गोस्वामी तुलसीदास रचित ‘रामचरित मानस’मधील ‘सुंदरकांड’चा चा मराठी भावानुवाद नारायण भिसे यांनी केला आहे. कुठल्याही धार्मिक-आध्यात्मिक ग्रंथाचा अर्थ समजून घेऊनच त्याचे पठण करणे महत्त्वाचे असते. नारायण भिसे यांनी केलेल्या अनुवादामुळे हा हेतू साध्य होतो.
गोस्वामी तुलसीदास म्हटले की आपल्याला ‘रामचरित मानस’ची आठवण होते. तुलसीदासांनी खूप भक्तिभावाने रामचरित मानस लिहिले आणि त्यांनी रामायणातील सर्व व्यक्तिरेखा आपल्या शब्दसामर्थ्याने साकार केल्या. रामचरित मानसातील विविध प्रकरणे कांड या नावाने ओळखली जातात. सुंदरकांड हे श्री हनुमंताचे वर्णन करणारे प्रकरण आहे. सुंदरकांडावर कथा-कीर्तने होत असतात. सुंदरकांड रामचरित मानसचा सर्वश्रेष्ठ अंश मानला जातो. हे प्रकरण म्हणजे श्री हनुमंताच्या ज्ञानाची, बुद्धीची आणि पराक्रमाची गाथा आहे. श्रीरामाचे अवतारकार्य सोपे व्हावे, म्हणूनच कदाचित श्री हनुमंताच्या रुद्रावराचे प्रयोजन असावे. उत्तर भारतात सुंदरकांडच्या नित्य पठणाची परंपरा आहे.
रामचरित मानसाचे लिखाण करताना गोस्वामी तुलसीदास यांनी खूप मोठ्या प्रमाणावर संस्कृतप्रचुर शब्दांचा वापर केला आहे. महाराष्ट्रात सुंदरकांडाचे नित्य पठण नसले, तरी मराठी वाचकांना सुंदरकांड मराठी भाषेत आणि ओवीबद्ध स्वरूपात उपलब्ध झाले आहे.
नारायण नरहर भिसे यांनी सुंदरकांडाचा मराठी अनुवाद केला असून ते स्वत: श्री हनुमंताचे भक्त आहेत. परंपरेने त्यांच्याकडे हनुमान जयंतीचा कार्यक्रम होत असतो. नारायण भिसे केवळ हनुमानभक्त नाहीत. एम.ई. रुकडी येथील केंद्रीय भवन अनुसंधान संस्थेत त्यांनी 36 वर्षे काम केले आहे. अनुसंधान कार्यावर त्यांचे 80हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्याचप्रमाणे गीता प्रेस गोरखपूरच्या अनेक ग्रंथांचे मराठी अनुवाद करण्याचे काम त्यांनी केले आहे. लेखनाचा, संशोधनाचा आणि अनुवादाचा प्रदीर्घ अनुभव असणार्या नारायण भिसे यांनी सुंदरकांड मराठी वाचकांसाठी अनुवादित केले आहे.
नारायण भिसे यांनी सुंदरकांडाचा शाब्दिक अनुवाद केला नसून गोस्वामी तुलसीदास यांना अपेक्षित असणारा भाव शब्दात पकडला आहे. कुठल्याही धार्मिक-आध्यात्मिक ग्रंथाचा अर्थ समजून घेऊनच त्याचे पठण करणे महत्त्वाचे असते. नारायण भिसे यांनी केलेल्या अनुवादामुळे हा हेतू साध्य होतो. गोस्वामी तुलसीदासांचे अनेक दोहे, छंद मराठी भाषेत अनुवाद करताना भिसे यांचा दोन्ही भाषांचा व्यासंग लक्षात येतो. भिसेंच्या लेखणीला गेयतेची जोड आहे. त्यामुळे त्यांनी केलेला अनुवाद केवळ वाचनीयच नव्हे, तर गायन करावा असा झाला आहे.
सुंदरकांडाबरोबरच गोस्वामी तुलसीदासांनी हनुमंताविषयी तीन स्तोत्रांची रचना केली. हनुमान चालिसा, बजरंग बाण व संकटमोचक हनुमानाष्टक. नारायण भिसे यांनी या पुस्तकात या तिन्ही स्तोत्रांचा मराठी अनुवादही केला आहे.
स्वत:ची ओळख, शक्ती विसरलेल्या हनुमंतास स्वत:चे स्वरूप किष्किंधा कांडात होते. त्यामुळे सुंदरकांडाचा पाठ करताना किष्किंधा कांडातील 29व्या दोह्यापासून वाचनास प्रारंभ करतात, हे लक्षात घेऊन नारायण भिसे यांनी सुंदरकांडाचा अनुवाद करताना किष्किंधा कांडातील हा दोहाही मराठीमध्ये अनुवादित केला आहे. सुंदरकांडाचा अनुवाद करताना हनुमंताचे लंकाप्रस्थान, हनुमान-बिभीषण संवाद, सीता भेट, लंकादहन, परत ऐलतटावर आणि श्रीराम गुणगान महिमा असे विविध प्रसंग भिसे यांनी खूप तन्मयतेने शब्दबद्ध केले आहेत. हनुमंताची भक्ती करताना आपणही त्यासारखे बलशाली, सामर्थ्यवान, बुद्धिमान व्हावे अशी साधकाची मनोभूमिका असते. समर्थ रामदासांनी बलोपासना सांगताना मारुती आदर्श मानला होता. नारायण भिसे यांनी सुंदरकांडाचा केलेला हा अनुवाद मराठी वाचक आणि हनुमान भक्त यांच्यासाठी उपयुक्त आहे.