इंद्राचे प्रश्न आणि भगवंतांची उत्तरे

विवेक मराठी    21-Dec-2022   
Total Views |
 
देवलोकातील इंद्र आणि गौतम बुद्ध यांच्या भेटीचा आणि त्यांच्यातील प्रश्नोत्तरांचा तपशील असलेला ग्रंथ म्हणजे सक्क पन्ना सुक्त. आपल्याला या लेखात इंद्र प्रश्नांच्या पूर्वार्धाचा आणि उत्तरार्धाचा विचार न करता प्रत्यक्ष प्रश्न काय आहेत आणि भगवंतांनी त्यांची उत्तरे काय दिली आहेत, एवढे बघायचे आहे. का बघायचे आहे? असा प्रश्न लगेच निर्माण होतो. याचे उत्तर असे की, इंद्राचे प्रश्न अडीच हजार वर्षांपूर्वीचे प्रश्न नाहीत. आजच्या परिस्थितीला ते जसेच्या तसे लागू होतात. ते चिरकालिक आणि शाश्वत प्रश्न आहेत.
 
vivek
 
भगवान बुद्धांच्या कथांत आणि उपदेशांत देवांचा राजा सक्क म्हणजे इंद्र यांचे अनेक वेळा उल्लेख येतात. दिघ्घनिकाय या पाली ग्रंथात सक्क पन्ना सुत्त (इंद्र प्रश्न सुत्त) असा एक भाग आहे. बौद्ध वाङ्मयातील जवळजवळ सर्वच सुत्ते विस्ताराने खूप मोठी आहेत आणि त्याच्यामध्ये वाक्यांची पुनरावृत्ती सतत होत राहते. यामुळे लांबी खूप वाढते. फार तपशिलात सर्व माहिती दिलेली असते. ज्या काळात ही सुत्ते लिपिबद्ध झाली असतील, त्या काळात लिहिण्याची आणि बोलण्याची ती पद्धती असावी. आज तशी पद्धती नाही. मोजक्या शब्दात मोजके लिहावे लागते आणि आजच्या सोशल मीडियाच्या युगात दीड-दोनशे शब्दांतच विषय पूर्ण करावा लागतो. लांबलचक वाचण्यासाठी लागणार वेळ आणि मनोधैर्य कमी कमी होत चालले आहे.
 
 
 
सक्क पन्ना सुत्त हेदेखील खूपच लांबलचक आहे. त्याचे तीन भाग होतात. देवलोकातील इंद्र भगवान गौतम बुद्ध यांच्या भेटीस आलेला आहे आणि त्याच्या मनात काही प्रश्न आहेत. त्याच्या भेटीला येण्याचा सगळा प्रसंग या सुत्तात फार तपशीलवार सांगितला आहे. प्रश्नाची ती पार्श्वभूमी आहे. दुसरा भाग प्रश्न-उत्तरांचा आहे आणि तिसरा भाग उत्तरातील गहन अध्यात्म चिंतनाचा आहे. अध्यात्म हा शब्द बौद्ध वाङ्मयात वापरला जात नाही, हे मला माहीत आहे. तरीदेखील तो मी वापरला आहे, याचे कारण असे की, त्यात उत्तरातील एकेका विषयाचा सूक्ष्मात जाऊन विचार केलेला आहे. तो समजायला आणि आकलन व्हायला कठीण आहे आणि वृत्तपत्रीय लेखाचा तो विषयदेखील होऊ शकत नाही. आपल्याला या लेखात इंद्र प्रश्नांच्या पूर्वार्धाचा आणि उत्तरार्धाचा विचार न करता प्रत्यक्ष प्रश्न काय आहेत आणि भगवंतांनी त्यांची उत्तरे काय दिली आहेत, एवढे बघायचे आहे.
 
 
 
का बघायचे आहे? असा प्रश्न लगेच निर्माण होतो. याचे उत्तर असे की, इंद्राचे प्रश्न अडीच हजार वर्षांपूर्वीचे प्रश्न नाहीत. आजच्या परिस्थितीला ते जसेच्या तसे लागू होतात. ते चिरकालिक आणि शाश्वत प्रश्न आहेत. इंद्राचा पहिलाच प्रश्न असा आहे, “वंदनीय महोदय, देवलोक आहे, मनुष्यलोक आहे, असुरलोक आहे, नागलोक आणि गंधर्वलोक आहे, येथे राहणार्‍या सर्वांची इच्छा भांडणापासून दूर राहण्याची असते. आपापसात सशस्त्र संघर्ष होऊ नये असे त्यांना वाटते, परस्पर विद्वेष वाढू नये आणि वातावरण कलुषित होऊ नये असेही त्यांना वाटत असते. असे असूनदेखील या वाईट गोष्टींपासून त्यांची सुटका होत नाही. अशा कोणत्या बंधनात ते अडकलेले असतात, ज्यामुळे ते मुक्त होत नाहीत?”
 
 
आज आपण ज्या परिस्थिती जगतो आहोत, या परिस्थितीला इंद्राचा प्रश्न लावला तर तो प्रश्न कसा होईल? तो असा होईल - जनतेला सुखासमाधानाने जगायचे असते. तिला भांडणे नको असतात, तरीदेखील वेगवेगळे राजकीय पक्ष आपापसात का भांडत असतात? महापरिवर्तन यात्रा, भारत जोडो यात्रा, संघर्ष यात्रा, महामोर्चे कशासाठी चालू असतात? शांतपणे आणि सुखाने जगण्याऐवजी कलह निर्माण करून जगण्यासाठी कोणत्या बेड्या कारणीभूत होतात?
 
 
नंतर इंद्र आणि गौतम बुद्ध यांचा संवाद सुरू होतो. एका प्रश्नाच्या उत्तरातून दुसरा प्रश्न निर्माण होतो, दुसर्‍या उत्तरातून तिसरा अशी ही मालिका सुरू होते. पहिल्या प्रश्नाचे उत्तर देताना भगवंत म्हणतात, “ईर्ष्या आणि मत्सर या दोन बेड्यांमुळे लोक अप्रसन्न होतात.” आजच्या परिस्थितीचा संदर्भ घेतला, तर त्याचा अर्थ असा होतो - जे आपल्यापेक्षा वरचढ झाले आहेत त्यांच्याविषयी ईर्ष्या निर्माण होते. त्यामुळे मग खोक्याची भाषा सुरू होते. दुसर्‍याचा विकास झाला, त्याला चांगले दिवस आले तर ते मत्सरामुळे सहन होत नाहीत. ईर्ष्या आणि मत्सर स्वस्थ बसू देत नाहीत. ज्याच्यात हेवा निर्माण झाला, तो अस्वस्थ होतो आणि भांडणाचे कारण शोधू लागतो. शत्रुत्वाची भाषा बोलू लागतो.
 
 
मत्सर हा असा दोष आहे, जो दुसर्‍याचा उत्कर्ष सहनच करू शकत नाही. मत्सराला काही कारण पुरते. एखादी विवाहित स्त्री परपुरुषाशी जर मैत्रिपूर्ण बोलू लागली, तर तिच्या नवर्‍याच्या मनात संशय निर्माण होतो आणि ती ज्याच्याशी बोलते त्याच्याविषयी मत्सर निर्माण होतो. दीर्घकाळ एका ठिकाणी काम करणार्‍या कर्मचार्‍यांवर एखादा नायक नेमल्यास बाकी कर्मचारी त्या नायकाचा मत्सर करू लागतात. आता हा आपल्याला अक्कल शिकविणार, असे त्यांना वाटू लागते.
 
 
 
या उत्तराने इंद्राचे समाधान होते. तो नंतर आणखी एक प्रश्न विचारतो, “ईर्ष्या आणि मत्सर कशातून निर्माण होतात?” इंद्राला विचारायचे आहे की, ईर्ष्या आणि मत्सराचे उगमस्थान कुठे आहे? भगवंत उत्तर देतात, “आवडत्या किंवा नावडत्या दृश्य गोष्टीपासून (पदार्थ, प्राणी, वस्तू) येथे त्यांचा जन्म होतो आणि तेथून त्यांचा उगम होतो.” भगवंतांना सांगायचे आहे की, आपल्या ज्ञानेद्रियांमार्फत आवडत्या-नावडत्या गोष्टींचा जोे अनुभव घेतो, त्यातून ईर्ष्या आणि मत्सर निर्माण होतात. आजच्या परिस्थितीच्या संदर्भात या प्रश्नाचा विचार केला, तर मोदींविषयी ईर्ष्या, द्वेष, मत्सर, निर्माण होण्याचे कारण मोदी आणि त्यांचा पक्ष असे दोघे जण असतात. या दोन्ही गोष्टी अनेकांना आवडत नाहीत. न आवडण्याची त्यांची वेगवेगळी कारणे असतात. मोदींमुळे सत्ता मिळत नाही आणि भाजपामुळे आपला पक्ष वाढत नाही, याचा राग, द्वेष, ईर्ष्या, मत्सर मनामध्ये असते. याच प्रकारे जागतिक भांडणतंट्याकडे बघितले, तर जागतिक स्तरावरील काही नेते एकमेकांशी स्पर्धा करीत राहतात. त्यांचे प्रेम आणि दुस्वास अतिशय टोकदार असतात, त्यातून ईर्ष्या, मत्सर निमाण होतात.
 
 
 
इंद्राचा तिसरा प्रश्न आहे की, “आवड आणि नावड कशातून निर्माण होते?” भगवंतांचे त्याला उत्तर आहे, “आवड आणि नावड निर्माण होण्याचे कारण तीव्र लालसा हे आहे.” ही लालसा अनेक प्रकारची असते. व्यक्तिगत जीवनातील लालसा वेगळ्या असतात आणि सार्वजनिक जीवनातील लालसा वेगळ्या असतात. सत्तेसाठी चाललेला निरंतर संघर्ष आपण रोज पाहत असतो. सत्तेवर बसलेल्यांची लालसा सत्तेवर राहण्याची असते आणि सत्तेपासून दूर असणार्‍यांची लालसा सत्तेवर येण्याची असते. या लालसेतून आवड, निवड, ईष्या, मत्सर आणि कलह निर्माण होत जातो.
 
 
 
इंद्राचा पुढचा प्रश्न आहे, “लालसा कशातून निर्माण होते?” भगवंत त्याचे उत्तर देतात, “लालसा विचारातून निर्माण होते.” इंद्राचा पुढचा प्रश्न आहे, “विचार कशातून निर्माण होतो?” भगवंतांचे त्यावर उत्तर, “मनात जे समज, गैरसमज वृद्धिंगत होतात, वाढत जातात, त्यातून विचारचक्र सुरू होते आणि विचारांचा जन्म होतो.”
 
 
 
अशा प्रकारे भगवंतांनी देवलोक, मनुष्यलोक, गंधर्वलोक, नागलोक इत्यादी समूहांत जे अशांती निर्माण करणारे विषय होतात, त्यांची कारणपरंपरा सांगितली आहे. देवलोक, मनुष्यलोक, गंधर्वलोक, नागलोक हे शब्द जर प्रतीकात्मक मानले, तर समाजात त्याचे प्रतिबिंब कसे दिसेल? तर ते असे दिसेल - सत्प्रवृत्त माणसांचा समूह, दुराचारी माणसांचा समूह, हिंसक लोकांचा समूह, केवळ उपभोगात रममाण असणार्‍यांचा समूह असे वेगवेगळे लोकसमूह तयार होतात. यापैकी प्रत्येकाला जगण्याची सुरक्षा पाहिजे असते. हिंसाचारी समूहदेखील समूहरूपाने आत्मघातकीपणा करीत नाही. दुसर्‍याला मारून जगायचे आहे ही त्याची मनीषा असते. इस्लामी जिहादी या गटात मोडतात. वेगवेगळ्या संप्रदायांचे भाविक लोक, वारकरी पंथांची मंडळी, साईबाबा, गोंदवलेकर महाराज, स्वामी समर्थ इत्यादींचा भक्तसंप्रदाय याला सज्जन वर्गात गणले पाहिजे. आणि उपभोग घेणारा वर्ग आपल्या आजूबाजूला भरपूर आहे. असे सगळे लोक आपापल्या ठिकाणी शांततेत जगू इच्छितात.
 
 
vivek
 
सत्तेसाठी चाललेले कलह ही शांती बिघडवितात. अशांती निर्माण करण्याचे विषय शोधून काढले जातात, खणून काढले जातात किंवा मेलेल्या प्रश्नांना जिवंत केले जाते. महापुरुषाचा अपमान झाला - मारा बोंबाबोंब.. सत्तेवरून आम्हाला खाली उतरविले - करा बोंबाबोंब.. निवडणुका येऊ घातल्या आहेत, तेव्हा उकरून काढा सीमाप्रश्न.. आणि यापैकी कोणताही प्रश्न खणून काढता आला नाही, तर जातीजातीत भांडणे लावून द्या, त्यासाठी आरक्षणाचा विषय.. तो कमी पडला, तर हिंदू-मुसलमानांत तेढ वाढविण्याचा विषय सुरू करा.
 
 
 
हे असे का होते, याची कारणे काय आहेत, याचे भगवंतांनी फार खोलात जाऊन विवेचन केले आहे. जिज्ञासू वाचकांनी ते पूर्णपणे वाचावे, अशी विनंती. नेटवर हे सर्व उपलब्ध आहे. ‘सक्क पन्ना सुत्त’ असे त्याचे शीर्षक आहे. मराठीत त्याचा अनुवाद होतो ‘इंद्र प्रश्न सुत्त’. हे आपले प्राचीन ज्ञान आहे. त्याला कोणत्याही धर्माचा रंग लावण्याचे कारण नाही. ते सर्व मानवजातीसाठी आहे. त्यातून सर्व काही शिकण्यासारखे आहे. आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे आचरणात आणण्यासारखे आहे. आपले राजकीय नेते कसे आचरण करतील, हे त्यांचा इतिहास सांगत असतो. आपण कसे आचरण करायचे हे आपण सर्वांनी मिळून ठरवायचे आहे. कलहमुक्तता, शांतता, परस्पर प्रेम, स्नेह या वातावरणात जर आपल्याला जगायचे असेल तर भांडकुदळ नेत्यांच्या मागे आपण जाऊ नये, हे त्याचे सरळ साधे उत्तर आहे. जेव्हा उत्तर सरळ साधे असते, तेव्हा ते अनेकांना पटत नाही आणि समजतही नाही, हे त्याचे दुर्दैव.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.