हा लढा एक मंदिर बांधण्याचा नाही, मुसलमानांशी संघर्ष करण्याचा नाही. हा लढा देशाला आपली सनातन ओळख करून देण्याचा लढा होता. सेक्युलॅरिझम ते राष्ट्रवाद असा हा प्रवास आहे. एका अर्थाने हा वैचारिक संघर्ष आहे. या संघर्षाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण माधव भांडारी यांनी केले आहे, ते पुन्हा पुन्हा वाचावे असे झाले आहे.
‘अयोध्या’ हे माधव भांडारी यांचे 414 पानांचे पुस्तक परम मित्र पब्लिकेशन्सने नुकतेच प्रकशित केले आहे. माधव भांडारी हे भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत. भारतात एक काळ असा होता की, अभ्यासू, विद्वान तरुण राजकारण करीत असत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हळूहळू ती पिढी संपली आणि त्यांची जागा ज्यांनी घेतली, ते सत्तेचे राजकारण करू लागले. आज अभ्यासू राजकीय नेता दुर्मीळ होत चालला आहे. या दुर्मीळातील एक रत्न म्हणजे माधव भांडारी आहेत.
त्यांचे 414 पानांचे पुस्तक म्हणजे अयोध्येवरील ज्ञानकोशच झालेला आहे. संशोधनात्मक जो ग्रंथ लिहिला जातो, त्या ग्रंथात पहिल्या दर्जाचे सर्व संदर्भ द्यावे लागतात. हे संदर्भ द्यायचे म्हणजे हे सगळे संदर्भ प्रथम शोधावे लागतात, नंतर ते वाचावे लागतात. वाचून त्यातील सार काढावे लागते. ज्या विषयावर ग्रंथ लिहायचा आहे, त्या विषयाला पूरक असे अस्सल संदर्भ द्यावे लागतात. या 414 पानांच्या ग्रंथात असे 257 संदर्भ आपल्याला वाचायला मिळतात. अशा प्रकारचे काम करणे आणि तेही एका राजकीय नेत्याने हे महाकठीण काम करणे हे अवघड आहे. यासाठी माधव भांडारी यांचे जेवढे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे.
अयोध्या हा विषय नाजूक आहे. ‘जी युद्धात जिंकता येत नाही, ती अयोध्या’ असे अयोध्येचे वर्णन माधव भांडारी यांनी दिलेले आहे आणि त्यालाही भरपूर संदर्भ त्यांनी दिले आहेत. अयोध्येत श्रीरामाचा जन्म झाला, अयोध्येतूनच राम वनवासात गेला. वनवासातून परत आल्यानंतर अयोध्येतच रामाचा राज्याभिषेक झाला. रामासारखा राजा झाला नाही आणि रामासारखे राज्य झाले नाही, म्हणून कोट्यवधी हिंदूंच्या मनात आणि हृदयात रामाला जे स्थान आहे, त्याची अन्य कशाशीही तुलना करता येत नाही. अयोध्या ही पवित्र नगरी आहे. शेकडो मंदिरांची नगरी आहे. अशी पवित्र अयोध्या ‘विवादास्पद अयोध्या’ आपल्या पुरोगामी, सेक्युलर आणि देशघातक डाव्यांनी केली.
अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर शेकडो सालांपासून होते. 1528 साली आक्रमक बाबराने रामाचे मंदिर पाडले. हा मंदिर पाडण्याचा इतिहास अतिशय क्लेशकारक आहे. मीर बांकी या सरदाराने हे मंदिर पाडले, असे आपण ऐकतो. हा मीर बांकी कोण? त्या नावाचा कोणी सरदार होता का? समकालीन ऐतिहासिक पुरावे काय सांगतात? अकबराला महान मानले जाते, हा ‘महान’ अकबर कसा पक्का राजकारणी होता आणि त्यानेदेखील अयोध्येत राममंदिर बांधू दिले नाही. जहांगीर त्याच्याच वळणावर गेला. या सर्वांचे दाखले त्या त्या प्रकरणात अस्सल पुराव्यानिशी माधव भांडारी यांनी सादर केले आहेत.
सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....https://www.facebook.
अयोध्येला वैदिक इतिहास आहे, पौराणिक इतिहास आहे, आध्यात्मिक इतिहास, जैन इतिहास आहे आणि बौद्ध इतिहासदेखील आहे. फेन सूक्त, दारूक्खंध सूक्त, मज्झिमनिकाय यात अयोध्येचे आलेले उल्लेख आणि बौद्ध व जैन ग्रंथांमध्ये ‘अयोध्या-साकेत’ याचे भरपूर उल्लेख आलेले आहेत. जे चिनी प्रवासी भारतात आले (इ.स. 337 ते 442 आणि इ.स. 602 ते 664), त्यांनी या काळात अयोध्येचे केलेले वर्णन याचे सर्व दाखले आपण ग्रंथात वाचू शकतो. आपल्या पुरोगामी महापंडितांनी ‘अयोध्या प्राचीन नगरी नाही, तिचा रामाशी संबंध नाही’ वगैरे वगैरे भरपूर शोध रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या काळात लावले.
या सर्व तथाकथित ‘इतिहासतज्ज्ञ, महापंडित’ यांचे पितळ न्यायालयीन खटल्यात कसे उघड पडले, याचे अनेक तपशील माधव भांडारी यांनी दिलेले आहेत. पृष्ठ 318वर ‘न्यायालयात झालेला पंचनामा’ या शीर्षकाखाली अलाहाबाद हायकोर्टाच्या तीन न्यायपीठाने दिलेल्या निकालपत्रात न्यायमूर्ती सुधीर अग्रवाल यांचे निकालपत्र सर्वात मोठे होते. या निकालपत्रातील चार परिच्छेद आपल्याला वाचायला मिळतील. त्याचा सारांश असा की, ‘बाबरी मशिदीच्या संदर्भात ज्यांनी साक्षी दिल्या, त्या विश्वासार्ह नाहीत, गोंधळात टाकणार्या आहेत, त्याला कोणताही आधार नाही. अशा तथाकथित पंडितांच्या लेखन आणि वक्तव्यांमुळे जे नुकसान झाले आहे, त्याची मोजदाद करणे कठीण आहे.’ डॉ. सुरेशचंद्र मिश्रा, डॉ. सुनील श्रीवास्तव, प्रा. सुविरा जैसवाल हे सर्व स्वत:ला इतिहासतज्ज्ञ म्हणतात, त्यांच्या या साक्षी आहेत. साक्षीतच अनेक जणांनी हे म्हटले की, मी अयोध्येला कधी गेलो नाही, बाबरकाळातील मुस्लीम शासनाची मला माहिती नाही, बाबरी मशीद कधी अस्तित्वात आली हे मला माहीत नाही (आणि तरीही मी इतिहासतज्ज्ञ आहे). माधव भांडारी यांनी भंपक लोकांविषयी अतिशय सौम्य भाषा वापरली आहे. ग्रंथाचे गांभीर्य राखण्यासाठी ती आवश्यक आहे. हे सर्व वाचल्यानंतर आपल्या मनात जी भाषा निर्माण होते, ती येथे लिहिणे योग्य नाही.
लेखक माधव भांडारी यांनी विदेशी प्रवासी आणि त्यांनी केलेल्या नोंदी यांचीही माहिती ग्रंथात दिलेली आहे. अयोध्येचा विवाद न्यायालयात चालू असताना, पुरावा म्हणून अयोध्येतील तीन शिलालेखांचा उपयोग केला गेला. लेखकाच्या प्रकरणाचे शीर्षकच ‘अयोध्या ः शिलालेखांचे रहस्य’ असे आहे. 1870पूर्वी कोणत्याही लेखनात बाबरी मशीद हा शब्दप्रयोगच नाही. विलियम फिंच (इ.स. 1610), जोनेस ड लईट (इ.स. 1631), थॉमस हर्बर्ट (इ.स. 1634), सी. मेंटले (इ.स. 1801) या सर्वांनी अयोध्येविषयी लिहून ठेवलेले आहे. रामकोट, राम किल्ला, रामजन्मस्थान असे त्यांच्या लेखनात उल्लेख आहेत, मशिदीचा उल्लेख नाही. रहस्यमय शिलालेख कसे प्रकट झाले आणि कसे अदृश्य झाले, हे या प्रकरणातच वाचायला पाहिजे.
ब्रिटिश राजवटीत अयोध्या ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेली. तेव्हा त्या संस्थानाचे नाव होते अवध. लॉर्ड डलहौसीने केलेल्या गैरकारभाराविरुद्ध राणी व्हिक्टोरियाला एक निवेदन सादर करण्यात आले. तेव्हाच्या अवधच्या नवाबाने निवेदन देताना रामायण, राजाराम, महान अयोध्या ही पुरातन काळापासून कशी आहे हे सांगितले. सामान्यतः ही गोष्ट आपल्याला माहीत नसते. इंग्रजांनी हिंदूंना रामजन्मस्थानावर जाण्यास मज्जाव केला, गर्भगृह कुंपण घालून बंद केले. जे औरंगजेबाला जमले नाही, ते इंग्रजांनी केले. विष्णुभट गोडसे यांनी ‘माझा प्रवास’ या त्यांच्या पुस्तकात चबुतर्यावर केल्या जाणार्या पूजेचे तपशीलवार वर्णन केलेले आहे. 1885मध्ये रामजन्मभूमी मुक्तीचा विषय न्यायालयात गेला. 1986 साली रामजन्मभूमी मुक्तिलढ्याचा दबाव निर्माण होऊन गर्भगृहाचे टाळे उघडले गेले. या शंभर वर्षांत काय काय घडले, याची तपशीलवार माहिती पुस्तकात दिली आहे.
या लढ्याला टोकदार रूप येण्याची घटना डिसेंबर 1949ला घडली. ती घटना अशी - अब्दुल बरकत हा पोलीस शिपाई न्यायाधीशांसमोर आपला जवाब देताना म्हणतो, “22-23 डिसेंबरच्या रात्री मी बंदोबस्ताला होतो. मध्यरात्री अचानक मला इमारतीच्या मध्यभागात सोनेरी रंगाचा खूप प्रखर उजेड दिसला. त्या उजेडात एका लहान, चार-पाच वर्षांच्या लहान बाळाचा चेहरा दिसत होता. असा दिव्य चेहरा मी पूर्वी कधीच बघितला नव्हता. ते दृश्य बघून माझी शुद्ध हरपली. मी जेव्हा शुद्धीवर आलो, तेव्हा मुख्य दरवाजाचे कुलूप तुटून पडलेले होते आणि प्रचंड संख्येने जमलेले हिंदू ती मूर्ती आसनावर ठेवून आरती करत होते.” रामलल्ला प्रकट झाल्याचा हा क्षण आहे. आपले पुरोगामी पंडित सांगतात की, कुणीतरी मूर्ती आणून तिथे टाकल्या आणि पहार्यावरचा पाहरेकरी सांगतो की त्या प्रकट झाल्या.
नंतर मग मूर्ती हटविण्याचा विषय सुरू झाला. या घटना नेहरूंच्या काळात घडल्या. नेहरूंचे हिंदू-प्रेम काय सांगावे! त्यांनी रामलल्ला कुलपात बंद करून टाकले. हे कुलपाचे टाळे प्रखर आंदोलनानंतर 1986 साली काढण्यात आले, राज्य होते नेहरूंच्या नातवाचे - म्हणजे राजीव गांधी यांचे. रामजन्मभूमी मुक्तिलढ्याची तपशीलवार माहिती ग्रंथाच्या ‘न्यायालयीन लढा’ आणि ‘लढ्याचा अखेरचा टप्पा’ या दोन प्रकरणांत दिली गेलेली आहे. बाबरी मशीद अॅक्शन कमिटी स्थापन झाली. सय्यद शहाउद्दीन यांनी तिचे नेतृत्व केले. तो काळ ज्यांना आठवतो त्यांच्या लक्षात येईल की सय्यद शहाउद्दीन यांनी अनेक मुक्ताफळे उधळली आहेत. लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा, पहिली कारसेवा, दुसरी कारसेवा आणि 6 डिसेंबरची घटना असा हा वेगवान घटनाक्रम आहे.
रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाचे राजकीय पैलू व परिणाम हे माझ्या मते या ग्रंथाचे अतिशय महत्त्वाचे प्रकरण आहे. 349 ते 385 एवढ्या पानांत या घटनेवर माधव भांडारी यांनी केलेले भाष्य अतिशय सुरेख आहे. हा लढा एक मंदिर बांधण्याचा नाही, मुसलमानांशी संघर्ष करण्याचा नाही. हा लढा देशाला आपली सनातन ओळख करून देण्याचा लढा होता. सेक्युलॅरिझम ते राष्ट्रवाद असा हा प्रवास आहे. एका अर्थाने हा वैचारिक संघर्ष आहे. हा वैचारिक संघर्ष म्हटले तर हिंदू विरोधी हिंदू असा आहे. सेक्युलॅरिझमची भांग प्यायलेले सर्व हिंदूच आहेत आणि पुरोगामी टोपी घातलेलेही हिंदूच आहेत. त्यांच्या डोक्यात भारत, भारताची संस्कृती, भारताची विचारपरंपरा, भारताची मूल्यपरंपरा बसत नाही. या आंदोलनाने राजकीय हिंदू समाज कसा घडला आणि तो कोणत्या कोणत्या टप्प्यावर घडत गेला, सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांचे त्यातील योगदान कोणते या सर्वांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण माधव भांडारी यांनी केले आहे, ते पुन्हा पुन्हा वाचावे असे झाले आहे.
सर्वार्थाने सुंदर, केवळ विषयाच्या दृष्टीने नव्हे तर ज्या विषयामुळे आपली आपल्याला ओळख घडत गेली, आपण मोहनिद्रेतून जागे होत गेलो ते कसे, हे विशद करणारा हा ग्रंथ झालेला आहे. त्यात अभिनिवेश नाही, पण वस्तुस्थितीची मर्यादा सोडलेली नाही. प्रत्येक विधानाला समर्पक पुरावे दिलेले आहेत. प्रत्येकाने हा ग्रंथ घरी ठेवावा - पूजेसाठी नाही, तर वाचनासाठी - एवढे त्याचे मोल आहे.