राजा कालस्य कारणम्

विवेक मराठी    05-Apr-2021
Total Views |

कोरोना सर्व देशात आहे आणि महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. कारण महाराष्ट्रात राजधर्माचे पाप सर्वाधिक आहे. जनादेशाचा विश्वासघात हे पहिले पाप, निष्पाप लोकांना त्रास देणे हे दुसरे पाप, खंडणीपासून रक्षण करण्याऐवजी खंडणीखोरांचे रक्षण करणे हे तिसरे पाप, लॉकडाउनने लोकांचे रोजगार बुडविणे हे चौथे पाप. या पापांचे परिणाम कोरोना वाढण्यात तर होत नाहीत ना?

 
bjp_1  H x W: 0

महाभारताच्या शांतिपर्वात भीष्म आणि युधिष्ठीर यांचा संवाद आहे. ते राजनीतीबद्दल आहेत. भीष्माचार्य युधिष्ठीराला म्हणतात की, “काळ राजाला बनवतो की राजा काळाला बनवतो, याविषयी तू मनात अजिबात संशय ठेवू नकोस. कारण राजा काळास कारणीभूत असतो.” याचा अर्थ असा की, परिस्थितीमुळे राजा बनतो की राजामुळे परिस्थिती निर्माण होते? भीष्माचार्यांचे उत्तर असे की, “परिस्थितीमुळे राजा बनत नसून राजा परिस्थिती बनविण्यास कारणीभूत होतो. अनुकूल वा प्रतिकूल परिस्थिती राजामुळे बनते.”

येथे राजा याचा अर्थ सिंहासनावर बसलेला, वंशपंरपरेने राज्यावर आलेला राजा असा आता करता येत नाही. येथे राजा याचा अर्थ राज्यशासन चालविण्याची मुख्य जबाबदारी ज्याच्यावर आहे, त्याला राजा म्हणायचे. म्हणजे मुख्य शासक म्हणायचे. आपल्या राज्याचा - महाराष्ट्राचा विचार करता, मुख्यमंत्री आपल्या राज्याचे मुख्य शासक असतात. भीष्माचार्यांच्या म्हणण्याप्रमाणे राज्याच्या परिस्थितीला राज्याचा मुख्य शासक सर्वस्वी जबाबदार असतो. परिस्थिती चांगली असेल तर त्याला तो जबाबदार आहे आणि परिस्थिती वाईट असेल, तरी त्यालाही तोच जबाबदार आहे.

तीन प्रश्नांचे एकच उत्तर असलेली कथा प्रसिद्ध आहे. तीन प्रश्न असे - 1. भाकरी का करपली? 2. पान का सडले? 3. घोडा का अडला? या तिन्ही प्रश्नांचे उत्तर एकच - फिरविल्यामुळे. भाकरी उलटावी लागते. खाण्याचे पान रोज फिरवावे लागते आणि घोडा अडला असता त्याला उलटा फिरवावे लागते. हे काम केल्यास भाकरी करपते, पान सडते, आणि घोडा आहे त्याच ठिकाणी उभा राहतो.

महाराष्ट्रासंबंधी असे तीन प्रश्न विचारता येतात - 1. कोरोना का वाढतो आहे? 2. पोलीस दलातील अधिकारी खंडणी वसूल करणारा का झाला? 3. चार साधूंच्या हत्या का झाल्या? या तिन्ही प्रश्नांचे उत्तर एकच - नाकर्ते राज्यकर्ते असल्यामुळे हे झाले. कोरोना संसर्गजन्य रोग आहे. त्याच्या खबरदारीच्या उपाययोजना काटेकोरपणे आखल्या पाहिजेत, अमलात आणल्या पाहिजेत. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारीपाळण्यात सर्व राज्यकर्ते व्यग्र असतील तर जनतेत कोरोना पसरणारच.

प्रजापालन, प्रजेचे रक्षण, पुत्रवत प्रजेचे संवर्धन हा सनातन राजधर्म आहे. त्याऐवजी एक सिनेनटी टीका करते म्हणून तिच्या घरावर आणि कार्यालयावर हातोडा चालवून ते पाडणे हा राजधर्म नव्हे, हा पुरुषार्थही नव्हे. खंडणीखोरांपासून सामान्य लोकांचे रक्षण करणे हा राजधर्म आहे. रक्षण करणाराच खंडणी वसूल करणारा झाला, हा अधर्म झाला. संन्याशाचे रक्त सांडू नये, हा आपला सनातन धर्म आहे. संन्याशाला स्वतःचे काही नसते. त्याने सर्वांचा त्याग केलेला असतो. आत्मचिंतन आणि समाजसेवा ही त्याची दोनच कामे असतात. म्हणून त्याचे रक्त सांडले असता खूप पाप होते आणि त्याचे परिणाम केवळ राज्यकर्त्यांना नाही, तर प्रजेलाही भोगावे लागतात.

आपल्या प्राचीन वाङ्मयात ऋष्यसिंग नावाच्या कुमाराची एक कथा सांगितली जाते. त्याच्या वडिलांनी त्याला जगाच्या रहाटीपासून वनात दूर ठेवले. वयात येईपर्यंत कोणत्याही स्त्रीचे दर्शन घडू दिले नाही. शेजारच्या राज्यात दुष्काळ पडला. पाऊस पडावा म्हणून राजाने खूप उपाय केले, पण ते यशस्वी झाले नाहीत. ऋष्यसिंग कुमाराला त्या राज्यात आणले तर पाऊस पडेल, असे राजाला सांगण्यात आले. राजाने आपली राजकन्या या कामासाठी पाठविली. तिने ऋष्यसिंगाला कसे वश करून घेतले आणि आपल्या सहवासाची गोडी कशी लावली याची दीर्घ कथा आहे. शेवटी ऋष्यसिंग राजकन्येबरोबर राज्यात आला, पाऊस पडला अशी ही कथा आहे. म्हणून राजधर्म हे सांगतो की, आपल्या राज्यात साधुसंत, चारित्र्यवान यांचा निवास राहिला पाहिजे आणि त्यांचे रक्षण झाले पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे. जे राज्य त्यांचे रक्षण करीत नाही, ते अधर्माचरण करतात.

 
raja_2  H x W:

कोरोना सर्व देशात आहे आणि महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. कारण महाराष्ट्रात राजधर्माचे पाप सर्वाधिक आहे. जनादेशाचा विश्वासघात हे पहिले पाप, निष्पाप लोकांना त्रास देणे हे दुसरे पाप, खंडणीपासून रक्षण करण्याऐवजी खंडणीखोरांचे रक्षण करणे हे तिसरे पाप, लॉकडाउनने लोकांचे रोजगार बुडविणे हे चौथे पाप. या पापांचे परिणाम कोरोना वाढण्यात तर होत नाहीत ना? वैज्ञानिकदृष्ट्या त्याचे उत्तर होकारार्थी देणे कठीण आहे, पण राजधर्माच्या पाप-पुण्याच्या संकल्पनेत याचा विचार केला तर त्याचे उत्तर ज्याचे त्याला सापडू शकते.

राजधर्माचे कसे पालन करावे, याची सुंदर कथा गौतम बुद्धांनी सांगितलेली आहे. पांचाल देशाचा राजा प्रजापालन करण्याऐवजी स्वतःच्याच महाली बसून राजसुखाचा उपभोग घेत बसला होता. राज्याचे अधिकारी यामुळे मोकाट झाले आणि ते प्रजेवर मन मानेल तसा जुलूम करू लागले.

एके दिवशी टेंभुर्णी वृक्षावरील देवता राजाच्या स्वप्नात आली. ती राजाला म्हणाली, “तुुझ्या पूर्वजांनी माझी नियमाने पूजा केली. राज्य उत्तम चालविले. परंतु तू राज्याकडे लक्ष देत नाहीस. आपल्याच विश्वात मग्न आहेस. राज्यात काय अंधाधुंदीपणा चालला हे एकदा बघून ये, नाहीतर राज्यात अराजक निर्माण होईल.”

 
raja_1  H x W:

राजपुरोहिताला बरोबर घेऊन, राज्याची पाहणी करण्यासाठी राजा राजमहालातून वेषांतर करून बाहेर पडला. एका खेड्यात गेला. गावातील शेतकर्याच्या घरी गेला. शेतकरी राजाला शिव्या घालायला लागला. त्याच्या पायात बाभळीचा काटा गेलेला होता. त्याच्या वेदना त्याला होत होत्या. तो म्हणाला, “राजाच्याही शरीरात असे बाण घुसावेत आणि तो जखमांनी विव्हळत पडावा.” वेषांतरातील राजा म्हणाला, “पायात काटा गेला, याला राजा कसा जबाबदार?” शेतकरी म्हणाला, “राजाच जबाबादार आहे. कारण राजाचे अधिकारी वसुलीसाठी येतात आणि चांगले पदार्थ ओरबडून घेऊन जातात. कोंबड्या-बकर्यादेखील घेऊन जातात. ते येणार हे कळल्यानंतर आम्ही जंगलात जातो आणि घराभोवती काटे पसरवून ठेवतो. राजा चांगला असता तर अधिकारी चांगले असते. जंगलात जावे लागले नसते, घरासमोर काटे पसरावे लागले नसते.”

राजा दुसर्या गावी गेला. तिथे एक वृद्ध बाई राजाला खूप शिव्या घालत होती. वेषांतर केलेला राजाने तिला विचारले, “तू राजाला शिव्या का देतेस?” ती म्हणाली, “माझ्या मुलीचे लग्न होत नाही, म्हणून मी राजाला शिव्या देते.” राजा म्हणाला, “तुझ्या मुलीचे लग्न होत नाही, याला राजा कसा जबाबदार?” ती पुन्हा तेच म्हणाली, “याला राजाच जबाबदार आहे. कारण सगळीकडे अनागोंदी असल्यामुळे कुणाला रोजगार नाही. स्वतःचेच पोट भरण्यास जिथे मारामार, तिथे खाण्याचे नवीन तोंड आणण्यास कुणीच तयार होत नाही. राजा चांगला असता तर सर्वांना रोजगार मिळाला असता आणि उपवर मुलामुलींची लग्ने झाली असती.”

अशी ही कथा खूप मोठी आहे. प्रत्येक गावात राजाला शिव्या खाव्या लागल्या. जखमी झालेला एक बेडूकदेखील राजाला शिव्या घालत होता. त्याला कावळ्याने जखमी केलेले होते. राजाचे डोळे उघडले आणि राजमहालात बसून काही उपयोग नाही, प्रजेत मिसळले पाहिजे, याचा त्यानेे निश्चय केला आणि आपले राज्य वाचविले...

महाराष्ट्राचे राज्य असे वाचेल की सचिन वाझे आपल्या राज्याचे बारा वाजवेल? शरद पवार आणि अमित शहा यांच्या भेटीचे रहस्य काय? त्याच्या उत्तराची आपण प्रतीक्षा करू या.