विजया एकादशी - 19 फेब्रुवारी 1906 हा परमपूजनीय श्रीगुरुजी यांचा जन्मदिवस आहे. हिंदू विचार जगणारे जन उभे राहणे हे संघाचे लक्ष्य आहे. विचार जगणार्या लोकांचा समूह हेच त्या विचाराचे सामर्थ्य असते. असा सामर्थ्यसंपन्न हिंदू समाज उभा करण्यासाठी श्रीगुरुजींनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांच्या विचारांचा जागर करणारा लेख...
विजया एकादशी - 19 फेब्रुवारी 1906 हा परमपूजनीय श्रीगुरुजी यांचा जन्मदिवस आहे. या वर्षी विजया एकादशी 27 फेब्रुवारी रोजी येत आहे. सर्वप्रथम या महापुरुषास विनम्र अभिवादन करतो. विजया एकादशीचे महत्त्व फार मोठे आहे. पौराणिक कथेनुसार श्रीरामाने वानरसेनेसहित रावणावर विजयप्राप्तीसाठी विजया एकादशीचे व्रत केले होते. श्रीगुरुजींचा जन्मच विजया एकादशीला झालेला आहे. ते संन्यासी होते. संन्यासी परंपरेप्रमाणे व्यक्तिगत जीवनात कोणतेही यश संपादन करण्याचा त्यांचा जीवनहेतू नव्हता. संन्यासी आपले श्राद्ध आपल्या हातानेच करतो. श्रीगुरुजींनी तसे केले होते. त्यांचा जन्म विजयासाठीच झालेला होता, म्हणून हा विजय कशावर आणि कोणाचा विजय याचा विचार करावा लागतो.
हिंदू संस्कृतीच्या, हिंदू तत्त्वज्ञानाच्या, हिंदू जीवनपद्धतीच्या विजयासाठी श्रीगुरुजींचा जन्म झालेला आहे. सरसंघचालक या भूमिकेतून त्यांनी तेहतीस वर्षे देशाचे दोनदा भ्रमण केले. स्वयंसेवकांना उद्देशून आणि समाजाला संबोधित करून त्यांची शेकडो भाषणे झाली. या भाषणांतून त्यांनी आपण हिंदू आहोत, म्हणजे काय आहोत? आपला वैचारिक वारसा कोणता आहे? आपली जीवनपद्धती कशी आहे? तिचा अंगीकार आपण का केला पाहिजे? हे साध्या-सरळ सोप्या भाषेत, तार्किक भाषेत अनेक उदाहरणे देऊन सांगितले.
ते त्यांना का करावे लागले? तर ज्या हिंदू समाजाच्या सामर्थ्यावर विजय प्राप्त करायचा आहे, तो हिंदू समाज आत्मविस्मृत झालेला होता. हजारो वर्षांच्या पारतंत्र्यामुळे त्याची अस्मिता क्षीण झाली होती. कोल्ह्याच्या कळपात वाढलेल्या सिंहाच्या छाव्याप्रमाणे तो स्वत:ला कोल्हा समजू लागला होता. हिंदू समाजाला त्याचे सिंहरूप दाखविण्याचे काम श्रीगुरुजींनी न थकता केले. श्रीगुरुजींनी एक यज्ञ केला. त्याला ‘हिंदू समाजजागृती यज्ञ’ असे म्हणता येईल.
आपण हिंदू संघटनेचे काम करतो, ते कशासाठी? या प्रश्नाचे उत्तर संघविरोधकांनी आपापल्या परीने काढले. हिंदू संघटन मुसलमानांच्या विरोधात आहे, दलितांच्या विरोधात आहे, ख्रिश्चन संप्रदायाच्या विरोधात आहे, असे भन्नाट शोध लोकांनी लावले. त्यावर पुस्तकांचा पाऊस पाडलेला आहे. श्रीगुरुजींचे म्हणणे वेडेवाकडे करून आपला विकृत विचार सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व वाङ्मयाची ‘विकृत वाङ्मय’ म्हणून इतिहासात नोंद होईल. तो कालखंड आता सुरू झालेला आहे.
श्रीगुरुजी अशा वादविवादात पडत नसत. त्याने ते प्रभावितदेखील होत नसत. त्यांनी हिंदुत्वाची अनुभूती घेतली, म्हणून ते अनुभूत ज्ञान मांडत असत. हे ज्ञान सत्य, शाश्वत आणि त्रिकालाबाधित असल्यामुळे या ज्ञानावर आक्षेप घेणारे त्यांच्या अज्ञानामुळेच हळूहळू संदर्भहीन आणि अर्थहीन होत चाललेले आहेत.
आपण हिंदू संघटन का करतो? त्याचे वैश्विक लक्ष्य कोणते? ते श्रीगुरुजींनी फारच उत्कटपणे मांडलेले आहे. ज्या काळात त्यांनी हा विषय मांडला, त्या काळात जगात वेगवेगळी राष्ट्रे उदयाला आलेली होती. ही राष्ट्रे केवळ स्वार्थ बघत असत आणि जेथे स्वार्थ आहे, तेथे स्वार्थांची टक्कर ठरलेली आहे. या स्वार्थांच्या टकरीमुळे पहिले महायुद्ध झाले, त्याहून भयानक दुसरे महायुद्ध झाले आणि जग तिसर्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन उभे राहिले. अणुबाँबचा विध्वंस जगाने पाहिला आणि तिसरे महायुद्ध अणुबाँबच्या साहाय्याने झाले, तर त्यात मानवजात नष्ट होईल. श्रीगुरुजींनी या गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या.
याच वेळी जगात मानवजात एक आहे, मानवजातीच्या सुखाचा विचार केला पाहिजे; राष्ट्रवादाची भावना संकुचित आहे, ती संघर्षाला जन्म देते, म्हणून तिचा त्याग केला पाहिजे हा विचार पुढे आला. कम्युनिझमचा विचार सांगतो की, राष्ट्रवाद ही घातक गोष्ट आहे. आपण आंतरराष्ट्रीय झाले पाहिजे. आपल्याकडेही ‘जय जगत्’चा नारा दिला गेला. आपण वैश्विक झाले पाहिजे. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन असा विचार करता कामा नये. मानवी मूल्ये आणि मानवी अधिकार सर्वश्रेष्ठ आहेत. त्याच्याशी आपण बांधिलकी ठेवली पाहिजे.
उदात्त विचार ऐकायला नेहमीच गोड वाटतात. परंतु हे विचार प्रत्यक्ष अमलात कसे आणायचे? त्याचा मार्ग कोणता? या प्रश्नाची उत्तरे प्रत्येक ‘इझम’वाला आपल्या इझमच्या साहाय्याने देतो. गांधीवादी म्हणणार - सैन्य बरखास्त करून टाकले पाहिजे. इस्लामचे मुल्ला म्हणणार - सर्वांनी मुसलमान झाले पााहिजे. येशूचे शिष्य म्हणणार - सर्वांनी बाप्तिस्मा घेतला पाहिजे. कम्युनिझमचे लोक म्हणणार - जगाने कम्युनिझमचा स्वीकार केला पाहिजे. आणि मग प्रत्येक इझमवाला आपला विचार जगावर लादण्याचा प्रयत्न करतो.
इतिहासात फार खोलवर जाण्याची गरज नाही. दुसरे महायुद्ध समाप्त झाल्यानंतर शीतयुद्धाचा (कोल्ड वॉरचा) जन्म झाला. कम्युनिस्ट गट आणि लोकशाहीवादी ख्रिश्चन गट यांत जगाची विभागणी झाली. आपली जीवनपद्धती जगावर लादण्याचा दोन्ही बाजूंनी जबरदस्त प्रयत्न झाला. नवनवीन संहारक शस्त्रे निर्माण करण्यात आली. जमीन, पाणी, आकाश आणि अवकाश येथून युद्ध करण्याची तयारी सुरू झाली. सर्व मानव एक आहेत, जगात सुखशांती नांदली पाहिजे या विचाराचे थडगे बांधले गेले. श्रीगुरुजींनी त्यांच्या भाषेत ही वस्तुस्थिती फार परखडपणे मांडली आहे.
श्रीगुरुजींचे सांगणे असे आहे की, अशा संघर्षमय आणि संहारक जगाला केवळ हिंदू विचार तारू शकतो. कारण हा विचार मानवाचा एकात्मिक विचार करतो. केवळ मानवाचाच विचार करतो असे नाही, तर विश्वातील किड्यामुंग्यांपासून सगळ्या प्राणिजगताचा विचार करतो. आपली प्रार्थना ‘सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामया। सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दु:ख भाग्भवेत्॥’ अशी आहे. पाश्चात्त्य विचार ‘पुष्कळांचे पुष्कळ सुख’ इथवरच येऊन थांबले आहे. आपण मात्र सर्व विश्वाच्या सुखाची कामना करणारा विचार देणारे आहोत. ज्ञानदेवांचे पसायदान हे याचे अप्रतिम उदाहरण आहे.
श्रीगुरुजी प्रश्न करतात की, पुष्कळांचे पुष्कळ सुख यातील सुखाची कल्पना कोणती आहे? पाश्चात्त्य जीवनपद्धती व्यक्तिसुखाला सर्वाधिक महत्त्व देते आणि सुख म्हणजे इंद्रियांना जे प्रिय वाटेल ते प्राप्त करणे. इंद्रियांना सुख देणार्या साधनांची निर्मिती करणे, ही साधने मिळविण्यासाठी छोट्या छोट्या देशांच्या साधनसंपत्तीवर कब्जा करणे, त्याची लूटमार करणे, वसाहतवादाचा जन्म यातून झालेला आहे. दुसर्यांना लुबाडून स्वत: सुखी होणे हा आसुरी मार्ग आहे. श्रीगुरुजी सांगायला विसरत नाही की, भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत या आसुरी गुणांचे वर्णन केलेले आहे. साधनसंपत्तीवर ताबा मिळविण्याच्या चढाओढीत पहिले-दुसरे महायुद्ध झाले आणि शीतयुद्धदेखील त्यासाठीच झाले. आपला मार्ग हा नाही.
आपला मार्ग कोणता आहे, हे सांगताना श्रीगुरुजी सांगतात की, सर्व मानवाला सुखी करण्यासाठी आपले पूर्वज चीन, जपानपासून ते अमेरिकेपर्यंतही गेले होते. दक्षिण आशियातील लोकांना त्यांनी सुसंस्कृत केले. त्यांना मानवधर्म दिला. त्यांची लूटमार केली नाही. त्यांना समृद्ध केले. यामुळे जगातील अनेक मानववंशांना आजही भारताचे आकर्षण असते. भारत ही पवित्र भूमी आहे या भावनेने ते भारताकडे बघतात.
हा आपला वारसा आपण जतन केला पाहिजे, समृद्ध केला पाहिजे. मनुष्य हा केवळ भौतिक गरजांचे गाठोडे नसून तो चैतन्याचा आविष्कार आहे. ते एकच चैतन्य सर्वव्यापी आहे, सर्व जीवसृष्टीत आहे, सर्व मानवसमूहात आहे. या चैतन्याने आपण बांधले गेलेलो आहोत. आफ्रिकेतील कृष्णवर्णीय माणूस माझ्यासारखा नाही, जपानी माणूसदेखील माझ्यासारखा नाही, पण चैतन्यरूपाने आपण सर्व समान आहोत, हा हिंदू विचार आहे. वरवर दिसणारे भेद नसून ती विविधता आहे. ती ईश्वरनिर्मित आहे. तिचे जतन केले पाहिजे. एकसारखेपणा निर्माण करणे हा कम्युनिझमचा विचार आहे. ख्रिश्चानिटीतून उदय पावलेल्या लोकतंत्रवादाचा विचार आहे. आपला विचार आध्यात्मिक आहे.
केवळ विचार सांगून कुणी ऐकत नाही, विचार जगावा लागतो. श्रीगुरुजींचे सांगणे होते की, हा विचार आपण आपल्या समाजजीवनात जगला पाहिजे. हिंदू संघटन त्यासाठी आहे. हिंदू विचार जगणारे जन उभे राहणे हे संघाचे लक्ष्य आहे. विचार जगणार्या लोकांचा समूह हेच त्या विचाराचे सामर्थ्य असते. असा सामर्थ्यसंपन्न हिंदू समाज उभा करण्यासाठी श्रीगुरुजींनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले.
त्याचे आज सुपरिणाम कोणते दिसतात? समाजात चालणार्या घडामोडींचे जर बारकाईने निरीक्षण केले, तर अनेक गोष्टी समजू लागतात. कालपर्यंत हिंदू शब्दाचे वावडे असणारे मोठमोठे लोक आता म्हणू लागले आहेत, ‘होय, मी हिंदू आहे, भारतात हिंदू राज्य आणायचे आहे.’ मी हिंदू का आहे? हे शशी थरूर यांना पुस्तक लिहून सांगावे लागते. एखादा मुस्लीम मौलवी आपल्या अस्मितेची ओळख झाल्यानंतर हिंदूपणाचा स्वीकार करतो. अॅकॅडमिक क्षेत्रातील मोठमोठी मंडळी आता सांगू लागली आहेत की, आक्रमक आर्य सिद्धान्त खोटा आहे, आपले वेद ज्ञानाची भंडारे आहेत. आपली संस्कृत भाषा ही भाषाशास्त्रीयदृष्ट्या जगातील श्रेष्ठ भाषा आहे. यापैकी असंख्य मंडळी कधीही संघशाखेत गेलेली नाहीत. अचानक ही सर्व मंडळी आपल्या अस्मितेच्या शोधाच्या मागे का लागली? याचे एका वाक्यात उत्तर द्यायचे, तर श्रीगुरुजींचे तपस्वी जीवन. तपाचा प्रभाव वातावरण निर्माण करतो आणि त्याच्या लहरी कोणाला कशा परिणाम देतील, हे सांगता येत नाही.
हिंदू जातींचे हे वैश्विक लक्ष्य संघस्वयंसेवक पंतप्रधान नरेंद्र मोदी वैश्विक पटलावर मांडत आहेत. जगाने त्यांना विश्वनेता म्हणून स्वीकारले आहे. त्यांच्या पाठीमागे रशिया, चीन, अमेरिकेप्रमाणे संहारक आसुरी सामर्थ्य नाही. विश्वाला अभय देणारे सांस्कृतिक सामर्थ्य आहे. विश्वपटलावर ते भारताचा आध्यात्मिक विचार घेऊन जातात. त्या वेळेच्या काळाच्या संदर्भात श्रीगुरुजींनी त्याची मांडणी करून ठेवली आहे. परिस्थिती बदलते, पण शाश्वत सिद्धान्त बदलत नाहीत.
आजच्या परिस्थितीच्या संदर्भात श्रीगुरुजींचे शाश्वत विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्वपटलावर कसे मांडतात, हे अभ्यास करण्यासारखे आहे. (‘लोकनेता ते विश्वनेता : नरेंद्र मोदी’ या विवेकच्या ग्रंथाचे अवलोकन करावे.) नरेंद्र मोदी यांनी शरीर, मन, बुद्धी आणि आत्मतत्त्व यांच्या संतुलित विकासाचा योगमार्ग जागतिक पटलावर नेला आहे. 2021 या वर्षी 173 देशांनी 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योगदिवस’ म्हणून साजरा केला.
मानवी जीवन सुखी होण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण झाले पाहिजे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर केला पाहिजे. कोळसा आणि खनिज तेलाचा वापर कमी केला पाहिजे. जंगलांचे रक्षण झाले पाहिजे. जीवसृष्टीचे रक्षण झाले पाहिजे. जागतिक व्यासपीठांवरून नरेंद्र मोदी हा विचार सांगतात आणि भारत या बाबतीत काय करतो आहे, हे सांगतात. भारत जगाला यापैकी काय देऊ शकतो, हे सांगतात. जग सुखी झाले पाहिजे, यासाठी मानवी समूहाला उत्तम आरोग्य लाभले पाहिजे. कोरोना महामारीच्या संकटात भारताने गरीब देशांना मुक्तहस्ताने औषधी पुरवठा केला. ‘सर्वे सन्तु निरामय:’ हा मंत्र असा जगावा लागतो.
जग संस्कृती संघर्षाची भाषा करते. मोदी संस्कृती समन्वयाची आणि सामंजस्याची भाषा करतात. दहशतवाद हा असहिष्णू विचारातून जन्म पावतो, म्हणून जगाने ‘जगा आणि जगू द्या, दुसर्याचे चांगलेपण शोधत राहा’ या मार्गाने गेले पाहिजे. अत्यंत कौशल्याने मोदी हा विषय मांडतात. मोदींच्या शब्दामागे हे सामर्थ्य हिंदू समाजाने उभे केले आहे. 1973 साली श्रीगुरुजींचे निधन झाले. तोपर्यंत हिंदू जीवनमूल्ये जगणारी एक भक्कम पिढी श्रीगुरुजींनी उभी केली. 1973 ते 2014 या कालखंडात या पिढीचा प्रचंड विस्तार झाला. आपल्याला सर्वत्र विजय प्राप्त करायचा आहे, या आकांक्षेने भारावलेले असंख्य तरुण उभे राहिले. ते जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत गेले, हिंदू जीवनदर्शनाच्या आधाराने राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या कामात अग्रेसर झाले आणि यातून हिंदू विचार जगणारी एक शक्ती देशात निर्माण झाली. राजकीय क्षेत्रात नरेंद्र मोदी या शक्तीचे प्रतिनिधित्व करतात.
आपल्या अंतिम भाषणात श्रीगुरुजींनी संदेश दिला, तो संदेश ‘सर्वत्र विजयच विजय आहे’ या शब्दात प्रकट झाला. विजया एकादशीला जन्मलेल्या या महापुरुषाने चिरविजयी राष्ट्रासाठी आपल्या जीवनाचाच यज्ञ केला. घोर तपस्या केली. या तपस्येचा पुण्यप्रभाव म्हणून आजचा राष्ट्रजागृत भारत आहे.