स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव - वाळवीकडेही लक्ष द्या

विवेक मराठी    18-Aug-2021
Total Views |
@रमेश पतंगे
स्वातंत्र्याचे शत्रू चीन आणि पाकिस्तान हे काय करतात, याकडे आपण लक्ष दिले पााहिजे. त्यांना ठोकून काढण्याची क्षमता असणारे राज्यकर्ते आपण निवडून दिले पाहिजेत आणि आपण अज्ञानी राहिलो, तर तिबटचे उदक चीनच्या हातावर सोडणारे, अक्साई चीन चीनला देणारे, एक तृतीयांश काश्मीर पाकिस्तानला देणारे राज्यकर्ते आपल्याकडून निवडले जातील. स्वातंत्र्याची वाळवी अगोदर लहानच असते. ही वाळवी हळूहळू सगळा वृक्ष पोखरीत जाते. म्हणून वाळवी लागली असतानाच तिचा नाश करणे आवश्यक आहे आणि तशी इच्छाशक्ती असणारे राज्यकर्ते निवडणे ही स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची गरज आहे.

china_1  H x W:
 
देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतो आहे. इंग्रजांकडून भारताला स्वातंत्र्य मिळाले. अनेक इंग्रजांचे तेव्हा असे मत होते की, भारत स्वातंत्र्य मिळविण्यास लायक नाही. विन्स्टन चर्चिल याचे मत असे होते, ""Power will go to the hands of rascals, rogues, freebooters; all Indian Leaders will be of low calibre & men of straw. They will have sweet tongues and silly hearts. They will fight amongst themselves for power and India will be lost in political squabbles. A day would come when even air and water would be taxed in India.'' - ‘सत्ता बदमाश, लुटारू आणि मद्यविक्रेत्यांच्या हातात जाईल. भारतातील सर्व नेते गवताच्या काडीसारखे आहेत. त्यांच्यात विशेष क्षमता नाहीत. त्यांच्या जिभेवर मध आहे, पण त्यांची अंत:करणेे मूर्खाची आहेत. सत्तेसाठी ते आपापसात कलह करतील. भारत राजकीय गोंधळात सापडेल. एक दिवस असा उजाडेल की, हवा आणि पाणी यावरही कर आकारला जाईल.’ विन्स्टन चर्चिल ब्रिटनचे राष्ट्रपुरुष असले, तरीही ते जबरदस्त वंशवादी होते. अत्यंत घमेंडखोर होते. मानवी जीवनासंबंधी त्यांना विशेष आस्था नव्हती. म्हणून त्यांचे मढे आपल्या डोक्यावर घेण्याचे कारण नाही.
चर्चिल काही म्हणाले, तरी भारताला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे झाली आहेत आणि या काळात पं. नेहरू, लालबहादुर शास्त्री, श्रीमती इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्यासारखे जागतिक कीर्तीचे नेते भारताने विश्वाला दिले आहेत. त्यांच्या त्यांच्या राजकीय धोरणांविषयी देशात उलटसुलट चर्चा चालते. ही आपली लोकशाही आहे. परंतु भारत अखंड आहे आणि भारतीय स्वातंत्र्याविषयी सगळे राजकीय नेते सजग आहेत. चर्चिलची भविष्यवाणी केराची टोपलीदेखील स्वीकारणार नाही. ती म्हणेल की, मी नक्कीच एवढी घाण नाही.
china_3  H x W: 
 
असे असले, तरी जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेले आहे, त्याचे सुराज्य करणे, भारत स्वावलंबी करणे, लष्करीदृष्ट्या आवश्यक तेवढे सामर्थ्यसंपन्न करणे, गरिबीवर मात करणे, धर्म-जातिभेदांच्या भिंती काढून टाकणे अशी असंख्य कामे अजून पूर्ण व्हायची आहेत. यातील प्रत्येक विषयावर विस्तृत लिहिता येण्यासारखे आहे, परंतु त्यातील देशाच्या संरक्षणाचा विषय हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे उत्तर सीमेबाबत थोडा विचार करू या.
भारताची उत्तर सीमा म्हटली की, सर्वांच्या डोळ्यासमोर चीन येणे स्वाभाविक आहे. पाकिस्तान भारताचा शत्रू आहे, हे कुणाला सांगावे लागत नाही. पाकिस्तानचे नाव नकाशावरून मिटवून टाकले पाहिजे, अशा घोषणा अतिउत्साही लोक देत असतात. चीन आणि पाकिस्तान यांच्या शत्रुत्वाची तुलना करीत असता पाकिस्तानपेक्षा चीनचा धोका भारताला अधिक आहे. 1962 साली चीनने भारतावर आक्रमण केले. चीनने 38 हजार चौ.कि.मी.चा अक्साई चीन बळकाविला. भारताचे राज्य अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग आहे, असे चीन सातत्याने सांगतो. भारताचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान अरुणाचल प्रदेशात शासकीय भेटीसाठी गेले की चीन त्यावर आक्षेप घेतो. त्याचे म्हणणे असते की, आमच्या प्रदेशात तुम्ही का आलात? चीनची ही भूमिका अजिबात बदललेली नाही.
दलाई लामा अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भेटीसाठी (2017 साली) गेले होते. ही त्यांची भेट धार्मिक कामासाठी होती. त्यात कुठलेही राजकारण नव्हते. दलाई लामा हे चीनच्या डोळ्यातील कुसळ आहे. त्यांच्या हालचालीवर चीनचे बारीक लक्ष असते. दलाई लामा चीनने बळकावलेल्या तिबेटचे धर्मगुरू आहेत. ते बौद्ध आहेत. तिबेटी जनता त्यांना भगवान गौतम बुद्धांइतकाच मान देते. त्यांच्या रूपाने तिबेटी जनतेच्या स्वातंत्र्याची आकांक्षा जागृत आहे. भारताने दलाई लामा यांना आश्रय दिल्यामुळे चीनच्या पोटात सतत दुखत असते.


china_2  H x W:

असे दलाई लामा अरुणाचल प्रदेशच्या भेटीसाठी गेले असता ‘ग्लोबल टाइम्स’ या चिनी वृत्तपत्रात त्याविषयी एक लेख प्रकाशित झाला. चीनमध्ये आपल्यासारखे वृत्तपत्रीय स्वातंत्र्य नाही. ग्लोबल टाइम्समध्ये जी मते व्यक्त केली जातात, ती चिनी शासनाची मते समजली जातात. आपल्याकडे वर्तमनापत्राच्या लेखाखाली लिहिले असते की, ‘ही मते लेखकाची आहेत, म्हणजे आमची नाहीत.’ तसे चीनमध्ये नसते.
 
ग्लोबल टाइम्स लिहितो - ‘भारतापेक्षा चीनचा जीडीपी (राष्ट्रीय उत्पन्न) भारतापेक्षा अनेक पटीने जास्त आहे. चीनचे लष्करी सामर्थ्य हिंदी महासागरापर्यंत पोहोचणारे आहे. भारताच्या शेजारील देशांशी चीनचे संबंध चांगले आहेत. चीनच्या सीमेला लागून असलेल्या भारताच्या उत्तरी राज्यात अशांतता आहे. जर चीनने भारताबरोबर भूराजनीतिक संघर्ष करायचे ठरविले, तर त्यात बिजिंग पराभूत होईल की नवी दिल्ली?’ ही एक प्रकारची धमकी आहे. चीन वेगवेगळ्या प्रकारे अशा धमक्या देतच असतो.
 
भारताचा शत्रू पाकिस्तान याच्याशी चीनचा दोस्ताना आहे, नेपाळमध्ये चीनचा हस्तक्षेप आहे. म्यानमारमध्येदेखील चीनचा हस्तक्षेप आहे. श्रीलंकेत एक बंदर बांधण्याचे काम चीनने सुरू केलेले आहे. पाकिस्तानमध्येदेखील एक बंदर बांधण्याचे काम चालूच आहे. या दोन्ही बंदरांतून चीनचे नाविक तळ उभे राहू शकतात. युद्धामध्ये नाविक सामर्थ्याला प्रचंड महत्त्व असते. ब्रिटनने नाविक सामर्थ्याच्या बळावरच, छोटा देश असूनही, जगावर राज्य केले. चीन, पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर बांधण्याचे काम 2013पासून चालू आहे. त्यासाठी चीन 62 अब्ज डॉलर्स खर्च करतो आहे. हा मार्ग पाकिस्तानने बळकावलेल्या काश्मीरमधून जातो, म्हणजे भारतीय प्रदेशातून जातो. ग्वादर बंदर येथून हा मार्ग सुरू होतो आणि तो चीनच्या काशगर येथपर्यंत जातो. (CPEC Project) हा मार्ग एक हजार शंभर किलोमीटर लांबीचा आहे. हा केवळ व्यापारी मार्ग समजणे मूर्खपणाचे ठरेल. या मार्गाने लष्करी वाहतूकही प्रचंड प्रमाणात होईल. म्हणजे भारताच्या डोक्याकडून चीन उद्या भारतातही घुसू शकतो.

china_4  H x W: 
 
भारतावर सतत दडपण ठेवण्यासाठी उत्तर सीमेवर चिनी लष्कर भारतीय हद्दीत घुसखोरी करीत राहते. या चीनचे दोन हेतू दिसतात. पहिला हेतू अक्साई चीन हा चीनचा भाग आहे, हे भारताने मान्य करावे. भारताने ते मान्य करण्यासाठी, भारतावर दडपण म्हणून अरुणाचल प्रदेशावर चीन आपला दावा सांगत असतो. चीनला भारत-चीन सीमारेषा - जिला ‘मॅकमोहन लाइन’ म्हणतात, ती मान्य नाही. मॅकमोहन हे ब्रिटिश राजनीतिज्ञ होते. त्यांनी 1913साली भारत-चीन सीमा निश्चित केली. ही सीमा ब्रह्मदेशापर्यंत पोहोचते. या सीमारेषेला मॅकमोहन लाइन असे नाव पडले. 1950 सालापासून भारत आणि चीन यांच्यात सीमारेषेबद्दल चर्चा चालू आहेत. वादाच्या फैरी झाडल्या आहेत. भारताला लागून असलेली मॅकमोहन लाइन चीनला मान्य नाही, पण ब्रह्मदेशाला लागून असलेली मॅकमोहन लाइन चीनला मान्य आहे.
 
चिनी राजनीती आणि विशेषत: चीनची परराष्ट्रनीती हा अतिशय गंभीरपणे अभ्यास करण्याचा विषय आहे. विजय गोखले यांचे "The Long Game' हे पुस्तक चीनच्या परराष्ट्रनीती वाटाघाटीवर खूप प्रकाश टाकणारे आहे. पहिल्याच प्रकरणात त्यांनी 1950पासून ते 1954पर्यंत तिबेट, मॅकमोहन लाइन, अक्साई चीन आदी विषयासंबंधात चीनशी ज्या वाटाघाटी झाल्या, त्यात चीनने भारताला कसे मामा बनविले, हे फार उत्तमरित्या सांगितले आहे. मामा बनविले हा त्यांचा शब्दप्रयोग नाही. कारण ते भारताचे ज्येष्ठ डिप्लोमॅट आहेत, ते अशा भाषेत नाही बोलत. पण जेव्हा आपण सर्व प्रकरण वाचतो, तेव्हा वाटाघाटी करताना आपण म्हणजे आपले डिप्लोमॅट्स आणि अगदी पं. नेहरूदेखील कसे बेसावध असत, माहितीचा अभाव किती असे आणि चीनच्या स्वभावाची ओळख कशी नसे, हे लक्षात येते.
 
भारताच्या संरक्षणासंदर्भात चिनी संकट हे लष्करी संकट आहे, आर्थिक संकट आहे आणि भारतात अंतर्गत कलह उत्पन्न करण्याची शक्ती करणारेदेखील संकट आहे. ते कसे आहे हे गोखले आपल्या पुस्तकात असे सांगतात - ‘2007 आणि 2008 साली भारत सरकारच्या अमेरिकेशी वाटाघाटी चालू होत्या. या वाटाघाटी भारतात अणुऊर्जा निर्माण करण्यासंबंधातील होत्या. त्याला "Indo-US Nuclear deal' असे म्हणतात. हा करार होऊ नये, म्हणून चीनने आंतरराष्ट्रीय स्तरावर जितक्या पाचर मारता येतील तितक्या मारण्याचा प्रयत्न केला. गोखले यांच्या पुस्तकात याचा तपशीलवार इतिहास वाचू शकतो - भारतातील डाव्या कम्युनिस्ट पक्षांना या कराराविरुद्ध प्रचार करण्यास चीनने भाग पाडले. त्यांच्या पाठिंब्यावर डॉ. मनमोहन सिंग यांचे सरकार टिकून होते. त्यांनी पाठिंबा काढून घेतला. त्या वेळी अन्य देशभक्त पक्षांनी मनमोहन सिंग शासनाला पाठिंबा दिला आणि अविश्वासदर्शक ठराव बारगळला. जंगली नक्षलवादी चळवळ आणि शहरी नक्षलवादी चळवळ यात चीनचा सहभाग खूप मोठा आहे.
 
राम माधव यांचे
"Because India Comes First' आणि विजय गोखले यांचे "The Long Game' ही पुस्तके चीनच्या राजकीय आकांक्षावर, विस्तारवादावर आणि प्रभुत्व निर्माण करण्याच्या सामर्थ्यावर खूप चांगला प्रकाश टाकणारी आहेत. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला या विषयाची माहिती असणे फार आवश्यक आहे. देशाचे परराष्ट्र धोरण हा केवळ परराष्ट्र मंत्रालयाचा विषय नाही. हे सगळे विषय आपल्या स्वातंत्र्याशी निगडित आहेत. आपली राज्यघटना आणि तिने दिलेली सर्व प्रकारची स्वातंत्र्ये यांचे रक्षण करायचे असेल, तर या स्वातंत्र्याचे शत्रू चीन आणि पाकिस्तान हे काय करतात, याकडे आपण लक्ष दिले पााहिजे. असे लक्ष देण्याची आपल्याला सवय लागली तर त्यांना ठोकून काढण्याची क्षमता असणारे राज्यकर्ते आपण निवडून देऊ. आणि आपण अज्ञानी राहिलो, तर तिबटचे उदक चीनच्या हातावर सोडणारे, अक्साई चीन चीनला देणारे, एक तृतीयांश काश्मीर पाकिस्तानला देणारे राज्यकर्ते आपल्याकडून निवडले जातील. स्वातंत्र्याची वाळवी अगोदर लहानच असते. ही वाळवी हळूहळू सगळा वृक्ष पोखरीत जाते. म्हणून वाळवी लागली असतानाच तिचा नाश करणे आवश्यक आहे आणि तशी इच्छाशक्ती असणारे राज्यकर्ते निवडणे ही स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची गरज आहे.