सर्वमतादर

विवेक मराठी    03-Aug-2021
Total Views |
कुठल्याही एका मताला अंतिम सत्य न मानणे, सत्याकडे जाण्याचा तोही एक मार्ग आहे हे स्वीकारणे असे सर्व भाव सर्वमतादर या शब्दात येतात. सेक्युलॅरिझममध्ये असलेलेल सर्व भाव आणि त्याही पलीकडे असलेली मानवता आमच्या रक्तबीजात आहे आणि आपण सर्व जण सहजपणे तिचे पालन करीत असतो.

RSS_1  H x W: 0


‘सिटिझनशिप डिबेट ओव्हर एनआरसी अँड सीएए - आसाम अँड दि पॉलिटिक्स ऑफ हिस्ट्री’ या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाप्रसंगी सरसंघचालक मोहनजी भागवत म्हणाले, “भारतीय नागरिकांनी नेहमीच ‘वसुधैव कुटुम्बकम’ या तत्त्वाचे पालन केले आहे. ‘सेक्युलॅरिझम’, लोकशाही आणि बहुलता ही भारतीय संस्कृतीची खास वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे भारतीयांना जगातील अन्य देशांकडून सर्वसमावेशकता शिकण्याची गरज नाही. भारताने लोकशाही अलीकडील काळात स्वीकारली अथवा ‘सेक्युलॅरिझम’चा नंतर स्वीकार केला, असेही नाही. भारतीय राज्यघटनेची निर्मिती करणारे आमचे महान नेते हे अतिशय उदारमतवादी होते. त्यामुळे भारतीय नागरिकांना या तत्त्वांविषयी नेहमीच सर्वोच्च आदर वाटतो.” मोहनजी भागवत यांनी अगदी योग्य वेळी अतिशय योग्य विषय देशापुढे ठेवला आहे. यावर उलटसुलट चर्चा होत राहील. तथाकथित डावी मंडळी त्यांच्या प्रकृतिधर्माप्रमाणे भागवतांच्या बोलण्याला विकृत अर्थ प्राप्त करून देतील. त्याची आता सर्वांना सवय झाली असल्यामुळे कुणीही डाव्यांचे विषय फार गंभीरपणे घेऊ नयेत.

सेक्युलॅरिझम याचा अर्थ कसा सांगितला जातो? त्याचा अर्थ असा होतो की, 1. राज्यसंस्थेचा कोणताही उपासना धर्म असू नये. 2. सर्व नागरिकांना उपासनेचे स्वातंत्र्य असले पाहिजे. 3. वेगळ्या उपासनापद्धतीचा अवलंब केल्यामुळे कोणाचाही राज्याने छळ करता कामा नये. हा सेक्युलॅरिझमचा अर्थ आपल्याला सगळे पाश्चात्त्य विद्वान सांगत असतात. आणि आपल्याकडच्या तथाकथित बुद्धिजीवी लोकांची गुलामीची सवय अशी असते की, ‘गोरा बोले आणि आम्ही डोले’! आपली बुद्धी न वापरता त्याने जे सांगितले ते प्रमाण मानावे, त्याची एक चौकट तयार करायची आणि या चौकटीत आपल्याला बसवायचा प्रयत्न करायचा. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की, र्‘ीेीपव शिस ळप र र्र्ीिींरीश हेश्रश’ - चौकोनी बिळात गोल खुंटी बसवायची, असा याचा अर्थ होतो.
 
मोहनजी भागवत यांनी तीन गोष्टी सांगितल्या - वसुधैव कुटुम्बकम, बहुलता आणि लोकशाही. वसुधैव कुटुम्बकम या दोन शब्दांत अतिशय विशाल अर्थ भरलेला आहे. हे सर्व जग म्हणजेच एक परिवार आहे. परिवार म्हटला की, आपापसातील प्रेमसंबंध आपोआप येतात. दुसरा विषय येतो तो म्हणजे परिवारातील सदस्यांचा एकमेकांशी असलेल्या कर्तव्यांचा. परिवारामध्ये आणखी एक विषय असतो, तो म्हणजे अर्थपूर्ण संवादाचा. या तीन गोष्टी असल्या, तर परिवार या संकल्पनेला अर्थ प्राप्त होतो. जेव्हा आपण म्हणतो की वसुंधरा एक परिवार आहे, तेव्हा परस्पर प्रेमसंबंध, परस्पर कर्तव्याची भावना आणि संवाद या गोष्टी आपोआप येतात.
वसुंधरा परिवार असल्यामुळे परिवारात अनावश्यक चढाओढ नसते, स्पर्धा नसते. दुसर्‍याला दाबून टाकण्याची भावना नसते. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे विकास करण्याची संधी असते आणि तसे स्वातंत्र्य असते. एका परिवारात अनेक सदस्य असतात आणि ते एकसारखा व्यवसाय करीत नाहीत. प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असतात, ते त्याच्या रुचीप्रमाणे असतात. याला रुचिभिन्नता म्हणतात. यालाच विविधता म्हणतात. ही विविधता नैसर्गिक असते. कृत्रिमरित्या ती निर्माण करता येत नाही. विविधता नाकारणार्‍या अनेक विचारसरणी आहेत. त्यातील मुख्य तीन विचारसरणी - 1. ख्रिश्चानिटी 2. इस्लाम 3. कम्युनिझम. या तिन्ही विचारधारा वेगळा विचार ठेवणार्‍याला जिवंत ठेवत नाहीत आणि जगातील सर्वात मोठी विडंबना अशी की, या विचारधारेतील विद्वान आम्हाला सेक्युलॅरिझमची प्रवचने देत असतात. विशेषत: भारतीय राष्ट्रजीवनात राष्ट्रीय विचारांचा - म्हणजे हिंदू विचारांचा प्रभाव जसजसा वाढत चालला आहे, तशी ही सेक्युलर मंडळी बेभान होत चाललेली आहेत. भारतातील सेक्युलॅरिझम धोक्यात आहे, ख्रिश्चन, मुसलमान, डावे यांचे जीवन धोक्यात येत चालले आहे, अशी हाकाटी त्यांनी सातत्याने चालू ठेवली आहे. मोहनजींनी त्यांना सणसणीत उत्तर दिले आहे.

आपल्याकडे मीडियाने आणि चित्रपटसृष्टीने मोठ्या कौशल्याने फादर, मुल्ला आणि डावे ‘लिबरल’ (?) यांच्या प्रतिमा रंगविलेल्या आहेत. सेवाभावी, दयाळू, शांत स्वभावाचा, अडचणीत आलेल्यांना मदत करणारा वगैरे वगैरे. ख्रिश्चन देशांचा इतिहास आपल्यला माहीत नसतो. कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला. तो कॅथोलिक ख्रिश्चन होता. त्याच्या पाठोपाठ स्पॅनिश लोक अमेरिका खंडात गेले. सोने आणि चांदीसाठी त्यांनी जवळजवळ दोन कोटी स्थानिक अमेरिकन लोकांना ठार केले. जे वाचले त्यांना ख्रिश्चन केले. स्थानिक लोकांकडे धनुष्यबाण, तलवारी होत्या. स्पॅनिश लोकांकडे तोफा आणि बंदुका होत्या. ब्रिटिश, डच, पोर्तुगीज आणि फ्रेंच, आफ्रिकेत आणि आशियात गेले. आफ्रिकेतील आणि आशियातील बहुतेक सगळे देश या गोर्‍या ख्रिश्चन लोकांनी लुटले, लोकांना कंगाल केले आणि जबरदस्तीने अनेक ठिकाणी त्यांना ख्रिश्चन केले. स्पॅनिश लोकांनी फिलिपिन्स जबरदस्तीने ख्रिश्चन करून टाकला. खुद्द ख्रिश्चन देशांमध्ये कॅथोलिक आणि त्याचे अनेक पंथ, प्रोटेस्टंट आणि त्याचे अनेक पंथ निर्माण झाले. युरोपमध्ये कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट यांच्यामध्ये अनेक युद्धे झाली. ‘तीस वर्षांचे युद्ध’ हे इतिहासात फार प्रसिद्ध आहे. या युद्धात ख्रिश्चन लोकांनी ख्रिश्चन लोकांना कापून काढले. कापून काढण्याचे कारण तो माझा पंथ मानत नाही, हे आहे.
 
इस्लामविषयी काय सांगावे? पहिल्यांदा त्यांनी सर्व अरबस्तान इस्लाममय करून टाकला. मग पारशांचा देश इराण इस्लाममय करून टाकला. जे मुसलमान होणार नाहीत, त्यांना जिवंत ठेवले नाही. भारतातही त्यांनी सातव्या शतकापासून ते अठराव्या शतकापर्यंत आक्रमणे करून इस्लामच्या तलवारीखाली कोटी-दीड कोटी हिंदूंना ठार मारले आहे. रशियात कम्युनिझम आला. कम्युनिझमला विरोध करणार्‍या दोन कोटी रशियन लोकांना लेनिन आणि स्टॅलिन यांनी ठार केले. त्याचा आदर्श माओने चीनमध्ये गिरविला. पॉलपॉट याने हा किस्सा कंबोडियात गिरविला. जो आपल्या मताचा नाही, त्याला जिंवत ठेवायचे नाही. हे तिन्ही विचारधारांचे समान सूत्र आहे. या विचारधारेचे लेखक, राजनेते, पत्रकार, विद्यापीठाचे प्राध्यापक पुस्तकांचा ढीग पाडून आम्हाला सांगणार की सेक्युलॅरिझमचे पालन करा, त्याशिवाय भारत एक राहणार नाही, भारतात धर्मकलह सुरू होतील.
 
 
मोहनजी भागवत यांनी घटनाकारांचा उल्लेख केलेला आहे. आपली राज्यघटना निर्माण करणारे बहुसंख्य हिंदूच होते. त्यामुळे त्यांना हिंदू विचार काय आहे, तो कसा सर्वसमावेशक आहे, सर्व उपासना पंथांचा आदर करायला तो कसा शिकवितो आणि सर्व उपासना पंथांनी एकमेकांचा आदर करीत, गुण्यागोविंदाने कसे राहायचे याचे फार बारकाईने ज्ञान सर्वांना होते. अनेक कलमांवर चर्चा करीत असताना याविषयी अनेकांची भाषणे झालेली आहेत. संंघाच्या परिभाषेत सांगायचे तर ही भाषणे उत्तम बौेद्धिक वर्ग आहेत. यामुळे आपल्या घटनाकारांनी राज्याची कोणतीही उपासनापद्धती राहणार नाही आणि सर्व उपासनापद्धतींना स्वातंत्र्य राहील, राज्य नागरिकांवर कोणत्याही एका उपासनापद्धतीची लादणूक करणार नाही, याची हमी दिलेली आहे. या विचाराचा पाश्चात्त्य विचाराशी काहीही संबंध नाही. मिलच्या विचाराशी संबंध नाही, हॉब्स, लॉक, रुसो, मार्क्स यांच्या विचारांशी संबंध नाही.
संबंध जर असेलच तर तो आपल्या प्राचीन विचारांशी आहे. ‘एकम् सत् विप्रा बहुधा वदन्ति’ या वाक्याशी आहे, ‘सर्व खल्विदं ब्रह्म’ या ब्रह्मवाक्याशी आहे आणि महिम्न स्तोत्रातील ‘रुचिनां वैचित्र्यादृजुकुटिलनानापथजुषाम्। नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव॥’ या मंत्राशी आहे. हा मंत्र स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या भाषणात सांगितला. असहिष्णू धर्ममताची मंडळी आजही आपले मत दुसर्‍यावर लादण्याचा प्रयत्न करतात, धर्मांतरे करतात आणि धर्मांतर करणेे हाच आमचा धर्म आहे असे सांगतात. अशी सर्व मंडळी सेक्युलॅरिझमचे शत्रू आहेत. भारतीय सर्वसमावेशकतेचे मारेकरी आहेत. म्हणून त्यांचा विरोध करणे हे सर्वसमावेशकतेचे जीवन जगू इच्छिणार्‍या, सर्व मतांचा अवलंब स्वीकारणार्‍या जनसमूहाचे प्राथमिक कर्तव्य आहे. त्यांचा विरोध करीत असताना भंपक जण काय म्हणतील याची काळजी करता कामा नये.
 
 
सेक्युलॅरिझम हा शब्द आपल्या शब्दकोशातील शब्द नाही. आपल्या शब्दकोशांतील शब्द आहेत, ‘कुणाही जिवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे’ - सर्वेश्वराची पूजा करायची आहे, तिचा अधिकार सर्वांना आहे. ज्याला ज्या मार्गाने करायची आहे, त्याला त्या मार्गाने करू द्यावी, त्याविषयी भांडण करण्याचे कारण नाही. म्हणून आपला सेक्युलॅरिझमसाठी पर्यायी शब्द ठरतो ‘सर्वमतादर’. कुठल्याही एका मताला अंतिम सत्य न मानणे, सत्याकडे जाण्याचा तोही एक मार्ग आहे, हे स्वीकारणे. असे सर्व भाव सर्वमतादर या शब्दात येतात. आणि हा भाव जे मानणार नाहीत, माझेच म्हणणे खरे, तुम्ही सर्व पाखंडी आहात, काफर आहात, हिदन आहात असे जो म्हणेल त्याचा आदर करण्याची आपल्यावर कोणतीही सक्ती नाही. त्याला त्याच्या भाषेत उत्तर द्यायला पाहिजे. मोहनजी भागवत म्हणाले तेच खरे आहे की, अन्य कुणी आम्हाला सेक्युलॅरिझम समजावून सांगण्याच्या भानगडीत पडू नये. सेक्युलॅरिझममध्ये असलेलेल सर्व भाव आणि त्याही पलीकडे असलेली मानवता आमच्या रक्तबीजात आहे आणि आपण सर्व जण सहजपणे तिचे पालन करीत असतो.