हेच त्यांचे मोठेपण

विवेक मराठी    21-Apr-2021
Total Views |

संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, जनसंघ-भाजपाचे कल्याण-डोंबिवलीतील नेते विवेकचे पालक श्रीपाद उर्फ आबासाहेब पटवारी यांचे दिनांक 20 एप्रिल 2021 रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृती जागविणारा हा लेख.

 
RSS_1  H x W: 0

रमेश, तुझा लेख फारच चांगला आहे. परखड आहे, पण भाषा संयमित आहे. वाचकांना आणि कार्यकर्त्यांना योग्य तो संदेश देणारा आहे.” आबासाहेबांचा हा संवाद गेल्या तीस-पस्तीस वर्षांत किती वेळा झाला असेल सांगता येणार नाही. मनापासून कौतुक करणे हा त्याचा स्वभाव होता. ही कौतुकाची थाप आता पाठीवर कधी पडणार नाही, याची जाणीव झाली की मन विष्णण होते. मृत्यू अटळ आहे हे जीवनाचे शाश्वत सत्य असले, तरी या सत्याचा कटू घोट पिताना खूप मानसिक त्रास होतो.


माझ्या
नावावर अनेक पुस्तके आहेत. पुस्तक वाचून झाल्यानंतर आबासाहेबांचा फोन येई. “रमेश, तुझे पुस्तक अतिशय उत्कृष्ट झालेले आहे. पुस्तकात खूप संदर्भ आहे. एवढे सगळे कधी वाचतोस?” संविधानावरील पुस्तक प्रकाशित झाले. आबासाहेबांनी ते वाचून काढले आणि कौतुकाचा पाऊस पाडला. “योग्य वेळी नवीन विषय अत्यंत सोप्या भाषेत तू मांडला आहेस. तुझे कौतुक करावे तेवढे थोडे.”

 
हे सर्व आठवले की, आता हे कौतुकाचे बोल, विराम पावले आहेत ही जाणीव खूप दु:खदायक असते.


आबासाहेबांशी माझा संबंध नेमका कोणत्या दिवशी आणि कधी आला हे नाही सांगता येणार. परंतु त्यांची कीर्ती परिचयापूर्वी माझ्या कानावर पडली होती. प्रत्यक्ष निवडणुकीतून निवडून आलेले ते डोंबिवलीचे पहिले नगराध्यक्ष होते. जनसंघाच्या तिकिटावर ते निवडून आले, तेव्हा जनसंघ लहानच होता. आपला माणूस निवडून आला की आम्हा सर्व कार्यकर्त्यांना त्याचा खूप आनंद होई. तसा मलाही झाला. माझ्या दृष्टीने ते तेव्हा खूपच मोठे माणूस होते.

RSS_1  H x W: 0 

अशा मोठ्या माणसाचा सहकारी म्हणून मला त्यांच्याबरोबर विवेकचे काम करावे लागेल, असे तेव्हा माझ्या स्वप्नातही वाटले नव्हते. जे स्वप्नात नसते ते प्रत्यक्षात येते यालाच नियतीचा खेळ म्हणतात. 1980 साली विवेक नव्या रूपामध्ये प्रकाशित होऊ लागला. दिलीप करंबेळकर यांच्यासह तेव्हा आबासाहेब होते. विवेकची आर्थिक स्थिती यथातथाच होती. त्या काळात त्यांनी विवेकचे पूर्णकालीन कार्यकर्ता म्हणून काम केले. महाराष्ट्राचा अनेक वेळा प्रवास केला. वेगवेगळे आर्थिक स्रोत विवेकला जोडून देण्याचा प्रयत्क केला. कामाच्या परताव्याची काहीही अपेक्षा ठेवली नाही. मानसन्मानाचीदेखील अपेक्षा ठेवली नाही. पुढे मी सहसंपादक, कार्यकारी संपादक आणि संपादक झालो. मला त्यांनी मोकळेपणाने स्वीकारले आणि वडीलकीच्या नात्याने सांभाळून घेतले. तसेच कौतुक करण्यात कधी कंजूसपणा केला नाही.

त्यांच्यामुळेच मी डोंबिवलीला राहायला गेलो. बोरिवलीतील माझे घर एका खोलीचे होते. मुली मोठ्या होऊ लागल्या होत्या, किमान दोन खोल्यांची तरी जागा असणे आवश्यक झाले. आबासाहेबांनी विठ्ठलराव काळे यांच्या स्टार कॉलनीत वन रूम किचनची एक जागा बुक करून ठेवली. मी तेथे राहायला गेलो. नवीन गाव, नवीन जागा अशा वेळी अनेक अडचणी उभ्या राहतात. त्याकडे आबासाहेबांचे बारकाईने लक्ष असे. माझ्या विवेकच्या कामात मला या अडचणींचा सामना करावा लागू नये याची त्यांनी भरपूर काळजी घेतली.

मुलींच्या शाळेच्या प्रवेशाचा विषय आला. आबासाहेबांनी मुलींना डोंबिवलीच्या टिळक विद्यालयात सहज प्रवेश मिळवून दिला. मी चिंतामुक्त झालो. मुलींचे शिक्षण कसे चालू आहे, काही अडचणी आहेत का याची ते अधूनमधून चौकशी करत राहिले. लेखकाला अशा प्रापंचिक कटकटीत गुंतून राहून चालत नाही, आबासाहेबांना याची जाणीव होती, म्हणून वडीलकीच्या नात्याने ते अनेक गोष्टी सहजपणे करत राहिले.

 

डोंबिवलीतील त्यांचा जनसंपर्क, अफाट शब्दही तोकडा पडावा एवढा अफाट होता. त्यांच्याबरोबर रस्त्याने चालण्याचे अनेक प्रसंग आले. ज्या ठिकाणी जायला दहा मिनिटे लागतील, तेथे तीस-चाळीस मिनिटे लागत. आबासाहेबांना अनेक लोक भेटत आणि प्रत्येकाला त्यांच्याशी बोलण्याचा काही ना काही विषय असे. आबासाहेब सर्वांशी हसतमुख राहून बोलत. मी बाजूला शांतपणे उभा राहत असे.

 
आबासाहेब हे स्वतःच एक चालतीबोलती संस्था होते. डोेंबिवलीच्या सार्वजनिक जीवनातील सर्व महत्त्वाच्या सामाजिक संस्थांशी त्यांचे संबंध होते. अनेक ठिकाणी ते पदाधिकारी होते. त्या संस्थेच्या उभारणीत त्यांचे योगदान अमूल्य असे. ‘गणेश मंदिर संस्थानहे डोंबिवलीचे ग्रामदैवत. या संस्थानाचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. मंदिराच्या सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर त्यांनी माझे भाषण ठेवले. हा एक धाडसी निर्णय होता.
 

सामाजिक समरसतेविषयी त्यांना मनापासून आस्था होती. समरसता मंचाचे काम कसे चालू आहे, कोणते विषय आपण घेतले आहेत. अभ्यासवर्ग कोणते झाले, यांची माहिती ते माझ्याकडून घेत असत. “गंभीर विषयाच्या अभ्यासवर्गाला मलाही निमंत्रित करीत जाअसा त्यांचा आग्रह असे. यमगरवाडी प्रकल्प सुरू झाला. मुलांची संख्या वाढू लागली, अडचणीचे डोंगरही वाढू लागले. विशेषत: मुलांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था तर सतत चिंतेचा विषय राहिला.

 

एकदा मी आबासाहेबांना म्हणालो, “गणेश मंदिर संस्थानातर्फे भाविकांकडून धान्य गोळा करता येईल का? आपल्या यमगरवाडीला त्याची नितांत गरज आहे.” आबासाहेबांनी संस्थानाच्या बैठकीत विषय केला आणि केवळ धान्य नाही, तर तेल, तिखट, मीठ, कांदे, बटाटे असे ट्रकभर साहित्य जमविले आणि संस्थेतील पदाधिकारी घेऊन ते यमगरवाडीला गेले. आबासाहेबांनी सहा महिन्याची चिंता मिटविली होती.

सर्वांची चिंता करणारा हा निष्काम कर्मयोगी अनंतात विलीन झाला आहे. त्यांचे जाणे असंख्यांना दुःख देणारे असले, तरी त्यांनी जो वारसा ठेवला आहे, तो मृत्यूलाही मारणारा आहे, तो चिरंजीव आहे, अक्षय आहे. ते मोठे होते, पण त्यांनी आपले मोठेेपण कधी मिरविले नाही किंवा बरोबरच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या मोठेपणाचे आझेदेखील वाटू दिले नाही, हेच त्यांचे मोठेपण आहे.


RSS_2  H x W: 0

 


RSS_1  H x W: 0