लोकजनशक्ती पक्ष हा घराणेशाहीवर चालणारा पक्ष आहे. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल हा राजकीय पक्षदेखील घराणेशाहीवर चालणारा पक्ष आहे. पासवान यांच्या पक्षातील फाटाफुटीमुळे घराणेशाहीवर चालणार्या पक्षांचा मुद्दा समजून घ्यायला हवा. लोकशाही राज्यव्यवस्थेत राजकीय पक्ष अनिवार्य असतात. त्यांचा विकास प्रथम इंग्लंडमध्ये झाला. विग आणि टोरी असे दोन पक्ष झाले. अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धात कोणतेही राजकीय पक्ष नव्हते. अमेरिकेची राज्यघटना झाल्यानंतर संघराज्य हवे, संघराज्य नको, असे म्हणणारे दोन पक्ष निर्माण झाले. रिपब्लिक आणि डेमोक्रॅट अशी दोन नावे त्यांना पडली.
भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात देशव्यापी राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष होता. आपले वेगळे अस्तित्व दाखविणारे अखिल भारतीय स्तरावर दोन पक्ष होते. 1. कम्युनिस्ट आणि 2. हिंदू महासभा. जनमानसावर या दोन्ही पक्षांचा विशेष प्रभाव नव्हता. वेगवेगळ्या राजकीय विचारधारांचे लोक राष्ट्रीय काँग्रेस पक्षातच होते. स्वातंत्र्यानंतर ही स्थिती बदलली.
स्वतंत्र्यानंतर काँग्रेस पक्षातील वेगवेगळ्या विचारधारा स्वतंत्र राजकीय पक्षाच्या रूपाने काम करू लागल्या. समाजवादी मंडळींनी प्रजासमाजवादी पक्षाची स्थापना केली. भांडवलदार वर्गाने स्वतंत्र पक्ष स्थापन केला. हिंदुत्ववादी विचारधारेच्या मंडळींनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. याच काळात पंजाबमध्ये अकाली दल आणि तामिळनाडूत डीएमके, काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स हे राजकीय प्रादेशिक पक्ष उदयाला आले. सत्तेचे राजकारण या पक्षांतील आपआपसात होऊ लागले.
नंतरच्या40-50वर्षांच्या काळात तीन प्रकारचे राजकीय पक्ष उदयास आले. पहिल्या प्रकारात काँग्रेसमधून फुटून निघालेल्यांनी आपापल्या प्रदेशात नवीन पक्ष काढले. नवीन पटनाईक यांनी ओरिसात बीजू जनता दल काढला. बंगालमध्ये ममतादीदींनी तृणमूल काँग्रेस काढली. महाराष्ट्रात शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस काढली. केरळ, आंध्र, कर्नाटकातदेखील असे प्रयोग झाले. यामुळे देशव्यापी काँग्रेस दुर्बळ झाली आणि प्रादेशिक पक्ष बलवान झाले.
दुसर्या प्रकारात व्यक्तिकेंद्रित आणि पुढे घराणेकेंद्रित पक्ष वाढत गेले. मुलायमसिंग यादव यांनी उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीची स्थापना केली. काही काळ ते आणि त्यांचे बंधू पक्ष चालवीत राहिले. पुढे भावाची मुले राजकारणात आली. मुलायमसिंग यादव यांची मुले राजकारणात आली आणि आज हा पक्ष यादव घराण्याचा पक्ष झालेला आहे. आत्येभाऊ, चुलतभाऊ, त्यांच्या पत्नी, मुले आणि मुली अशा सर्व घराण्याचा हा पक्ष झाला. अखिलेश यादव हा त्यांचा मुलगा, तो पक्षप्रमुख आहे. त्याची पत्नी डिंपल यादव खासदार आहे. दुसर्या पत्नीचा मुलगा प्रतीक यादवची पत्नी अपर्णा यादव लखनौमध्ये समाजसेवक आहे. मुलायमसिंग यांचे एक भाऊ प्रदेशाध्यक्ष आहेत. अशी ही यादी खूप लांबलचक आहे. परिवारातील सात लोकांकडे पक्षातील सर्व महत्त्वाची खाती आहेत.
बिहारमधील लालूप्रसाद यादव यांची हीच गोष्ट आहे. मुलगा शिवपाल यादव पक्षप्रमुख आहे. पत्नी राबडीदेवी मुख्यमंत्री झाली. त्यांच्या परिवाराचा एक फोटो नेटवर पाहिला, या फोटोमध्ये एकूण तेवीस जण आहेत आणि फोटोचे शीर्षक ‘हम दो, हमारे गिन लो’ असे आहे. त्यांचा पक्ष म्हणजे एका परिवाराचा पक्ष आहे. रामविलास पासवान यांचा पक्षदेखील काका-पुतणे आणि मुलांचा आहे. हीच गोष्ट महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्रातील शरदराव पवार यांचा पक्ष हा पवार घराण्याचा पक्ष आहे. मुलगी सुप्रिया, पुतण्या अजित पवार आणि त्यांची मुले राजकारणात आहेत. कुणी खासदार आहे, कुणी मंत्री आहे. नोकरी-व्यवसायात कुणी नाही. शिवसेनेची स्थितीदेखील अशीच आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा हा पक्ष. तो आता ठाकरे परिवाराचा पक्ष झाला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचा मुलगा आदित्य हादेखील मंत्री आहे. तामिळनाडूचा डीएमके हा या रांगेत बसणारा पक्ष आहे. ही लांबण थांबविण्यासाठी इथे थांबतो.
तिसर्या प्रकारचा राजकीय पक्ष म्हणजे जातीचे रूप असलेला पक्ष आहे. मायावती यांची बहुजन समाज पार्टी ही प्रामुख्याने दलित वर्गाची पार्टी आहे. महाराष्ट्रातील रिपब्लिकन पार्टी आंबेडकरांना प्रमाण मानणार्या जातींचीच पार्टी आहे. प्रकाश आंबेडकर यांची बहुजन विकास पार्टी - नावात जरी बहुजन असले तरी बहुजनातील अल्प जण पक्षात असतात, बाकी सर्व एकजातीय लोक आहेत. मुलायमसिंग यादव यांचा पक्ष जसा घराण्याचा आहे, तसाच तो यादव जातीचा आहे. आणि लालूप्रसाद यादव यांचा पक्ष जसा घराण्याचा आहे, तसा यादव जातीचादेखील आहे. अकाली दल हा फक्त शिखांचा पक्ष आहे. म्हणजे तो धार्मिक आधारावर उभा राहिलेला पक्ष आहे. नॅशनल कॉन्फरन्स हा मुसलमानांचा पक्ष आहे. सांप्रदायिक पक्ष काढणे, जातीय पक्ष काढणे हे राज्यघटनेच्या उदात्त आशयाच्या विरुद्ध आहे, परंतु तेच कसे योग्य आहे, हे या पक्षाचे नेते आपल्याला पटवून देऊ शकतात.
काँग्रेस पक्ष नेहरूंच्या काळापासून एका घराण्याचा पक्ष झालेला आहे. पं. नेहरू यांच्या निधनानंतर लालबहादुर शास्त्री फक्त अकरा महिने पंतप्रधान राहिले. त्यानंतर इंदिरा गांधाी, राजीव गांधी, राहुल गांधी आणि मध्ये थोडा काळ गेल्यानंतर नेहरू-गांधी राज सुरू झाले. या नेहरू-गांधी घराण्याचे राजचे अतिशय सुंदर आणि बोलके व्यंगचित्र आहे. त्याचे शीर्षक असे - नेहरू-गांधी ऊूपरीीूं (घराणे), गरिबी ही आमची ऊशीींळपू (नियती) केली.
चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष फुटला, याला कारण घराण्यातील सत्तासंघर्ष. आज तरी तो काँग्रेसमध्ये नाही. उद्या तो राहणार नाही, असे छातीठोकपणे कुणी सांगू शकत नाही. सत्ता ही अशी गोष्ट आहे, जी प्रतिस्पर्ध्याला सहन करीत नाही. राम-लक्ष्मण, कृष्ण-बलराम, हे अपवादात्मक आहेत. व्यवहारातील स्थिती कौरव-पांडवांचीच असते. युरोपचा आणि रशियाचा इतिहास वाचला, तर प्रत्येक राजघराण्यामध्ये सत्ता मिळविण्यासाठी आणि मिळविलेली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी अनेक वेळा भावाने भावाला ठार मारलेले आहे. आईने मुलाला दूर केले आहे आणि पत्नीने नवर्यालाही ठार केले आहे. कॅथेरीन डी मेडिसी हिने सत्ता भोगण्यासाठी नवर्याची परोक्षपणे हत्या केली. नंतर राजे झालेल्या तिन्ही मुलांना आपल्या मुठीत ठेवले आणि तिच्या सत्तेला ज्यांच्यापासून धोका आहे, अशा सर्वांना वेगवेगळ्या प्रकारे ठार केले. आपल्या देशाचा तसा स्वभाव नाही. त्यामुळे आपली मजल पक्ष फोडून नवीन पक्ष किंवा नवीन गट स्थापन करण्यापर्यंत जाते. लेखात जे व्यंगचित्र दिले आहे, ते सर्वच घराणेशाहीतील पक्षांना लागू आहे. प्रत्येक घराणेशाहीतील पक्ष लोकांना सांगतो की, तुमच्या भल्यासाठी मला राज्य करायचे आहे. मात्र लोक आहेत तिथेच राहतात, भल्याचे राजकारण मात्र घराण्याचे होते. चिराग पासवानच्या फाटाफुटीमुळे जे विचार मनात आले, ते इथे मांडले आहेत. यात कोणाचाही काहीही अधिक्षेप करण्याचा विषय नाही.