ही एकजूट आपल्या अस्मितेविरुद्ध

विवेक मराठी    01-Aug-2021
Total Views |
@रमेश पतंगे
बंगालसारख्या एका राज्यात जी रणनीती यशस्वी झाली, ती सर्व राज्यांत यशस्वी होईल याची शक्यता फार कमी असते. प. बंगालमध्ये भाजपाचा पराभव केला, हे वाक्य अर्थहीन आहे. पं. बंगालमध्ये सत्तेवर भाजपा नव्हती. त्यामुळे भाजपाचा पराभव कसा झाला? पराभव सत्तेवर असलेल्या पक्षाचा होतो. भाजपाला प. बंगालची सत्ता मिळाली नाही, एवढेच आपण म्हणू शकतो. प. बंगालचे मॉडेल अत्यंत वेगळे आहे. काँग्रेस आणि डावे कम्युनिस्ट यांचा तिथे धुव्वा उडाला आहे. हे मॉडेल यशस्वी व्हायचे असेल, तर प्रत्येक राज्यात काँग्रेस आणि अखिल भारतीय पक्षांना आपले अस्तित्व गुंडाळून ठेवावे लागेल.
 

bjp_1  H x W: 0

हा लेख लिहीत असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्लीत आल्या होत्या. पाच दिवसांच्या त्यांच्या दिल्ली दौर्‍यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट हा एक विषय होता. त्या पंतप्रधानांना भेटल्या. कोविड-१९ महामारीशी मुकाबला करण्यासाठी केंद्राने पश्चिम बंगालला लसींचा अधिक पुरवठा करावा, अशी त्यांनी मागणी केली. पंतप्रधानांच्या भेटीत हा विषय सोडून आणखी कोणत्या विषयावर बोलणे झाले, ते काही माध्यमांना समजले नाही. पंतप्रधानांची भेट हा त्यांच्या दिल्लीवारीचा विषय होता, तसा दुसरा विषय पंतप्रधानपदावर २०२४नंतर नरेंद्र मोदी असू नयेत हादेखील होता. हा विषय नरेंद्र मोदी यांच्याशी बोलण्याचा नाही, हे आपण सर्व जण समजू शकतो. हा दुसरा विषय विरोधी पक्षनेत्यांशी बोलण्याचा आहे.

ममता बॅनर्जी यांनी हा दुसरा विषय घेऊन श्रीमती सोनिया गांधी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, शरद पवार, आनंद शर्मा आणि कमलनाथ यांच्या भेटी घेणे प्रारंभ केले. त्यांनी घोषणा दिली की, लोक आता म्हणू लागले आहेत, ‘अच्छे दिन’ खूप झाले, आता आम्हाला ‘सच्चे दिन’ हवे आहेत. आता राजकीय तुफान येणार आहे आणि त्याला अडविणे फार कठीण आहे. मांजराच्या गळ्यात घंटी बांधण्याचे काम मला करायचे आहे असेही त्या म्हणाल्या.

राजकीय नेता म्हटला की पत्रकार परिषद आली. सत्ताधारी पक्षाविरुद्ध प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांची एकजूट करण्याचा विषय सुरू झाला की पहिला प्रश्न निर्माण होतो - विरोधी पक्षांचे नेतृत्व कोण करणार? "ममता सर्वांचे नेतृत्व करणार काय?" असाही प्रश्न पत्रकारांनी विचारला. ममतादीदींनी त्याला राजकीय उत्तर दिले की, "मी माझी आवड अन्य पक्षांवर लादू इच्छित नाही. परिस्थिती जशी निर्माण होईल, त्याप्रमाणे नव्या नेतृत्वाचा उदय होईल." भाजपाला काँग्रेसच्या वाय.एस. जगन मोहन रेड्डी आणि बिजू जनता दलाचे नवीन पटनाईक यांचे समर्थन असते. पत्रकारांनी विचारले की, "हे दोन्ही नेते विरोधी गटात सामील होतील का?" त्यावर ममता म्हणाल्या की, "आज ते होणार नाहीत, परंतु उद्या ते होऊ शकतात."

यानंतरचा प्रश्न आला की, "उत्तर प्रदेश, पंजाब, आणि उत्तराखंड या राज्यांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. या तीन राज्यांमध्ये विरोधी दलांची भूमिका कोणती असेल?" ममता यावर म्हणाल्या की, "बंगालमध्ये आम्ही भाजपाचा पराभव करू शकतो, तर अन्य राज्यातही हे होऊ शकते. २०२४ची निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध सारा देश अशी लढली जाईल. ‘पूरे देश में खेला होबे (खेळ होईल)’ सगळ्या देशाला सच्चे दिन हवे आहेत." काँग्रेसचा विषय आला असता ममता दीदी म्हणाल्या की, "प्रादेशिक पक्षांवर काँग्रेसचा विश्वास आहे आणि प्रादेशिक पक्षांचादेखील काँग्रेसवर विश्वास आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या बरोबर आपली चर्चा खूप चांगल्या वातावरणात झाली. सर्वांनी एकत्र येण्याची आता गरज आहे. मी लीडर नसून केडर आहे."


bjp_2  H x W: 0
हा झाला ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौर्‍याचा थोडक्यात इतिहास. २०२४ निवडणुकीत प्रादेशिक पक्षांना बरोबर घेऊन त्या-त्या राज्यांत एकजूट केली पाहिजे, हा विचार दीड-दोन वर्षांपासून सुरू आहे. शरदराव पवार हे या विचारसूत्राचे मुख्य आधारस्तंभ आहेत. निवडणूक विशेषज्ञ प्रशांत कुमार यांचादेखील हा सिद्धान्त आहे. प्रशांत कुमार हे ममता बॅनर्जी यांचे निवडणूक रणनीतिकार होते. त्यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेऊन २०२४च्या निवडणुकांची रणनीती कशी आखली पाहिजे, यावर चर्चा केली. त्याला आता दीड-दोन महिने झाले.

सत्ताधारी पक्षाविरुद्ध विरोधी पक्षांनी रणनीती आखणे हा लोकशाही राजवटीचा अविभाज्य भाग असतो. यासाठी ममता बॅनर्जी, शरदराव पवार आणि त्यांचे सल्लागार पीके (प्रशांत कुमार) हे जे काही करुन राहिले आहेत, त्याबद्दल वेडेवाकडे लिहिण्याची काही गरज नाही. त्यांचे जे प्रयत्न चालू आहेत, ते संसदीय लोकशाहीचा विचार केला तर या लोकशाहीच्या चौकटीत बसणारेच आहेत. काही प्रश्न निर्माण होतात, त्याचा थोडा विचार करू या.

भाजपाचे रणनीतिकार ममता बॅनर्जी, शरद पवार यांच्या खेळीचा कसा विचार करणार आहेत? त्यांनी कसा विचार करावा? असा उपदेश करणे म्हणजे या रणनीतिकारांना राजनितीतील काही समजत नाही असे म्हणण्यासारखे आहे. ते याचा गंभाीरपणे विचार करत असतीलच. सत्ताधारी पक्ष नेहमी हे पाहतो की, विरोधकांची आपल्याविरुद्ध एकजूट होणार नाही. एकजुटीचे प्रयत्न चालले तर ते कोलमडून कसे पडतील याची रणनीती आखली जाईल. आर्य चाणक्य यांच्या सूत्राप्रमाणे साम, दाम, दंड, भेद, याचा अवलंब केला जातो. भाजपाचे रण नीतिकार यात कमी पडतील हे समजण्याचे कारण नाही.

दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की, बंगालसारख्या एका राज्यात जी रणनीती यशस्वी झाली, ती सर्व राज्यांत यशस्वी होईल याची शक्यता फार कमी असते. प. बंगालमध्ये भाजपाचा पराभव केला, हे वाक्य अर्थहीन आहे. पं. बंगालमध्ये सत्तेवर भाजपा नव्हती. त्यामुळे भाजपाचा पराभव कसा झाला? पराभव सत्तेवर असलेल्या पक्षाचा होतो. भाजपाला प. बंगालची सत्ता मिळाली नाही, एवढेच आपण म्हणू शकतो. प. बंगालचे मॉडेल अत्यंत वेगळे आहे. काँग्रेस आणि डावे कम्युनिस्ट यांचा तिथे धुव्वा उडाला आहे. हे मॉडेल यशस्वी व्हायचे असेल, तर प्रत्येक राज्यात काँग्रेस आणि अखिल भारतीय पक्षांना आपले अस्तित्व गुंडाळून ठेवावे लागेल. अशी अपेक्षा करणे हा मोठा राजकीय विनोद ठरेल.

आपला देश एक असला, त्याची संस्कृती एक असली, तरी वेगवेगळ्या राज्याप्रमाणे त्याची राजकीय संस्कृती वेगवेगळी असते. प्रत्येक राज्याचे प्रश्न वेगवेगळे असतात. राज्यांच्या नेत्यांची ठेवण वेगळी असते. त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. त्यांचे हितसंबंध वेगळे असतात. अशा सर्वांना एका समान मुद्द्यावर एकत्र आणणे, सोपे काम नाही. हे काम ममता बॅनर्जी आणि त्यांच्या टीमने केले, तर ते राजकीय आश्चर्य झाले असे मानावे लागेल. देशाच्या राजकारणात फक्त आणीबाणीच्या कालखंडात मुख्य विरोधी पक्ष एकत्र आले, त्यात दक्षिणेतील पक्ष सामील झाले नाहीत, ही आपल्या देशातील स्थिती आहे.

ममता बॅनर्जी, शरद पवार, अखिलेश यादव, मायावती, गांधी परिवार यांच्या शक्तीला कमी लेखण्याची राजकीय चूक कोणी करू नये. विशेषतः भाजपाने करू नये. या सर्वांविषयी भाजपाचे समर्थक वेगवेगळ्या प्रकारे नकारात्मक प्रचार करीत असतात. ममता बॅनर्जींना कुणी ‘लेडी जीना’ म्हणतात. त्या मुस्लीमधार्जिण्या आहेत. सत्तेवर त्या दीर्घकाळ राहिल्या तर बंगाल भारतात राहणार नाही असेही काही जण भाकीत करतात. विचार याचा केला पाहिजे की, ममता बॅनर्जींना ५१% मते पडली. अशी कोणती शक्ती ममता बॅनर्जी यांच्याकडे आहे, ज्यामुळे त्यांना एवढी मते पडली? याचा शोध घेतला पाहिजे. आपल्या विचारांचे चश्मे लावून राजकीय नेत्याचे आकलन करता येत नाही, त्याला त्याच्याच चश्म्यातून बघावे लागते. त्यामुळे जे दिसेल त्यातून योग्य त्या मार्गाची दिशा सापडेल.

हीच गोष्ट शरद पवार यांच्याबद्दल आहे. भ्रष्टाचार, भूखंडाचे श्रीखंड, गुन्हेगारी जगताशी संबंध, जातींचे राजकारण अशा सगळ्या चश्म्यातून शरद पवार यांच्या सामर्थ्याचे दर्शन होत नाही. एवढे सगळे भन्नाट आरोप करूनही त्यांची लोकप्रियता कायम आहे. निवडून आणण्याची त्यांची शक्ती कमी झालेली नाही. त्याचा शोध घ्यावा लागेल की त्यांची शक्ती नेमकी कशात आहे. बहुजन समाज पार्टी उभी राहत असताना कांशीराम यांच्याविरुद्ध उलटसुलट भरपूर लिहिले गेले. तेव्हा एक घोषणा दिली गेली होती, ‘कांशीराम ईसाई है, देश का कसाई है|’ याच कांशीराम यांनी उत्तर प्रदेशाची सत्ता हस्तगत करण्याएवढे सामर्थ्य प्राप्त केले. हे सामर्थ्य कशात होते किंवा आहे? सगळे चश्मे बाजूला काढून याचा विचार केला पाहिजे. रणनीती ठरविताना भावनेला महत्त्व नसते. वस्तुनिष्ठ विश्लेषणाला महत्त्व असते.
 
आपण सामान्य मतदारांनी या परिस्थितीचा कसा विचार केला पाहिजे, हे समजून घ्यायला पाहिजे. सामान्य मतदार राजनीतिक व्यूहरचनाकार नसतो. सामान्यपणे सगळेच जण या ना त्या प्रकारे नकारात्मक प्रचाराचे बळी होतात. सतत नकारात्मक प्रचार केला आणि तोच कानावर पडला की त्याच गोष्टी खर्‍या वाटू लागतात. गेले वर्षभर नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध नकारात्मक प्रचाराचे रान उठविण्यात आले आहे. कोरोना दुसर्‍या लाटेपासून ते राफेल विमान आणि आता पेगॅसस हेरगिरी हे सगळे विषय सातत्याने नकारात्मक विचाराचे झाले आहेत. सामान्य मतदार या नकारात्मक प्रचाराला बळी पडू द्यायचा नसेल, तर वस्तुस्थिती त्याच्यापुढे सतत मांडली गेली पाहिजे. वेगवेगळ्या माध्यमांतून ती मांडली गेली पाहिजे.

नरेंद्र मोदी यांचा विचार एक व्यक्ती असा करता येत नाही. नरेंद्र मोदी यांचा विचार एक वैचारिक संकल्पना या संदर्भात करावा लागतो. गेल्या सात वर्षांतील त्यांचे कार्य देशाची अस्मिता प्रकट करणारे कार्य आहे. हजार वर्षे आपण पारतंत्र्यात राहिलो. त्याचा एक मोठा परिणाम असा झाला की, आपण आपली अस्मिताच गमावून बसलो. ती जागी करण्याचे काम राजा राममोहन राय, ईश्वरचंद्र विद्यासागर, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. हेडगेवार यांनी केले. समाजाला त्याच्या सत्त्वाची ओळख करुन देणे हे दीर्घकाळ चालणारे काम असते. वर ज्या थोर पुरुषांची नावे घेतली आहेत, त्यांनी ती आपापल्या परीने केले. प्रत्येकाचे मार्ग वेगळे, दृष्टी वेगळी, मांडणी वेगळी, पण लक्ष्य एक होते. लक्ष्य होते - भारत जागा व्हावा आणि विश्वाच्या राष्ट्र मालिकेत त्याने आपले स्वतंत्र स्थान निर्माण करावे. नरेंद्र मोदी हा वारसा पुढे घेऊन निघालेले राजनेता आहेत. भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक, तसेच सामाजिक आणि आर्थिक अस्मितेचे ते प्रतिनिधित्व करतात. या दृष्टीने त्यांच्याकडे बघितले पाहिजे. ती व्यक्ती नाही, तो एक विचार आहे.

ममता बॅनर्जी, शरदराव पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल इत्यादी नेते संसदीय लोकशाहीतील चौकटीतील राजकारण करीत आहेत. पण प्रश्न असा आहे की ते कोणत्या अस्मितेचे प्रतिनिधित्व करतात? मोदी ज्या अस्मितेचे प्रतिनिधित्व करतात, त्या अस्मितेचे प्रतिनिधित्व ही मंडळी करीत नाहीत, हे निर्विवाद सत्य आहे. ते सत्तेचे राजकारण करतात, म्हणून ज्यांना आपल्या अस्मितेचा विचार विजयपथावर ठेवायचा आहे, त्यांनी या सर्वांचे आव्हान स्वीकारले पाहिजे. लोकशाहीची शक्ती लोकमतात असते. लोकमत मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त होते. हे लोकमत घडविण्याचे काम, आपली अस्मिता हा ज्यांचा विचार आहे, त्यांचा आहे. आपल्या संपर्कातून, विविध उपक्रमांतून हे कार्य सतत करत राहण्याचे काम आहे. आपल्या सर्वांचे लक्ष्य एक आहे. ते लक्ष्य आहे ‘भारतमातेला विश्वगुरुपदावर आरूढ करण्याचे’. हे जातिधर्माच्या राजकारणाने, प्रादेशिक अस्मितांच्या राजकरणाने, द्वेेषाच्या राजकारणाने साध्य होणार नाही. राष्ट्रीय राजकारण हाच त्याला एकमेव पर्याय आहे. ममता बॅनर्जी यांचा संघर्ष हा दिसायला मोदी या एका व्यक्तीविरुद्ध दिसतो आणि तसा तो आहेदेखील. हा संघर्ष ममता बॅनर्जी सर्व शक्ती पणाला लावून पुढे नेण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांना साहाय्य करण्यासाठी प्रशांत किशोरसारखे धंदेवाईक एक्स्प एक्स्पर्टस आणि प्रादेशिक नेते मैदानात उतरतीलही. अस्मिता हा ज्यांचा आत्मबिंदू आहे, त्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की ममता बॅनर्जींचा आणि त्यांच्या साथीदारांचा संघर्ष हा आपल्या सर्वांविरुद्ध आहे. म्हणून आपली सर्वांची शक्ती ही काय असते, हे आपल्याला दाखवून द्यावे लागेल.