अलिगढचा फतवा आणि पुरोगाम्यांची स्मशानशांतता

विवेक मराठी    21-Aug-2020
Total Views |
प्रश्न केवळ धमकीचा किंवा फतव्याचा नाही. तुम्ही संविधान मानता की कुराण? हा प्रश्न आहे. सोईनुसार संविधान आणि सोईनुसार कुराण ही दोन दगडांवर पाय ठेवण्याची वृत्ती समाजाला कळू लागली आहे आणि त्यामुळे पुरोगामित्वाचा बुरखाही टराटरा फाटू लागला आहे. एका बाजूला मुस्लीम समाज उन्नत व्हावा यासाठी सरकार मदरशांतून आधुनिक शिक्षण देण्याचा प्रयत्न करते आहे, मुस्लीम महिलांना तिहेरी तलाकच्या फासातून मुक्त करते आहे आणि दुसऱ्या बाजूला समाजावर मुल्लामौलवींचा प्रभाव अजूनही असल्याचे वास्तव समोर येत आहे. 

seva_1  H x W:

देशात ५ ऑगस्ट रोजी रामक्रांतीचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. साऱ्या देशात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण अनुभवास येत आहे. आगामी तीस-चाळीस महिन्यांत अयोध्येत भव्य मंदिर साकार होईल, अशा बातम्याही प्रकाशित होऊ लागल्या आहेत. अशा वेळी श्रीरामाचे भजन केले म्हणून एका महिलेला धर्मबहिष्कृत करण्याचा फतवा जारी झाला आहे. ही घटना क्लेशदायक आहे. ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत भूमिपूजनाचा सोहळा चालू असताना अलिगढ येथील रूबी आसिफ खान या महिलेने आपल्याला कुटुंबातील सदस्यासह स्वतःच्या घरी रामभजन केले, त्याचा परिणाम म्हणून अलिगढ येथील मुल्लामौलवींनी त्यांना धर्मबहिष्कृत केले असून शहरभर पोस्टर्स लावली आहेत, रूबी आसिफ खान यांना जिवंत जाळण्याची धमकी दिली जाते आहे. रक्षाबंधनानिमित्त रूबी आसिफ खान यांनी अयोध्येस राखी पाठवली होती, तेव्हाही त्यांना धमकावण्यात आले होते. रामभजनानंतर त्यांना जिवंत जाळण्याची धमकी दिली गेली, धर्मबहिष्कृत करण्याचा फतवा जारी झाला. मात्र या गोष्टीवर तथाकथित पुरोगामी तोंड उघडायला तयार नाहीत. सिलेक्टिव्ह सेक्युलॅरिझमचे हे आदर्श उदाहरण आहे. एका बाजूला अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा ढोल वाजवत आपण कसे पुरोगामी आहोत हे सांगत राहायचे आणि दुसऱ्या बाजूला मुल्लामौलवींच्या दाढ्या कुरवाळत बसायचे, हा तथाकथित पुरोगामी मंडळींचा पवित्रा असतो. रूबी आसिफ खान प्रकरणातही त्याचा अनुभव येत आहे. आपल्या संविधानात अभिव्यक्तिस्वातंत्र्याबरोबरच उपासना स्वातंत्र्यही मिळाले आहे. मुस्लीम समाजातील रूबी आसिफ खान यांनी संविधानाने बहाल केलेल्या स्वातंत्र्याचा अंगीकार केला आहे. मात्र प्रतिगामी मानसिकता जपणाऱ्या मुल्लामौलवींना हेच रुचलेले नाही. मुस्लीम समाजातील महिलेने असे धर्मकार्य करणे म्हणजे अधर्म, अल्लाहच्या दरबारात केलेला अक्षम्य गुन्हा ठरवून तिला जिवंत जाळून मारण्याचा फतवा जाहीर झाला. हा फतवा म्हणजे क्रूर रानटी मानसिकतेचे प्रकटीकरण आहेच, पण त्याचबरोबर आम्ही संविधान, व्यक्तिस्वातंत्र्य, उपासना स्वातंत्र्य मानत नाही यांचीही मूक संमती आहे. आम्ही कुराणातील आदेश मानणार आणि त्यानुसार समाजसंचलन करणार, या मुस्लीम मानसिकतेचे हे विदारक चित्र समोर आले आहे. मात्र या मानसिकतेविरुद्ध शब्द उच्चारला, तर ज्यांच्या आधारे आपण पुरोगामीपणाचा टेंभा मिरवतो, तो समाज नाराज होईल, या भीतीने देशभरातील पुरोगामी महंत, महिलांचे प्रश्न घेऊन लढणाऱ्या संघटना आणि व्यक्ती आज स्मशानशांततेचा अनुभव घेत आहेत.
प्रश्न केवळ धमकीचा किंवा फतव्याचा नाही. तुम्ही संविधान मानता की कुराण? हा प्रश्न आहे. सोईनुसार संविधान आणि सोईनुसार कुराण ही दोन दगडांवर पाय ठेवण्याची वृत्ती समाजाला कळू लागली आहे आणि त्यामुळे पुरोगामित्वाचा बुरखाही टराटरा फाटू लागला आहे. एका बाजूला मुस्लीम समाज उन्नत व्हावा यासाठी सरकार मदरशांतून आधुनिक शिक्षण देण्याचा प्रयत्न करते आहे, मुस्लीम महिलांना तिहेरी तलाकच्या फासातून मुक्त करते आहे आणि दुसऱ्या बाजूला समाजावर मुल्लामौलवींचा प्रभाव अजूनही असल्याचे वास्तव समोर येत आहे. अशा वेळी सरकारने या गोष्टीची गंभीरपणे दखल घेतली पाहिजे आणि संविधानाने बहाल केलेल्या मानवी स्वातंत्र्याचा अधिक्षेप करणाऱ्यावर कडक कारवाई केली पाहिजे.


seva_1  H x W:
रूबी आसिफ खान या बदलत्या मुस्लीम मानसिकतेचे प्रतीक आहे, असे आम्हाला वाटते. या देशाच्या आनंदात, उत्साहात सामिल होताना संविधानाने बहाल केलेले मुलभूत अधिकार जगण्यावर भर देणारी मानसिकता आहे. अशी मानसिकता वाढत जाणे म्हणजे मुल्लामौलवींची ठेकेदारी मोडीत काढणे आहे. म्हणून आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मुल्लामौलवी संविधानविरोधी फतवे काढत आहेत. मागील काही वर्षांपासून मुस्लीम महिलांच्या मानसिकतेत बदल होत असून तो संविधाननिष्ठ आहे. हे संविधान स्वीकारण्यात आणि भारतीय होण्यातच आपले भले आहे, हे मुस्लीम महिलांच्या लक्षात येऊ लागले आहे. रूबी आसिफ खान या त्याच मानसिकतेच्या प्रतीक आहेत. ही मानसिकता देशभर उफाळून यावी आणि मुल्लामौलवींबरोबरच तथाकथित पुरोगामी मंडळींनाही त्यांची जागा दाखवून द्यावी. तरच आपण आपल्या देशात संविधानाचा खऱ्या अर्थाने स्वीकार केला आहे, असे म्हणू शकू.