1 सप्टेंबरला हैदराबाद येथील विवेकानंद इन्स्टिट्यूट फॉर ह्यूमन एक्सलन्स फाउंडेशने सरन्यायाधीश रामण्णा यांचे भाषण ठेवले होते. औचित्य होते, स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथील सर्वधर्म परिषदेतील भाषणाच्या स्मृतिदिवसाचे! त्यांचे भाषण अर्थातच स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो भाषणावर होते. स्वामी विवेकानंदांच्या कालजयी विचारांचे सरन्यायाधीशांनी स्मरण करून देणे ही बदलत्या भारताची निशाणी आहे.
रोजचे वर्तमानपत्र उघडले की, पहिल्या पानापासून ते संपादकीय पानापर्यंत राजकीय बातम्यांचा पाऊस असतो. त्यातून जी जागा उरते, त्यात मारामार्या, खून, बलात्कार यांना स्थान मिळते. अधूनमधून फोडणीला सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींची वक्तव्ये टाकली जातात आणि ती कशी वादग्रस्त आहेत, यावर टिप्पणी असते. अतिवृष्टीच्या बातम्या, पुराने झालेले नुकसान, कांदे-बटाटे-टोमॅटो यांच्या भावातील चढउतार, वाढत चाललेली महागाई, तेलांच्या दरातील चढउतार अशा बातम्यांनी वर्तमानपत्र भरून गेलेले असते. दूरदर्शनवरील बातम्यांचे चॅनल उघडले, तर सिनेस्टाइलने बातम्या देणारे अँकर, त्यांच्या चेहर्यावरील हावभाव, आवाजातील चढउतार सर्व ऐकल्यानंतर आपण बातम्या ऐकतो की सिने डायलॉग ऐकतो आहोत, असा संभ्रम माझ्यासारख्यांना पडतो.
अशा सगळ्या गदारोळात कुठली तरी चांगली बातमी एखाद्या कोपर्यात असते. ती चांगली असल्यामुळे तिच्यावर संपादकीय टिप्पणी केली जात नाही किंवा संपादकीयसुद्धा लिहिले जात नाही. ही आपल्या देशाची पत्रकारिता आहे. विषय आहे भारताचे सरन्यायाधीश रामण्णा यांच्या भाषणाचा. हैदराबाद येथे विवेकानंद इन्स्टिट्यूट फॉर ह्यूमन एक्सलन्स फाउंडेशन येथे 11 सप्टेंबर रोजी त्यांचे भाषण झाले. 11 सप्टेंबर हा दिवस स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथील सर्वधर्म परिषदेतील भाषणाचा स्मृतिदिवस आहे. या भाषणाला 128 वर्षे झाली आहेत. सरन्यायाधीश रामण्णा यांचे भाषण अर्थातच स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो भाषणावर होते. त्यांचे भाषण अप्रतिम आहे आणि संपूर्ण भाषण उपलब्ध आहे.
न्यायमूर्ती भाषण करतानाचा फोटो www.livelaw.in या साइटवर आहे. कपाळाला गंध लावलेला आहे आणि भाषणाचा मुख्य विषय आहे ‘सहिष्णुता आणि वैश्विक स्वीकारार्हता’. या भाषणात ते म्हणतात की, “स्वामी विवेकानंद यांनी भारताच्या राज्यघटनेचा उगम होण्यापूर्वीच सेक्युलॅरिझमची संकल्पना मांडलेली आहे.” ते म्हणतात, “स्वामी विवेकानंद यांचा धर्माच्या शाश्वत मूल्यांवर ठाम विश्वास होता. सर्वसामान्यांचे कल्याण आणि सहिष्णुता हा धर्माचा मूलाधार आहे. धर्म हा अंधश्रद्धा आणि कर्मठता यांच्या वर असला पाहिजे. स्वामीजींचे हे स्वप्न उदयीमान भारतात प्रत्यक्षात येण्यासाठी सर्वसामान्यांचे कल्याण आणि सहिष्णुता हे स्वामीजींचे सिद्धान्त आजच्या तरुणांमध्ये संक्रमित केले पाहिजेत.”
मा. सरन्यायाधीश यांचे हे उद्गार अतिशय अर्थपूर्ण आहेत. यापूर्वी अपवादानेच भारताच्या एखाद्या सरन्यायाधीशाने स्वामी विवेकानंद आणि त्यांच्या विचारांचा असा गौरव केला असेल. अनेक न्यायमूर्ती भारतीय संविधानाविषयी बोलताना मिल्ल, ए.व्ही. डायसी इत्यादी पाश्चात्त्य विद्वानांना उद्धृत करतात. सेक्युलॅरिझमची संकल्पना स्पष्ट करताना ब्रिटिश आणि अमेरिकन संविधानाचे दाखले देतात. ही परंपरा मोडून रामण्णा यांनी संविधान अस्तित्वात येण्यापूर्वीच विवेकानंदांनी सेक्युलॅरिझमची संकल्पना मांडली हे सांगितले. माझ्या दृष्टीने हे फार महत्त्वाचे आहे. सेक्युलॅरिझम हा शब्द आपल्या उद्देशिकेत घातला गेलेला आहे. आणीबाणीच्या कालखंडात इंदिरा गांधींनी हा शब्द घुसडला.
नेहरू-गांधी घराण्याच्या सेक्युलॅरिझमचा अर्थ आणि विवेकानंदांच्या सेक्युलॅरिझमचा अर्थ यामध्ये दोन ध्रुवांचे अंतर आहे. नेहरू-गांधी घराण्याचा सेक्युलॅरिझम म्हणजे मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजांचे तुष्टीकरण, त्यांना सर्व सवलती आणि हिंदुत्वाचा पराकोटीचा द्वेष असा आहे. जे जे हिंदू ते ते निंदू, हिंदू भावना पायदळी तुडवू, हिंदू धर्माचार्यांचा अपमान करू हा नेहरू-गांधी घराण्याचा सेक्युलॅरिझम आहे. सोमनाथाचे मंदिर बांधायला नेहरूंनी विरोध केला. या घराण्याने आयोध्येचा प्रश्न कुजत ठेवला. राज्यघटनेत 370 कलम घुसडून काश्मीरमधील मुसलमानांमध्ये फुटीरतेची बीजे पेरली. स्वामी विवेकानंदांना हा सेक्युलॅरिझम अभिप्रेत नाही.
सरन्यायाधीश रामण्णा यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार अशा काळात व्यक्त केले आहेत, ज्या काळात जागतिक संदर्भ फार बदलले आहेत. ते म्हणतात, “स्वामीजींच्या शिकागो येथील भाषणाने जगाचे लक्ष प्रथमच सनातन भारतीय वेदान्त दर्शनाकडे वळले. हा वेदान्त प्रेम, सहानुभूती आणि सर्वांचा समान आदर शिकवतो.” स्वामी विवेकानंद यांच्या सेक्युलॅरिझमचा जन्म वेदान्तात झालेला आहे. तो कोणत्याही विदेशी विचारांच्या तत्त्वज्ञानात झालेला नाही. त्याचा पाया शंभर टक्के भारतीय आहे. वेदान्त सांगतो की, विश्व हे एका तत्त्वातून निर्माण झाले आहे. विश्व हे चैतन्याचा पसारा आहे. चैतन्य सर्व ठिकाणी सारखे असते. त्यात उच्च-नीचता नसते. या चैतन्याला समजून घेण्याचे मार्ग अनेक आहेत. प्रत्येकाला आपल्या रुचीच्या मार्गाने तिथे जाता येते. शिकागोच्या भाषणात स्वमी विवेकानंदांनी शिवमहिम्न स्तोत्रातील पुढील श्लोक उद्धृत केला -
‘रुचिनां वैचि त्र्या दृजु कुटिल नाना पथ जुषाम्।
नृणा मेको गम्य स्तवमसि पयसा मर्णव ईव॥’
हा वेदान्त हा विश्वाचा धर्म झाला पाहिजे. सरन्यायाधीश रामण्णा यांनी सूचकपणे जागतिक संदर्भाकडे अंगुलिनिर्देश केला आहे. अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आली आहे. या तालिबानींची प्रतिमा असहिष्णुतेचे पुतळे अशी आहे. त्याच वेळी त्यांचा बिमोड करायला निघालेली अमेरिका ही काही सहिष्णुतेचा आदर्श पुतळा आहे असे नाही. तालिबानी आणि पाश्चात्त्य विचारधारा या दोन्हीही असहिष्णू आहेत आणि त्यांचा संघर्ष मानवजातीला भयंकर किंमत मोजायला लावणारा आहे. अशा वेळी स्वामी विवेकानंदांच्या शिकागोतील भाषणाचे स्मरण करून देण्याचे कार्य रामण्णा यांनी नेहरू-गांधी सेक्युलॅरिझमच्या वर उठून केले, म्हणून ते परमआदरास पात्र आहे.
हे त्यांचे भाषण तरुण विद्यार्थ्यांपुढे आहे आणि तरुणांना त्यांनी जे मार्गदर्शन केले आहे, ते राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची आठवण करून देणारे आहे. ते म्हणाले की, “आम्हाला जे स्वातंत्र्य मिळाले आहे, त्यात वीर बिरसा मुंडा, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, सीताराम राजू आदी क्रांतिकारक नेत्यांचा खूप मोठा वाटा आहे.” न बोलता त्यांनी हे सुचविले की, आम्हाला मिळालेले स्वातंत्र्य केवळ महात्मा गांधी अथवा नेहरू घराण्यामुळे मिळाले नाही. सरन्यायाधीशांनी आपल्या क्रांतिकारकांचे स्मरण करावे ही अभिमानाची गोष्ट आहे. यानंतर त्यांनी जे लोकशाही अधिकार आपल्याला मिळाले आहेत, त्याचा उल्लेख केला आणि आणीबाणीच्या काळात ज्या युवकांनी या अधिकारांच्या रक्षणासाठी संघर्ष केला, त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांचे वाक्य असे आहे - “अनेकांनी आपले प्राण गमावले, अनेकांनी सुखासीन करिअरचा त्याग केला. राष्ट्र आणि समाज यांच्या सार्वत्रिक कल्याणासाठी त्यांनी हे सर्व केले.” आणीबाणीच्या कालखंडात मी चौदा महिने तुरुंगात राहिलो. न्यायमूर्तींनी केलेला गौरव माझ्यासारख्या आणीबाणी कालखंडातील हजारो तरुणांचा गौरव आहे. ही आणीबाणी नेहरू-गांधी घराण्याने लादली, हे विसरता कामा नये.
स्वामी विवेकानंद यांनी सर्वप्रथम आपल्या समाजातील वंचित, दलित, शोषित यांचा विषय पुढे आणला. वेदान्ताचा आधार घेऊन त्यांनी सांगितले की, ‘माणसामाणसात भेद करणे, गरीब आणि श्रीमंत अशी दरी वाढवीत जाणे, शोषण करणे हा वेदान्त नाही.’ सरन्यायाधीश रामण्णा म्हणतात, “तुम्ही सर्वांनी (तरुणांनी) आपली सामजिक दुःखे, सामाजिक आणि राजकीय प्रश्न जाणून घ्यायला पाहिजेत. आपली दृष्टी विशाल होण्यासाठी पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. आजच्या काळात आपल्याला गृहबंदी होऊन राहावे लागले, तरी वेळ काढून घराच्या बाहेर पडले पाहिजे. आपल्या प्रकृतीकडे लक्ष दिले पाहिजे. खेळ आणि शारीरिक आरोग्य याकडे दुर्लक्ष करता कामा नये. आपल्या आजूबाजूच्या गरिबांच्या वसतीत गेले पाहिजे. समाजाचे हे जे दुभाजन झाले आहे, त्याबद्दल जागरूक असले पाहिजे, खेड्यात गेले पाहिजे, तेथील जीवनाचा परिचय करून घ्यायला पाहिजे.”
स्वामी विवेकानंद सांगून गेले की, “खरा भारत खेड्यात राहतो. खेड्यात जा आणि त्यांना साक्षर करा. त्यांच्यातील शक्ती जागृत करा. तेच उद्याच्या भारताचे तारणहार आहेत.” स्वामी विवेकानंदांच्या कालजयी विचारांचे सरन्यायाधीशांनी स्मरण करून देणे ही बदलत्या भारताची निशाणी आहे, म्हणून आपण सर्वांनी त्याचे स्वागत केले पाहिजे आणि ज्यांना शक्य आहे, त्यांनी इंटरनेटवर जाऊन हे भाषण पूर्णपणे ऐकले आणि वाचले पाहिजे.