वैज्ञानिक आणि तर्कनिष्ठ विचारपद्धतीच्या, संशोधनपद्धतींच्या, तसेच सुस्पष्ट अशा वैज्ञानिक ज्ञानशाखांच्या उदयामध्ये यंत्रनगरी अलेक्झांड्रियाचे मोलाचे योगदान आहे. आपल्या देशातही आज या दोन तथाकथित पौर्वात्य आणि पाश्चिमात्य दृष्टीकोनांची संतुलित सांगड घालण्याचे आव्हान आहेच.
रोपीय वसाहतीकरण व साम्राज्यवाद जोरावर असताना असे मानले जायचे की या जगाकडे पाहण्याचे पौर्वात्य आणि पाश्चिमात्य असे मुख्य दोन दृष्टीकोन आहेत. पौर्वात्य दृष्टीकोन असलेली व्यक्ती तत्त्वज्ञानात रमणारी, श्रद्धाळू असते; निसर्गाच्या शक्तींवर मात करण्यापेक्षाही त्या शक्तींसमोर विनम्र होऊन त्यास पूरक अशी जीवनपद्धती अनुसरताना आढळते, असे चित्र उभे केले जायचे. त्याउलट पाश्चिमात्य दृष्टीकोन असलेला व्यक्ती प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करणारी, तर्कनिष्ठ व यंत्रप्रधान असते; तसेच ती सृष्टीतील प्रयेमे ओळखून त्यावर स्वार होऊन तिला ताब्यात आणू पाहणारी असते, अशी प्रतिमा उभी केली जायची.
अर्थात, आज पूर्वेस काय अथवा पश्चिमेस काय, सर्वच ठिकाणी या दोन्ही दृष्टीकोनांचा संयोग असलेल्या व्यक्ती अथवा समाज आढळून येतात.
प्राचीन काळात मात्र, वैज्ञानिक अथवा तार्किक दृष्टीकोन ही संकल्पनाच बाळसे धरत होती. बहुतांश संस्कृतींवर विविध प्रकारच्या अवैज्ञानिक प्रथांचा अथवा रूढींचा पगडा होता. रोगराई अथवा नैसर्गिक आपत्तींसमोर असाहाय्य असलेला मानवी समाज अंधश्रद्धा, भाकिते तसेच नैसर्गिक शक्तींचा कोप टाळण्याकरिता केल्या जाणार्या पूजा-अर्चांच्या पगड्याखाली होता. अशा स्थितीतही अंधश्रद्धा, कर्मकांडे अथवा भाकिते यांच्या पलीकडे एक वेगळ्या प्रकारचा गूढ विचार मांडणार्या द्रष्ट्यांची मांदियाळीही स्वत:चे वेगळे अस्तित्व राखून होती. प्रामुख्याने भरतखंड, ग्रीस आणि चीन या तीनच प्रदेशांत या मंडळींना समाजमान्यता लाभली होती. यांनाच ‘तत्त्वज्ञ’ म्हणत. एकंदरच या मंडळींचा तत्त्वैज्ञानिक दृष्टीकोन आणि परंपरा ही वैज्ञानिक दृष्टीकोन सार्वत्रिक होण्याअगोदर मुख्य प्रवाहात मान्यता पावली, हे मात्र खरे.
असो! तर साधारण इ.स.पू. 330नंतर मात्र चित्र पालटू लागले. मॅसिडोनियन राजयोद्धा अलेक्झांडरच्या पूर्व दिग्विजयानंतर त्याच्या अफाट साम्राज्यात विचारपद्धतींचे दोन ध्रुवच वाटावेत अशी दोन केंद्रे निर्माण झाली. त्यातील एक केंद्र तत्त्वज्ञानी लोकांचा बालेकिल्ला होते, तर दुसरे होते वैज्ञानिकांचे आगर. इ.स.पू. 320 ते इ.स.पू. 250 या काळात ‘अथेन्स’ आणि ‘अलेक्झांड्रिया’ ही नगरे या दोन भिन्न पद्धतीच्या विचारपद्धतींचे प्रतिनिधित्व करणारी ठळक उदाहरणे म्हणून उदयास आली.
पण इ.स.पू. 331मध्ये स्थापना झालेल्या अलेक्झांड्रिया नगरीत ग्रीस व आसपासच्या प्रदेशातून एका वेगळ्याच प्रजातीच्या माणसांचा ओघ अचानक वाढू लागला. ही माणसे प्रश्न विचारणारी माणसे होती. थातूरमातूर उत्तरे त्यांचे समाधान करीत नसत. चंद्र व त्याच्या कला, ग्रह-तारे, वनौषधी, समुद्र, हवेतील बदल, पृथ्वीवरील ज्ञात-अज्ञात प्रदेश अशा असंख्य विषयांतील प्रश्न यांना पडत असत. या प्रश्नांचे तर्कनिष्ठ आणि सप्रमाण उत्तर मिळाल्याखेरीज हे शांत बसत नसत.
या प्रजातीच्या माणसांच्या जिज्ञासेला सीमा नव्हती. यातील काही तर आणखी एक पाऊल पुढे होते. त्यांना हस्तकौशल्य व कारागिरी हे केवळ दैनंदिन गरजा भागवणारे उपजीविकेचे माध्यम वाटत नसे. कारागिरी ही त्यांच्यासाठी नवनवीन प्रयोग करण्याचे उत्तम मध्यम होते. अनावश्यक मानवी श्रम वाचवू शकणारी आणि एकेकट्या माणसालाही 10 माणसांइतके कार्यक्षम बनवणारी लाकडी अथवा धातूची अजस्र खेळणी बनवणे हा यांचा छंद होता. हे अवलिये होते प्राचीन यंत्रनिर्माते!
या सगळ्या लटपट्या खटपट्या लोकांचा ओघ अलेक्झांड्रियामध्ये सुरू होण्याचे श्रेय दिले जाते अलेक्झांडरने इथे उभारलेल्या प्रसिद्ध अशा ‘म्युझियमला’. ‘म्युजेस’ या कलेच्या देवतांना अर्पण केलेले हे देवालय प्रत्यक्षात होते एक विद्यापीठ. आज जरी म्युझियम हा शब्द संग्रहालय या अर्थी रूढ झाला असला, तरी हे अलेक्झांड्रियातील म्युझियम मात्र होते एक चिकित्सात्मक विचारपद्धतींचे माहेरघर. या म्युझियमला सढळ असा राजाश्रय होता व तो अलेक्झांडरनंतरच्या राज्यकर्त्यांकडूनही अनेक वर्षे चालू राहिला.
इथेच संशोधनासाठी आलेला आणखी एक अफाट प्रज्ञावंत म्हणजे सिराक्यूजचा आर्किमिडीज! विविध लाकडी गियर्स, दोरखंड आणि पुलीज यांच्या साहाय्याने अवजड गोष्टी लीलया हलवणारी त्याची यंत्रे हा एक चमत्कारच मानला जाई. ईरॅटोस्थेनिस, तसेच अॅरिस्टार्कस हे अफाट प्रतिभेचे खगोलशास्त्रज्ञ. चंद्रापासून ते पृथ्वीपर्यंतचे अंदाजे अंतर वर्तवणारे त्यांचे अद्भुत संशोधन अक्षम्यरित्या पुढे 2,000 वर्षे युरोपमध्येच दुर्लक्षिले गेले. त्या काळी ज्ञात असलेल्या जगाचा नकाशा बनवणारे टोलेमी आणि हिप्पार्कस. त्यांचे प्राचीन जगताचे वेळोवेळी सुधारणा करत आणलेले शास्त्रसिद्ध नकाशे ही अलेक्झांड्रियाचीच जगाला देणगी आहे. या व अशा अनेक संशोधकांनी वैज्ञानिक क्षेत्रात शास्त्रशुद्ध संशोधन पद्धतीचा पाया रचला. आजही अनेक वैज्ञानिक या प्राचीन पूर्वसुरींचे ऋण मन:पूर्वक मान्य करताना आढळतात.
वैज्ञानिक आणि तर्कनिष्ठ विचारपद्धतीच्या, संशोधनपद्धतींच्या, तसेच सुस्पष्ट अशा वैज्ञानिक ज्ञानशाखांच्या उदयामध्ये यंत्रनगरी अलेक्झांड्रियाचे मोलाचे योगदान आहे. आपल्या देशातही आज या दोन तथाकथित पौर्वात्य आणि पाश्चिमात्य दृष्टीकोनांची संतुलित सांगड घालण्याचे आव्हान आहेच. पण आपल्या परंपरेत या दोन्हींमध्ये संतुलन साधताना गोंधळ उडू नये, याकरिता ईशावास्य उपनिषदामध्ये फार पूर्वीच एक उत्तम सुभाषित योजण्यात आले आहे -
‘विद्यां च अविद्यां च यस्तद्वेद उभयं सह।
अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्यया अमृतमश्नुते।’