प्रश्नांच्या जाळ्यात मुख्यमंत्री

विवेक मराठी    08-Apr-2021
Total Views |

 गृहमंत्रिपद हे नंबर दोनचे पद असते. मुख्यमंत्री त्यांच्या समर्थनार्थ किंवा बचावासाठी काहीही बोलत नाहीत. फडणवीस प्रश्न विचारतातमुख्यमंत्री मौन का? या मौनाचे अर्थ काय काढायचे?’ या सूचक प्रश्नातून धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं, अशी मुख्यमंत्र्यांची अवस्था झालेली दिसते.

udhav thakarey_1 &nb

 
भविष्यकाळ अशा शहाण्या राजनेत्यांच्या हातात येईल, ज्यांना हे समजते की जनतेला पक्षीय राजकारण नको, तर उत्तम प्रशासन हवे.” (अमेरिकेचे बत्तिसावे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट). रुझवेल्ट यांच्या या म्हणण्याचे प्रतिबिंब देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आपण पाहू शकतो. सचिन वाझे प्रकरणावरून गेला महिना-दीड महिना भरपूर राजकारण चालू आहे. त्याची सध्याची स्थिती सांगायची, तर अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 100 कोटी दरमहाच्या वसुलीची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काहीही बोलत नाहीत. त्यांचे गुरू शरदराव पवारदेखील विशेष काही बोलत नाहीत. अत्यंत सूचक बोलण्याचे काम देवेंद्र फडणवीस करीत असतात.

ते विरोधी पक्षनेते आहेत. त्यापूर्वी ते मुख्यमंत्री होते आणि आताही तेच मुख्यमंत्री असायला पाहिजे होते, कारण जनादेश त्यांना मिळाला होता. परंतु शिवसेनेने विश्वासघात करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती केली आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद मिळविले. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस जेवढे आदर्श होते, तेवढेच आज ते विरोधी पक्षनेता या भूमिकेतदेखील आहेत. सत्ता गेल्याचा खेद नाही आणि विरोधी बाकावर बसायला लागते याचा उद्वेग नाही. एखादा उत्तम राजकीय नेता, ज्या भूमिका येतील त्या भूमिका कसोशीने पार पाडण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी त्या नेत्याकडे मूलभूत आणि अंगभूत असे काही गुण असावे लागतात. त्याच्याकडे सचोटी हवी, सत्यवादिता हवी, जनसेवेचा भाव हवा, निर्णयक्षमता हवी, वाणीवर संयम हवा, परिस्थितीचे तत्काळ आकलन करण्याची क्षमता हवी, आकलन केल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांना काय सांगायचे याचे उत्तम भान असायला पाहिजे. सचिन वाझे प्रकरण सुरू झाल्यापासून देवेंद्र फडणवीस यांनी जी वक्तव्ये केलेली आहेत, त्याचा जर नीट अभ्यास केला, तर राजकीय नेत्याकडे प्रगल्भता कशी असायला पाहिजे, हे लक्षात आल्याशिवाय राहाणार नाही. ‘मनसुख हिरानी यांची हत्या कोणी केली हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही, तोपर्यंत सचिन वाझे प्रकरण संपत नाही.’ देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात अनेक गोष्टी सुचविल्या आहेत. सचिन वाझे यांचा या हत्येत काही हात आहे का? असल्यास त्यांचा बोलविता धनी कोण आहे? त्याचा तपास होणार का? असे विचारलेले प्रश्न एकाच वाक्यातून ध्वनित होतात.


मी मुख्यमंत्री असताना शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घ्यावे, म्हणून माझ्यावर भरपूर दडपण आणले होते.” आणखी एकदा देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘सचिन वाझे यांचा बचाव करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “वाझे कोणी ओसामा बिन लादेन आहेत का?” अशा सूचक वाक्यांतून सचिन वाझे आणि उद्धव ठाकरे यांच्या संबंधाविषयी अनेक प्रकारचे संभ्रम निर्माण होतात. उद्धव ठाकरे पोलीस दलातील एका निलंबित अधिकार्याची भलावण का करतात? ‘दाल में कुछ काला हैहे यातून ध्वनित होते. उच्च न्यायालयाचा निर्णय आला आणि सीबीआयने 15 दिवसांत प्राथमिक चौकशी पूर्ण करावी, असा आदेशही आला. अनिल देशमुखांना जावे लागले. गृहमंत्रिपद हे नंबर दोनचे पद असते. मुख्यमंत्री त्यांच्या समर्थनार्थ किंवा बचावासाठी काहीही बोलत नाहीत. फडणवीस प्रश्न विचारतातमुख्यमंत्री मौन का? या मौनाचे अर्थ काय काढायचे?’ या सूचक प्रश्नातून धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं, अशी मुख्यमंत्र्यांची अवस्था झालेली दिसते.


पक्षाची
भूमिका मांडताना सर्वांचा एकच सूर असला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी तो सूर कोणता असला पाहिजे, हे आपल्या वक्तव्यातून ध्वनित केलेले आहे. भाजपाचा लढा सचिन वाझे किंवा अनिल देशमुख यांच्याशी नसून तो मुख्यमंत्री आणि त्यांचे राजकीय गुरू यांच्याशी आहे. प्रश्न आपण स्वबळावर सत्तेवर येणार की नाही? हा नसून प्रश्न स्वबळावर सत्ता आणण्यासाठी विरोधकांचे बळ आणि त्यांची विश्वासार्हता रसातळाला नेणे हा आहे. हे काम करायचे असेल, तर आता मुख्यमंत्र्यांना वेगवेगळ्या प्रश्नांच्या जाळ्यात अडकविणे हीच कुशल राजनीती आहे. अन्य सर्व वक्तव्ये मूळ विषयापासून लक्ष दूर करणारी ठरतात. खरे म्हणजे, 2019मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती करणे ही एका अर्थाने चूकच होती. या चुकीचे वर्णन करायचे, तर 44पैकी 41 जागा जिंकून भाजपा युतीने लोकसभेचे युद्ध जिंकले होते, पण विधानसभेच्या निवडणुकीच्या तहात हा विजय त्यांनी गमावला. आता ती चूक करण्याच्या मन:स्थितीत कोणी नाही, ही गोष्ट खरी. मागची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली. ते विजयीवीर ठरले. आता चालू असलेली लढाई तेच लढत आहेत. अत्यंत कौशल्याने लढत आहेत. त्यांच्या वक्तव्यावरून हे लक्षात येते की, प्रतिपक्षावर कुठे, केव्हा आणि कसा वार करायचा, हे ते फार उत्तम जाणून आहेत. परिस्थितीचे त्यांचे आकलन आणि त्यांचे विश्लेषण हे वादातीत आहे. म्हणून आज असे वाटते की, भाजपातील अन्य सर्वांनी फडणवीस काय म्हणतात याचा गंभीरपणे अभ्यास करावा आणि त्याला पूरक होतील अशीच वक्तव्ये करावीत. टीव्हीच्या कॅमेर्यासमोर झळकण्याचा मोह सर्वच राजकीय नेत्यांना असतो, पण असे झळकताना आपले वक्तव्य ऐकणार्यांना बालिश वाटणार नाही, याची काळजी घ्यावी.