केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील पाला गावातील कॅथलिक बिशप चर्चचे पादरी रेव्हरंड जोसेफ कल्लारंगट ह्यांनी एका कार्यक्रमात जाहीररित्या वक्तव्य केले की केरळमध्ये मुस्लीम समुदायाकडून गैर मुस्लीम समुदायांमध्ये ‘लव्ह जिहाद’ आणि त्यातल्या त्यात ‘नार्कोटिक जिहाद’ मोठ्या प्रमाणावर पसरवला जातोय.. याअगोदर हिंदुत्ववादी संघटना यावर आवाज उठवत होत्या, पण तेव्हा ही मंडळी गप्प होती. आता हे प्रकरण स्वत:वर शेकायला लागल्यावर मात्र लगेच ‘लव्ह जिहाद’, ‘नार्कोटिक जिहाद’ वगैरे ओरड सुरू केली. पण म्हणून ती ओरड गैरलागू निश्चितच नाही.

‘जिहाद’ हा शब्द तसा भारतीयांना किंवा एकूणच जगाला नवीन नाही. जिहाद शब्दाची व्याख्या, त्याची व्याप्ती आणि त्याचा कुराणमधील किंवा हदीसमधील उल्लेख किंवा संज्ञा ह्याचा विचार केला, तर मध्ययुगीन जिहाद आणि एकविसाव्या शतकातील जिहाद ह्याच्या कृतीत बर्यापैकी अंतर आले असले, तरीही जिहादामागील वृत्तीत तसूभरही फरक पडला नसेल. आधी तलवारीच्या बळावर तो व्हायचा, आताशा बंदुकीच्या धाकावर किंवा प्रेमाचे, अफूचे जाळे फेकून तो होतो. होय, तुम्ही बरोबर वाचलेत - अफूचे! तसे बघता इस्लाममध्ये किंवा शरियतमध्ये कुठल्याही स्वरूपाची नशा हराम (निषिद्ध) मानली जाते. पण स्वत:ला इस्लामचे कट्टर अनुयायी म्हणवणारे अफगाणिस्थानातील तालिबानी शासक अफूची जगातील सगळ्यात अधिक निर्यात करतात! आहे की नाही विरोधाभास? गेल्या काही दशकांत प्रचलित झालेला आणखी एक जिहाद म्हणजे ‘लव्ह जिहाद’! हिंदू संघटनांकडून हा शब्द समोर आला रे आला की पाल पडल्यागत समस्त पुरोगामी समाज किंचाळत सुटतो. पण गेल्या आठवड्यात केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील पाला (शबरीमाला यात्रेला आलेल्या भाविकांचा बेस कँप इथेच लागतो) गावातील कॅथलिक बिशप चर्चचे पादरी रेव्हरंड जोसेफ कल्लारंगट ह्यांनी एका कार्यक्रमात जाहीररित्या वक्तव्य केले की केरळमध्ये मुस्लीम समुदायाकडून गैर मुस्लीम समुदायांमध्ये ‘लव्ह जिहाद’ आणि त्यातल्या त्यात ‘नार्कोटिक जिहाद’ मोठ्या प्रमाणावर पसरवला जातोय, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर तरुण पिढी नासवली जातेय. बघा, हे कोण सांगतोय.. तर कोट्टायम जिल्ह्यातील एका कॅथलिक चर्चचा बिशप! हा तोच कोट्टायम जिल्हा आहे, ज्यात हिंदूंचे ख्रिस्ती धर्मांतरण मोठ्या प्रमाणावर होते! पाला, जो शबरीमालाचा बेस कँप आहे, तो ह्या धर्मांतरणाचा मोठा हॉटस्पॉट आहे. बिशप ह्यांनी केलेले आरोप म्हणजे ‘सौ चूहे खाकर बिल्ली चली हज को’ ह्यातलाच प्रकार म्हणायचा. प्रकरण स्वत:वर शेकायला लागल्यावर मात्र लगेच ‘लव्ह जिहाद’, ‘नार्कोटिक जिहाद’ वगैरे ओरड सुरू केली. पण म्हणून ती ओरड गैरलागू निश्चितच नाही.
स्थानिक मुस्लीम नेत्यांकडून साहजिकच बिशप ह्यांच्या वक्तव्यावर जोरदार हल्ला करण्यात आला. त्याचबरोबर बिशप ह्यांनी माफी मागितली नाही, तर ‘सेक्युलर स्टेट’ म्हणवले जाणारे केरळ राज्य धार्मिक उन्मादात अडकले तर ह्याची जबाबदारी आमची राहणार नाही, असा धमकीवजा गर्भित इशारा खणचङचे नेते पन्नाक्कड सादिक अली शिहाब थंगल ह्यांनी दिला आहे. केरळची डेमोग्राफी, किंवा एकूणच केरळची सध्याची समाजव्यवस्था कशी आहे ह्याची ज्यांना जाण आहे, त्यांना हा सगळा प्रकार समजायला सोपे जाईल. केरळमध्ये क्लिष्ट स्वरूपातील डेमोग्राफी आहे. धर्मांतरणाचे गेल्या हजार वर्षांत इतके असंख्य प्रयोग झालेयत की धर्मांतरण होऊनसुद्धा कुटुंबाचे/कुळ किंवा घराचे नाव तेच असते, पण काही पिढ्यांपूर्वीचे लोक हिंदू आणि नंतर ख्रिस्ती/मुस्लीम असे आहेत. आडनाव तेच, पण धर्म वेगळा, उपासना पद्धती थोड्याफार वेगळ्या; काही तर इतक्या सारख्या आहेत की बदल जाणवणारदेखील नाही. उदाहरण म्हणून सांगतो, देऊळ राक्षसी शक्तींकडून वाचण्यासाठी केरळच्या देवळात देऊळ परिसरात तंत्रसिद्धता केलेली असते. तंत्रसिद्धता म्हणजे काय, तर देऊळ परिसरात काही विशिष्ट दगडी आकृत्या, साचे असतात. कमी-अधिक प्रमाणात पेंटॅकोस्ट्ल किंवा प्रोटेस्टंट ख्रिस्ती चर्चमध्येदेखील हे दिसेल. धर्मध्वज स्तंभाची जागा तितक्याच उंचीच्या ‘होली क्रॉस’ने घेतलेली असते. त्यामुळे केरळातील धर्मांतरण लगेच लक्षात येत नाही. गेली कित्येक वर्षे मोठ्या प्रमाणावर हिंदूंचे ख्रिस्ती किंवा मुस्लिमांमध्ये धर्मांतरण झाले आणि हे खूप शांतपणे सुरू होते. संघपरिवारातील काही संघटनांनी, काही हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या आवाजानंतर निवडक राष्ट्रीय माध्यमांनी त्याची दखल, पुरोगाम्यांनी नेहमीप्रमाणे शहामृगी भूमिका घेतली. आता जेव्हा खुद्द चर्चचा बिशप ह्या मुद्द्यावर बोलतोय म्हटल्यावर मात्र आता पुरोगाम्यांनी बिशप हिंदुत्ववाद्यांच्या प्रभावाखाली येऊन कसे ‘इस्लामोफोबिक’ झालेत, अशी मल्लिनाथीदेखील केली आहे. इतक्यावरच न थांबता ख्रिस्ती समुदायातील पहिला खासदार निवडून आल्यावर कसा भाजपप्रणीत एनडीएच्या वळचळणीला गेला, ही पुष्टीदेखील जोडून झाली आहे.

आता बिशप ह्यांच्या वक्तव्यानंतर उद्भवलेल्या वादाची थोडी आर्थिक बाजू बघू या. तसे बघता मुस्लीम असो वा ख्रिश्चन, दोन्ही समुदाय हे ‘अब्राहमिक’ आहेत. एकेश्वरवाद हा दोहोंचा गाभा आहे. दोहोंच्या धर्मग्रंथातील काही मूळ हे एकाच स्रोताकडे जातात, तरीही ख्रिस्ती आणि मुस्लीम ह्यांच्यातील संघर्ष किमान केरळमध्ये तरी अर्थकारणाशी जोडला गेला आहे. केरळी समाजात गेल्या कित्येक पिढ्यांपासून भारताबाहेर मध्यपूर्वेत जाण्याची प्रथा आहे. हिंदू, मुस्लीम, ख्रिस्ती तिन्ही समाजांतील लोक मध्यपूर्वेत जाऊन गडगंज पैसा कमवून तो भारतात कुटुंबासाठी आणि त्यांच्या त्यांच्या समाजासाठी पाठवतात. मध्यपूर्वेत कुठल्याच प्रकारच्या सामाजिक एकत्रीकरणाला फारशी परवानगी नसली, तरीही तिन्ही धर्मांचे थोड्या-अधिक प्रमाणात कम्युनिटी सर्कल्स आहेत. मध्यपूर्वेत तशी रडारवर असणारी, पण इतर जगभरात मुक्तपणे वावरणारी ‘मुस्लीम ब्रदरहूड’देखील मोठ्या प्रमाणात कार्यान्वित असते. तिथून केरळमधील मदरशांना मोठ्या प्रमाणात डोनेशन्स जातात. मशिदीत सलाहनंतर केरळातील स्थानिक प्रश्नांवर मशिदीबाहेर कुणाच्या घरी चर्चासत्रांचे आयोजन असते. त्यामुळे एक समाज म्हणून आपल्या धर्माकरिता जे काही करता येईल, ते सगळे करण्याचे धोरण ह्यामागे आहे.
गेल्या काही वर्षांत केरळमध्ये आयसिसचे अतिरेकी सापडणे, मदरशांमधून राष्ट्रविघातक साहित्य मिळणे, आयसिससाठी महिला पथकाची भरती करायला ‘लव्ह जिहाद’सारख्या संकल्पना राबवणे किंवा आणखी इतर प्रकार मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा असोत वा राज्यस्तरीय तपास यंत्रणा, देशभरात घडलेल्या काही राष्ट्रविरोधी घटनांचे धागेदोरे केरळमध्ये सापडले आहेत. एकूण विचार केला, तर हे प्रकरण फक्त ‘लव्ह जिहाद’ किंवा ‘नार्कोटिक्स जिहाद’ यापुरते मर्यादित नाही. त्याची व्याप्ती बरीच मोठी आहे आणि त्याचे गांभीर्यदेखील. पालामधील बिशप ह्यांनी आवाज उठवला आहे, त्याकडे फक्त वादाचा मुद्दा म्हणून बघू नये. केरळमधील कम्युनिस्ट सरकारला हिंदुत्ववाद्यांचे वावडे असेल, तर किमान एक ख्रिस्ती धर्मगुरू म्हणतोय म्हणून तरी किमान ह्याकडे लक्ष द्यावे! शेवटी काय, कुणाच्या काठीने का होईना, ‘जिहाद’ नावाचा ‘साप’ ठेचला जात असेल, तर ते कुणाला नकोय?