संसदेतच राष्ट्र संकल्पनेवर प्रश्न उपस्थित करून खळबळ निर्माण करता आली, तर जनतेत त्याचे पडसाद कसे उमटतात? अशा राष्ट्रविरोधी भूमिकेमुळे राहुल गांधींना जनधार मिळणार आहे का? चंद्रशेखर यांनी नवीन घटना तयार करण्याची मागणी करण्यामागे काय कारण असावे? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असले, तरी या मंडळींना भारतीय जनतेचा राष्ट्रीय आत्मा कळला नाही, हेही लक्षात येते. ‘विदेशी षड्यंत्र विरुद्ध राष्ट्रभावना’ असा हा सामना आहे, ‘विखंडनाचे स्वप्न विरुद्ध अखंडतेचे वास्तव’ असा आहे...
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँगेसचे नेते राहुल गांधी यांनी सांगितले की भारत हे राष्ट्र नसून राज्यांचा संघ आहे. संविधानातसुद्धा राष्ट्र संकल्पना नसून राज्य हाच महत्त्वाचा घटक आहे. आपल्या भाषणात राहुल गांधींनी राष्ट्र ही संकल्पना नाकारताना राज्यांना म्हणजेच प्रदेशांना महत्त्व देऊन त्यांना अधिक स्वातंत्र्य दिले पाहिजे, असे म्हटले. राहुल गांधींप्रमाणेच तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर यांनीही राज्यांच्या क्षमता वाढवण्यासाठी, राज्यांना सक्षम करण्यासाठी नव्याने राज्यघटना लिहिली पाहिजे, अशी मागणी केली आहे. राहुल गांधी, चंद्रशेखर हे दोघेही राजकारणात दीर्घकाळ काम करत आहेत, त्यामुळे त्यांचे म्हणणे केवळ शब्दार्थाने समजून न घेता त्यामागील भावार्थही समजून घेतला पाहिजे.
दोघेही राज्यघटनेविषयी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याआधारे देशाच्या विखंडनाचे अप्रत्यक्षपणे समर्थन करतात, हे आपण सर्वात आधी लक्षात घेतले पाहिजे. राज्ये सक्षम झाली पाहिजेत, सक्षम झाली पाहिजेत असे म्हणताना ही मंडळी प्रादेशिक अस्मितेचे आणि फुटीरतावादाचे बीजारोपण करत आहेत. याआधी स्वतंत्र खलिस्तान, स्वतंत्र द्रविड राष्ट्र, स्वतंत्र दलितस्तान अशा मागण्या पुढे आल्या आहेत. भारत नावाच्या राष्ट्रातून फुटून वेगळे निघण्याच्या मानसिकतेला बळ देण्याचे काम अशा राज्यघटनाविरोधी विधानांतून होते. या गोष्टींचा निषेध केला पाहिजे.
आज राष्ट्र या व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उमटवले जात असताना एक हजार वर्षांपूर्वी संपूर्ण भारत देश उभा-आडवा पिंजून समतेचा संदेश देणार्या रामानुजाचार्य यांच्या 216 फूट उंचीच्या भव्य प्रतिमेचे अनावरण नुकतेच झाले. खरे तर हा धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रातील सोहळा, पण राहुल गांधी, चंद्रशेखर या मंडळींच्या वक्तव्यामुळे त्याला समकालीन संदर्भ प्राप्त झाले आहेत असे आम्हाला वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भव्य प्रतिमेचे अनावरण करताना ‘समानतेचे प्रतीक’ (स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी) या शब्दांचा वापर केला. एक हजार वर्षांपूर्वी रामानुजाचार्य यांनी भारतभ्रमण करून समतेची शिकवण दिली, महिलांना सन्मानाचे स्थान दिले. रामानुजाचार्यांच्या समतेचा लसावि मांडायचा, तर असे म्हणता येईल की, काश्मीर ते कन्याकुमारी आणि कामरूप ते कच्छ आम्ही समान आहोत, सारखे आहोत, एकरूप आहोत. या प्रसंगी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, “संत रामानुजाचार्यांची प्रतिमा भारतासाठी आणि जगासाठी समानतेचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास’ या मंत्राने आज देश नवीन भविष्याचा पाया रचत आहे. रामानुजाचार्यांचा हा पुतळा येणार्या पिढ्यांना प्रेरणा तर देईलच, तसेच भारताची प्राचीन ओळख बळकट करेल. समाजातील प्रत्येक घटकाचा विकास झाला पाहिजे. कोणताही भेदभाव नसावा. ज्यांना शतकानुशतके छळले गेले, त्यांनी पूर्ण सन्मानाने विकासाचे भागीदार व्हावे यासाठी आजचा बदलता भारत एकसंघ प्रयत्न करत आहे. पुरोगामित्व आणि पुरातनता यामध्ये कोणताही विरोधाभास नाही. सुधारणेसाठी आपल्या मुळापासून दूर जावे लागेल असे नाही, तर आपण खर्या मुळाशी जोडले जाणे, आपल्या खर्या शक्तीची जाणीव होणे महत्त्वाचे आहे, कारण तेव्हाच खर्या अर्थाने सुधारणा साध्य होते.”
या मांडणीचा अर्थ असा की आपण संघटित राहिलो, तरच गतिमान आणि शाश्वत विकास साध्य करू शकू. भारतीय चिरंतन तत्त्वज्ञान सर्वमंगलाची कामना करते, सर्वांच्या सुखासमाधानाचा मंत्र देते. आपण आपल्या क्षमता समजून घेतल्या तरच आपण शक्तिमान होऊ, जगताला मार्गदर्शक ठरू.
मात्र क्षुद्र राजकारणापोटी आपल्या देशाच्या एकसंधतेवर, राज्यघटनेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा देश विखंडित झाला, तर आंतरराष्ट्रीय राजकारणाची दिशा बदलता येईल, अशी मनीषा असणारी राष्ट्रे आपल्या देशातील बोलक्या बाहुल्यांना हाताशी धरून खेळ खेळत असतात. संसदेतच राष्ट्र संकल्पनेवर प्रश्न उपस्थित करून खळबळ निर्माण करता आली, तर जनतेत त्याचे पडसाद कसे उमटतात? अशा राष्ट्रविरोधी भूमिकेमुळे राहुल गांधींना जनधार मिळणार आहे का? चंद्रशेखर यांनी नवीन घटना तयार करण्याची मागणी करण्यामागे काय कारण असावे? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असले, तरी या मंडळींना भारतीय जनतेचा राष्ट्रीय आत्मा कळला नाही, हेही लक्षात येते. ‘विदेशी षड्यंत्र विरुद्ध राष्ट्रभावना’ असा हा सामना आहे, ‘विखंडनाचे स्वप्न विरुद्ध अखंडतेचे वास्तव’ असा आहे, ‘तोडा-फोडा आणि राज्य करा’ ही इंग्रजाची नीती अंगीकारणार्यांविरुद्ध आम्ही सगळे एक आहोत, भारतमातेची लेकरे आहोत, म्हणजे भारतीयत्व जगण्याचा आहे.
आपण या सामन्यात राष्ट्रभावना, अखंडता, भारतीयत्व यांची पाठराखण केली पाहिजे.