचा संपर्क जरी यादवकालापासून असला, तरी वीरशैवांच्या मराठी वाङ्मयाचा इतिहास मन्मथ स्वामींपासूनच सुरू करावा लागतो. वीरशैव व वारकरी संप्रदायांचा उदय आणि विकास, त्यांच्यातील साम्य-भेद, वीरशैव सांप्रदायिकांवर वारकरी साहित्याचा प्रभाव, असे विषय हाताळून लेखिकेने वारकरी आणि वीरशैव संप्रदायांतील ऋणानुबंध उलगडले आहेत.
 
यादवकाळातील गूढ व्यक्तिमत्त्व असलेले विसोबा खेचर, खेचर विसा आणि ‘शडुस्थळि’ हा वीरशैव तत्त्वज्ञान स्पष्ट करणारा त्यांचा ग्रंथ, विसोबांचा योगाधिकार सुचविणारी गुरुपरंपरा, वारकरी संप्रदायातील नामदेवराय आणि खेचर-विसा भेट, तसेच शिवनाम-संकीर्तनात उभी हयात वेचणार्या संत महादेवप्रभू, संत लक्ष्मण असे वीरशैव संप्रदायातील संतमहात्मे यांनी रचलेले संतसाहित्य हे शिव आणि जीव यांना एकत्र साधणारे दुवे ठरले आहेत, अशी उत्तम मांडणी लेखिकेने संतांचे अभंग देऊन विशद केली आहे.शिवउपासक असलेला वीरशैव संप्रदाय हा स्त्रीला पार्वतीदेवीसमान मानतो. शिवाय बसवेश्वरांनी उभारलेल्या ‘अनुभवमंटपा’त असलेल्या शिवशरणी (स्त्री) या पंचाचारातही निपुण होत्या, इतके वीरशैव संप्रदायात स्त्रियांना महत्त्वाचे आणि सन्मानाचे स्थान दिले असल्यामुळे मराठी वीरशैव वाङ्मयातही स्त्रीला दिलेला समान दर्जा, तिच्या मनोविश्वाचे घडविलेेले अनेकांगी दर्शन पाहता, हे वाङ्मय काळाच्या पुढे जाणारे ठरते हे लेखिकेने अगदी थोडक्याच शब्दात परंतु सुस्पष्टपणे मांडले आहे. संतकवयित्री भावंडीबाई, शिवशरणी अक्क-महादेवी इत्यादी स्त्रीसंतांचा ओघवता व प्रेरणादायक माहितीपट मोजक्या शब्दात विशद केलेला आहे.
 
मराठी वीरशैव संप्रदायाची श्रद्धास्थाने, त्यांचे पंचाचार, अष्टावरण, पंचाचार्य (त्यांचे मठ व सिंहासन), पंचपीठे, षट्स्थल, अशा काही वीरशैव तत्त्वज्ञानातील पारिभाषिक संज्ञा आणि त्यामागील संप्रदायाच्या पद्धती या पुस्तकात विस्तृतपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय वीरशैवतत्त्व कल्पना, आचारधर्म, तत्त्वज्ञान, लिंगांगसामरस्य इत्यादींचे आराखडे पुस्तकाच्या शेवटी देऊन अधिक सोपे करून दाखविले आहेत.
 
संतमहात्मे हे कालसुसंगत विचार करणारे असतात, हे वीरशैव संप्रदायातील पूज्य असणारे महात्मा बसवेश्वर यांचे जीवनकार्य आणि त्यांनी स्थापन केलेला ‘अनुभवमंटप’ याद्वारे अधोरेखित होते. वीरशैव संप्रदायातील पवित्र ग्रंथ मानण्यात येणार्या ‘सिद्धांतशिखामणी’ ग्रंथात शिवभक्तिरूपी इंधनात सार्या जातिभेदाची राख होते. हाच मूलाधार घेऊन महात्मा बसवेश्वरांनी अनुभवमंटपाची रचना केली होती. जातिभेदाचा कठोरपणे केलेला धिक्कार, मानवतावादाचा पुरस्कार, श्रमप्रतिष्ठेला महत्त्व या अनुभवमंटपातील मांडणीमुळे आणि आचारपद्धतीमुळे अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तीही अनुभवमंटपाकडे आकर्षित झाल्या. अनुभवमंटपात असलेल्या समान दर्जामुळे अनेक शिवशरणी सहभागी झाल्या. कालसुसंगत आणि समाजकल्याण साधणार्या या महात्मा बसवेश्वरांच्या मार्गाने होणारी वाटचाल ही भारतीय समाजाला परमवैभवाच्या दिशेने नेणारी ठरेल, हे सूचक विधानही लेखिका श्यामा घोणसे करतात.
 
‘मराठी वीरशैव वाङ्मय : एक अवलोकन’ हे पुस्तक एका संप्रदायाविषयीच्या साहित्याची ओळख करून देणारे असले, तरी वीरशैव संप्रदायाचा इतिहास, त्यांच्या आचारविचार पद्धती, धर्माचार, पंचाचार, लिंगधारणा पद्धती, त्याचे त्यांच्या जीवनात असलेले महत्त्व, वारकरी-वीरशैव भेद-साम्य, स्त्रियांना दिलेले सन्मानाचे स्थान इत्यादी अनेक विषय वरकरणी छोटेखानी दिसत असलेल्या पुस्तकात संदर्भासहित मांडले असल्यामुळे हे पुस्तक अतिशय अभ्यासपूर्ण झाले आहे.

पूनम पवार

 सा. विवेकमध्ये उपसंपादक कार्यरत आणि विवेक व्यासपीठ अंतगर्त खास महिलांसाठी विवेकज्योती या उपक्रमाची जबाबदारी. रुईया कॉलेज मुंबई येथून (राज्याशात्र / मराठी साहित्य) पदवीधर. महिला आणि समाजातील विविध विषयांवरील लिखाणाची आवड.