‘जन्माने हिंदू’, कर्तृत्वाचं काय?

विवेक मराठी    12-Mar-2021
Total Views |

ममतांनी घरात कितीही चंडीपाठ केला, अन्य कुठले श्लोक-स्तोत्रं म्हटली, पूजा-अर्चा केल्या तरी पश्चिम बंगालमधील हिंदूंना त्याचा काय उपयोग झाला? बंगालमधील सामान्य हिंदू रोज अनन्वित अत्याचार सोसतोच आहे आणि बंगालची सत्ता उपभोगणार्या आजवरच्या कुणीही या हिंदूंच्या भावनांना किंमत दिली नाही... ममता असोत वा त्यांच्या पूर्वीचे कम्युनिस्ट. त्यामुळेच भाजपामध्ये बंगाली जनतेला आशेचा किरण दिसला. कारण भाजपा नुसता चंडीपाठ करून आणि आम्ही हिंदू असल्याचं जागोजागी सांगून थांबला नाही. भाजपाच्या सरकारने 370 कलम हटवून दाखवलं, अयोध्येतील राममंदिराच्या स्वप्नपूर्तीसाठी पावलं उचलली, सीएएच्या माध्यमातून भारतातीलच नव्हे, तर भारतीय उपखंडातील हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

bjp_1  H x W: 0

 
गेली अनेक दशकं ज्या देशात तेथील बहुसंख्य समाजाची - म्हणजे हिंदूंची, त्यांच्या श्रद्धा-परंपरांची, भावनांची खिल्ली उडवणं, अवमान करणं हीच फॅशन बनली होती आणि असं करणार्याला पुरोगामी, सेक्युलर म्हणवलं जात होतं, अशा देशात आताआम्हीच कसे हिंदू आहोत, सश्रद्ध आहोतहे सांगण्याची स्पर्धा लागली आहे. राहुल गांधी हे जानवंधारी ब्राह्मण हिंदू असल्याचा दावा काँग्रेसजन रोज करत आहेत, प्रियांका गांधी-वढेरा मंदिरांना भेटी देत आहेत, गंगेत स्नान करत आहेत. दक्षिणेत तामिळनाडूतील डीएमकेचे स्टालिनदेखील आता आम्ही हिंदूंच्या विरोधात नाही, असं म्हणत आपल्या आधीच्या विधानांवर दुबळी सारवासारव करत आहेत. गेल्या तीन-चार वर्षांत हे प्रमाण वाढलं आहे आणि अशा रितीने अखेर उशिरा का होईना, हिंदू समाज भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. या यादीत आता एक उदाहरण नव्याने समाविष्ट करता येईल, ते म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. नुकतंच बंगालमध्ये एका सभेत बोलताना ममतांनी सांगितलं की मी एक हिंदू आहे, मी रोज चंडीपाठ करते वगैरे. त्यामुळे मला भाजपाने हिंदुत्ववाद शिकवू नये असेहीखडे बोलत्यांनी भाजपाला सुनावल्याचं वर्णन माध्यमांतून करण्यात आलं. त्यामुळे अखेर उशिरा का होईना, आपण हिंदू असल्याची आठवण ममतांना झाली.

 

आपण हिंदू असल्याचा हा असा अचानक साक्षात्कार झाल्याबद्दल ममतांचं अभिनंदन. तथापि, मालदाच्या दंगलींच्या वेळी, दुर्गापूजेच्या अडवणुकीच्या वेळी, बंगालमधील ठिकठिकाणी मुस्लिमांनी केलेल्या मुजोरीच्या वेळी आणि अशा असंख्य घटनांच्या वेळी ममतांना आपणही हिंदू आहोत हे आठवलं असतं तर आज राज्यातून आपली सत्ता जाईल इतपत परिस्थिती त्यांच्यावर ओढवली नसती. जन्माने हिंदू असणं यात ममतांचं कर्तृत्व शून्य असलं, तरी हिंदू असणं त्यांनी मान्य करणं हेही नसे थोडके. आता कर्तृत्वानेही आपण हिंदू आहोत, हे ममतांनी सिद्ध करायला हवं. मात्र पश्चिम बंगालमधील परिस्थिती पाहता हे सिद्ध करण्यासाठी ममतांकडे सत्ता राहील, अशी शक्यता वाटत नाही. याचं कारण म्हणजे समोर उभा असलेला भारतीय जनता पक्ष. ममता काय, काँग्रेसचे राहुल-प्रियांका काय, डीएमकेचे स्टालिन काय.. अशा अनेक पक्षांना - नेत्यांना आपण हिंदू असल्याचं सांगावं लागणं, हिंदू समाजाची सहानुभूती मिळवण्यासाठी केविलवाणी धडपड करावी लागणं हेच मुळात रा.स्व. संघाच्या, त्याच्या मुशीतून तयार झालेल्या जनसंघ-भाजपाच्या आणि संपूर्ण संघपरिवाराच्या गेल्या अनेक दशकांच्या अविरत प्रयत्नांचं, संघर्षाचं यश आहे. याचं कारण म्हणजे जन्माने हिंदू असणं आणि कर्माने हिंदू असणं, यामध्ये प्रचंड मोठा फरक आहे. हिंदू म्हणून जन्मलेला प्रत्येक माणूस हिंदुत्ववादी असता, तर या देशात हिंदूंना संघर्ष करण्याची वेळच आली नसती. तुमच्या घरात तुम्ही कितीही सश्रद्ध हिंदू असा, तुम्ही हिंदू समाजासाठी काय केलंत, यावर तुमचं कर्तृत्व ठरतं. त्या अर्थाने एखादा नास्तिकदेखील हिंदुहिताची, राष्ट्रवादाची भूमिका घेत असेल, तर तो ममता बॅनर्जी यांच्यापेक्षा अधिक सच्चा हिंदू ठरतो.


ममतांनी
घरात कितीही चंडीपाठ केला, अन्य कुठले श्लोक-स्तोत्रं म्हटली, पूजा-अर्चा केल्या तरी पश्चिम बंगालमधील हिंदूंना त्याचा काय उपयोग झाला? बंगालमधील सामान्य हिंदू रोज अनन्वित अत्याचार सोसतोच आहे आणि बंगालची सत्ता उपभोगणार्या आजवरच्या कुणीही या हिंदूंच्या भावनांना किंमत दिली नाही... ममता असोत वा त्यांच्या पूर्वीचे कम्युनिस्ट. त्यामुळेच भाजपामध्ये बंगाली जनतेला आशेचा किरण दिसला. कारण भाजपा नुसता चंडीपाठ करून आणि आम्ही हिंदू असल्याचं जागोजागी सांगून थांबला नाही. भाजपाच्या सरकारने 370 कलम हटवून दाखवलं, अयोध्येतील राममंदिराच्या स्वप्नपूर्तीसाठी पावलं उचलली, सीएएच्या माध्यमातून भारतातीलच नव्हे, तर भारतीय उपखंडातील हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. भाजपाने आणि भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने कर्तृत्वाने आपलं हिंदुत्व सिद्ध केलं, म्हणून तर बंगालमधील सामान्य मतदार आज भाजपाच्या झेंड्याखाली एकत्र होत असल्याचं चित्र दिसतं आहे. त्यामुळे ममतांनी कसं भाजपाला कडक शब्दांत सुनावलं वगैरे वर्णनांच्या लेखांचे रतीब घालणार्यांनी मुळात हिंदू असणं आणि हिंदुत्ववादी असणं, जन्माने हिंदू असणं आणि कर्माने हिंदू असणं, यातील फरक लक्षात घ्यायला हवा. 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी ऊठसूट ठिकठिकाणच्या मंदिरांना भेटी देत होतेच, त्यांचे प्रवक्तेही राहुल गांधी हे कसे खरे हिंदू आहेत याची वर्णनं करत होतेच. या सगळ्याचा उपयोग काय झाला, हे आपण पाहिलंच.

बंगाल आणि अन्य राज्यांप्रमाणे आपल्याकडे महाराष्ट्रातही हीच परिस्थिती आहे. आपले मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही आम्ही हिंदू आहोत, आम्ही धर्मांतर केलेलं नाही, हे सातत्याने कंठशोष करून सांगत आहेत. तथापि, राज्यात पालघरमध्ये साधूंना दगडांनी ठेचून मारलं जातं, शर्जील उस्मानी इथे येऊन हिंदू समाज सडला असल्याचं बेधडकपणे जाहीर कार्यक्रमांत बोलतो, मालाड-मालवणीमध्ये हिंदू संकटात सापडतो.. आणि आमच्या हिंदू मुख्यमंत्र्यांना या गोष्टींना काडीचीही किंमत द्यावीशी वाटत नाही. उद्धव ठाकरेंच्या या अशा निष्क्रिय हिंदू असण्याचा काय उपयोग? आणि सुदैवाने कुणीही काहीही म्हटलं तरी सर्वसामान्य हिंदू मतदार खरं- खोटं, बरं-वाईट व्यवस्थित ओळखतो. त्यामुळे ममतादीदी, तुम्ही चंडीपाठ केलात.. चांगलंच केलं. परंतु तुमच्या राज्यातील चंडीपाठ करणार्या लाखो-करोडो हिंदूंच्या हिंदुत्वासाठी तुम्ही काही केलं असतं, तर तुम्हालाही हिंदुत्ववादी म्हणता आलं असतं. मात्र आज मतांच्या लोभापायी हिंदुत्वाचा मोह तुम्हाला कितीही होत असला, तरी त्याचा काहीही उपयोग होऊ शकत नाही. ती संधी तुम्ही केव्हाच गमावलेली आहे..