स्वत:ला लढवय्या म्हणवून घेत स्वत:चीच पाठ थोपटून घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मैदानात उतरून लढाई केल्याची एकही घटना आमच्या स्मरणात नाही. पक्षनेतृत्व वंशपरंपरेने आले आहे, त्यात त्यांचे कर्तृत्व ते काय? मुख्यमंत्रिपदही राजकीय साठमारीकरून मिळवले. सभागृहात सदस्य म्हणून जाण्यासाठी मागचे दार निवडले. अशा प्रकारे मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या उद्धव ठाकरे यांचा लढवय्या बाणा कोठे झाकून ठेवला होता? कोरोना काळात स्वत:च्या घराबाहेर न पडणारे आणि विरोधी पक्षनेते कोरोना काळात सर्वसामान्य माणसाच्या वेदना समजून घेतात म्हणून त्यांच्यावर निर्बंध लादणारे मुख्यमंत्री लढवय्या आहेत असे म्हणायचे का?
काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांनी नुकतीच बिगर भाजपा मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित केली होती. आपल्या पक्षाचे संपू पाहणारे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांना अशा वेगवेगळ्या टेकूंचा आधार घ्यावा लागत आहे. सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेसुद्धा उपस्थित होते. या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "मी लढवय्या पित्याचा लढवय्या मुलगा आहे." केंद्रात सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध अशा प्रकारे बाह्या सरसावून बोलले की स्वत:बरोबरच सोबत असणाऱ्यांनाही थोडे अवसान येते, हे उद्धव ठाकरे फार लवकर शिकले आहेत. आपण योद्धे आहोत हे तारस्वरात सांगताना आपल्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या महाराष्ट्र सरकारची न्यायालयात कशा प्रकारे लक्तरे टांगली जात आहेत, याकडे मात्र ते कानाडोळा करत आहेत.
महाराष्ट्र राज्य सरकारची काही प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. या प्रकरणांबाबत महाराष्ट्र सरकार खूप दुर्लक्ष करत आहे का, असे चित्र समोर येत आहे. पालघर जिल्ह्यातील साधूंच्या हत्येला पाच महिने होत आले, तरी सरकारच्या वतीने दोषारोपपत्र दाखल केले नाही. या विषयावर न्यायालयाने सरकारला धारेवर धरले आहे. तसेच मराठा आरक्षण हा विषयही सर्वोच्च न्यायालयात आहे. या प्रकरणाबाबत राज्य सरकार आवश्यक ती कागदपत्रे देत नाही, असे वकील मुकुल रोहतगी यांनी सांगितले. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस सरकारचा या विषयातील समन्वय खूप चांगला होता, अशी टिप्पणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणाबाबत न्यायालय जर राज्य सरकारवर निराशापूर्ण टिप्पणी करत असेल, तर लढवय्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या टिप्पणीची जबाबदारी घेण्याचे धैर्य आहे का? मुळात राज्यशटक चालवणे आणि बोलघेवडेपणा करणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. उद्धव ठाकरे यांना तो फरक लवकर कळावा.
केवळ सर्वोच्च न्यायालयातच नाही, तर उच्च न्यायालयातही राज्य सरकारवर कोरडे ओढले जात आहेत. कोरोना आपत्तीत खाजगी रुग्णालये जी लूट करत आहेत, त्यावर सरकारने काय भूमिका घेतली? दारूची दुकाने सुरू करण्यास परवानगी, मात्र मंदिर बंद ठेवून कोरोना आटोक्यात येईल का? सरकारमध्ये मंत्रिपद भूषवणाऱ्या व्यक्तीने केलेल्या मारहाणीबाबत सरकारने आपले म्हणणे मांडलेले नाही. त्याचप्रमाणे कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर, पोलीस, स्वच्छता कर्मचारी अशा मंडळींच्या विविध प्रश्नांकडे सरकारने केलेले दुर्लक्ष या विषयावरही उच्च न्यायालयात सरकारची नाचक्की झाली आहे. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांत राज्य सरकारवर अशी टीका होत असताना मुख्यमंत्री आपण लढवय्या आहोत हे सांगत आहेत.
स्वत:ला लढवय्या म्हणवून घेत स्वत:चीच पाठ थोपटून घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मैदानात उतरून लढाई केल्याची एकही घटना आमच्या स्मरणात नाही. पक्षनेतृत्व वंशपरंपरेने आले आहे, त्यात त्यांचे कर्तृत्व ते काय? मुख्यमंत्रिपदही राजकीय साठमारीकरून मिळवले. सभागृहात सदस्य म्हणून जाण्यासाठी मागचे दार निवडले. अशा प्रकारे मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या उद्धव ठाकरे यांचा लढवय्या बाणा कोठे झाकून ठेवला होता? कोरोना काळात स्वत:च्या घराबाहेर न पडणारे आणि विरोधी पक्षनेते कोरोना काळात सर्वसामान्य माणसाच्या वेदना समजून घेतात म्हणून त्यांच्यावर निर्बंध लादणारे मुख्यमंत्री लढवय्या आहेत असे म्हणायचे का? आजही राज्यात कोरोनाचा कहर थांबलेला नाही. सर्वसामान्य माणसाला जगण्यासाठी बळ मिळेल असे कोणतेही काम सरकारकडून होत नाही. केवळ निर्बंध लादून किंवा कायम ठेवून या आपत्तीतून बाहेर पडता येणार नाही. त्यासाठी मैदानात उतरून वास्तव समजून घेतले पाहिजे आणि संकटाशी सामना केला पाहिजे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अशी कोणतीही कृती होताना दिसत नाही. सत्तेवर आल्यापासून केवळ मागील सरकारने सुरू केलेल्या योजनांना स्थगिती देण्याचा एककलमी कार्यक्रम या लढवय्या मुख्यमंत्री महोदयांनी केला आहे. कोरोना आपत्तीतून जी सर्वस्तरीय अधोगती सुरू झाली आहे, ती रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काय उपाययोजना केल्या, हे समजून घेण्यासाठी उभा महाराष्ट्र उत्सुक आहे. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर केवळ स्थगिती आदेश देण्यात आनंद मानणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला लढवय्या बाणा केवळ भाषणबाजी करून न दाखवता मैदानात उतरून दाखवायला हवा. मतदारांची तीच अपेक्षा आहे आणि पुरी झाली नाही, तर मतदार म्हणतील, "बालिश बहु...."