यशाने आत्मविश्वासात झालेली वाढ आणि पराभवाने दिलेले धडे यातून भाजपा पुढील निवडणुकांसाठीची रणनीती आखेल, अशी आशा आहे.
नुकत्याच झालेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत आणि त्याच दरम्यान झालेल्या दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत, भाजपा या देशातील मुख्य राजकीय पक्षाला जय-पराजय दोन्हींना सामोरे जावे लागले आहे. या निवडणुकांपासून देशातला महत्त्वाच्या निवडणुकांचा मोसम सुरू झाला आहे. या मोसमाच्या सुरुवातीच्या टप्प्यात भाजपाच्या वाट्याला जय-पराजय दोन्ही आले ते पक्ष म्हणून हितकर ठरेल.
जवळजवळ तीन दशके गुजरातेत भाजपा सत्तेवर आहे आणि तरीही मतदारांनी पुन्हा एकदा भाजपाच्या पारड्यात मताचे दान टाकले आहे. एवढेच नव्हे, तर 182पैकी 156 जागांसाठी भाजपाचे उमेदवार निवडून हा ऐतिहासिक विजय मिळवून दिला आहे. याला कारण लोकोपयोगी विकासकामांमधून भाजपाने जनतेचा संपादन केलेला विश्वास. त्यावरच मतदारांनी पुन्हा एकदा पसंतीची मोहोर उमटवली आहे. अँटीइन्कम्बन्सीचे वारे गुजरातमध्ये वाहत नसल्याचे हे निदर्शक असले, तरी लोकमताचा आदर राखत योग्य वेळी मंत्रीमंडळात केलेला बदल, मोरबी पूल दुर्घटनेनंतर भाजपाने केलेले मदतकार्य, अमित शाह यांनी निवडणुकीचे केलेले अतिशय चोख नियोजन, कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या प्रचारसभा या सगळ्याचे भाजपाच्या यशात योगदान आहे.
गुजरातेत ऐतिहासिक यश मिळवलेल्या भाजपाला हिमाचल प्रदेशात मात्र मतदारांनी पुन्हा सत्तेची सूत्रे दिली नाहीत. यामागे, सत्तेवर असताना सरकारकडून झालेल्या काही चुका आणि हिमाचली जनता नेहमीच प्रस्थापितांविरोधात मतदान करते ही महत्त्वाची कारणे आहेत. मात्र या राज्यात भाजपाला पराभव स्वीकारावा लागला असला, तरी काँग्रेस आणि भाजपा यांना मिळालेल्या मतांमध्ये एका टक्क्याचेही अंतर नाही, हे नमूद करायला हवे.
म्हणूनच सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे - गुजरातमधला ऐतिहासिक विजय भाजपाच्या सर्व स्तरांतल्या कार्यकर्त्यांचा कामातला हुरूप वाढवेल, तर हिमाचल प्रदेशात वाट्याला आलेला पराभव आत्मपरीक्षण करायला, चुका टाळून मार्गक्रमण करायला उद्युक्त करेल.
गुजरातमध्ये आधीच निस्तेज झालेली काँग्रेस या निकालानंतर नामशेष होण्याच्या मार्गावर चालली आहे, असे म्हणता येईल. विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळण्याएवढेही काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले नाहीत. ही नामुश्की ओढवण्यामागे स्थानिक नेतृत्वाची वानवा, भाजपाला जाऊन मिळालेले नाराज आमदार, या निवडणुकीकडे गांधी घराण्याने केलेले अक्षम्य दुर्लक्ष, काँग्रेसच्या नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्षांनी प्रचारसभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेली आक्षेपार्ह टीका.. अशी अनेक कारणे आहेत. आधीच जनाधार गमावलेल्या काँग्रेसचे जहाज बुडवायला ती पुरेशी आहेत. ऐशआरामी ‘भारत जोडो’ यात्रेत मग्न असलेल्या राहुल गांधींनी आपली यात्रा गुजरातेतून नेली नाही आणि फुटकळ 2-3 प्रचारसभा घेण्यापलीकडे या निवडणुकीत रसही दाखवला नाही. शीर्षस्थ नेत्याच्या या उदासीनतेचा व्हायचा तो परिणाम झाला आणि पक्ष पराभवाचा एक नवा नीचांक स्थापित झाला. पुढच्या वर्षी होत असलेल्या 4 राज्यांच्या निवडणुकांमध्येही काँग्रेसचे श्रेष्ठी असेच उदासीन राहिले, तर पक्ष देशातून अस्तंगत व्हायला फारसा वेळ लागणार नाही. याचा फायदा ‘राष्ट्रीय पक्षा’चा दर्जा मिळालेल्या ‘आप’ला होणार आहे. ते देशासाठी धोकादायक ठरू शकते. (नियत आणि इरादे नेक नसल्याचे या पक्षाने दिल्लीत आणि पंजाबमध्ये दाखवून दिले आहे.) ‘आप’ला गुजरातमध्ये जेमतेम पाच जागा मिळाल्या असल्या आणि हिमाचल प्रदेशमध्ये शून्यावर बाद झाला असला, तरी या पक्षाचा विस्तार हा देशासाठी डोकेदुखी ठरू शकतो. या पक्षाच्या नेतृत्वाच्या फाजिल आत्मविश्वासाला गुजरातेतील मतदारांनी टाचणी लावली असली, तरीही भाजपाने सावध राहायला हवे. गुजरातमध्ये ‘आप’चा झालेला चंचुप्रवेश ही धोक्याची घंटा आहे, हे लक्षात घेऊन पावले टाकायला हवीत.
या दोन विधानसभा निवडणूक निकालांइतकेच महत्त्वाचे आहेत दिल्ली महापालिकेचे निकाल. गेली 15 वर्षे दिल्ली महापालिकेत सत्तास्थानी असलेल्या भाजपाला पुन्हा निवडून देण्याऐवजी दिल्लीकरांनी ‘आप’ला पसंती दिली, तरी भाजपाला 104 जागांवर विजय मिळवता आला. एक्झिट पोलने भाजपासंदर्भात जे अंदाज वर्तवले होते, तितकीही घसरण झाली नाही. आता विरोधी बाकांवर बसून ‘आप’वर लक्ष ठेवण्याचे काम भाजपा करेल, तेही महत्त्वाचेच!
तेव्हा मिळालेल्या यशाने आत्मविश्वासात झालेली वाढ आणि पराभवाने दिलेले धडे यातून भाजपा पुढील निवडणुकांसाठीची रणनीती आखेल, अशी आशा आहे.