स्वत:च्या आयुष्याची पुंजी आणि वडिलोपार्जित मालमत्ता पणाला लावून दुर्गम लडाखमध्ये 38 कि.मी.चा रस्ता बांधणीसाठी पुढाकार घेणार्या पद्मश्री सुलतानाम चोंजोर यांचा थोडक्यात परिचय.
ह्याचबरोबर आज लडाखमध्ये सुलतानाम चोंजोर ह्यांचे नावही आदराने घेतले जाते, कारण त्यांनी जगावेगळे कार्य प्रत्यक्षात साकारले आहे. लडाखमधील कारगिल जिल्ह्यातील झन्स्कर भागात आपली वडिलोपार्जित संपत्ती विकून त्यांनी स्थानिक लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी रस्त्याचे प्रकल्प हाती घेतले. हा प्रवास तसा सोपा नव्हता. लडाखमधून हिमाचल व इतर भागाकडे जाण्यासाठी अनेक दिवस चालल्यानंतर स्थानिकांना वाहनांसाठी मोठी रक्कम मोजावी लागत होती आणि ह्यातून वेळ आणि शारीरिक कष्ट दोन्ही लागत असत. ह्यांतूनच मार्ग काढत सुलतानाम चोंजोर ह्यांनी जम्मू-काश्मीरमधील रामजाक ते झान्स्करमधील करग्यकपर्यंत 38 कि.मी. लांबीचा रस्ता तयार केला. मे 2014 ते जून 2017पर्यंत त्यांनी 38 कि.मी. लांबीचे अंतर पूर्ण केले. 1965-2000 ह्या प्रदीर्घ कालावधीत सुलतानाम चोंजोर राज्य हस्तशिल्प विभागात कार्यरत होते.
रस्ता निर्मितीसाठी काही स्थानिक लोकांकडून, नगरसेवकांकडून आणि व्यापार्यांकडूनही त्यांना पैशांची मदत मिळाली, कारण स्थानिक लोक ह्या कामासाठी त्यांच्या बाजूने उभे होते. इतरांच्या वेदना व त्रास पाहून त्यांना रस्ता तयार करण्याची प्रेरणा मिळाली. वर्षातून फक्त 3-4 महिने त्यांना काम करता येत असे, कारण वातावरण आणि बर्फवृष्टीमुळे रस्त्यावर काम करणे शक्यच नव्हते. पण ह्या अवघड परिस्थितीही त्यांनी हाती घेतलेले कार्य पूर्ण केले. पुढे इ.ठ.ज.ने ह्या रस्त्याचे रुंदीकरण आणि विस्तारीकरण केले आहे.
सुलतानाम चोंजोर साधी राहणी पसंत करतात, म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणात आज आर्थिक मदतीची गरज नाही. राज्य सरकारकडून मिळत असलेल्या नियमित मासिक पेन्शनवर त्यांचा उदरनिर्वाह आणि आनंदी आयुष्य सुरू आहे. आज त्यांची एवढीच इच्छा आहे की लडाखमधील बाकी जिल्ह्यांत रस्ते निर्माण व्हावे आणि संपूर्ण लडाख प्रदेश रस्त्यांनी एकमेकांना जोडला जावा, ज्याचा स्थानिकांना लाभ होईल.
लोककल्याणाला वाहून घेतलेल्या सुलतानाम चोंजोर यांच्यासारख्या व्यक्तींमुळे आज जनमानसांत राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ होते आहे. अनेकांना ती प्रेरणादायक ठरते. याच भावनेने या लेखमालेची सुरुवात झाली. लोककल्याणासाठी कटिबद्ध असलेले सुलतानाम चोंजोर ह्यांच्या भावी वाटचालीस मनापासून सदिच्छा आहे.