मधुबनी चित्रकलेसाठी पद्मश्री मिळालेल्या दुलारी देवी

विवेक मराठी    29-May-2021
Total Views |

मध्यंतरी इंटरनेटवर दुलारी देवी यांचे मधुबनी चित्र बघितले आणि त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा झाली. काही वाचनात आल्यावर आणि ऐकल्यावर आश्चर्य वाटले. कधीही शाळेत गेलेल्या, एकही वर्ग शिकलेल्या दुलारी देवी आजपद्मश्री दुलारी देवीझाल्या आहेत. मधुबनी चित्रकलेसाठी त्यांना पद्म पुरस्कार मिळाला आहे. त्यांचा प्रवास शून्यातून विश्वनिर्मितीचा आहे.


padmshree_1  H

बिहारच्या मधुबन जिल्ह्यातील रांती गावच्या दुलारी देवी यांना पद्मश्री पुरस्काराने ह्या वर्षी गौरविण्यात आले आहे. दुलारी देवी झाडलोट आणि फरश्या पुसण्यासारखी, धुणीभांड्याची कामे करत आपला उदरनिर्वाह चालवत असत. पण काही करण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि त्यातूनच त्यांचा प्रवास सुरू झाला आणि आज पद्मश्री ह्या बिरुदावलीत दुलारी देवी हे नाव अलंकृत झाले आहे.

खरे तर माणसाला जगायला शिकवते ती म्हणजे कला आणि माणूसपणाच्या जगण्याला एक उंची देते ती म्हणजेसुद्धा कला आहे. दररोजच्या कंटाळवाण्या जीवनातून हवाहवासा वाटणारा विरंगुळा म्हणजे कुठलीही कला, कारण कला जगण्याला सौंदर्य प्रदान करतातच आणि ह्या कलेमुळे जगणे अधिक सुसह्य होत जाते. त्यातली अनेकांच्या जवळची, अनेकांना उपजत असलेली कला म्हणजे चित्रकला. शब्दांपासून दूर नेण्याची ताकद चित्रात असते. चित्रे माणसाच्या मनात विचारांची स्पंदने निर्माण करतात आणि आपल्याला विचारांनी समृद्ध करत असतात. आज मधुबनी चित्रकलेसाठी पद्मश्री मिळविलेल्या दुलारी देवी ह्या सातव्या व्यक्ती आहेत. आजवर ह्याच मधुबनी चित्रासाठी सहा जणांना पद्म पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.


padmshree_2  H

त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते, “माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम हेदेखील कायम कौतुक करत असत.” मल्लाह जातीच्या अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या दुलारी देवी ह्यांचे वयाच्या 12व्या वर्षी लग्न झाले. घरोघरी झाडझुड आणि फरश्या पुसण्याची कामे करताना, प्रसिद्ध मधुबनी चित्रकलाकार कपूरी देवी यांच्या संपर्कात आल्यावर त्यांचा कलाप्रवास सुरू झाला.

पुढे दुलारी देवी ह्यांनी घराचे अंगण लाकडापासून बनवून आपल्या कल्पनांना आकार द्यायला सुरुवात केली. कपूरी देवी ह्यांच्याकडून शिक्षण घेत दुलारी यांनी मिथिला चित्रकला क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. दुलारी देवी यांनी आतापर्यंत विविध विषयांवर सात हजार मिथिला पेंटिंग्ज केल्या आहेत. दुलारी देवी ह्यांच्या कार्यासाठी त्यांना राज्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

गीता वुल्फचेफॉलोइंग माय पेंट ब्रशपुस्तक आणि मार्टिन ले कॉज यांचे फ्रेंच पुस्तक मिथिला दुलारी देवी यांच्या जीवनाची कथा आणि कलाकृतींनी सुसज्ज आहेत. त्यांच्या चित्रकलेला सतरंगी नावाच्या पुस्तकातही जागा मिळाली आहे. इग्नूसाठी (इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठासाठी) मिथिला चित्रामध्ये तयार केलेल्या आधार कोर्सच्या मुख्यपृष्ठासाठीही त्यांची चित्रकला निवडली गेली आहे.

पाटणा येथील बिहार संग्रहालयाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दुलारी देवी यांना खास आमंत्रित केले होते. तेथे कमला नदीच्या पूजेवर बनवलेल्या चित्रांना स्थान देण्यात आले आहे. मधुबनी चित्रांसाठी पद्मश्री मिळालेल्या दुलारी देवी ह्यांचे कार्य प्रेरणादायक आहे. विद्यमान सरकार 2014पासून अशाच सामान्यांतल्या असामान्य व्यक्तींचा गौरव करत आहे.