टाळ्या मिळवून लोकरंजनाची पावती मिळवण्यापेक्षा परंपरा जपत समाजप्रबोधन करणं हाच कोणत्याही लोककलेचा मूळ उद्देश असतो, असायला हवा. काही लोककला आधुनिक विचारधारांमध्ये वाहत जाऊन लोकानुनयात इतिकर्तव्यता मानत असल्या, तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातली ‘दशावतार’ ही लोककला मात्र परंपरा जोपासत आहे.
रात्र चढू लागते. जत्रेसाठी जमलेला मंदिराचा परिसर आणखी फुलून जातो. पखवाज वाजू लागतो. हार्मोनियमचे स्वरसुद्धा टिपलेला पोहोचतात. तसतशी गर्दी आणखी वाढू लागते. इतर वेळी शांततेच्या पांघरुणात गुडुप झालेलं गाव त्या रात्री मात्र मंदिराच्या प्रांगणात जमतं. दर वर्षी एकदाच हे असं घडत असतं. अख्खं गाव रात्र जागून काढतं आणि पहाट झाल्यावर दशावतारातल्या प्रयोगामधल्या आख्यानविषयाची चर्चा करतं. प्रयोगाचा समारोप होत असताना राम, कृष्ण किंवा त्या प्रयोगातल्या प्रमुख दैवताला मनोमन आठवत आपल्या आयुष्यातला दुर्दैवाचा दशावतार संपावा, असं साकडं घालत घरोघरी परततं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दर वर्षी कार्तिकी एकादशीपासून पुढचे साडेतीन ते चार महिने वेगवेगळ्या गावांमध्ये हे असंच चित्र असतं. त्याचं मुख्य कारण असतं ते ग्रामदैवताचा वार्षिक जत्रोत्सव आणि त्यानिमित्ताने होणारे दशावतारी नाट्यप्रयोग. दशावतार ही एक पारंपरिक लोककला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ग्रामदैवतांच्या जत्रोत्सवाशी या लोककलेचं जवळचं नातं आहे. आठशे वर्षांपासून जत्रोत्सव आणि दशावताराची परंपरा असल्याचं सांगितलं जातं.
त्यांचा नेमका कालावधी निश्चित करण्यासाठी अजूनही अभ्यास सुरू आहे, पण दशावतारी नाटकाचे प्रयोग होतात, त्यावरून सहज दृष्टिक्षेप टाकला तर लोककला आणि लोकजीवन यांचा किती जवळचा संबंध असतो, त्याचं चित्र समोर उभा राहतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव आणि शिमगोत्सव हे प्रमुख सणं असले, तरी ग्रामदैवतांचा वार्षिक जत्रोत्सव प्रत्येक ग्रामस्थाच्या जिव्हाळ्याचा असतो. उत्सवानिमित्त दैवताची पालखी निघते. विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात आणि सर्वांत महत्त्वाचं आकर्षण असतं, ते रात्री होणार्या दशावतारी कलेच्या सादरीकरणाचं.दशावताराची अनेक वैशिष्ट्यं सांगता येतील. मुख्य म्हणजे हा नाट्याविष्कार असला, तरी कोणतीही लिखित संहिता या नाटकांना नसते. अत्यंत उत्स्फूर्तपणे नाटकातले संवाद सादर केले जातात. लिहिलेले संवाद नसतानासुद्धा सहा तास किंवा त्यापेक्षा अधिक काळ नाटक नुसतं चालतं नव्हे, तर उत्तरोत्तर रंगत जातं. प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. नाटकाचा विषय प्रामुख्याने पौराणिक असतो. राम आणि कृष्ण या मुख्य दैवतांच्या भोवती आणि प्रसंगानुरूप इतर दैवतांच्या भूमिका या नाटकात सादर केल्या जातात. व्यवसाय म्हणून अलीकडे दशावताराचे प्रयोग मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये, तसंच देशभरात विविध ठिकाणी होतात. मुंबईत भरणार्या कोकण महोत्सवांमध्ये दशावतारी नाटकांचं महत्त्वाचं स्थान आहे. त्यातला अपवाद वगळला, तर नाटकातल्या स्त्रियांच्या भूमिका पुरुषच करतात, हेही दशावताराचं वैशिष्ट्य आहे. कार्तिकी एकादशी आणि त्यानंतरची त्रिपुरारी पौर्णिमा या मुहूर्तावर दशावताराचे प्रयोग सुरू होतात. गावागावांमधल्या जत्रा दर वर्षीच्या त्या त्या तिथीला भरत असतात. आता संख्या शंभरावर गेली असली, तरी प्रामुख्याने बाळकृष्ण गोरे, चेंदवणकर, वालावलकर, नाईक-मोचेमाडकर, मामा मोचेमाडकर, खानोलकर, आजगावकर, आरोलकर, पार्सेकर, कलेश्वर अशी दशावताराची दहा मंडळं सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. गावोगावच्या जत्रा पूर्वीच्या दहा मंडळांना दिल्या जातात. पूर्वीपासून त्या त्या गावांच्या परंपरांनुसार ठरावीक मंडळच जत्रोत्सवातले नाट्यप्रयोग सादर करत असतात.
आठशे वर्षांपासून सुरू असलेलं मंडळ
आमचं मंडळ जिल्ह्यातलं सर्वांत पहिलं दशावतारी मंडळ आहे. आमचे पूर्वज कर्नाटकातून पंढरपूरला आणि वेगवेगळ्या ठिकाणी गेले. पण त्यांना जगणं कठीण झालं. अखेर त्यांना दृष्टान्त झाला. ‘परशुरामभूमीमध्ये कोकणात प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्या वालावलच्या लक्ष्मीनारायण मंदिरात तुम्ही जा’ असा तो दृष्टान्त होता. त्यानुसार केशव, माधव, मुकुंद, मुरारी, हरेराम, कृष्ण, गोविंद असे आमच्या पूर्वजांचे आठ भाऊ वालावल (ता. कुडाळ) इथे आले. सगळे भाऊ एकत्र राहून चालणार नाही, म्हणून ते मोचेमाड, आरवली अशा वेगवेगळ्या ठिकाणी गेले. आम्ही आता कवठी गावात राहतो. आमच्या मंडळात वीस जण आहेत. आमच्याकडे वार्षिक 95 जत्रोत्सव आहेत. तुटपुंज्या मानधनावर वार्षिक जत्रोत्सव पार पडावे लागतात. मंदिरांमधून सात-आठ हजार रुपये मिळतात. पण तिथीप्रमाणे जत्रा असल्यामुळे तिथे जाऊन नाटक करावं लागतं. परवडत नाही. आमचं पहिलं नाटक ओसरगावच्या विठ्ठल मंदिरात वैकुंठ चतुर्दशीला होतं. त्यानंतर त्रिपुरारी पौर्णिमेला मालवणला नाटक होतं. शेवटचं नाटक पळसंब (मालवण) इथे होतं. याशिवाय गोवा प्रांतातही आम्ही नाटकं करतो. धंदा म्हणून आठ वर्षं कंपनी चालवताना मध्य प्रदेश, उज्जैन, इंदूर, सिंहस्थ कुंभमेळा, जम्मू-काश्मीर, चंदीगड, तिरुवनंतपुरम, ऑलिम्पिक, भारत महोत्सव अशा ठिकाणी नाटकाचे प्रयोग केले आहेत. आतापर्यंत मला 34 पुरस्कार मिळाले आहेत. उपजीविकेसाठी मी एलआयसी एजंट म्हणून काम करतो. पौरोहित्यही करतो.
दिनेश गोरे, बाळकृष्ण गोरे पारंपरिक लोककला दशावतारी नाट्यमंडळ, कवठी (कुडाळ)
व्यवसाय म्हणून करायचं नाटक मात्र कोणतंही मंडळ कोणत्याही गावात करतं. ठरलेल्या गावी, ठरलेल्या तिथीला नाट्य मंडळाचे सर्व सदस्य सायंकाळीच दाखल होतात. आधी ठरलं असेल तर तो विषय किंवा ग्रामस्थ सांगतील तो विषय त्या रात्री नाटकाच्या आख्यानाचा विषय ठरतो. आधीच नमूद केल्याप्रमाणे कोणतीही लिखित संहिता नसते, पण पौराणिक कथांमध्ये असलेल्या नारद, विष्णू, कृष्ण, रावण, तसंच त्या त्या नाटकानुसार आवश्यक असलेल्या खलनायकांची पात्रं नाटकाचा सूत्रधार किंवा नाट्यसंस्थेचा मालक कलाकारांना नेमून देतो.
गणपतीचा पेटारा
मंडळाचा गणपतीचा पेटारा ही सर्वांत मोठी जमानत असते. हा गणपती नवसाला पावतो, अशी अनेक ग्रामस्थांची श्रद्धा असते. म्हणूनच नाट्यमंडळ गावात दाखल झालं आणि त्यांनी पेटारा आणला की ग्रामस्थही त्या गणपतीची आवर्जून पूजा करतात. जत्रांमधल्या नाटकांमध्ये या गणपतीची आरती केली जात नाही. पण व्यावसायिक स्वरूपात करावयाच्या नाटकांची सुरुवात गणपतीच्या आरतीने केली जाते. पेटार्यातील गणेशदर्शनाबरोबरच शस्त्रं, अस्त्रं दाखवायची पद्धतही पूर्वी होती.
रात्री बारा-साडेबारा वाजल्यानंतर नाटकाची सुरुवात होते. सुरुवातीला पखवाज, तबला, पेटी यांचं वादन केलं जातं. त्यातून वातावरणनिर्मिती होते. सुरुवातीला संकासूर हे विनोदी पात्र प्रवेश करतं. गणपती नर्तन करतो. सरस्वती प्रकट होते. हे सारं विशिष्ट पद्धतीने सादर होत असतं. त्यानंतर त्या आख्यान विषयातला राजा दाखल होतो. पौराणिक कथा अनेकांना माहीत असतात, पण नाटकात पात्राला साजेशी वेशभूषा करून त्या कथा जिवंत केल्या जातात. सूत्रधाराने सांगितल्यानुसार आपापल्या भूमिकांची वेशभूषा प्रत्येक कलाकार स्वत: करत असतो, किंबहुना प्रत्येक कलाकार स्वत: सादर करणार असलेल्या भूमिकांसाठी, सजावटीसाठी आवश्यक असलेले रंग, केशभूषा यासाठीची सर्व साधनं स्वत:च बाळगत असतो. नाटक करायच्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर प्रत्यक्ष नाटक सुरू होण्यापूर्वी तास-दीड तासांमध्ये त्यांची वेशभूषा पूर्ण होते. काही वेळा एकाच कलाकाराला अनेक भूमिका निभावाव्या लागतात. अशा वेळी तशीही त्याची तयारी असते. रावणाची भूमिका करायची, तर तो दशग्रंथी ब्राह्मण होता हे लक्षात ठेवलं पाहिजे. दुर्योधन उभा करताना लालसेमुळे तो किती टोकाला जाऊ शकतो, हे साकारलं पाहिजे. स्त्री भूमिका करतानाच नारदाची, विष्णूची भूमिकाही निभावावी लागते. त्याची तयारी असते.
कलाकाराला नारद साकारायचा असेल, स्त्री पार्ट (भूमिका) करायची असेल, तर संगीताची आवड असावी लागते, जोपासावी लागते. रियाज करावा लागतो. आयत्या वेळी एखादा कलाकार आला नाही, तर एकाच कलाकाराला वेगवेगळ्या दोन, तीन किंवा चार भूमिकासुद्धा संपूर्ण नाटकात निभावाव्या लागतात. म्हणूनच प्रत्येक कलाकाराचा त्या त्या विषयाचा चांगला अभ्यास असतो. विविध पौराणिक ग्रंथांचं वाचन ते करत असतात. या नाटकामध्ये प्रॉम्प्टिंग नसतं. पाठांतर नसतं. उत्स्फूर्तपणा आणि अभ्यास कलाकाराच्या भूमिकेतून प्रकट होत असतो. ज्याचा जितका अभ्यास, तितकंच त्याचं प्रकट होणं अधिक प्रभावी होतं आणि प्रेक्षकांना भावतं. त्यातून बक्षीस म्हणून अनेक प्रेक्षक कलाकारांना छोट्या-मोठ्या देणग्या देतात. अगदी दहा रुपयांपासून पाचशे-हजार रुपयांपर्यंतही बक्षिसं त्या त्या कलाकाराच्या आवडलेल्या भूमिकेसाठी प्रेक्षकांकडून मिळतात.
नाटकाचं नेपथ्य अगदी कमी असतं. आधुनिक नाटकातला फिरता रंगमंच असावा, तसं एखाद्या चादरीचा आडोसा घेऊन आधीचं पात्र विंगेत जातं, त्याच ठिकाणी राजा येतो. एखादं बाकडं संपूर्ण नाटकात मोठी भूमिका निभावत असतं. कारण तेच आसन असतं, तेच शयनगृह, तेच सिंहासन आणि नृसिंह अवतारातला दाराचा उंबराही तोच असतो.
मध्यरात्रीनंतर सुरू झालेलं हे नाटक सूर्योदयाच्या सुमाराला संपतं. खलनायकाचा वध होतो. कृष्ण किंवा विष्णूसह कलाकार मंदिराला प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर दहीकाला केला जातो. दहीहंडी आधीच बांधलेली असते. ती मुख्य पात्राच्या हस्ते फोडली जाते. प्रसाद सर्वांना वाटला जातो आणि त्या दिवशीच - म्हणजे आदल्या रात्री सुरू झालेलं नाटक संपतं. साधारण अशीच पद्धत प्रत्येक गावात असते. पण हे त्या त्या मंदिरातल्या प्रथेनुसार होत असतं.
दुष्टांचं निर्दालन आणि सुष्टांचं संरक्षण हे प्रत्येक नाटकाचं मुख्य सूत्र असतं. प्रबोधनाचा भाग याच ठिकाणी येतो. पौराणिक कथांचा आधार घेत चांगल्या गोष्टींचं, चांगल्या विचारांचं उदात्तीकरण नाटकातून केलं जातं. दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी परमेश्वर पाठीराखा असतो, हे सांगितलं जातं. नाटकातले कलाकार उपजीविकेसाठी विविध व्यवसाय करत असतात. कोणी शेती करतो, कोणी दुकान चालवतो, कोणी मासळीची विक्री करतो, कोणी सुतारकाम, लोहारकाम, ब्राह्मण कलाकार असतील, तर भिक्षुकी अशी कामंही करत असतात. विशेष म्हणजे सर्व जातींचे कलाकार त्यामध्ये असतात. दशावतार ही एका विशिष्ट जातीची मक्तेदारी नाही. ती सर्वसमावेशक आहे. समाज एकत्र राहण्याचंही ते एक साधन आहे.
आजही दशावताराची आवड कमी झालेली नाही. जत्रांमध्ये पालखीला गर्दी असते. नंतर नाटकाला ठरावीक लोक राहतात. प्रत्येक जण आता रोजगार, धंदा करत असतो. दुसर्या दिवशी कामावर जावं लागतं. छोट्या कुटुंबामुळे त्यांना रात्री जागता येत नाही. शिवाय आता त्यांना पर्याय उभे राहिले आहेत. दिवसासुद्धा नाटकं बघायला मिळतात. त्यामुळे रात्रीची गर्दी कमी झाली आहे. पण आवड कमी झालेली नाही.
वार्षिक जमाखर्चाचा मेळ बसत नाही
गेल्या साडेतीनशे वर्षांपासून आमचं मंडळ ही कला जोपासत आहे. वेंगुर्ल्याच्या सातेरी मंदिरात आमचं पहिलं नाटक होतं. शंभर देवळांमध्ये आमची नाटकं होतात. देवळातून चार-पाच हजार रुपये मिळतात. पण त्यात भागत नाही. कलाकारांचे पगार वाढले. त्यांना दररोज चारशेच्या पुढे पैसे द्यावे लागतात. पण परंपरा म्हणून देवळातली नाटकं करावीच लागतात. ती नाही केली, तर पुढचे दोन महिने जो नाटक धंदा आहे, तो होत नाही. ती नाटकं मे महिन्यापर्यंत चालतात. बाकीच्या ठिकाणी नऊ-दहा हजार रुपये देतात. त्यातून गाडीचा खर्च आणि इतर खर्च करतो. पावसात चार महिने नाटकं बंद असतात. राहिलेल्या आठ महिन्यांत जे मिळेल, त्यातून सगळं भागवावं लागतं. जमाखर्चाचा मेळ बसत नाही. पण परंपरा म्हणून सगळं करावं लागतं.
प्रभाकर शंकर पार्सेकर, अध्यक्ष, पार्सेकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, वेंगुर्ले पूर्वी ‘रात्रीचा राजा दुसर्या दिवशी डोक्यावर बोजा’ ही नाटकातल्या कलाकारांबद्दलची स्थिती आज काहीशी बदलली आहे. म्हणजे आर्थिक स्थिती सुधारली आहे असं नव्हे, तर राजाला स्वत:चा बोजा स्वत:च्या डोक्यावरून वाहून नेण्याऐवजी आता मंडळाच्या गाडीवर ठेवावा लागतो, इतकी स्थिती बदलली आहे. बहुतेक प्रमुख सर्व मंडळांनी स्वत:ची मिनीबससारखी वाहनं खरेदी केली आहेत. अर्थातच ही वाहन परवडतात, म्हणून खरेदी केलेली नसतात तर सर्व कलाकारांना एकत्र येऊन प्रवास करणं सोपं जावं, हा उद्देश त्यामागे असतो.
शिवाय आता दिवसाही नाटकं केली जातात. त्यामुळे ‘दुपारचा राजा त्याचा (मिनीबसच्या) टपावर बोजा’ असं आता म्हटलं जातं.
मनोरंजनाची कोणतीही साधनं नव्हती, त्या काळात दशावताराला खूप महत्त्व होतं. आता तुलनेने ते कमी झालं असलं आणि मनोरंजनाची इतर साधनं उपलब्ध असली, तरी जत्रोत्सवातल्या दशावतारी नाटकांचं महत्त्व कमी झालेलं नाही.नाटक त्याच पद्धतीने सादर केली जातात. संबंधित संस्था सेवा म्हणून आणि परंपरा म्हणून ही नाटकं गावोगावी आजही करतात. मंदिराच्या व्यवस्थापनाकडून चार ते आठ हजार रुपयांपर्यंत मानधन दिलं जातं. मंडळांमध्ये पंधरा ते वीस कलाकार असतात. त्यामध्ये ते मानधन वाटून घेतलं जातं. दशावतारी नाटकांकडे कलाकारांकडून केवळ उपजीविकेचं साधन म्हणून पाहिलं जात नाही. आपली कला आपण जोपासली पाहिजे, हाच मूळ उद्देश त्यात असतो. मात्र लोकाश्रय असलेल्या या लोककलेला म्हणावा तसा राजाश्रय मिळालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. टाळ्या मिळवून लोकरंजनाची पावती मिळवण्यापेक्षा परंपरा जपत समाजप्रबोधन करणं हा मूळ उद्देश सिंधुदुर्ग जिल्ह्यातली दशावतार ही लोककला जोपासत आहे. त्या कलेच्या संवर्धनासाठी, ही कला चिरकाल टिकवून ठेवण्यासाठी राजाश्रय मात्र मिळायला हवा. त्यासाठी प्रयत्न होत असले, तरी त्याला अजूनही निश्चित दिशा सापडलेली नाही.