समाजाच्या सुखदु:खाचा भाष्यकार

विवेक मराठी    05-Dec-2022   
Total Views |
ग्रामीण मराठी साहित्याचे अर्ध्वयू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या निधनाने मराठी साहित्यात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. डॉ. कोत्तापल्ले यांनी कथा, कादंबरी, कविता आणि समीक्षा अशा सर्वच भूमिकांमधून मराठी साहित्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. शेती-मातीत आणि उन्हा-पावसात राबणार्‍या शेतकर्‍यांचे चित्रण ते करतात. मुख्य म्हणजे ’माणुसकी’ ही त्यांच्या साहित्यातून प्रकट होणारी जाणीव आहे. माणूसपणाची जाणीव जागृत व्हावी व तशा प्रकारचा समाज निर्माण व्हावा, हेच त्यांच्या साहित्याचे मुख्य अधिष्ठान आहे.

kottapali
मराठी ग्रामीण साहित्यात महत्त्वाचे योगदान देणारे डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी कथा, कादंबरी, कविता आणि समीक्षा अशा सर्वच साहित्यप्रकारांत लेखन केले. त्यांनी शेती-मातीत आणि उन्हापावसात राबणार्‍या शेतकर्‍यांचेे जिवंत चित्रण केले. ‘माणुसकी’ हा त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू होता. माणूसपणाची जाणीव असणारा समाज, हेच त्यांच्या साहित्याचे मुख्य अधिष्ठान होतेे.
1960-70च्या दशकात मराठी साहित्यात जे विविध प्रवाह पुढे आले, त्यात ग्रामीण साहित्याचे स्थान विशेष आहे. यातील ग्रामीण लेखकांची पिढी अतिशय कसदार, आत्मभान आलेल्या वृत्तीतून अतिशय उत्कट आणि सशक्त लेखन करीत असे. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे त्यामधील एक महत्त्वाचे नाव.
 
 
 
मराठवाड्यातील मुखेडसारख्या अगदी छोट्या गावात डॉ. कोत्तापल्ले यांचा जन्म झाला. त्यामुळे ग्रामीण जीवन, प्रश्न, समस्या, निसर्ग, शेती हा सगळा भवताल त्यांनी जवळून अनुभवला, न्याहाळला होता. ते त्याचाच एक भाग होते, म्हणूनच त्यांच्या लेखनातून येथील समाजजीवनाचे, मानवी मूल्यांचे दर्शन घडत असे. ‘उलट चालिला प्रवाहो’, ‘गांधारीचे डोळे’ व ‘मध्यरात्र’ या त्यांच्या कादंबर्‍यांनी मराठी वाचकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. तर, ‘रक्त आणि पाऊस’, ‘कर्फ्यू आणि इतर कथा’ हे त्यांचे कथासंग्रह गाजले. कथाकार-कादंबरीकार कोत्तापल्ले यांनी समीक्षक म्हणून केलेले लेखनही नावाजले गेले. ‘नवकथाकार शंकर पाटील’, ‘साहित्याचा अन्वयार्थ’, ‘ग्रामीण साहित्य - स्वरूप व शोध’ या त्यांच्या समीक्षात्मक ग्रंथांना मराठी समीक्षेत मानाचे स्थान आहे.
 
 
 
कोणत्याही व्यवस्थेला दोन बाजू असतात. त्यामुळे साहित्यिकाला एकांगी भूमिका घेता येत नाही. यासाठी साहित्यिकाला समकालीन वास्तव आणि त्यात जगणारी जिवंत माणसे समजून घ्यावी लागतात. आकलन झालेली वस्तुुस्थिती पात्रांच्या साहाय्याने आविष्कृत करावी लागते. डॉ. कोत्तापल्ले यांचे आकलन व्यापक आणि सूक्ष्मही होते. वास्तवाचा अन्वयार्थ लावून, तटस्थता राखत त्यांनी समाजजीवनाचे चित्रण केले. ‘उलट चालिला प्रवाहो’ या कादंबरीतून ग्रामीण समाजवास्तवाचे दर्शन घडते. या कादंबरीचा नायक समाजात अनेक प्रयोग करतो, पण त्याच्या वाट्याला अपयशच येते. त्याचबरोबर, आमच्या सांस्कृतिक परंपरेला, सामाजिक एकतेला कसा तडा गेला आहे याचे वास्तव दर्शन दलित व सवर्ण यांच्यातील संघर्षातून, प्रसंगांतून होते.
 
 
 
‘गांधारीचे डोळे’ या कादंबरीतून खेड्यातल्या ग्रामीण तणावाचे भीषण चित्रण समोर येते. भ्रष्टाचाराचा बकासुर खेड्यात कसा शिरला आहे, त्यामुळे गावाच्या समाजजीवनाचा, मानवी मूल्याचा कसा र्‍हास होतो आहे याचे दर्शन कोत्तापल्ले यांच्या या कादंबरीतून होते. या दोन्ही कादंबर्‍यांनी मराठी ग्रामीण साहित्यात मोलाची भर घातली. अज्ञान, दारिद्य्र आणि दु:ख यामुळे दिव्यांग बनत चाललेल्या मानवी मनाचे खरेखुरे चित्रण या दोन्ही कादंबर्‍यांतून येते. आज ग्रामीण म्हणविली जाणारी संस्कृती व तेथील मूल्यव्यवस्था आणि कृषी परंपरा झपाट्याने लोप पावत चालली आहे, ही पडझड थांबली पाहिजे, खेड्यातील ’माणुसकी’ जिवंत राहावी, असा सूर या कादंबर्‍यांतून दिसून येतो.
 
 
 
‘काफिला’ या कथेतून लहान मुलांचे भावविश्व प्रकट होते, तर याच संग्रहातील ‘कळा ज्या लागल्या जीवा’ कथेतून गरोदर स्त्रीच्या भावभावनांचे चित्रण येते. ‘तर हे असं’ या कथेत ते व्यक्तींच्या विविध प्रवृत्तीचे दर्शन घडवितात. ‘रक्त आणि पाऊस’ या कथासंग्रहात ग्रामीण आणि नागर जीवनातील ताणतणावाचे चित्रण केले आहे. ‘मूड्स’ या त्यांच्या कवितासंग्रहाने काव्यविश्वात विशेष स्थान निर्माण केले आहे.
 
 
 
समीक्षक रा.ग.जाधव डॉ. कोत्तापल्ले यांचे मूल्यमापन करताना म्हणतात, ‘नागनाथ कोत्तापल्ले यांनी एक कवी, कथाकार, कादंबरीकार, समीक्षक, संपादक आणि अनुवादक अशा सर्वच भूमिकांमधून मराठी साहित्यात आपला स्वतंत्र ठसा उमटविलेला आहे. सभोवतालचे अस्वस्थ करणारे समाजवास्तव, माणसाच्या वाट्याला आलेले दु:ख, यातना, त्याची होणारी कुचंबणा हाच डॉ. कोत्तापल्ले यांच्या लेखनाचा गाभा आहे. समाजभान असलेला आणि दुखर्‍या समाजमनाची भळभळती जखम टिपणारा हा लेखक जीवनाच्या सर्व बाजूंना स्पर्श करतो.’
 
 
 
चिपळूण येथे झालेल्या 85व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद भूषविण्याची संधी डॉ. कोत्तापल्ले यांना मिळाली. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरीही स्पृहणीय होती. साहित्यिकाइतकेच विद्यार्थिप्रिय प्राध्यापक, कुशल व्यवस्थापक, साक्षेपी समीक्षक हीदेखील त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती.

विकास पांढरे

सध्या सा.विवेकमध्ये उपसंपादक, एम.ए.बीएड पर्यंतचे शिक्षण. वयाच्या १६ व्या वर्षापासून सोलापूर 'तरुण भारत' मध्ये वार्ताहर म्हणून कामास प्रारंभ. पुढे दैनिक तरूण भारत, सुराज्य,पुढारीमध्ये वार्ताहर व उपसंपादक. कृषी,साहित्य, व वंचित समाजाविषयी सातत्याने लिखाण.