@श्रीकांत तिजारे
समाजापासून दुरावलेल्या, कधी काळी चोर लुटारू म्हणून हिणविल्या गेलेल्या, दुखावल्या गेलेल्या आपल्याच समाजबांधवांसाठी भटके-विमुक्त विकास परिषद गेली अनेक वर्षे कार्य करीत आहे. समाज आणि शासन यांतील दुवा म्हणून भटके विमुक्त कल्याणकारी संस्था सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कार्यरत आहे. ही एक तपस्या आहे. ही तपस्या आहे माणुसकीच्या धर्माची. आपणही या दैवी कार्यात सहभागी होऊ या.
‘हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे। माणसाने माणसाशी माणसासम वागणे।’ हे उबंटू चित्रपटातले गीत एका कार्यक्रमात आमची चिमुकली बालके गात असताना अनेकांचे पाणावलेले डोळे या समाजबांधवांची जीवनगाथा खूप काही सांगून गेले.
स्वातंत्र्ययोद्धे आणि संस्कृतिरक्षक असा ज्यांचा पूर्वेतिहास आहे, अशा भटके-विमुक्त समाजबांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न 1991मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी केला. भटके-विमुक्त विकास परिषदेची स्थापना करण्यात आली.
‘चलो जलाये दीप वाह, जहा अभि अंधेरा है।’ पोटाला कोरभर तुकडा मिळविण्यासाठी दगड फोडणारे, नाचणारे गाणारे, कसरत करणारे, अर्धनग्न अवस्थेत असणारे पुरुष आणि त्यांच्या पायाशी घोटाळणारी, खांद्यावरच्या झोळीत लटकणारी कुपोषित बालके. नेहमीच उपेक्षित अशा या समाजाला मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक होते. अशा वेळी या समाजाला सन्मानाचे जगणे मिळवून देण्यासाठी भटके-विमुक्त विकास परिषदेची पायाभरणी झाली. या परमपवित्र भारतमातेला जर वैभवाच्या शिखरापर्यंत न्यायचे असेल, तर भटक्या विमुक्तांसह अवघा हिंदू समाज संघटित झाला पाहिजे. या समाजातला प्रत्येक घटक बलशाली झाला पाहिजे.
समाजापासून दुरावलेल्या, कधी काळी चोर लुटारू म्हणून हिणविल्या गेलेल्या, दुखावल्या गेलेल्या आपल्याच समाजबांधवांसाठी भटके-विमुक्त विकास परिषद गेली अनेक वर्षे कार्य करीत आहे. परिषदेच्या स्वयंसेवकानी स्वत:ला या कार्यात झोकून दिले आहे. भटके विमुक्त बांधवांची आणि त्यांच्या विकासाची कास धरलेल्या स्वयंसेवकांनी संपर्क, भेटीगाठी, भाऊबीज, अशा लहान-लहान कार्यक्रमांमधून भटक्यांच्या पालावर राबता वाढविला आणि 2003मध्ये विदर्भात या भटके-विमुक्त विकास परिषदेची खर्या अर्थाने मुहूर्तमेढ झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक सेवाभावी प्रकल्पांपैकी भटके-विमुक्त विकास परिषद हा एक प्रकल्प. भटके समाजबांधवांच्या वस्तीवर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांना मदतीचा हात दिला. अशा वेळी या कार्यकर्त्यांना त्या वस्तीतील समाजबांधवांसोबत राहून त्यांना समजून घ्यावे लागले. आज या त्यांच्या कार्याला एक मूर्त स्वरूप यायला लागले आहे. परंतु हे कार्य करत असताना प्रत्येक वेळी स्वयंसेवकांच्या मनात हाच भाव आहे की, पाल टाकून उघड्यावर राहणारी ही माणसे माझी आहेत. ते आमच्या कुटुंबाचा एक घटक आहेत. हा भाव समोर ठेवून आज कार्य प्रगतिपथावर आहे. भटके विमुक्त कल्याणकारी परिषद हा या उपेक्षित, दुर्लक्षित समाजबांधवांसाठी एक आधारवड आहे. या समाजबांधवांसाठी सुरू असलेले हे कार्य एक दैवी कार्य आहे, त्याचा अनुभव वेळोवेळी आपले कार्यकर्ते घेत असतात. गोंदिया शहरातील आपल्या समाजबांधवांच्या वस्तीत जाऊन कार्य करणारे प्रशांतजी बोरसे यांचा हा अनुभव खूप काही सांगून जातो -
“गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी आमची गोंदियातील पेंढारी वस्तीतील नियमित शाळा झाल्यावर प्रार्थनेआधी नेहमीप्रमाणे गप्पा चालू असताना, गुढीपाडवा कोण कोण साजरा करणार? असा सहज साधा प्रश्न सर्व मुलांना केला आणि सर्वसाधारण उत्तराच्या अपेक्षेने मुलांकडे पाहिले, तर साजरा करणार म्हणजे पाळणार हा अर्थ घेऊन गुढीपाडवा नावाचा प्राणी नेमका कसा दिसतो? अशी एक चर्चा मुलांमध्ये घडली. आणि मुख्य म्हणजे हा प्राणी खाता येतो काय, हा असा एक सामूहिक सूर मुलांमधून आला. बरे, उडणार्यांत कावळा सोडून सर्व पक्षी यांनी खाल्लेले, पळणार्या प्राण्यांत खार, मुंगूस यांसह इतर विविध नमुनेही वेळोवेळी चाखलेले. घोरपड पकडण्याचा खड्डा नेमका किती खोल आणि रुंद खोदावा, यात आमचा पहिलीतला जॉनीही आपला क्लास घेऊ शकेल.
मग शेवटी घाबरत एक धीट प्रश्न आलाच, “सर, गुडी पाडा कैसा दिखता हैं?” मग माझ्या लक्षात आले, आपण प्रश्न बदलून बघावा.
“घरावर परवा गुढी कोण कोण उभारणार?” पुन्हा तेच प्रश्नचिन्ह मुलांच्या चेहर्यावर. बरे, आता सरला विचारावे तर सर चिडेल, दुसर्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत नाही म्हणेल.
शेवटी यांची शांतता बघून मीच गुढी, लोटा ते लिंबपालापर्यंत सर्व वर्णन करून विचारले, “अशी काठी कोण घरावर उभी करणार?”
पुन्हा शांतता. माझा संयम संपायच्या आधी दहावीतल्या मंदाने एकदम एक्साइट होऊन उत्तर दिले, “सर, उसको गुढी बोलते हैं क्या? तो मैने वो अरिहंत कॉलोनी में देखी हैं। कबाड काम को गये थे तब। (कचरा गोळा करायला गेली तेव्हा).” मग माझ्या लक्षात विषयाचा आवाका आला - ह्या मुलांना आपले हिंदू नववर्ष अथवा गुढीपाडवा किती महत्त्वाचा सण आहे, हे योग्य मार्गाने पटवून सांगावे लागेल.
आमच्या सुषमाताईंशी या विषयावर बोललो, तर शाळेवर गुढीपाडवा मोठ्या प्रमाणात साजरा करावा असा आमच्या दोघांचाही सूर निघाला. मग लागलो तयारीला. श्रीखंडाचा बेत हा आमच्या घरी धुळ्यात गुढीपाडव्याला ठरलेलाच. त्यानुसार माझी व ताईंची तयारी सुरू झाली. 150 मुलांसाठी श्रीखंड आणणे आमच्या आवाक्याबाहेरचा विषय नसला, तरीही एका वेळेस आपण किती खर्च करावा यांच्या मर्यादा मी आखून घेतलेल्या.
मग बाहेरून दूध आणून घरीच श्रीखंड बनवण्याच्या ताईंच्या योजनेनुसार आम्ही गोंदियातील प्रथितयश व्यवसायिक शामसुंदर स्वीट यांना भेटायला गेलो. शामसुंदर स्वीट मार्टबद्दल गोंदियात अशी एक चर्चा होती की जेवढी त्यांची मिठाई गोड, तेवढीच मालकांची जीभ कडू! तरीही हिय्या करून भेटायला गेलोच. मालकांचे लहान भाऊ मुन्ना सिंधी यांच्याशी आधी थोडी ओळख होती, त्यानुसार त्यांना उत्कृष्ट श्रीखंड बनविण्याची सर्व प्रक्रिया विचारून घेतली. आम्ही निघणार, तेवढ्यात मुन्नाभाईंनी आम्हाला थांबवून विचारले, “चक्का मैने दिया तो चलेगा क्या?” मी व ताई दोघेही अत्यानंद आणि शॉक एकत्र अनुभवत होतो. तरीही शंका नको, म्हणून मी मुन्नाभाईंना घाबरत पैशाबद्दल विचारले, तर प्रतिक्रिया ऐकून मला स्वत:ला भरून आले. “आप इतना कुछ कमा रहे हैं, तो थोडा पुण्य हमारे हिस्से में भी आने दो.” ह्या अशाच घटना नेहमी कार्यकर्त्यांचे प्रेरणास्रोत राहिल्या आहेत.
आमचे उमेशजी मेंढे नेहमी म्हणतात त्याप्रमाणे आम्ही करतोय ते दैवी कार्याचा एक भाग आहे, याचा अनुभव पुन्हा एकदा येत होता. त्याच दिवशी पताका आणून रात्री समग्र शाळा मंडळी कामाला लागली. सर्व बालगोपालांचा उत्साह ओसंडून वाहत होता. माझी बोलणी खात, माझी नजर चुकवत जेथे सुतळीवर जागा मिळेल तिथे पताका चिटकत होत्या, वेळप्रसंगी पताका चिटकवायला जागा न मिळाल्यास माझी नजर चुकवून दुसर्याची पताका काढून आपली लावली जात होती. कधीही शाळेत न येणारा सूरज सर्व खांबांवर आणि घरांवर पताका बांधायला चढताना साक्षात वानरसेनेचे दर्शन घडवीत होता. त्यात मध्येच एक विद्युत तारेची अडचण निर्माण झाली, तर रात्री त्याच वेळेस चार घरांची वीज बंद करून काम तत्काळ पूर्ण झाले. मी मात्र विचारात पडलो.. आपल्या प्रतिथयश कॉलनीत रात्री कोणीही वीज बंद करू दिली असती काय? असो.
पालावरच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम यांचा संवाद
अशा प्रकारे सर्व वस्तीची साफसफाई करून संपूर्ण शाळेतील बालगोपाळांनी नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी केली. सोबतीला वस्तीतलाच मुलांचा आवडता आणि मुलांना मनापासून शिकविणारा बारावीतला शक्ती शेंडे, शाळेत नुकताच काही दिवसांपासून शिकवायला येणारा सॉफ्टवेअर इंजीनियर राज छावडा हे दोघेही होते, रिताभाभी होत्या मदतीला. सर्व कामे करत रात्री बराच उशीर झाला. मग तितक्या रात्री भाड्याने आणलेल्या ढोल आणि ताशावर ट्रायल नावाखाली सर्वांनी हात धुऊन घेतला. शेवटी मी रागावल्यावर सर्व घरी गेले. मी रूमवर पोहोचलो, तेव्हा एक वाजला होता. सुषमाताईंशी फोनवर उद्याच्या नियोजनाची उजळणी झाली,
त्यानंतर ताई श्रीखंड करण्याच्या तयारीला लागल्या. सकाळी सुषमाताई वस्तीवर आल्यावर ताईंचे डोळे सांगत होते की ताई रात्रभर झोपल्या नाहीत, तरीही चेहर्यावर तोच उत्साह, तेच तेज. मला ताईंचा त्या क्षणी पुन्हा एकदा हेवा वाटला. सकाळी सहा वाजल्यापासूनच वस्तीवर लगबग सुरू झाली. गुढीसाठी उभारलेल्या दांडीभोवती सर्व मुले रांगोळी काढून आपला हात आजमावून घेत होते. वस्तीतील सर्व घरांवर गुढी उभारली गेली नसली, तरीही आदल्या रात्री शक्तीने वस्तीतून वर्गणी करून विकत आणलेल्या भगव्या झेड्यांनी प्रत्येकाची घरे सजली होती, सर्व वस्तीत भगवे झेंडे मानाने डोलत होते.
गुढी कशी असते याची सर्व माहिती सर्वांना सांगून सात वाजेपर्यंत गुढी उभारून झाली. मुलांनीही अतिशय काळजीपूर्वक गुढी पाहून घेतली. शोभायात्रेची तयारी सुरू झाली. आठ वाजता वाजतगाजत शोभायात्रा सुरू झाली. आश्चर्य म्हणजे काही मुलींनी खूपच मनावर घेऊन त्या साडी नेसून आल्या होत्या. मीही सुखावलो. शोभायात्रेत सर्वात पुढे ढोलताशे, त्यामागे भगवा झेंडा, त्यामागे उत्साही, पण एक डोळा माझ्याकडे ठेवत शिस्तबद्ध शाळा. संपूर्ण गोंदिया आमच्या या शोभायात्रेकडे पाहत होता. गायत्री मंदिरात पोहोचल्यावर सर्वांनी एका रांगेत चपला काढल्या, कारण सर्वांना माहीत होते - चपला इकडेतिकडे काढल्या, तर सर स्वत: हातात चपला घेऊन लाइनीत लावतो. गायत्री मंदिरात सर्व मुलांच्या हातून होमहवन झाले, हे सर्व मी व ताई डोळे भरून बघत होतो. भीक मागणारे, कचरा गोळा करणारे, कष्ट करून रापलेले हात आज हवनाची समिधा मधल्या तीन बोटांत काळजीपूर्वक पकडून मनापासून हवन करीत होती. नवीन वर्षानिमित्त हवन करण्याची राहिलेली माझी इच्छा मुलांना पाहून पूर्ण झाली, यापेक्षा माझे सुंदर हवन आणखी कुठले झाले असते? तीन तास होमहवन करूनही मुलांच्या चेहर्यावर कुठलाही कंटाळा नव्हता. आमचे मित्र अजयजी यादव यांनी नास्त्याची व्यवस्था केली होती. नास्ता झाल्यावर पुन्हा एकदा सर्वांची बॅटरी चार्ज झाली. पुढे अजयजी यादव यांनी आदल्या रात्री सुचवल्यानुसार शोभायात्रा गावात राममंदिरापर्यंत गेली. राममंदिरात गेल्यावर सर्व मुलांचे पेशन्स संपले. इतका वेळ चालणे ठीक, पण शिस्तबद्ध चालणे म्हणजे साक्षात आमच्या पेंढार्याचा अंत बघत आहात, असा भाव मुलांच्या चेहर्यावर होता. मग सुषमाताईंनी खास लोकाग्रहानुसार ढोल व ताशा आणि मुले यांना काही काळ सूट दिली. मग काय, बघता बघता सर्व मुले अथक नाचली. ताईही त्यांच्यात सामील झाल्या. पुढे यादवजी आणि मधवजी गारसे यांनी गाड्यांवर मुलांना वस्तीवर सोडण्याची व्यवस्था केली. वस्तीवर संतोषजी कुलकर्णी यांच्यामार्फत जेवणाची व्यवस्था केली होती. ते आणि त्यांचे चिरंजीव प्रथमेश याने किशोर कांबळे, आदर पाथरे आणि इतर वस्तीवरची मंडळी यांच्या मदतीने पुलाव आणि कढी याचा गरम गरम बेत तयार ठेवला होता. लगेच पंगती बसल्या. इतके थकल्यानंतरही भजन मंत्र झाला, मगच भोजन सुरू झाले. सर्व मुले आणि वस्ती तृप्त होऊन गेली. माझे आणि ताईंचे नववर्ष सार्थकी लागले होते.”
उपक्रमशीलता जेव्हा अंगात असते आणि समाजासाठी काहीतरी करावे ही प्रबल इच्छा मनात असली की समाजसुद्धा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो, त्याचे हे उदाहरण.
बिर्हाड परिषदेत डॉ. सुवर्णा रावळ व अन्य मान्यवर
‘सब समाज को लिये साथ मे, आगे है बढते जाना।’ हे सिद्ध करण्यासाठी ‘बंधुभाव हाच धर्म’ हे ब्रीद घेऊन वाटचाल करणारी संस्था, भटके-विमुक्त विकास परिषद म्हणजेच विदर्भात कार्यरत असलेली भटके विमुक्त कल्याणकारी संस्था परिश्रम करीत आहे.
विदर्भात नाथजोगी, बहुरूपी, कोतारी, बेलदार, पांगुळ, वडार, गिरी, गोसावी, गोपाळ, मांगगारूडी, गोंधळी, सोनझारी, बैगावैदू, मसणजोगी, कैकाडी, भामटी, बंजारी, चित्रकती, ढीवर यासारख्या चोवीस विविध जातींचे समाजबांधव वास्तव्याला आहेत.
भारतमातेला सर्वशक्तिमान करण्यासाठी या उपेक्षित समाजाला सोबत घेऊन प्रगती करणे, मार्गक्रमण करणे, त्यांचे हक्क मिळवून देणे यासाठी भटके-विमुक्त कल्याणकारी संस्था विदर्भ स्तरावर विविध उपक्रम राबवीत आहे. शिक्षण, स्वावलंबन, सुरक्षा, स्वच्छता, आरोग्य आणि सन्मान अशा सहा आयामांवर संघटनेचे कार्य आधारित आहे.
संघटनात्मक बांधणी पक्की करण्याच्या दृष्टीकोनातून वस्ती प्रमुख, महिला वस्ती प्रमुख, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख व त्यांची कार्यकारिणी अशाप्रमाणे रचना केलेली आहे. सर्व आयामांचे प्रमुख निर्धारित केलेले आहेत. त्यांचा प्रवास ठरलेला आहे. त्यामुळे संघटनेच्या कामात सुसूत्रता आहे.
समस्यानिवारण
भटके समाजबांधवांच्या वैयक्तिक तसेच सामाजिक समस्या समजून घेणे, त्यांचे निरसन करणे यावर संस्था भर देते. भटके समाजबांधवांचा ऐरणीचा प्रश्न म्हणजे त्यांची जात प्रमाणपत्रे. भटक्यांना पूर्वजांचा दाखला नसल्याने कोणतेही प्रमाणपत्र मिळत नव्हते. भटके विमुक्त कल्याणकारी संस्थेने या समस्येवर लक्ष केंद्रित करून शासनदरबारी सततच्या पाठपुराव्यामुळे आजवर तीन हजार भटके समाजबांधवांना जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. नुकताच अखिल भारतीय घुमंतू परिषदेचे प्रमुख दुर्गादासजी यांच्या प्रमुख उपस्थितीत साकोली येथे बेलदार समाजाच्या चाळीस बांधवांना जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. सत्तर वर्षांनंतर पहिल्यांदा त्यांना हे प्रमाणपत्र प्राप्त झाले.
अधिकाधिक समाजबांधवांचे आधार कार्ड, ओळखपत्र, शिधापत्रिका तयार झाली आहे. स्वयंपाकाचा गॅस व शेगडी मिळाली आहे. कार्य प्रगतिपथावर आहे. काही वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सौर दिवे, पक्के सिमेंटचे रस्ते शासन निधीतून उपलब्ध केले आहेत. काही वस्त्यांवर घरकूल योजनांचा लाभ मिळाला आहे. पारंपरिक व्यवसायाला चालना देऊन अर्थार्जन व्हावे, या दृष्टीने परिषद कार्यरत आहे. अनेकांना पारंपरिक रोजगारनिर्मितीसाठी कौशल्य विकासाच्या माध्यमातून शासकीय कर्ज योजनेचा लाभ मिळाला आहे. या संपूर्ण कार्यात भटके विमुक्त कल्याणकारी संस्थेच्या सक्रिय कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे.
बिर्हाड परिषद
अस्तित्वाकरिता भटके समाजबांधवांनी एकत्र यावे, संवाद घडावा आणि समाजाच्या रितीभातींची माहिती या भटक्यांना व्हावी, त्यांना मुख्य प्रवाहाशी जुळवून घेता आले पाहिजे हा मुख्य उद्देश समोर ठेवून 2010पासून दर दोन वर्षांनी ‘बिर्हाड परिषदे’चे आयोजन केले जाते.
आजपर्यंत एकंदर पाच बिर्हाड परिषदांचे आयोजन करण्यात आले. भंडाराजवळील कार्धा या गावी 2010मध्ये पहिली बिर्हाड परिषद घेण्यात आली. हे एक स्नेहमिलनच म्हणू या आपण. भटके बांधव दूरवरून आपापली बिर्हाडे घेऊन परिषदेच्या ठिकाणी येतात. दोन दिवस छान आनंद उपभोगतात. बिर्हाड परिषदेला विदर्भातून दूरदुरून स्वखर्चाने सारे भटके समाजबांधव एकत्र जमतात. याच समाजातून पुढे चांगले शिक्षण घेऊन, उच्च पदांवर असणार्या अधिकारी, खेळाडू, यांचे मार्गदर्शन या बिर्हाड परिषदेत उपस्थित समाजबांधवांना लाभते. आपले हे समाजबांधव दोन दिवसांच्या या निवासी बिर्हाड परिषदांची वाट बघत असतात. या बिर्हाड परिषदेदरम्यान भटक्या समाजबांधवांनी दाखविलेली शिस्त आणि स्वच्छता कौतुकास्पद आहे. दि. 2 व 3 फेब्रुवारी 2019 रोजी गोंदिया जिल्ह्यातील हिरडामाली-गोरेगाव येथे भटके विमुक्त विकास परिषदेतर्फे पाचवी बिर्हाड परिषद आयोजित करण्यात आली होती. अखिल भारतीय भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान मुंबईच्या अध्यक्षा सुवर्णाताई रावळ, तसेच भटके विमुक्त समाजबांधवांसाठी प्रत्यक्ष काम करणारे नरसिंगजी झरे हे या परिषदेला प्रमुख वक्ते होते.
या वर्षी गौरवमूर्ती म्हणून भटके समाजातीलच उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थ मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यात मा. बालाजी मंजुळे, आयुक्त (एकच डोळा असून मराठी माध्यमातून परीक्षा देऊन खअड झालेले), मच्छींद्रजी चव्हाण, (साहाय्यक पोलीस आयुक्त, मुंबई), भूमिका संजय उपाध्याय (तेलगू/मराठी अभिनेत्री), तसेच राजश्री गायकवाड (क्रिकेटपटू, भारतीय महिला संघ, बंगळुरू), कालीदासजी शिंदे (पीएच.डी.), मारोतीजी पात्रे, शेखरजी बोरसे (बांधकाम व्यावसायिक) यांचा समावेश होता. या बिर्हाड परिषदेत प्रसादजी महानकर यांनी केलेले उद्बोधन उद्धृत केल्याशिवाय राहवत नाही. समाजाचेच समाजबांधव, परंतु भटके. चालीरिती, परंपरा वेगळ्या. तरीही एका ओळखीखाली एकत्र आलेले. समाजबांधवांच्या समस्यांसाठी खांद्याला खांदा लावून एकत्र आलेले. ‘बंधुभाव हाच धर्म’ हे ब्रीद असलेल्या या भटके विमुक्त कल्याणकारी परिषदेने हे सेतुबंधनाचे पवित्र कार्य केले.
आम्ही सारे भारतीय आहोत, ही ओळख पक्की व्हावी हे भटके विमुक्त कल्याणकारी संस्थेचे कार्य आहे.
2017मध्ये भंडारा शहराजवळील भिलेवाडा या गावात चौथी बिर्हाड परिषद आयोजित केली होती. त्यात जवळजवळ दोन हजाराहून अधिक भटके बांधव सहभागी झाले होते. दादा इदातेंच्या उपस्थित पार पडलेल्या या बिर्हाड परिषदेत एक ठराव पारित करण्यात आला. यात ‘शिक्षण हे अत्यावश्यक आहे. हा समाज शिकला, तरच पुढे जाऊ शकतो’ असे ठाम मत व्यक्त करण्यात आले. रोजगारनिर्मितीवरसुद्धा भर देण्यात आला होता. अगदी हाच धागा धरून भटके विमुक्त कल्याणकारी परिषदेतर्फे पालावरची शाळा हा उपक्रम एक पथदर्शक प्रकल्प म्हणून विदर्भात राबविला जातो.
पालावरची शाळा
शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे जेव्हा कार्यकर्त्यांच्या लक्षात आले, तेव्हा सुरू झाली ती पालावरची शाळा. हा उपक्रम खूप समाजाभिमुख झालेला आहे. पालावरची शाळा प्रकल्प म्हणजे समाजविकासाच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल आहे. भविष्यात ही पालावरची शाळा एक पथदर्शक प्रकल्प व्हावा, ही त्यामागची संकल्पना. भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यांत आज 14 पालावरच्या शाळांमधून भटक्या समाजातील बालकांना, त्यांच्याच वस्तीत जाऊन दगडाचा फळा करून शिक्षित आणि संस्कारित करण्याचा यशस्वी प्रयत्न केला जातो. गेली चार वर्षे या पालावरच्या शाळा सुव्यवस्थितपणे चालत आहेत. शाळेत जाणारी, न जाणारी मुले अशांना एकत्र करून त्यांना संस्कारित करण्याचा प्रयत्न. पालावरच्या शाळेत शिकविणार्या शिक्षकांना आचार्य असे संबोधले जाते. शाळेमध्ये संस्कारयुक्त गोष्टी शिकविणे, खेळ, आरोग्य शिक्षण, पर्यावरणाचे ज्ञान, त्यांच्या शाळेमध्ये घेतलेला अभ्यास इत्यादी बाबी लक्षात घेतल्या जातात. शाळेला पक्की इमारत नाही. ती भरते खुल्या आसमंतात, झाडाखाली, कधी रस्त्याशेजारी, तर पावसाळ्यात कुणाच्यातरी झोपड्यात. स्थानिक व्यक्तींना नेतृत्व देऊन त्यांच्या माध्यमातून समाजबांधवांची मोट बांधणे आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणे ही भटके-विमुक्त कल्याणकारी संस्थेची भूमिका. या शाळेचे आचार्य ती प्रत्यक्षात आणत आहेत. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पूर्ण काळजी घेतली जाते. त्यांच्या शारीरिक स्वच्छतेवर भर दिला जातो. प्रत्येक शाळेत एक संस्कार पेटी असते. काही अपवाद वगळता शाळेला सुट्टी नसते. या पालावरच्या शाळेमधून विविध उपक्रम राबविले जातात. पारंपरिक नृत्य, गाणी, कथा, तसेच मुलांच्या अंगी असणार्या कलागुणांना कसे विकसित करता येईल यावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, पालकसभा नियमित होतात. राष्ट्रीय कार्यक्रम - म्हणजे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, थोर पुरुषांच्या जयंती, विविध उत्सव, सहल यासारखे कार्यक्रम पालावरच्या शाळेत राबविले जातात. आज या पालावरच्या शाळेत मुले संस्कारित होत आहेत. काही शाळेतील विद्यार्थ्यांना पन्नासपर्यंतचे पाढे पाठ आहेत. पालावरची शाळा सुरू झाली, तेव्हाचा हा आमच्या प्रशांतजींना आलेला एक बोलका अनुभव -
“आज जसवंत नवीन पाठ शिकवून गेला.
सहा महिन्यांपूर्वी ऑफिस सुटल्यानंतर सायंकाळी झोपडपट्टीत जनजाती समितीच्या पालावरच्या शाळेत शिकवायला सुरुवात केली. सोबतीला होती वस्तीतील सुशील कांबळे, छमन बाई यांची मदत आणि मा. दिनेशभाई पटेल यांचे अनमोल मार्गदर्शन. अतिशय अवघड परिस्तिथी वाटत होती. इथे काहीच करू शकणार नाही अशी राहून राहून चुकचुक होती. 100 मुले-मुली काहीतरी खातच येत किंवा नाक गाळत, व्यक्त करता येणार नाही अशा परिस्थितीत मुले येत. मुलांना शिकविताना थोडासा हात इकडे तिकडे झाला की हाताला त्यांच्या चिकट पदार्थ लागे. घरी आलो की माझी अवस्था बिकट होऊन जाई. शाळेत आधी तर स्वछतेपासून सुरुवात होती. उद्यापासून अंघोळ करून या म्हटले, तर बरेच जण सायंकाळी नुकतेच अंघोळ करून ओल्या केसानिशी आलेले. तेल लावून या म्हटले, तर डोक्यावरून कपाळावर तेलाचे ओघळ आणि एकदा तर दोन लहान मुली “सर, बुचडा बांधून दे” म्हणून पाठ करून माझ्याकडे बसल्या.. आणि गम्मत म्हणजे बर्याच वेळा गावात फिरायला गेलो की कुठूनही आवाज येत “गुडमॉर्निंग सर” (वेळ अगदी सायंकाळची असली, तरीही गुडमॉर्निंगच!) वळून पाहिले, तर कचरा गोळा करणारी काही मुले माझ्या प्रतिक्रियेची वाट पाहत माझ्याकडे हसत बघत. ही बहुतांश कचरा गोळा करणारी अथवा मागून खाणारी मुले होती, हे खूप उशिरा कळले.
दरम्यान, एका सधन कुटुंबाने त्यांच्या आईवडिलांच्या वाढदिवसानिमित्त काही 50 गोष्टींची पुस्तक दिली होती, त्यांची छोटी लायब्ररी सुरू केली. पुस्तके वाटली. खूप आनंद होता मुलांच्या चेहर्यावर. अंदाजे इयत्ता सातवी-आठवीची मुले जवळ आली, “सर, पुस्तक बहुत मस्त होय। पण आमले अजून वाचताच येत नस्से।”
हळूहळू त्यांना शिकविता शिकविता आम्हीच शिकायला लागलो. किती, कसे शिकवायचे हे कळायला लागले. पालकांना बोलवायचे नाही, हा मुख्य पाठ शिकलो. कारण मुलगा चुकला म्हणून पालकाला बोलावले, तर पालकच डुलत येणार, हा अनुभव गाठीशी. हळूहळू काही पालकच शाळेत येऊन डोकावून जायला लागले, मुलांची प्रगती विचारायला लागले.
प्रयत्नांना काही प्रमाणात यश येऊ लागले. पाढे 23पर्यंत ओढले. पसायदान पूर्ण पाठ झाले.
दरम्यान काही हिरे गवसले - जसवंत कांबळे, यशवंत शेंडे. त्यात जसवंत एकपाठी होता. त्याच्यासाठी मा. दिनेशभाई यांनी येथील सर्वोत्तम आणि नावाजलेल्या गुजराथी शाळेत प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नानंतर शाळा प्रवेश परीक्षा घेण्यास तयार झाली. त्यात जसवंत सपाटून आपटला. (मराठी माध्यमातून कधी कधी शाळेत गेलेला हा मुलगा इंग्लिश माध्यमातील पेपरला बसल्यावर दुसरे काय होणार!)
भयानक वैतागलो. त्याच्यावरही चिडलो. कारण अपेक्षा वाढल्या होत्या. पुन्हा मा. दिनेशभाई यांनी दुसर्या शाळेत प्रवेशासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान ओळखीच्या काही सरांकडे जसवंतला क्लास लावला. एक दिवस दिनेशभाईंचा अचानक निरोप आला. गुजराती शाळेत कुठल्याही फीशिवाय अॅडमिशन मिळेल, (काही अटींवर). अॅडमिशन मिळाली. (मा. दिनेशभाई आणि शाळेचे आभार. शाळेने जसवंतची सर्व फी माफ केली आहे.) बर्याच लोकांनी आमचे अभिनंदन केले. अगदी शाळेच्या गेटवरील शिपायानेही थांबवून अभिनंदन केले, कारण तेही आमचे प्रयत्न बघत होते. (काहींनी असूयेने विचारले, कुठून जॅक लावला? बहुधा प्रतीक्षा यादी मोठी असावी.)
त्याच दिवशी जसवंतला टाय बूटसह युनिफॉर्म लगेच घेतला. आनंदाची बाब होती, म्हणून वाटायला चॉकलेट्सचा बॉक्स घेतला. यशवंतला घेऊन कार्यालयातील मारुती मंदिरात गेलो. तिथे त्याने चॉकलेट ठेवले. बाहेर आल्या आल्या जसवंत एका बाईला जाऊन चॉकलेट देत होता आणि काहीतरी सांगत होता. मी अतिशय रागाने त्याच्याकडे बघत होतो, कारण येणारी जाणारी माणसे आमच्या दोघांकडे बघत होती. भीक मागणार्या त्या बाईची अवस्थाही अतिशय बिकट होती. कडेवर मूल, एका हातात वाडगा आणि डोक्याला कचर्याचे पोते अडकविलेले.
जसवंत आणि मी मार्गी लागल्यावर रागातच त्याला विचारले, “तू रस्त्याने प्रत्येकाला चॉकलेट वाटत सांगत जाणार आहेस काय?” बर्याच वेळाने जसवंत मान खाली घालून हळूच म्हणाला, “नस्से सर, ती माही बहीण होय. टाय अन बूट घातले म्हणून तिला कसा भुलन?”
घरी जाईपर्यंत पाणावलेल्या डोळ्यांनी जसवंतशी एकही शब्द बोलायची हिम्मत करू दिली नाही.”
आज मुलांना शिक्षणाची गोडी लागलीय, हे काही कमी नव्हे. शहरातील, नामवंत शाळांचे विद्यार्थी पालावरच्या शाळेला भेट द्यायला येतात, त्यांना शिकविण्यासाठी येतात, ही मोठी उपलब्धी आहे. वस्तीतील पुरुष, महिला यांच्यात झालेला बदल ही एक पोचपावती ठरावी.
नुकतेच भंडारा जिल्ह्याचे हेडमास्तर पालावरच्या शाळेत झाले मास्तर. संपूर्ण जिल्ह्याचा कारभार डोक्यावर घेऊन प्रशासकीय गाडा कुशलतेने हाकताना, अधिनस्थ अधिकारी-कर्मचार्यांना प्रशासकीय धडे देणारे जिल्हाधिकारी आज चक्क मास्तर बनले. आता म्हणाल, एखाद्या नावाजलेल्या अपडेट शाळेत जाऊन साहेबांनी भेट घेतली असेल! पण तसे झाले नाही. ज्यांना शिक्षणाचा गंधच नव्हता, अशा भटक्यांसाठी झाडाच्या खाली चालविल्या जाणार्या पालावरच्या शाळेला भेट देत त्यांनी विद्यार्थ्यांना एबीसीडी नव्हे, तर गणिताचे आणि भूमितीचेही धडे दिले. काहींचा समज असतो की साहेब लोक जिथे व्यवस्थित, तिथेच जातात. पण जिल्हाधिकारी संदीप कदमसाहेबांनी तो समज चुकीचा ठरविला. मागील चार वर्षांपासून जिल्ह्यात विविध वस्त्यांवर सुरू असलेल्या या पालावरच्या शाळेच्या उपक्रमाची माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांना कळल्यानंतर त्यांनी अशा शाळांना भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती प्रत्यक्षात आणली. कोरोनाच्या प्रचंड प्रादुर्भावामुळे असलेले दडपण, शासकीय सुट्टी या गोष्टी कुठेही आड न येऊ देता भटक्यांसाठी सुरू असलेला शिक्षणाचा नवोपक्रम कुतूहलाने जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी साकोलीजवळील पटाच्या मैदानावर असलेल्या बेलदार समाजाच्या वस्तीत पोहोचले. त्या ठिकाणी एका झाडाखाली ही पालावरची शाळा भरली. साकोलीजवळील खैरलांजी येथे आणि लाखनी तालुक्यातील पिंपळगावच्या गोपलांच्या वस्तीत अशीच शाळा भरली. सिमेंटच्या चार भिंतीच्या वर्गखोलीत जेवढ्या शिस्तीने मुले बसतात, तीच शिस्त या आकाशाखाली भरलेल्या शाळेत होती. वय वर्षे सहापासून ते 20 वर्षांपर्यंत विद्यार्थी येथे होते. विद्यार्थ्यांशी जिल्हाधिकार्यांनी संवाद साधला. शिक्षणाविषयीची गोडी, विषयातील ध्येय या चर्चा करताना विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्तपणे अनेक प्रश्नही आले. जिल्हाधिकार्यांनी या प्रश्नांना तेवढ्याच आत्मीयतेने उत्तर देऊन शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे सांगितले. केवळ संवाद साधूनच नाही, तर प्रत्यक्ष फळ्यावर गणित मांडीत जिल्हाधिकार्यांनी विद्यार्थ्यांना शिकविले आणि आतापर्यंत आत्मसात केलेले ज्ञान जाणून घेतले. मुलांना शिक्षणापासून दूर ठेवू नका, असा अत्यंत मोलाचा सल्ला या वेळी त्यांनी पालकांना दिला. “पालावरची शाळा पाहून आपण गहिवरलो” अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तिन्ही शाळांच्या आचार्य ज्योती शिवणकर, रंजू सोनकुसरे आणि मिथुन भेंडारकर यांनी जिल्हाधिकार्यांपुढे शाळेच्या या प्रगतीचा आलेख मांडला. पहिल्यांदाच एखादा उच्चपदस्थ अधिकारी वस्तीवर येऊन आस्थेने विचारपूस करून जातो, या गोष्टीचे समाधान वस्तीतील प्रत्येकाच्या चेहर्यावर दिसत होते.
प्रकल्प प्रमुख, प्रकल्पाचे पालक, प्रकल्पाचे मार्गदर्शक, टोळीतील सदस्य, संघटनेचे अध्यक्ष, विभाग प्रचारक, विभाग संयोजक यांच्या पूर्णत: देखरेखीत हा प्रकल्प चालतो.
निवासी अभ्यासिका
भटके विमुक्त कल्याणकारी संस्थेतर्फे जुलै 2019पासून भंडारा येथे या मुलांसाठी नि:शुल्क निवासी अभ्यासिका सुरू केली आहे. आज दहा विद्यार्थी तिथे राहून चांगले शिक्षण घेत आहेत. अर्थात आपल्या समाजबांधवांच्या सहभागातून, दानशूर व्यक्तींच्या सहयोगाने हा उपक्रम सुरू आहे. आपल्या समाजातील काही सन्माननीय कुटुंबांनी यापैकी काही मुलाचे पालकत्व स्वीकारले आहे. आपल्या या पाल्याचा वर्षभराचा खर्च ते करतात. सणासुदीला आपल्या पाल्याला ते घरी घेऊन जातात. घरातल्यांशी ओळख व्हावी, या मुलांना विविध चालीरिती कळाव्यात, आपुलकीची भावना निर्माण व्हावी, हा त्यामागचा उद्देश.
विविध उपक्रम
भाऊबीज - मुख्य समाज आता आपल्या भटके समाजबांधवांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघू लागला आहे. भाऊबीज, रक्षाबंधन, मकर संक्रांतीचे हळदीकुंकू असे कार्यक्रम पालावर जाऊन (भटके समाजबांधवांची वस्ती) साजरे केले जातात. बरेचदा या समाजबांधवांसह भोजनाचा आस्वाद घेतला जातो. या कार्यक्रमांतून सामाजिक समरसता दृढ व्हावी हा उद्देश सध्या होताना दिसतो आहे.
भाऊबीज - भटके समाजबांधवांच्या वस्तीवर आरोग्य शिबिर घेऊन विनामूल्य तपासणी केली जाते. वस्तीत राबविल्या जाणार्या पालावरच्या शाळेतसुद्धा आरोग्य तपासणी शिबिर घेतले जाते. समाजातील सेवाभावी डॉक्टर्स काही वस्त्यांवर नियमितपणे ही सेवा देतात. नियमित आरोग्य तपासणी शिबिरामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण बर्याच प्रमाणात कमी झाले आहे.
स्वच्छता मोहीम - परिसर स्वच्छ असल्यास आरोग्य चांगले राहू शकते, यासाठी दर पंधरा दिवसांतून वस्ती स्वच्छता मोहीम राबविली जाते. या वस्त्यांमधून स्वच्छता व नीटनेटकेपणा आढळून येतो. भटके समाज म्हटले की अस्वच्छता हेच समोर येते. पण आता चित्र बदलते आहे. नुकत्याच अखिल भारतीय घुमंतु परिषदेचे प्रमुख दुर्गादासजी यांनी त्यांच्या वस्ती भेटीत भंडाराजवळील देवखमारी वस्तीतील स्वच्छतेची विशेष दाखल घेतली.
कार्यकर्ता संमेलन
बंधुभाव हाच धर्म हे ब्रीद घेऊन, संस्कारक्षम माणूस घडविणारा कार्यकर्ता समोर यावा, याकरिता भटक्या समाजातील कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्ता संमेलन घेतले जाते. नागपूर जिल्ह्यातील उमरेड या गावी 2018मध्ये पहिले कार्यकर्ता संमेलन, तर 2020मध्ये नागपूरजवळील वाडी येथे दुसरे कार्यकर्ता संमेलन घेण्यात आले. आज परिषदेला या समाजातील साठ-सत्तर कार्यकर्त्यांची फौज सहज निर्माण करता आली. या समाजबांधवांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचावा, म्हणून या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य पार पडत आहे. भंडारा येथील एका भटक्या कुटुंबाला शासकीय योजनेअंतर्गत अर्थसाहाय्य उपलब्ध झाले, तो क्षण बरेच काही सांगून गेला. आज आपल्या या भटके समाजबांधवांच्या वस्त्यांवर शासकीय शिबिरांचे आयोजन केले जाते. एकाच ठिकाणी सारे दाखले मिळतील अशी व्यवस्था मा. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात होत आहे. खुद्द भंडारा जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी बिर्हाड वस्तीत येऊन जात प्रमाणपत्र वाटप करतात, म्हणजे ‘शासन अपुल्या दारी’ याचे खरे प्रत्यंतर म्हटले, तर ती अतिशयोक्ती ठरू नये.
एखादी अगदीच लहानशी घटनासुद्धा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरू शकते. असाच एक प्रसंग नुकताच घडला. मन भरून आले. संस्थेचे सुरू असलेले कार्य अगदी योग्य दिशेने, सकारात्मक दृष्टीने, सुरू आहे याची खात्री पटली.
नुकताच दोन आचार्यांचा विवाहसोहळा अनुभवण्याचा योग आला. एकाच मंडपात दोन लग्ने पार पडली. एक आचार्य वर तर दुसरी वधू. साकोली तालुक्यातील खैरलांजी येथील गोपाळ वस्तीतील ज्योती व आरती शिवणकर या दोन बहिणी. यातील ज्योती ही ऊ.एव.शिक्षित असून भटके विमुक्त कल्याणकारी संस्थेद्वारा चालणार्या पालावरच्या शाळेची आचार्या आहे. मिथुन भेंडारकर हा नुकताच बारावी उत्तीर्ण झालेला आमचा आचार्य. संजय शेंद्रे यांच्याशी ज्योतीचे शुभमंगल, तर आरती हिच्याशी मिथुनचे शुभमंगल जातीच्या रितीरिवाजानुसार पार पडले.
कोरोना काळ, फार कमी उपस्थिती. परंतु सर्व गोष्टी कशा गोपाळ समाजबांधवांच्या रितीप्रमाणे झाल्या. मंगलाष्टके झाली. वधू-वरांनी एकमेकांना वरमाला घातली. टाळ्यांचा कडकडाट झाला. अगदी देखणा लग्नसोहळा. होय, देखणा असेच त्याचे वर्णन. या समारंभात भटके विमुक्त कल्याणकारी संस्थेचे दिलीपजी चित्रिवेकर दांपत्य, श्याामरावजी शिवणकर, राहुलजी आवरकर तसेच गजेंद्र कोसलकर व नगर सेवा प्रमुख शिवम चंद्रवंशी आवर्जून उपस्थित होते. भेटवस्तूंचा सोपस्कारही आटोपला गेला. आचार्य (वधू) भगिनीने, आमच्या कार्यकर्त्यांसह मंचावर फोटोसेशन आटोपलेले. आणि...
..आणि त्या दोन नवदांपत्यांनी कार्यकर्त्यांकडे एक लिफाफा सुपूर्द केला. हे अनपेक्षित होते सर्वांना. त्यांनी खुलासा केला, “गेली दोन वर्षे आम्ही पालावरच्या शाळेत शिकवले. आम्हाला आचार्य म्हणून ओळख मिळाली. समाजाची अनेक रखडलेली कामे संघटनेच्या माध्यमातून होताना आम्ही बघितली. अशा वेळी आमच्या समाजासाठी जिवाभावाने कार्य करणार्या संघटनेला आमची ही छोटीशी भेट समजा.” सारेच अवाक झाले. नम्रपणे दिलेली भेट आमच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारली. तोच मंगल निधी. या आचार्यांनी त्यांना मिळालेल्या भेट रकमेपैकी काही रक्कम मंगल निधी म्हणून संस्थेस दिली. मंगल निधी! किती सुंदर आणि मार्मिक असे नाव आहे हे. मंगल प्रसंगी, मंगल हातांनी, अत्यंत मंगल (प्रसन्न) चित्ताने, मंगल कार्यासाठी दिलेला निधी! मंगल निधीच्या स्वरूपात भटके समाजबांधवांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली, असेच म्हणावे लागते.
‘घेणार्याने घेत जावे, देणार्याने देत जावे। घेता घेता एक दिवस देणार्याचे हात घ्यावे।’ याचा प्रत्यय हा प्रसंग सांगून जातो. सततच मागून, उदरनिर्वाह करणारा समाज आता आपल्या घासातला घास द्यायला लागला, हे काही कमी नव्हे. याला परीसस्पर्श म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये.
कोरोना काळातील मदतकार्य
25 मार्च 2020पासून पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी कोरोना संक्रमणावर विजय मिळविण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाउन घोषित केला. अशा वेळी भीक मागून, कसरती करून, केस गोळा करून, झाडू विकून, बहुरुप्याचे सोंग घेऊन हातावर कमावून पोट भरणारा, जीवनक्रम पुढे रेटणारा हा समाजबांधव.. या समाजबांधवांचे काय? अशाच कठीण प्रसंगी धावून गेले ते संघटन आणि स्वयंसेवक. तुमच्या सुखदु:खात सहभागी होऊ असा आपल्या या उपेक्षित समाजबांधवांना ज्यांनी शब्द दिला, ते भटके-विमुक्त कल्याणकारी संस्थेचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवक बंधू आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून, शासकीय सूचनांचा योग्य मान राखून, स्वत:ची नीट काळजी घेऊन या भटक्या समाजबांधवांपर्यंत पोहोचले. कोरोना महामारीमुळे आलेले हे भयंकर संकट होते. 19 मार्चला मोदीजींनी राष्ट्राला संबोधित केले. जनता कर्फ्यूची हाक दिली. घरी थांबणे हीच देशसेवा. आमच्या या समाजबांधवांनी घरातच राहून आणि पाच वाजता टाळ्या वाजवून खरी देशसेवा केली.
समाजातील काही घटकांना आवाहन करून तांदूळ, तेल, मागवण्यात आले . भटके-विमुक्त कल्याणकारी संस्थेमार्फत विविध वस्त्यांवर गरजूंना धान्यवाटपाची व्यवस्था झाली. भंडारा येथील भटके-विमुक्त कल्याणकारी संस्थेतर्फे चालविल्या जाणार्या निवासी अभ्यासिका म्हणजे छात्रावास येथे साहित्य संकलन केंद्र तयार करण्यात आले. जीवनावश्यक साहित्याचा ओघ सुरू झाला. सव्वीस तारखेला साहित्यवाटप करण्यात एक सुसूत्रता आली.
भंडारा, गोंदिया जिल्ह्याचे खासदार, संघाचे स्वयंसेवक, भटके विमुक्त कल्याणकारी संस्था पदाधिकारी यांची मा. जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बैठक घेऊन त्यांना या भटके समाजबांधवांची माहिती देण्यात आली. वस्ती प्रमुख, परिवारांची संख्या, कार्डधारकांची संख्या, रेशन कार्ड नसणार्यांची संख्या अशी संपूर्ण माहिती भटके विमुक्त कल्याणकारी संस्थेतर्फे शासनास देण्यात आली. शासनाने लगेच त्याची दखल घेत यंत्रणा कामाला लावली.
पोटाची खळगी भरण्यासाठी दुसर्या गावात, तसेच परप्रांतात गेलेले हे समाजबांधव विविध ठिकाणी अडकून पडलेत, अशांची माहिती लागली. भटके-विमुक्त कल्याणकारी संस्थेतर्फे गावातील व्यक्तींशी संपर्क साधून मदत पोहोचती झाली. यंत्रणा कामाला लागली आणि परप्रांतात अडकलेल्या या सार्या समाजबांधवांना दुपारपर्यंत दिलासा मिळाला. सुरतच्या बांधवांनी सढळ हाताने त्यांना मदत केली. पंजाबमधील फगवाडा येथे शिबारी समाजाचे काही भटके बांधव अडकले, या समाजबांधवांना तिथेच स्थानिक पोलिसांना संपर्क करून त्यांच्याद्वारे मदत करण्यात आली. रायपूर येथे अडकलेल्या काही कुटुंबापर्यंत सहयोग दिला.
दुसर्या जिल्ह्यात बांधवांना स्थानिक लोकांच्या मदतीने कार्य सुरू असतानाच, आपल्या गावात, जिल्ह्यात, दुसर्या ठिकाणाहून तर काही भटके समाजबांधव आले नाही ना? याचीसुद्धा चौकशी सुरू झाली. आणि होय! पोटाची खळगी भरण्यासाठी वर्धा, बुटीबोरी, चंद्रपूर येथून आलेल्या भटके बांधवांनासुद्धा मदतीचा हात पुढे करण्यात आला. अन्नधान्याची मदत झाली. छत्तीसगडमधून व्यवसायानिमित्त आलेल्या अशा काही समाजबांधवांना भंडारा येथे मदत करण्यात आली. वेगवेगळ्या चार ठिकाणांवरून आलेल्या अशा कुटुंबाना मदत पोहोचती झाली. नुकतीच आपल्या या सेवाभावी संस्थेला मा. नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून अद्ययावत रुग्णवाहिका प्राप्त झाली आहे. आरोग्यसेवेसाठी तिचा यथोचित उपयोग होईल, यात शंका नाही.
या वस्त्यांवर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणालासुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी तर 80 ते 90 टक्के लसीकरण झाले आहे.
सेवा है यज्ञकुंड.. हे व्रत ज्यांचे ध्येय आहे, ते नमे कर्म फले स्पृहा.. या भावनेनेच कार्यरत असतात. अशा या आमच्या सेवाकर्मींना, कार्यकर्ता बंधूंना प्रणाम.
समाज आणि शासन यांतील दुवा म्हणून भटके विमुक्त कल्याणकारी संस्था सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कार्यरत आहे. ही एक तपस्या आहे. ही तपस्या आहे माणुसकीच्या धर्माची. आपणही या दैवी कार्यात सहभागी होऊ या.