पुण्यात होणार ‘गो’मंथन

विवेक मराठी    09-Dec-2022   
Total Views |
भारतीय देशी गायींचे महत्त्व लक्षात घेण्यासाठी आणि त्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी पुण्यात भोसरी येथे 24 व 25 डिसेंबर या कालावधीत जनमित्र सेवा संघ व सहयोगी संस्थांतर्फे विश्व गो परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. गो-आधारित ग्रामनिर्मिती करणे यासह विविध उद्देश डोळ्यांसमोर ठेवून या परिषदेची आखणी करण्यात आली आहे.
 
 
vivek
भारतभूमीत वेदकाळापासून गायीचे महत्त्व वर्णिले आहे. पंचगव्याच्या वैज्ञानिक पद्धतीने, अभ्यासाने व संशोधनाने तयार झालेल्या उत्पादनांची वैज्ञानिक सिद्धता दर्शविणारे अनेक प्रयोग यशस्वी झाले आहेत. त्यामुळेच भारतासारख्या कृषिप्रधान देशात शाश्वत शेतीसाठी योग्य पर्याय म्हणून देशी गायीकडे पाहिले जाते. ‘गो’ हाच विषय केंद्रस्थानी ठेवून जनमित्र सेवा संघ (पुणे), गोविज्ञान अनुसंधान केंद्र (देवलापार), विवेक विचार समूह (मुंबई), पुणे पांजरापोळ, चितळे बंधू दूध केंद्र (भिलवडी), रोटरी क्लब पुणे, वकीलसाहेब सेतुबंध न्यास (पुणे), पुण्यधाम आश्रम (कोंढवा) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील भोसरी येथील गौधाम पांजरापोळ येथे 24 व 25 डिसेंबर 2022 रोजी ‘विश्व गो परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर 21 ते 25 डिसेंबर दरम्यान हरिद्वार येथील प.पू. बालसंन्यासी अनिरुद्ध तीर्थ स्वामी हे ‘कामधेनू यज्ञ’ करणार आहेत. ही परिषद यशस्वी होण्यासाठी सध्या युद्धपातळीवर नियोजन सुरू आहे. सुमारे पाच लाखापेक्षा जास्त गोप्रेमी या परिषदेला प्रत्यक्ष भेट देतील, तर ऑनलाइनच्या माध्यमातून सुमारे 23 देशांतील असंख्य नागरिक या परिषदेत सहभागी होतील; शिवाय पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूरसह विविध जिल्ह्यांतील शाळांच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभणार आहे, असा संयोजकांनी विश्वास व्यक्त केला आहे.
या परिषदेत सहभागी होणार्‍या प्रत्येक व्यक्तीला एकाच वेळी आणि एकाच जागी गो-क्षेत्रातील आणि त्यांच्याशी निगडित वैज्ञानिक माहिती मिळेल आणि ती सर्वांसाठी उपयुक्त ठरेल, अशी प्रदर्शनाची रचना करण्यात आली आहे.
 
 
परिषदेचे मुख्य आकर्षण
 
 
‘पुणे पांजरापोळ ट्रस्ट’ ही 1855पासून गोसंरक्षण आणि संवर्धन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. 1944पासून संस्थेने भोसरी (जि. पुणे) येथे देशी गोवंशाच्या संगोपनासाठी दहा एकर क्षेत्रावर गोशाळा उभारली आहे. ही देशातील वैशिष्ट्यपूर्ण गोशाळा म्हणून ओळखली जाते. या ठिकाणाहून विविध गो-आधारित उत्पादनांची निर्मिती आणि विक्री केली जाते. या गोशाळेला दर वर्षी देशातील व राज्यातील हजारो नागरिक भेट देत असतात. आता याच गोशाळेच्या स्थळावर विश्व गो परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या निमित्ताने देशभरातील नागरिकांना या गोशाळेला भेट देण्याची संधी मिळाली आहे. एका अर्थाने ही परिषद सर्वांसाठी पर्वणी ठरली आहे.
 


vivek 
 
मान्यवरांकडून होणार विचारमंथन
 
 
दोन दिवस चालणार्‍या या परिषदेत प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. विजय भटकर, गोपालभाई सुतारिया (संस्थापक, बंसी गीर गोशाळा, अहमदाबाद), हुकूमचंदजी सावला (आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष, विहिंप), पशुतज्ज्ञ डॉ. नितीन मार्कंडेय (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी), सुनील मानसिंहका (गोविज्ञान अनुसंधान केंद्र, देवलापार), हणमंतराव गायकवाड (बीव्हीजी उद्योग समूह), गणेश चितळे (चितळे दूध उद्योग केंद्र, भिलवडी), गणेश देशपांडे (उपायुक्त, महाराष्ट्र), डॉ. राहुल शिंदे, गिरीश कुलकर्णी, प्रमोद मोघे आदी मान्यवर सहभागी होऊन उपस्थितांशी संवाद साधतील.
 
 
गो-आधारित आत्मनिर्भर ग्राममनिर्मिती, देशी गोवंशाचे जतन व संवर्धन, आदर्श गोशाळा निर्मिती, गो-आधारित शेती व पंचगव्य निर्मिती, पंचगव्य चिकित्सा, गो-उत्पादनांची निर्मिती व ब्रँडिंग यासह विविध विषयांचा मुद्देसूद आढावा या परिषदेच्या सत्रांतून घेण्यात येणार आहे.
 

vivek
 
 
विविध विषयांचा ठराव
 
 
परिषदेमध्ये तज्ज्ञांच्या व नागरिकांच्या वतीने येणार्‍या सूचनांनुसार विविध ठराव पारित करण्यात येणार आहेत. गायरान जमीन गोपालक संस्थांना मिळावी, प्रत्येक राज्याला गोसेवा आयोग बंधनकारक करण्यात यावा, गोमाता संगोपनासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान देण्यात यावे, गो संरक्षण कायद्यातील कमतरता व त्रुटी दूर करून गो कायदा कडक स्वरूपात आणावा, प्रत्येक शासकीय रुग्णालयात, नोंदणीकृत रुग्णालयात पंचगव्य चिकित्सा विभाग सुरू करावा, अशा विविध विषयांवर ठराव मांडण्यात येणार आहेत.
 

vivek 
 
गो-आधारित आकर्षक प्रदर्शन
 
 
10 एकर क्षेत्रावरील गो-प्रदर्शन हे परिषदेचे आणखी एक वैशिष्ट्य. या प्रदर्शनात विविध प्रांतांतील गो-उत्पादन करणार्‍या कंपन्या, संस्था सहभाग नोंदविणार आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणीच भारतातील जातिवंत दुधाळ गोवंश पाहावयास मिळणार आहेत. देशी गायीचे संगोपन, व्यवस्थापनाची शास्त्रीय माहिती, दूध व शेणापासून मूल्यवर्धन कसे करता येईल यासारखे दालन या प्रदर्शनात आकर्षण ठरणार आहे. प्रत्येक दालनात विशिष्ट स्टॉलला भेट देण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. यासाठीचे चोख व्यवस्थापन करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी 23, 24 डिसेंबर रोजी गोमाताविषयक माहितीचे चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी चित्र प्रदर्शन व उत्पादन यावर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात येणार आहे.
गो-विज्ञानाविषयी नागरिकांचा दृष्टीकोन वैज्ञानिक होण्यास आणि गोविषयक माहिती प्रत्यक्ष स्वरूपात मिळण्यास ही परिषद अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
 
 
अधिक माहितीसाठी संपर्क
। 9422995528
 

vivek 

विकास पांढरे

सध्या सा.विवेकमध्ये उपसंपादक, एम.ए.बीएड पर्यंतचे शिक्षण. वयाच्या १६ व्या वर्षापासून सोलापूर 'तरुण भारत' मध्ये वार्ताहर म्हणून कामास प्रारंभ. पुढे दैनिक तरूण भारत, सुराज्य,पुढारीमध्ये वार्ताहर व उपसंपादक. कृषी,साहित्य, व वंचित समाजाविषयी सातत्याने लिखाण.