दिसतं तसं नसतं

विवेक मराठी    29-Aug-2020
Total Views |

 Pakistan_1  H
 
भारताची दुखरी नस असलेल्या शेजारी राष्ट्र पाकिस्तानविषयी भारतातील हाताच्या बोटावर मोजण्याइतके अराष्ट्रवादी लोक सोडले, तर पाकिस्तानविषयी भारतीयांमध्ये प्रचंड असंतोष आहे. जगातील सर्वच देश या-ना-त्या कारणाने पाकिस्तानचा द्वेष करताना दिसतात. मात्र पाकिस्तान सर्वार्थाने एक दुर्बल देश आहे असे वरकरणी वाटत असले, तरी त्याची शक्ती काय आहे हे जाणून घेतले पाहिजे.


काही स्वनामधन्य, विचारवंत आणि पत्रकार, आदर्शवादी, गांधीवादी सोडले, तर पाकिस्तानविषयी चांगले लिहिणारा आणि बोलणारा माणूस भारतात सापडणे कठीण आहे. पाकिस्तानला शिव्या घालणारे गल्लोगल्ली सापडतील. स्वातंत्र्यदिन आला की अखंड भारताचे स्मरण करण्यात येते. अखंड भारताचे विषय अनेक आहेत. त्यावर कमी बोलले जाते आणि पाकिस्तानला शिव्या देण्यात मात्र वक्त्यांना आनंद वाटत असतो.

असे होण्याचे कारण असे की, पाकिस्तान भारताविरुद्ध सतत कुरापती काढत असतो. दहशतवादी हल्ल्याचे केंद्र पाकिस्तानी असते. दहशतवाद्यांची घुसखोरी पाकिस्तानातून होते. मुंबई बॉम्बहल्ल्याचा मास्टर माइंड दाऊद इब्राहिम याला पाकिस्तानने लपवून ठेवले आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख हाफिज सईद पाकिस्तानीच आहे. काश्मीर प्रश्नावरून सगळ्या मुस्लीम देशांना भारताविरुद्ध उभे करण्याचा प्रयत्न पाकिस्तानमार्फत सतत चालूच असतो. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (OIC) ही मुस्लीम देशांची संघटना आहे. तिचे नेतृत्व सौदी अरेबियाकडे आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद कुरैशी यांनी सौदी अरेबियाला मुस्लीम परराष्ट्र मंत्र्यांची बैठक बोलावून काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला पाठिंबा देण्याचा आग्रह ठरला. सौदी अरेबियाने ते मानले नाही, म्हणून पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याने मुस्लीम देशांची वेगळी संघटना उभी करण्याची धमकी दिली. सौदी अरेबियाने चाबकाचा एक फटकारा मारून पाकिस्तानची झोप उडविली. 'अब्जावधी डॉलर्सचे कर्ज तत्काळ फेडा' असा आदेश दिला.

 Pakistan_1  H  

जगातील स्थितीचा विचार केला, तर पाकिस्तान हा दहशतवादी देश ठरतो. जगात घडणाऱ्या मुस्लीम दहशतवाद्यांच्या हल्ल्यात कुठे ना कुठे पाकिस्तानचा हात असतो. पाकिस्तानची स्थिती एखाद्या भाडोत्री सैनिकासारखी असते. या भाडोत्री सैनिकांना 'मर्सीनरीज' असे म्हणतात. जो त्यांना भरपूर पैसा देईल त्याच्यासाठी लढण्याचे त्यांचे काम असते. सगळे देश पाकिस्तानचा या कामासाठी उपयोग करतात.

पाकिस्तानचे भौगोलिक स्थान अत्यंत मोक्याचे आहे. एका बाजूला रशिया आहे, एका बाजूला चीन आहे, एका बाजूला खनिज तेलसंपन्न इराण आणि अरबस्तान आहे आणि एका बाजूला भारत आहे. अरबस्तानाच्या तेलावर जगाची अर्थव्यवस्था चालते. तिथल्या सत्तासंघर्षात पाकिस्तानी भूमीचा वापर अतिशय महत्त्वाचा ठरतो. अफगाणिस्तानवर जेव्हा रशियाने आक्रमण केले, तेव्हा अफगाण युद्धाला सुरुवात झाली. सौदी अरेबिया, अमेरिका यांनी हे युद्ध पाकिस्तानच्या भूमीवरून लढले. या युद्धात अमेरिकेने एकही सैनिक पाठविला नाही. लढण्यासाठी जिहादी तालिबानी उभे केले. मदरशांतून त्यांचे प्रशिक्षण झाले. पाकिस्तानात मदरसे उभे करण्यासाठी सौदी अरेबियाने पाण्यासारखा पैसा खर्च केला. पाकिस्तान हा जिहादी बनविण्याचा कारखाना झाला.

नंतर पाकिस्तानी लष्कराने लष्कराचे छुपे हस्तक म्हणून त्यांचा वापर केला. आजही अफगाणिस्तानात जे वारंवार दहशतवादी हल्ले होतात, बॉम्बस्फोट होतात, ते सर्व या पाकिस्तानी जिहादींमार्फत होत असतात. अफगाणिस्तानातून रशिया गेला आणि नंतर ओसामा बिन लादेन आणि त्याच्या अल कायद्याला नष्ट करण्यासाठी अमेरिकेला अफगाणिस्तानात उतरावे लागले. अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले. या युद्धात पाकिस्तानला सहभागी करून घेतले. पाकिस्तानने आपल्या स्वभावाप्रमाणे पैशासाठी आणि शस्त्रांसाठी या युद्धात सहभाग घेतला. यासाठी पाकिस्तानचे वर्णन 'मर्सिनरीज स्टेट' या शब्दात करण्यात येते. दुसऱ्यांचे युद्ध लढणारा देश ही पाकिस्तानची प्रतिमा झालेली आहे.

पाकिस्तानात कधी लष्करशाही असते, तर कधी लोकशाही असते, कधी पंतप्रधान असतो, तर कधी राष्ट्राध्यक्ष असतो. राजवट कोणती का असेना, दुसऱ्यासाठी युद्ध लढणारा देश ही पाकिस्तानची भूमिका कधी बदलत नाही. परदेशातून पाण्यासारखा पैसे येतो. अफाट शस्त्रे येतात. फुकटचा पैसा आला की भ्रष्टाचार होणे क्रमप्राप्त असते. पाकिस्तानातील प्रत्येक सत्ताधारी हा कोट्यवधी रुपयांची संपत्ती धारण करणारा असतो. राजवट लोकशाही असली, तरी सत्ताकेंद्र लष्करच असते. लष्कराचे पूर्णपणे राजकीयीकरण झालेले आहे. लोकशाहीने निवडून दिलेल्या उमेदवाराला लष्कराच्या आज्ञेत राहून काम करावे लागते. ज्या वेळी तो ऐकत नाही, तेव्हा त्याचा भुट्टो होतो. इम्रान खान हा पाकिस्तानचा चेहरा आहे, पण त्याच्या सर्व दोऱ्या लष्कराच्या हातात आहेत.


 Pakistan_1  H

पाकिस्तानचे लष्कर संघटित आहे. लष्करी साहित्याने सामर्थ्यसंपन्न आहे. भूदल, हवाई दल, तोफदल अशा विविध अंगांनी ते अतिशय मजबूत आहे. विविध प्रकारची क्षेपणास्त्रे त्यांच्याकडे आहेत आणि अणुबॉम्बदेखील आहेत. इस्लामी देशांत केवळ पाकिस्तान हाच अणुबॉम्ब बाळगणारा देश आहे. त्यामुळे इस्लामी देशांत त्याचा दबदबा आहे. पाकिस्तानचे लष्कर सौदी अरेबियासारख्या देशांच्या मदतीलादेखील जात असते. लष्करी सामर्थ्याच्या संदर्भात पाकिस्तानला कमी लेखण्याचे काही कारण नाही.

लष्करी तंत्रज्ञान विकसिक करण्यात पाकिस्तान अन्य मुस्लीम देशांपेक्षा आघाडीवर आहे. अणुबॉम्ब बनविण्याचे तंत्रज्ञान त्यांनी चोरून आणले असले, तरी तो बनविण्याचे तंत्र त्यानेच विकसित केले आहे. म्हणून तंत्रज्ञानाच्या बाबतीत पाकिस्तान अतिशय दुबळा आहे, असेही समजण्याचे कारण नाही. पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत लष्करीदृष्टया दुर्बल होऊ द्यायचे नाही, असे अमेरिकेचे धोरण आहे, तसेच चीनचेदेखील आहे. चीनने तर अब्जावधी डॉलर्स खर्च करून पाकिस्तानमध्ये ग्वादार बंदर ते चीन असा प्रशस्त हायवे बांधण्याचे काम सुरू केले आहे. आखाती देशांच्या दरवाजावर चीन येऊन बसणार आहे. पाकिस्तानला चीनचा पैसा मिळत असल्यामुळे या गोष्टीला पाकिस्तानची मान्यता आहे.

आणखी एक क्षेत्र असे आहे, ज्या क्षेत्रात पाकिस्तान आघाडीवर असतो. पाकिस्तानची अंतर्गत परिस्थिती फारशी चांगली नसते. दहशतवादी पाकिस्तानातही धुमाकूळ घालतात. मशिदीत बॉम्बस्फोट करतात. सिंधी, पंजाबी, बलुची, पठाण यांच्यात आपापसात प्रचंड संघर्ष आहेत, असे असूनही हॉकी आणि क्रिकेट या दोन खेळांत पाकिस्तानचे संघ जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असतात. खेळाच्या क्षेत्रात पाकिस्तानला कमी लेखता येत नाही. संगीताच्या क्षेत्रातदेखील नुसरत फते अली, अबिदा परवीन, रईस खान (पूर्वी ते भारतात होते, नंतर पाकिस्तानात गेले), नजाकत अली आणि शराफत अली अशी फार मोठी नावे आहेत. संगीताच्या क्षेत्रात पाकिस्तानने आपले मोठेपण सिद्ध केलेले आहे.


 Pakistan_1  H

'नक्क्षेसे निकालो नाम पापी पाकिस्तान का' ही घोषणा अनेक जण घेतात. अनेकांना असे वाटते की, आज ना उद्या पाकिस्तान संपेल. काही जणांची अशी इच्छा असते की, भारताने पाकिस्तानचे तुकडे करावेत. या सर्व कल्पना चांगल्या आहेत. सर्व चांगल्या कल्पना व्यवहार्य असतात असे नाही. सर्व चांगल्या कल्पना देशाच्या परराष्ट्रनीतीत आणता येतात असेदेखील नाही. पाकिस्तान जिवंत राहणार आहे, तो दीर्घकाळ राहणार आहे, तो आपला शेजारी देश म्हणून राहणार आहे. हेच एकमेव सत्य आहे. ते स्वीकारून आपल्याला जगावे लागेल आणि सुरक्षित जगण्यासाठी मोदीसारखे खंबीर सरकारच हवे. तेथे अन्य कोणाचे काम नाही. नेहरू-गांधी परिवारातील जर कोणाला आपण सत्ताधीश केले, तर सध्या देशात थांबलेले बॉम्बस्फोट पुन्हा होऊ लागतील, याचा आपण गांभीर्याने सतत विचार करीत राहिले पाहिजे.

नियतीने शेवटी पाकिस्तान का निर्माण केले? त्याचे एका वाक्यात उत्तर असे आहे की, 'हिंदूंना समर्थपणे जगण्याची संधी मिळावी म्हणून.' काही इतिहासकार म्हणतात की, इस्लामशी सुरू असलेल्या या संघर्षात हिंदूंना अस्तित्वरक्षणाची ही शेवटची संधी आहे. सर्व हिंदूंना याची जाणीव आहे. म्हणून पाकिस्तानरूपी बागुलबुवा आणखी काही काळ राहिला पाहिजे. त्याच्या अस्तित्वाशिवाय आपल्यापुढे उभ्या ठाकलेल्या धोक्याची कल्पना हिंदू समाजाला येत नाही. आपल्याच हिंदू समाजातील हे बांधव छळ, कपट आणि तलवारीच्या धाकेने मुसलमान झालेले आहेत, त्यांना त्याच्या स्वधर्माची ओळख करून देणे हे हिंदू समाजापुढील मोठे आव्हान आहे. अनेक पंथ आणि देवदेवतांना सामावून घेणारी आपली परंपरा आहे, पण अजूनही आपल्याला अल्ला आणि प्रेषित महम्मदांना सामावून घेण्यात फार मोठे यश आलेले आहे, असे नाही. संत कबीर ते संत साईबाबा इथपर्यंत अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत. ते वाया जाता कामा नयेत, त्याचे कालानुरूप पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. पाकिस्तानविषयी भोंगळ सहानुभूती नको आणि ओंगळ विद्वेषही नको. जे आहे ते तसे जाणून घेऊन समाजाला आपला मार्ग शोधावा लागेल. हाच मार्ग अनेक प्रश्न संपविणारा ठरेल.