दहशतवाद्यांचे सगळ्यात ठळकपणे उठून दिसणारे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे ‘सर्वसामान्यपण’ असते. कुणालाही वाटणार नाही इतके सामान्यपणे दहशतवादी वावरतात. ते वेडे तर नसतातच. उलट त्यांच्या ध्येयासाठी पूर्णपणे त्यांनी स्वत:ला झोकून दिलेले असते. ‘आपला सगळ्यात महत्त्वाचा असणारा जीव द्यावा लागला तरीही चालेल, पण हा हल्ला मी करणारच’ इथपर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत महsत्त्वाचे मानसिक टप्पे त्या व्यक्तीने पार केलेले असतात.
आपल्या प्राणाचे संरक्षण करणे ही प्रत्येक सजीवाची नैसर्गिक प्रवृत्ती असते. अगदी प्राणिमात्रांमध्येही निसर्गत: स्वसंरक्षण करण्यासाठी जाणिवा विकसित झालेल्या दिसून येतात. मग आपल्याला सगळ्यात प्रिय असणारा जीव कायमसाठी गमावणे, मृत्यूला कवटाळणे हे आत्मघातकी दहशतवादी कसे काय करू शकतात? काय असते त्यामागची काळी प्रेरणा? दहशतवाद आणि दहशतवाद्यांची मानसिकता ह्यांचा थेट संबंध आहे. विशेषत: आत्मघातकी हल्ल्यामध्ये तर स्वत:चा जीव देऊन हल्ला यशस्वी करायचा असतो. एखादी व्यक्ती स्वत:ला ठार मारून दुसर्यांचा बळी घ्यायला का तयार होते? आत्मघातकी दहशतवादी हा काही एका दिवसात तयार होत नसतो. त्याला काही काळ जावा लागतो. एखाद्या ठिकाणी बाँब किंवा स्फोटके ठेवणे, रेल्वेमध्ये किंवा एखाद्या गर्दीच्या ठिकाणी टाइमबाँब लावणे आणि त्याचा स्फोट घडवणे ह्यासाठी लागणारी मानसिक तयारी वेगळी असते. पण ज्या हल्ल्यामध्ये हल्लेखोराचा मृत्यू अटळ आहे, त्या हल्ल्यासाठी लागणारी मानसिक तयारी खूपच वेगळी असते. आत्मघातकी दहशतवादी हल्ला करण्यासाठी विशिष्ट स्वरूपाची मानसिकता तयार व्हावी लागते. त्यासाठी दहशतवादी संघटना जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. त्यासाठी संभाव्य दहशतवादी निवडण्यापासून त्याने प्रत्यक्षात दहशतवादी हल्ला घडवून आणेपर्यंत ‘मानसिकता’ हा घटक महत्त्वाची भूमिका बजावतो.
आत्महत्या, आत्मबलिदान आणि आत्मघातकी दहशतवाद
आत्महत्या करणारे लोकही स्वत:चा जीव देतात. ते आणि आत्मघातकी दहशतवादी यांच्यात फरक असतो. आत्महत्या करण्यामागे कारणे वैयक्तिक असतात. जीवनातील नैराश्य, आप्तजनाचा मृत्यू, मानहानी अशा अनेक कारणांमुळे व्यक्ती आत्महत्या करते. काही वेळा सामूहिक आत्महत्याही झालेल्या दिसून येतात. काही वेळा संपूर्ण कुटुंब काही कारणास्तव आत्महत्या करते. पण आत्मघातकी हल्ला वेगळा असतो. यात व्यक्तीचे मरण अटळ असते. त्यात एका विशिष्ट कारणासाठी झपाटले जाणे हे मुख्यत: आढळते. आपल्या जिवापेक्षा दहशतवादी संघटनेची मूल्ये त्या व्यक्तीने महत्त्वाची ठरवलेली असतात. कारण त्या व्यक्तीवर ती मूल्ये वारंवार ठसवलेली असतात.
देशासाठी आत्मबलिदान करणे अत्यंत गौरवास्पद आहे. व्यक्ती देशाच्या सेवेसाठी लष्करात स्वत:होऊन भरती होते. प्रसंगी देशासाठी आपले बलिदान देते. हे त्या व्यक्तीने कर्तव्यासाठी दिलेले सर्वोच्च योगदान असते. जपानमध्ये तर ‘कामिकाझे’ ह्याच कारणासाठी होते. दुसर्या महायुद्धात हे कामिकाझे वैमानिक आपले विमान थेट अमेरिकेच्या युद्धनौकांवर आदळून त्या नौका नष्ट करीत आणि स्वत:ही त्यासह मरणाला कवटाळत असत. ते जणू स्वत:च शस्त्र बनून शत्रूचा वेध घेत. पण कामिकाझे हे देशासाठी बलिदान देत होते. तसेच जपानकडे ‘कायटन’ नावाचे टॉरपिडो होते. ह्याच्या आत बसून सैनिकाला हल्ला करावा लागे. आतमधल्या सैनिकांसह लक्ष्यभेद ह्या कायटनद्वारे केला जात असे. म्हणजे आतला सैनिक हुतात्मा होणार हे ठरलेलेच असायचे. पण हे देशासाठीचे कर्तव्य होते. व्यक्ती आत्महत्या करते, तेव्हा ती तो ‘शेवटचा पर्याय’ म्हणून स्वीकारते. त्यात इतरांचा बळी घेण्याचा हेतू नसतो. देशासाठी सैनिक हौतात्म्य पत्करतात, कारण ते देशावर प्रेम करतात. देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी शत्रूला ठार मारताना ते बलिदान देतात. पण आत्मघातकी दहशतवादी हे विध्वंस घडवतात, त्यात प्रामुख्याने निरपराध नागरिकांचा बळी घेतला जातो. ते चुकीच्या ध्येयाने झपाटलेले असतात. सामान्य नागरिकांचा बळी घेऊन आपला राजकीय किंवा धार्मिक उद्देश पूर्ण करणे कोणत्याही नैतिकतेमध्ये येत नाही. बेसावध असणार्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत माजवणे आणि त्याचा दबाव राजकीय सत्तेवर पाडणे हा दहशतवाद्यांचा हेतू असतो.
आत्मघातकी दहशतवादी आणि मानसिक विकार/विकृती
मानसशास्त्रात अनेक विकृतींचा अभ्यास केला गेलेला आहे. पण दहशतवादी हे कोणतेही कृत्य मानसिक उन्मादी अवस्थेत किंवा विकृतीमुळे करत नाहीत. मुळात ही व्यक्ती ठार होत असल्यामुळे तिची मानसिकता नंतर कळू शकत नाही. पण नियोजित हल्ला करण्यासाठी स्वत:ला तयार करणारी व्यक्ती निश्चितच मानसिकदृष्ट्या सक्षम असते. ती वेडाच्या भरात किंवा उन्मादी अवस्थेत नसते. वेडाच्या भरात इतरांवर शस्त्र चालवणारी व्यक्ती वेगळी आणि सुनियोजित कारस्थान करून, मनाची पूर्ण तयारी करून आत्मघातकी हल्ला करणारी दहशतवादी व्यक्ती वेगळी!
दहशतवाद्यांचे सगळ्यात ठळकपणे उठून दिसणारे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे ‘सर्वसामान्यपण’ असते. कुणालाही वाटणार नाही इतके सामान्यपणे दहशतवादी वावरतात. ते वेडे तर नसतातच. उलट त्यांच्या ध्येयासाठी पूर्णपणे त्यांनी स्वत:ला झोकून दिलेले असते. ‘आपला सगळ्यात महत्त्वाचा असणारा जीव द्यावा लागला तरीही चालेल, पण हा हल्ला मी करणारच’ इथपर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानसिक टप्पे त्या व्यक्तीने पार केलेले असतात. यात प्रामुख्याने दोन निर्णयप्रक्रियांचा समावेश होतो - 1. हल्ल्याचे नियोजन, 2 प्रत्यक्ष हल्ला. हल्ल्याचे नियोजन यात लक्ष्याची रेकी करणे, ते लक्ष्य निश्चित करणे, स्फोटके मिळवणे आणि व्यक्तीची निवड करणे. दुसर्या टप्प्यात थेट हल्ला चढवणे आणि लक्ष्य गाठणे हे प्रमुख कार्य असते. आत्मघातकी हल्लेखोरांची मानसिक तयारी या टप्प्यासाठी करवून घेतली जाते.
आत्मघातकी दहशतवाद्यांचे ब्रेनवॉश
दहशतवाद्यांचे ब्रेनवॉश पद्धतशीरपणे केले जाते. विशेषत: इस्लामी दहशतवादी भरती करताना त्यांना इस्लामी तत्त्वांसाठी आत्मघात करण्यासाठी शिकवण देण्यात येते. वास्तविक कुराणमध्ये आत्महत्या करणे पाप आहे. पण धर्माच्या रक्षणासाठी कुणाला ठार व्हावे लागले तर ते पुण्य आहे. तसेच धर्मरक्षणासाठी शत्रूला ठार मारणे उचित मानलेले आहे. इस्लामी आत्मघातकी दहशतवादी हे मोठ्या प्रमाणात धर्माप्रती संवेदनशील असतात. पाश्चिमात्य - विशेषत: अमेरिकेच्या वाढत्या प्रभावाला विरोध करण्याची इस्लामी मूलतत्त्ववाद्यांची प्रवृत्ती हे एक कारण आहे. सौदी अरेबियामध्ये मक्का आणि मदिना ही मुस्लिमांची महत्त्वाची धार्मिक क्षेत्रे आहेत. तिथे अमेरिकन सैन्याची उपस्थिती दीर्घकाळ नको, ह्यासाठी त्याला धार्मिक संदर्भ देत संवेदनशील युवकांचे ब्रेनवॉश केले जाते. धर्माच्या नावाखाली विशेषत: इंटरनेटच्या माध्यमातून द्वेषयुक्त साहित्य, चुकीची माहिती, संदर्भ, व्हिडिओ अपलोड केले जातात. चॅटिंग, गेम खेळणे, रोज नवीन माहिती वाचणे ज्यांना आवडते, त्यांना हळूहळू आपल्या संघटनेचे सदस्य करून घेतले जाते. 9/11च्या हल्ल्याच्या आधी दहशतवादी संघटना सदस्य हेरून त्यांचे ब्रेनवॉश करण्याचे प्रमाण जास्त होते. पण नंतर व्यक्ती स्वत:होऊन भरती होण्याचे प्रमाण वाढले आहे. ‘जागतिक जिहादला’ पाठिंबा देण्यासाठी स्वत:होऊन हिंसक कृती करणारे वाढलेले आहेत. ‘लीडरलेस जिहाद’ असे याला म्हटले जाते. मानसिकदृष्ट्या अतिसंवेदनशील असणारे युवक मनातला राग थेट कृतीत उतरवायला तयार होतात. विशेषत: अल कैदासारख्या संघटना तर इंटरनेटवर विविध व्हिडिओ अपलोड करून मुलांना आणि तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी झालेले आहेत. (संदर्भ - अल कैदा ऑनलाइन रॅडिकलायझेशन अँड दि क्रिएशन ऑफ चिल्ड्रेन टेररिस्ट - अनिता पेरेसीन, ऑफिस ऑफ नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल, क्रोएशिया.) अलीकडच्या काळात इसीसच्या उदयामुळे तर ‘इस्लामिक स्टेट’ स्थापन करणे हे जीवनाचे अंतिम ध्येय आहे असे वाटून घेऊन इसीसला जाऊन मिळणार्या तरुणांची संख्या वाढती आहे.
काही केस स्टडीज
इस्माइल-अल-मासौबी याने 22 जून 2001 रोजी गाझा येथे आत्मघातकी हल्ला चढवला. हमासने याची जबाबदारी घेतली होती. त्याआधी त्याने आपले मृत्युपत्र लिहिले होते. त्यात तो लिहितो की, ‘जिहाद’ आणि ‘हौतात्म्य’ या दोन्हीवरच्या प्रेमाने माझ्या आयुष्याला झपाटून टाकलेले होते. कुराणातील शब्दांनी माझ्या आत्म्याला यातना होत. मला माझ्यातील आणि मुस्लीम बांधवांमधील कमतरतेची जाणीव होई. देवाप्रतीच्या मार्गावर चालताना आपल्या कर्तव्यांची पूर्तता करावी असे मला वाटले.’ म्हणजेच आपले हे कृत्य पूर्णपणे आपल्या धर्मासाठी आहे, ह्याची त्याला खात्री पटलेली होती.
इसीससारख्या संघटना तर लहान मुलांना ‘कब ऑफ खलिफत’ यासारखी संबोधने वापरून कोवळ्या वयातच दहशतवादी बनवत आहेत. (संदर्भ - हँडबुक ऑन चिल्ड्रेन रिक्रूटेड अँड एक्स्प्लॉयटेड बाय टेररिस्ट अँड व्हॉयलन्स एक्स्ट्रीमिस्ट ग्रूप्स, युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राईम, 2017.)
आत्मघातकी दहशतवादी हल्ले मध्यपूर्वेत जास्त झालेले आहेत. इस्रायल आणि पॅलेस्टाइन ह्यांच्यात सातत्याने हे हल्ले होत राहतात. विशेषत: स्त्रिया आपल्या वैयक्तिक कारणांसाठी, सूडाची भावना शमवण्यासाठी, जगावेगळे काही तरी करून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आत्मघातकी दहशतवादी बनतात. घराबाहेर पडायला मिळणे, जे स्वातंत्र्य इस्लामी कुटुंबात मिळत नाही ते उपभोगायला मिळते यासाठीसुद्धा काही स्त्रिया संघटनेत सामील होतात. बर्याच वेळा तर भावाच्या/पतीच्या/प्रियकराच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दहशतवादी संघटनेला जाऊन मिळतात. (संदर्भ - अनात बेर्को, ‘दी पाथ टू पॅरडाइज’.)
केस स्टडी म्हणून वफा इद्रिसचेही उदाहरण घेता येईल. इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षामुळे अनेक निर्वासितांना छावण्यामध्ये राहावे लागले. अमारी ह्या एका निर्वासितांच्या छावणीमध्ये वाढलेली वफा इद्रिस. ती छावणीत समाजकार्यही करत असे. पुढे तेविसाव्या वर्षी विवाह, त्यात अपयश, पतीने टाकून देणे इ. वैयक्तिक समस्यांनी ती खचली. रेड क्रॉस सोसायटीसाठी ती काम करू लागली. (संदर्भ - व्हालेय एगेर, फ्रॉम फ्रीडम फायटर टू टेररिस्ट - वूमन अँड पॉलिटिकल व्हॉयलन्स, एशगेट पेज - 188-189.) नंतर, 27 जानेवारी 2002 रोजी 22 पौंडाचा बाँब पाठीवर सॅकमध्ये ठेवून जेरुसलेममध्ये जाफा रोडवर तिने बाँबचा स्फोट घडवला. अल अक्सा मार्टियर ब्रिगेडने जबाबदारी स्वीकारली. वास्तविक ह्या घटनेपर्यंत स्त्रियांचा वापर केवळ बाँब पेरण्यासाठी केला जात होता. पण अल अक्साने तिला दहशतवादी बनवले. तिला वैयक्तिक कारणांनी जीवनाचा तिटकारा होताच, शिवाय रामल्लाहमध्ये पॅलेस्टाइनची मुले मारली जात होती, त्याचा राग होताच. दहशतवादी संघटनेने तिला हेरून घेतले, ब्रेनवॉश केले आणि आपले उद्दिष्ट साध्य केले.
आणखी एक उदाहरण आहे मुरीएल डेगॉकचे. बेल्जियमची ही कॅथॉलिक खिश्चन महिला मोरक्कोच्या एसाम गोरीस ह्या मुस्लीम व्यक्तीच्या प्रेमात पडली. लग्नानंतर ते इराकमध्ये आले. मुरीएल बुरखा वापरत कट्टर मुस्लीम बनली. तिचा पती जहाल सामाजिक गटाचा सदस्य होता. त्याने बाँबचा पट्टा बांधून इराकमध्ये असणार्या अमेरिकी सैन्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण त्याआधीच तो ठार मारला गेला. मग मुरीएल डेगॉकने 9 नोव्हेंबर 2005 रोजी बगदादमध्ये अमेरिकन सैन्याच्या तुकडीवर कारबाँबने हल्ला चढवला. (संदर्भ - बेल्जियन ‘सुसाइड बाँबर’ इज नेम्ड, बी.बी.सी., रित्रीव्ह - 2007-04-09.) स्वत: इस्लाम धर्माची नसूनही इराकमध्ये अमेरीकन सैनिकांना ठार मारण्यासाठी स्वत: आत्मघात ओढवून घेणारी ही महिला. तिच्या पतीने तिला मोठ्या प्रमाणात इस्लामी मूलतत्त्ववादी बनवलेले होते, यात शंकाच नाही. एक ख्रिश्चन महिला धर्मांतर करून इस्लामसाठी मरते, यातून तिच्या मानसिक स्थित्यंतराचा प्रभाव जाणवतो.
साधारणपणे, जी व्यक्ती तिच्या आयुष्यात अपयशी झालेली असते, तिला हेरले जाते. जी व्यक्ती समाजाने मान्य केलेल्या नीतिमूल्यांना पूर्णत: पूर्ण करू शकत नाही, तिच्यात अपराधीपणाची भावना असते. न्यूनगंड असतो. मग काही तरी करून स्वत:ला सिद्ध करण्याची संधी दहशतवादी संघटनेमुळे मिळते.
निर्णयप्रक्रिया
सामाजीकरण आणि मानसिक/भावनिक प्रतिसाद यामुळे एखाद्या दहशतवादी संघटनेकडे व्यक्ती आकर्षित होते. तिच्या वैयक्तिक तत्त्वांपेक्षा ती हळूहळू संघटनेची तत्त्वे महत्त्वाची मानायला लागते. तिच्या विचारधारेवर संघटनेचा प्रभाव जाणवतो. मग विशिष्ट धार्मिक पोशाख परिधान करणे, धार्मिक प्रतीके/चिन्हे बाळगणे असा प्रवास सुरू होतो. व्यक्तीला संघटनेच्या बाहेरील व्यक्तींची गरज कमी होत जाते. कारण समान आवडीनिवडी, समान मूल्यांवर श्रद्धा, वैचारिकदृष्ट्या समान असणार्या व्यक्ती तिथे भेटतात. मग पुढचा टप्पा म्हणजे संघटनेसाठी ‘काहीतरी’ करणे. मग सगळ्यात मोलाचे बलिदान किंवा सगळ्यात मोठे आव्हान पेलण्याची तयारी करणे. संघटनेच्या अंतर्गत आपली निष्ठा सिद्ध करून दाखवणे ही जवाबदारी असते. मग स्वत: संघटनेसाठी एक ‘आदर्श’ निर्माण करणे. ह्यासाठी काही कृत्ये केली जातात. पण यात व्यक्ती अशा मार्गावर चालू लागते की तिथून तिला माघार घेणे अशक्य होत जाते. मग ‘लक्ष्य’ गाठण्यासाठी कुटुंबाचा त्याग करणे किंवा मनाने अलिप्तता स्वीकारणे. बाह्यजगापासून विलगीकरण करणे. यात मनाची मरण्यासाठीची तयारी करणे. अल कैदा, इसीस, बोकोहाराम ह्या इस्लामिक मूलतत्त्ववादी अतिजहाल विचारसरणीच्या दहशतवादी संघटना कुराणच्या संदर्भांचा वापर करून त्या व्यक्तीच्या मनावर हौतात्म्य बिंबवताना दिसतात.
थोडक्यात, विध्वंस आधी मनात घडतो... मग समाजात...!