संघकार्याची गरज आणि कार्यकर्त्यांची क्षमता व रुची लक्षात घेऊन डॉक्टरांनी संघाची कार्यपद्धती हळुवारपणे सुरू केली नि टप्प्याटप्प्याने रुजविली. कार्यपद्धती विकसित करताना त्यासंबंधीच्या सूचना स्वत: न करता त्या कार्यकर्त्यांकडून याव्यात नि मग एखादा बदल घडावा, हेच डॉक्टरांचे सूत्र असे. प्रार्थनेसारख्या कुठल्याही संघटनेसाठी अगदी प्राथमिक आणि मूलभूत गोष्टीबाबतही डॉक्टरांनी हेच धोरण अवलंबिले. सुरुवातीच्या प्रार्थनेपेक्षा संघाची सध्याची प्रार्थना वेगळी आहे. ती कशी विकसित झाली, याची मांडणी करणारा लेख...
शंभरीच्या उंबरठ्यावर असलेल्या रा.स्व. संघाची वाटचाल अभ्यासणे अनेक दृष्टींनी आवश्यक आहे. अनेक संस्था-संघटना कालौघात क्षीण किंवा लुप्त झाल्या. अन्य काही कालबाह्य किंवा मार्गभ्रष्ट झाल्या. आपल्या ध्येयात कोणताही बदल न करणारा संघ कालसुसंगत, समाजमान्य आणि वर्धिष्णू का ठरला? या प्रश्नाचे उत्तर संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांच्या जीवनकार्यात सापडते. संस्थाबांधणीच्या सर्व रूढ संकेतांना छेद देत डॉक्टरांनी संघ घडविला. संघटनेचे नाव, नियम, पदाधिकारी, कार्यक्रम, आर्थिक व्यवस्था अशा कोणत्याही गोष्टी न ठरविताच वरवर चारचौघांसारखा दिसणारा एक निष्कांचन मनुष्य डझनभर तरुणांना घेऊन संघटना स्थापन करतो काय, उण्यापुर्या पंधरा वर्षांत तिला देशव्यापी स्वरूप देतो काय, आपले जीवनसर्वस्व अर्पण करणारे कार्यकर्ते निर्माण करतो काय आणि स्वत:चे व्यक्तित्व गाडून संघटनेच्या रूपात अमर होतो काय! संघाची कार्यपद्धती हा डॉक्टरांच्या अलौकिक प्रतिभेचा आविष्कार होय! ध्येय आणि विचारांबाबत कमालीचा ठामपणा, पण कार्यपद्धतीत मात्र लवचीकता हा डॉक्टरांचा स्वभाव होता. संघकार्याची गरज आणि कार्यकर्त्यांची क्षमता व रुची लक्षात घेऊन डॉक्टरांनी संघाची कार्यपद्धती हळुवारपणे सुरू केली नि टप्प्याटप्प्याने रुजविली. कार्यपद्धती विकसित करताना त्यासंबंधीच्या सूचना स्वत: न करता त्या कार्यकर्त्यांकडून याव्यात नि मग एखादा बदल घडावा, हेच डॉक्टरांचे सूत्र असे. प्रार्थनेसारख्या कुठल्याही संघटनेसाठी अगदी प्राथमिक आणि मूलभूत गोष्टीबाबतही डॉक्टरांनी हेच धोरण अवलंबिले. सुरुवातीच्या प्रार्थनेपेक्षा संघाची सध्याची प्रार्थना वेगळी आहे. ती कशी विकसित झाली हाच या लेखाचा प्रपंच. प्रस्तुत लेखातील माहिती रा.स्व. संघाच्या अभिलेखागारात परिश्रमपूर्वक जतन करून ठेवलेल्या मूळ कागदपत्रांतून घेतलेली आहे.
अण्णा सोहोनी
संघाच्या पहिल्या मराठी-हिंदी प्रार्थनेची जुळणी अनंत गणेश उर्फ अण्णा सोहोनी (1890-1955) यांनी केल्याचे मानले जाते. विद्यार्थी असताना केशवराव हेडगेवारांचे वास्तव्य अनेकदा डॉ. मुंज्यांकडे असे. तेथेच 1913 साली त्यांचा अण्णांशी परिचय झाला. सन 1913 ते 1922 या काळात वर्धा येथील मारवाडी हायस्कूलमध्ये ड्रॉइंगचे व व्यायामाचे शिक्षक असलेले अण्णा 1922 साली नागपुरात आले. सन 1922-23मध्ये ते धंतोली येथील गोखले-कहाते व्यायामशाळेत शिक्षक होते. संघ निघण्यापूर्वीच अण्णा नागपुरातील मुनशी वाड्यामध्ये लक्ष्मीनारायणाच्या देवळाजवळ लाठी शिकवीत असत. सातार्याच्या दामोदर बळवंत भिडे भटजी (जन्म 31 जुलै 1860) या क्रांतिकारकाकडून अण्णांनी कुस्ती, भाल्याची फेक, पट्टा, फरीगदगाचे शिक्षण घेतले होते. लेझीम, लाठी, जंबिया, तलवार, धनुर्बाण यांतही अण्णा निष्णात होते. ऐंशी वर्षांच्या नि दैन्यावस्थेत असलेल्या बाबाजी लोहाराकडून त्यांनी तलवारी, जंबिये, वाघनखे, भाले, शिरस्त्राण, हस्तस्त्राण वगैरे आयुधे करावयाचे शिक्षण घेतले. दि. 28 मे 1926पासून लाठीकाठीचे वर्ग नियमितपणे घेणारे अण्णा सोहोनी संघातील शारीरिक शिक्षणाचे जनक ठरले. संघाचे घटक (हाच शब्द त्या काळी रूढ होता) एकत्र आल्यावर मराठी-हिंदी प्रार्थना म्हणण्याची प्रथा याच सुमारास पडली.
संघाची पहिली प्रार्थना
सन 1924मध्ये अण्णा सोहोनी दहा महिने अकोल्यात असताना तेथील राजेश्वराच्या देवळाजवळील व्यायामशाळेत त्यांनी संघाची जुनी प्रार्थना प्रथम (म्हणजेच संघ सुरू होण्यापूर्वी) म्हटली. ही आठवण अण्णांनी दि. 20 डिसेंबर 1954ला भुसावळ येथे डॉक्टरांचे चरित्रलेखक नाना पालकरांना सांगितली. एका आर्यसमाजी कवितेत बदल करून अण्णा सोहोनी यांनी पहिली प्रार्थना दिली. प्रार्थनेतील मराठी श्लोकही दुसर्या कोणत्यातरी श्लोकात थोडा बदल करून स्वीकारलेला असावा. हे श्लोक त्या काळात काही शाळांमध्ये म्हटले जात असत. संघाची मूळ प्रार्थना कवी गोविंद दरेकर यांनी प्रसिद्ध केलेल्या ‘अभिनव भारत’च्या प्रार्थना पुस्तिकेतील होती, असे श्री पाचलेगावकर महाराजांनी नाना पालकरांना नागपूर येथे 10 नोव्हेंबर 1954ला सांगितले. संघाची जुनी मराठी-हिंदी प्रार्थना पुढीलप्रमाणे होती -
नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी,
नमो धर्मभूमी जियेच्याच कामी, पडो देह माझा सदा ती नमी मी।
भारत माता की जय।
हे गुरो श्रीरामदूता शील हमको दीजिये, शीघ्र सारे सद्गुणों से पूर्ण हिंदू कीजिए,
लीजिये हमको शरण में रामपंथी हम बने, ब्रह्मचारी धर्मरक्षक वीरव्रतधारी बने।
जय वज्रांग बली बलभीम की जय।
कार्यविस्तारातून उत्पन्न झालेली गरज
संघाच्या प्रारंभापासून अखिल हिंदुस्थानातील समस्त हिंदू समाज हाच डॉक्टरांच्या डोळ्यांसमोर होता. किंबहुना फेब्रुवारी 1929मध्ये अण्णा सोहोनी संघापासून दूर होण्याचे हे एक कारण होते. मुस्लीम आक्रमकतेला तात्कालिक उत्तर देणारी, महाराष्ट्रीय तरुणांना शारीरिक शिक्षण देणारी संघटना एवढेच संघाचे स्वरूप अण्णांना अभिप्रेत होते. अण्णा संघापासून दूर झाले हे एकदा सांगत असताना डॉक्टरांचे डोळे पाणावले होते, अशी आठवण वर्ध्याचे संघचालक आप्पाजी जोशी यांनी नमूद केली आहे.
आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि श्रीगुरुजी गोळवलकर या दोन विभूतींनी संघभाव कसा जगला, याचे सखोल चिंतन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक रमेश पतंगे यांनी या पुस्तकातून केले आहे.
संघाच्या गाभ्याला स्पर्श करणारे, संघविचारांची खोली उलगडणारे आणि संघसूत्रांवर भाष्य करणारे पुस्तक.
मूल्य : 200/- ₹
सवलत मूल्य 160/- ₹
https://www.vivekprakashan.in/books/rss-spirit/
नागपूरचे काम नमुनेदार व्हावे, म्हणून तेथील काम बळकट ठेवत असताना नागपूर जिल्हा, हिंदी मध्य प्रांत, वर्हाड प्रांत, खानदेश-कोकणसह मुंबई प्रांत आणि महाराष्ट्राबाहेर संघाची क्रमाक्रमाने सुरुवात झाली. दि. 15 ऑगस्ट 1934ला यवतमाळचे अधिवक्ता भीमराव हरी उर्फ अण्णासाहेब जतकर यांना डॉक्टर पत्राद्वारे लिहितात, ‘संघाचे कार्य दिरंगाईने करावयाचे कार्य नसून आपला अखिल महाराष्ट्र आपल्याला शक्य तितक्या लवकर संघटित करून व हा महाराष्ट्राचा नमुना इतर प्रांतांपुढे ठेवून पाच-दहा वर्षांत सबंध हिंदुस्थान संघटित करावयाचे आहे.’ पुण्याच्या वसंतराव देवकुळे यांना दि. 3 ऑक्टोबर 1939ला पाठविलेल्या पत्रात डॉक्टर लिहितात, ‘अंत:करणपूर्वक संघकार्य करणार्यांची संख्या जितकी वाढेल तितकी संघाला हवीच आहे. महाराष्ट्रातील संघकार्य एका विशिष्ट मर्यादेला पोहोचून संघकार्याकरिता महाराष्ट्राबाहेर पडणारा प्रौढ व तरुण वर्ग आज आपल्याला पाहिजे आहे. आपल्या कार्यातून असा वर्ग लवकरच बराचसा तयार होईल असे वाटते.’ वाईच्या अ.स. भिडे यांना दि. 21 नोव्हेंबर 1939ला पाठविलेल्या पत्रात डॉक्टर पुन्हा हेच म्हणतात, ‘बाहेर प्रांतांत कार्य करणारी कार्यकर्ती मंडळी परत आपले नियोजित स्थळी गेलेली आहे. अशा समर्थ व निष्णात माणसांची जास्त आवश्यकता आहे.’
डॉक्टरांनी घडविलेले तरुण विद्यार्थी स्वयंसेवक शिक्षण घेण्याच्या निमित्ताने संघाचा विस्तार करण्यासाठी प्रांतोप्रांती गेले. त्याचा परिणाम म्हणून काशी, बिलासपूर (1928), इंदूर (1929), कराची (1932), कोकण (1933), खानदेश, मुंबई (1934), बाढ जि. पाटणा (1935), लाहोर (1936), बेळगाव, दिल्ली, लखनऊ, वलसाड (1937), हुबळी (1938), सुरत, कलकत्ता, त्रिचिनापल्ली (1939) असा संघाचा विस्तार झाला.
कार्यकर्त्यांकडून सूचना अपेक्षित
संघाचे पाऊल महाराष्ट्राबाहेर पडताच संघाची मराठी-हिंदी प्रार्थना बदलणे डॉक्टरांना सहज शक्य होते. पण एकतर्फी निर्णय घेणे डॉक्टरांच्या स्वभावातच नव्हते. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी स्वत:होऊन प्रार्थनेबाबत काही उपाय केल्याचे दिसते. बनारस हिंदू विश्वविद्यालयात दुसर्या वर्षाला शिकणार्या दिनकर गणपत उर्फ अण्णा मुलमुले (हे पुढे बनारसच्या संघ कार्यालयाचे प्रमुख झाले) यांनी दि. 3 डिसेंबर 1936ला बाबासाहेब आपटे यांना लिहिलेल्या पत्रात काशी संघाने संघाची मराठी प्रार्थना बदलून त्याऐवजी पुढील हिंदी प्रार्थना घातली, याची माहिती दिली -
यदि देश हित मरना पडे मुझको सहस्रो बार भी
तो भी न मैं इस कष्ट को निज ध्यान मे लाऊं कभी
हे ईश भारतवर्ष में शत बार मेरा जन्म हो
संघाची प्रार्थना बदलण्याची ही प्रक्रिया म्हणजे डॉक्टरांच्या कार्यपद्धतीचा उत्कृष्ट नमुना आहे. त्यांना न विचारता हिंदी प्रार्थना म्हणणार्या काशीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी ना निष्कासित केले, ना त्यांची कानउघडणी केली. स्वत: प्रार्थना बदलण्याची त्यांनी कोणतीही घाईगडबड केली नाही. स्वत: काही सूचना किंवा सल्ला देण्याऐवजी अशा सूचना आपल्या सहकार्यांकडून याव्यात हाच त्यांचा प्रयत्न असे.
वाकणकर-हेडगेवार पत्रव्यवहार
लक्ष्मण श्रीधर उर्फ बापू वाकणकर (1912-1999) हे संघाचे स्वयंसेवक आपल्या उत्तरायुष्यात ‘अक्षरपुरुष’, ‘पुराणपुरुष’ म्हणून प्रसिद्ध झाले. भारतीय लिप्यांच्या संगणकीकरणासंबंधी त्यांनी मूलगामी संशोधन केले. सन 1937मध्ये बनारस हिंदू विश्वविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांचा तत्कालीन संघप्रार्थनेविषयी डॉक्टरांशी पत्रव्यवहार झाला होता. त्या वेळी व्यंकटेश गणेश उर्फ भाऊराव दामले काशीचे संघचालक होते. दि. 7 जानेवारी 1937ला उज्जैनहून डॉक्टरांना लिहिलेल्या पत्रात बापू वाकणकर सांगतात, ‘पूज्य संघचालक भाऊराव दामले यांची ‘नमो मातृभूमी’चे हिंदीत भाषांतर करण्याची आज्ञा झाली होती. पुढे शिबिरात दादा परमार्थ व आपटे यांनीही प्रार्थनेचा प्रश्न काढला होता, तेव्हा खालील हिंदी समश्लोकी तयार करून परमार्थ यांच्या सूचनेवरून आपल्यास त्याची योग्य ती व्यवस्था लावण्यास सादर करीत आहे -
नमो मातृभूमी जहां जन्म पाया, नमो आर्यभूमी देह तूने दिलाया
नमो धर्मभू, देवि! तेरे लिये ही गिरे देह मेरा, सदा पूज्य तू ही
बापू वाकणकरांच्या पत्राला डॉक्टरांनी दि. 15 जानेवारी 1937ला लिहिलेल्या पत्रात पुढील उत्तर दिले, ‘जोपर्यंत संघाची मूळ प्रार्थना संघाच्या बहुतेक सर्व शाखांतून चालू आहे, तोपर्यंत काही शाखांतून निराळी प्रार्थना म्हटली जाणे ठीक नाही. प्रार्थनेच्या हिंदी भाषांतराने अर्थभिन्नता जरी उत्पन्न होत नसली, तरी स्वरूपभिन्नता मात्र उत्पन्न होते. आपल्या प्रार्थनेतील एक श्लोक पूर्णपणे हिंदी असून दुसरा अर्धा संस्कृत व अर्धा मराठी असा आहे. मराठी भाग इतका थोडा आहे की कोणत्याही हिंदी भाषा बोलणार्याला अल्प प्रयासाने त्याचा अर्थ समजून घेता येईल. मूळ श्लोकाऐवजी हिंदी भाषांतरित श्लोक एकदम सर्वत्र सुरू करणेही तितके सोपे नाही, ही गोष्टही योग्य विचारांती आपल्या लक्षात येईल.’
प्रार्थना बदलण्याच्या वाढत्या सूचना
विविध प्रांतांत संघाचा विस्तार झाल्यावर मराठी-हिंदी प्रार्थना अडचणीची ठरू लागली. स्वत:चे ग्रह आणि विचार घेऊन संघात विविध प्रकारचे लोक येत असतात. ‘आहे तसा स्वीकारायचा, पाहिजे तसा घडवायचा’ हे संघात प्रवेश करणार्याच्या बाबतीत संघाची भूमिका डॉक्टरांच्या काळापासून आजही तशीच आहे. विविध प्रांतांतून मराठी-हिंदी प्रार्थनेविषयी येणारे प्रतिकूल अभिप्राय डॉक्टरांनी शांतपणे ऐकून घेतले. दि. 13 ऑक्टोबर 1939ला सुरतेहून शं.गो. उर्फ सांब वैद्यांनी लिहिले, ‘प्रार्थना मराठीतून नसावी असे प्रा. पाळंदे आदी लोकांचे म्हणणे आहे.’ दि. 19 ऑक्टोबर 1939ला कराचीहून पाठविलेल्या पत्रात बापू भिशीकरांनी लिहिले, ‘स्काउटिंगप्रमाणेच अनेक जण संघाकडे पाहतात. मराठी प्रार्थना, राष्ट्रगुरू रामदास वगैरे बाबतींत तर टीकेची व शंकांची झोड असते.’ हुबळीहून ग.ना. वझे वैद्यांनी लिहिले, ‘मराठी प्रार्थनेबद्दल जोराचा विरोध सुरू झाला आहे. मराठीला विरोध म्हणून विरोध आहे. सबंध कर्नाटकात असाच विरोध होणार आहे.’ हिंदी प्रांतांपुरती संघप्रार्थना हिंदीत करण्याच्या सूचना आल्या. दि. 12 मार्च 1940ला सुरतेहून मधुसूदन देव यांनी डॉक्टरांना लिहिले, ‘प्रार्थना गुजराती का नाही हा प्रश्न पुष्कळ स्वयंसेवक विचारतात. प्रार्थना मराठी असल्यामुळे महाराष्ट्रीयांचे वर्चस्व आहे अशी काही स्वयंसेवकांची समजूत आहे. आमच्या प्रांतात गुजराती प्रार्थना पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे.’
सर्व देशात स्वीकार्य अशी प्रार्थना सिद्ध करण्याचे डॉक्टरांनी निश्चित केलेच होते. पण हे काम तडीस नेईपर्यंत त्यांनी कोणताही अर्धवट उपाय सांगितला नाही. दि. 14 ऑक्टोबर 1939ला पुणे संघचालक विनायकराव आपटे यांना पत्रातून डॉक्टर लिहितात, ‘कर्नाटक येथील लोकांच्या सोयीप्रमाणे शिक्षण देताना निरनिराळ्या शब्दांची योजना करणे आवश्यक वाटल्यास तशी योजना करावी. फक्त प्रार्थना वगैरेमध्ये फरक होऊ न देण्याची काळजी घेणे.’
सिंदीची ऐतिहासिक बैठक
दि. 20 फेब्रुवारी 1939ला वर्धा जिल्ह्यातील सिंदी या गावी संघाची ऐतिहासिक बैठक सुरू झाली. सुमारे आठ दिवस चाललेल्या या बैठकीत संघाच्या विचारांचे नि आचारांचे प्रतिदिन आठ तास मंथन झाले. या बैठकीत डॉ. हेडगेवार, आप्पाजी जोशी, श्रीगुरुजी, बाळासाहेब देवरस, विठ्ठलराव पत्की, नारायण यशवंत उर्फ तात्या तेलंग, बाबाजी सालोडकर, कृष्णराव मोहरीर, बळीराम नीलकंठ उर्फ नानासाहेब टालाटुले आणि बबनराव पंडित (व्यवस्था) उपस्थित होते. डॉक्टर संस्कृत भाषेकडे सर्व राष्ट्राची आदरणीय भाषा या दृष्टीने पाहत. आपले ध्येय, मार्ग, आकांक्षा ग्रथित केलेली संस्कृत प्रार्थना असावी, असे ठरवून डॉक्टरांनी या बैठकीत संस्कृत प्रार्थना रचून घेण्याच्या दृष्टीने सर्वांसमोर काही विचार व कल्पना ठेवल्या. त्या ध्यानी घेऊन नानासाहेब टालाटुले यांनी गद्यरूपात प्रार्थना लिहून काढली.
संस्कृत पद्यात रूपांतर
डॉक्टरांनी संघाची नवीन प्रार्थना संस्कृत काव्यात रूपांतर करण्याकरिता अनेक लोकांना पाठविल्याचे दिसते. महाराष्ट्र प्रांत संघचालक काशिनाथराव लिमये यांना दि. 20 नोव्हेंबर 1939ला पाठविलेल्या पत्रात डॉक्टर लिहितात, ‘संस्कृत काव्यात रूपांतर करण्याकरिता आपणाकडे मराठी मजकुराचा मसुदा आपले इच्छेप्रमाणे या पत्रासोबत पाठवीत आहोत. तरी ते कार्य शक्य तितक्या लवकर आपण करून घ्यावे. गेल्या ओटीसीच्या (अधिकारी प्रशिक्षण वर्गाच्या) वेळेला हा मसुदा विनायकराव आपटे यांना दिला होता. तो हरविल्याचे पत्र त्यांचेकडून आले आहे, म्हणून त्यांचेकडेही पुन्हा हा मसुदा पाठवीत आहोत.’ दि. 22 डिसेंबर 1939ला जळगावच्या दामुअण्णा भावे यांस डॉक्टरांनी संस्कृत रूपांतरासाठी प्रार्थनेचा मराठी आशय पाठविला.
ठिकठिकाणच्या संस्कृत पंडितांकडे पद्यांत रूपांतर करण्यासाठी गद्य आशय पाठविल्यावर डॉक्टरांच्या हाती अनेक पद्यप्रार्थना पडल्या. नेमकेपणाने आशय व्यक्त करणारी, अचूक शब्दयोजना असलेली गेय प्रार्थना निवडण्यास 1940चा मार्च-एप्रिल उजाडला. नागपूरचे संस्कृत पंडित नरहर नारायण भिडे यांची रचना पसंतीस उतरली. पुढे भिडे पुण्याच्या पर्वती भागात स्थायिक झाले. ते रमणबाग शाळेत शिक्षक होते. बाबा महाराज सहस्रबुद्धे यांना आध्यात्मिक गुरू मानणार्या भिड्यांचे निधन 1986च्या सुमारास झाले.
दि. 23 एप्रिल 1940ला पुणे येथे सुरू झालेल्या अधिकारी प्रशिक्षण वर्गाच्या प्रारंभीच नवीन संस्कृत प्रार्थना (व संस्कृत आज्ञा) प्रचलित करण्यात आल्या. दि. 29 एप्रिलला डॉक्टरांचे या वर्गात आगमन होऊन त्यांचे तेथे पंधरा दिवस वास्तव्य झाले. देववाणीतील संघाची ही नवीन प्रार्थना सर्व शिक्षार्थ्यांसह म्हणताना डॉक्टरांच्या मनात कृतकृत्यतेचा भाव आला असेल, यात शंका ती काय?