पद्मश्री राहीबाई यांनी स्थानिक बी-बियाणे वापरून हरित क्रांती कशी करता येते, हे सप्रमाण सिद्ध तर केलेच, तसेच अन्य कित्येक शेतकरी महिलांना विकासाचा मार्ग दाखवला. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत, बी.बी.सी.ने जगातल्या शंभर कर्तृत्ववान महिलांच्या यादीत या एकमेव भारतीय महिलेचा समावेश केला आहे.
कोंभाळणे गावातील अकोले तालुक्यातली अहमदनगर जिल्ह्यातील एक मराठमोळी शेतकरी महिला राहीबाई सोमा पोपेरे ह्यांना या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. गेल्या वर्षी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती मा. रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना नारी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. पद्मश्री राहीबाई यांनी स्थानिक बी-बियाणे वापरून हरित क्रांती कशी करता येते, हे सप्रमाण सिद्ध तर केलेच, तसेच अन्य कित्येक शेतकरी महिलांना विकासाचा मार्ग दाखवला. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत, बी.बी.सी.ने जगातल्या शंभर कर्तृत्ववान महिलांच्या यादीत या एकमेव भारतीय महिलेचा समावेश केला आहे. त्यांचा साधेपणा आणि सहजपणा याने जिंकून घेत आत्मीय भाव सहज उत्पन्न होईल असे त्यांचे रूप बघून विलक्षण आनंद झाला.
अतिशय दुर्गम आणि आदिवासी भागातल्या त्यांच्या गावात रस्ते, वीज, पायाभूत सुविधा अजून तशा नाहीतच. गावच्या मागच्या डोंगरावर विकासाचे निशाण फडकवणारी पवनचक्क्यांची फिरणारी पाती. त्यात अतिसामान्य आदिवासी कुटुंबाचे एक पारंपरिक कौलारू घर आणि त्याशेजारी चार जनावरे.. पण घराच्या जवळच एक छोटीशी खोली आहे. विशेषत्वाने जाऊन बघावे असे काहीच वाटणार नाही. पण आत गेलेच, तर मात्र कोणीही आश्चर्याने थक्क व्हावे... भिंतींला लागून दोन्ही बाजूंना पारंपरिक पद्धतीची मडकी, प्लास्टिकचे टीप, बाटल्या, प्लास्टिकच्या चौकोनी पेट्या ओळीने मांडून ठेवलेल्या. आणि ह्यात असंख्य वेगवेगळ्या बिया. सगळी गावराणी देशी बियाणी, जी जंगलातून वेचून आणलेली असतात.
राहीबाई सोमा पोपेरे आज अंदाजे 57च्या घरात आहेत. वयाच्या 12व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. गरीब कुटुंबात जन्म झाल्यामुळे शाळेत जाण्याचा कधी प्रश्नच आला नाही. पण लहानपणापासून शेतीची प्रचंड आवड होती. वडिलांबरोबर शेतात जाऊन वेगवेगळ्या बिया गोळ्या करण्याचा छंद लहानपणापासून होताच आणि लग्नानंतरही हा छंद त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. आज ‘सीड मदर’ म्हणून जगभरात त्यांची ओळख आहे. कोण काय म्हणते याकडे लक्ष न देता त्यांनी आपला छंद आनंदाने जोपासला. हा छंद आज BAIFसारख्या संस्थेचा एक मोठा भाग झाला आहे आणि त्यातून निर्माण झाली सीड बँक. आज शासनाच्या मदतीतून त्यांची सीड बँक कार्यरत आहे.
आजूबाजूच्या पाड्यांतून, शेतांतून पारंपरिक बियाणे गोळा करत आज राहीबाईंच्या बँकेत तब्बल 54 पिकांची 116 जातींची वाणे आहेत. आश्चर्य म्हणजे त्यांना आज प्रत्येक बियाणाची माहिती आहे. त्यांच्या बँकेत कोणीही गेले, तरी त्यांना ती बियाणे औषधीयुक्त आहेत की नाही, त्याचा उपयोग, त्याची वैशिष्ट्य याबाबत मार्गदर्शन करतात. थोर शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी "mother of seeds'’ अर्थात बीजमाता म्हणून त्यांचा गौरव केला आहे.
जीवविविधता जिवंत ठेवण्यात हे काम खूप महत्त्वाचे आहे. जीवविविधतेसाठी आदिवासी भागांमध्ये काही लोक अशी बियाणी जतन करून ठेवतात. राहीबाई पोपेरे यांच्या या क्षेत्रातील अजोड कामाला बीबीसीने गौरवले आहे. आज जगातील तब्बल 60 देशांतील 100 प्रेरणादायक महिलांमध्ये राहीबाईंचा समावेश केला आहे. आज जागतिक पातळीवर त्यांच्या कामाची दखल घेतली आहे आणि राहीबाई ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड, पेरूमधील लेखिका इजाबेल अलेंद, क्लिटंन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा चेलसा क्लिटंन यांच्या रांगेत जाऊन बसल्या आहेत. नुकताच राष्ट्रपती भवनात त्यांच्या कार्याचा गौरवही करण्यात आला आहे.
सध्याच्या काळातल्या सदोष शेतमालाच्या नावाने आपण सगळेच बोटे मोडतो. कर्करोगासह जवळपास सगळ्याच रोगांना आणि पूर्वीपेक्षा कमी झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी आपण नेहमी शेतीतल्या रासायनिक खतांच्या अतिवापराला, हायब्रीड बियाणांना नावे ठेवतो. पण फळे, भाज्या, अन्नधान्य यांची जी जुनी चव होती, ती कुठेतरी आपण आज नक्कीच गमावली आहे.
जेव्हा असे कार्य करणारे आजूबाजूला बघितले, की सहज वाटते - कशाला हवे राजकारण, पक्ष, पार्टी, व्यक्ती, निष्ठा.. आज समाजात परिवर्तन घडते, ते यांच्यासारख्या कार्य करणार्या कर्तव्यनिष्ठ आणि बहुमोल कार्य करणारे व्यक्तींमुळेच. त्यामुळे कोण काय बोलले यापेक्षा ही आनंद देणारी घटना दिवसाच्या सुरुवातीला मिळाली की दिवस नक्कीच वेगळ्या विश्वात घेऊन जातो.