एक नगरी है विख्यात अयोध्या नाम की...

विवेक मराठी    16-Aug-2020
Total Views |
नुकतेच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते रामजन्मभूमी अयोध्या येथे श्रीरामांच्या मंदिराचा भूमीपूजनाचा कार्यक्रम जल्लोषात पार पडला. परंतु थोड्याच दिवसात एका कार्यक्रमात नेपाळचे पंतप्रधान केपीएस ओली यांनी नुकतेच एक वादग्रस्त वक्तव्य केले – “श्रीरामाची जन्मभूमी नेपाळ असून, श्रीरामाचा जन्म नेपाळमधील ठोरी या ठिकाणी झाला होता. मात्र अनेक प्राचीन ग्रंथातूनहे सिद्ध झाले आहे की, रामप्रभुंची जन्मभूमी ही अयोध्या आहे.

shree ram_1  H
 
नेपाळचे पंतप्रधान केपीएस ओली यांनी नुकतेच एक वादग्रस्त वक्तव्य केले – “श्रीरामाची जन्मभूमी नेपाळ असून, श्रीरामाचा जन्म नेपाळमधील ठोरी या ठिकाणी झाला होता. राजा दशरथसुद्धा नेपाळचा होता. त्याने नेपाळमधील रीदी या गावी पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. वाल्मिकीसुद्धा नेपाळचे होते. वाल्मिकींचा आश्रमसुद्धा नेपाळमध्ये होता. पूर्वीच्या काळी लांबचा प्रवास शक्य नसल्याने तेव्हा श्रीरामाला भारतातील अयोध्येतून जनकपुरीपर्यंत येणे शक्य नव्हते, म्हणून श्रीरामाचा जन्म जनकाच्या गावाजवळ नेपाळमध्ये झाला होता...” कवी भानुभक्त यांच्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात ओली बोलत होते. या कवी भानुभक्त यांनी १९व्या शतकात 'वाल्मिकी रामायण'चा नेपाळी भाषेत अनुवाद केला होता. ओली यांच्या वक्तव्यात काही तथ्य आहे का? वाल्मिकी श्रीरामायणात अयोध्येचे स्थान कुठे सांगितले आहे? नेपाळमधील ठोरी ही ‘खरी’ अयोध्या असू शकते का, ते पाहू.
रामायणातील बालकांडमध्ये अयोध्येबद्दल वाल्मिकी लिहितात –
कोसलो नाम मुदितः स्फीतो जनपदो महान् |
निविष्टः सरयूतीरे प्रभूतधनधान्यवान् || १-५-५
अयोध्या नाम नगरी तत्रासील्लोकविश्रुता |
मनुना मानवेन्द्रेण या पुरी निर्मिता स्वयम् || १-५-६
शरयू नदीच्या काठावर कोसल नावाचे एक महाजनपद होते. या राज्यात विपुलता होती, भरपूर धनधान्य होते. तेथील लोक सुखाने राहत होते. त्या कोसल राज्यात अयोध्या नावाची नगरी होती. ती नगरी स्वत: मनूने निर्माण केली होती. या विस्तीर्ण नगरीतील राजमार्ग रोज फुलांनी सजवले जात. त्या नगरीत अनेक उद्याने व आमराया होत्या. इंद्राप्रमाणे शोभणारा दशरथ इथे राज्य करीत होता... इत्यादी वर्णन येते. यातील महत्त्वाचे आहे अयोध्येचे स्थान – शरयू नदीच्या काठावर. नकाशात आपल्याला दिसते की उत्तर प्रदेशमधील अयोध्या नगरी शरयू (घगर) नदीच्या काठावर आहे. *****
वाल्मिकी रामायण पुढे सांगते, की श्रीराम-लक्ष्मण-सीता जेव्हा वनवासासाठी निघाले, तेव्हा अयोध्येचे नागरिक त्यांच्या मागे मागे गेले. अयोध्यावासींच्या सोबतीने श्रीरामाने वनवासाची पहिली रात्र तमसा नदीच्या काठावर घालवली. पहाट होताच श्रीराम-लक्ष्मण-सीता यांनी नागरिकांना मागे सोडून झरझर वाहणारी तमसा नदी ओलांडली. (आता फैजाबाद जिल्ह्यातील या नदीला नाल्याचे स्वरूप आले आहे. वाळलेल्या नदीच्या पात्रात ठिकठिकाणी अतिक्रमणदेखील झाले आहे.) पुढे तिघांनी गोमती नदी पार केली व कोसल देशाची सीमा असलेली स्यांदिक नदी पार केली.
कदा अहम् पुनर् आगम्य सरय्वाः पुष्पिते वने |
मृगयाम् पर्याटष्यामि मात्रा पित्रा च सम्गतः || २-४९-१५
मातृभूमीची सीमा ओलांडताना श्रीरामाला गहिवरून आले. श्रीरामाने खेदाने म्हटले, “आता मी कधी परत येऊन आई-वडिलांना सोबत घेऊन शरयू नदीच्या काठी असलेल्या अरण्यात शिकार करायला येईन? मला शिकारीची हौस नाही, पण आई–वडिलांना पुन्हा कधी पाहीन या विचाराने मन व्याकूळ होत आहे.”
 

shree ram_1  H
 
या प्रसंगातून कळते की अयोध्या नगरी शरयूच्या पश्चिम तीरावर होती. अयोध्येच्या दक्षिणेला तमसा होती आणि तिच्याही पश्चिमेला स्यांदिक नदी होती. तिथून पुढे दक्षिणेकडे जात राम-लक्ष्मण-सीतेने निषादराज गुहाच्या मदतीने गंगा नदी पार केली.
वाल्मिकी रामायणात आणखी एका प्रसंगी अयोध्येचे स्थान कळते. श्रीराम-लक्ष्मण-सीता वनवासात गेल्यावर लवकरच दशरथाचा मृत्यू झाला. त्या वेळी भरत व शत्रुघ्न केकय राज्यात त्यांच्या आजोळी होते. वसिष्ठ ऋषींनी दूतांना भरत व शत्रुघ्नला घेऊन येण्यासाठी पाठवले. अयोध्येतून पाच दूत द्रुतगतीने निघाले. उत्तरेला कूच करून हस्तिनापूर येथे त्यांनी गंगा नदी केली.
ते हस्तिनापुरे गङ्गाम् तीर्त्वा प्रत्यङ्मुखा ययुः |
पाञलदेशमासाद्य मध्येन कुरुजाङ्गलम् || २-६८-१३
अयोध्या शरयूच्या पश्चिम तीरावर वसली आहे. त्यामुळे पश्चिमेला जातांना शरयू पार करावी लागत नाही. अयोध्येच्या पश्चिमेला मोठी नदी आहे – गंगा. गंगा आणि शरयू या दोन्ही नद्यांच्या मधील भागात अयोध्या वसली आहे.
पुढील प्रसंगात, दूतांकडून निरोप मिळताच भरत आजोळहून - म्हणजे केकय इथून अयोध्येला निघाला. हा परतीचा मार्ग थोडा दक्षिणेकडून होता. भरत एकसारखा ८ दिवस प्रवास करून अयोध्येस पोहोचला. वाल्मिकी रामायण सांगते की या प्रवासात त्याने सतलज, सरस्वती, यमुना व गंगा नद्या ओलांडल्या. त्यावर एकशाला येथे गोमती नदी ओलांडली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे तो अयोध्येस पोहोचला.
एक साले स्थाणुमतीम् विनते गोमतीम् नदीम् |
... अयोध्याम् मनुना राज्ञा निर्मिताम् स ददर्श ह | २.७१.१८
अर्थात अयोध्या गोमती व शरयूच्या मधील भागात आहे.
वनवास संपवून, रावणाशी युद्ध करून राम-लक्ष्मण-सीता पुष्पक विमानाने परत येत होते. या प्रवासात श्रीराम व सीता खाली दिसणाऱ्या दृश्याबद्दल बोलतात. अयोध्येजवळ येताना राम सीतेला सांगतात – "मैथिली! ती पाहा यमुना नदी. तिच्या तीरावरील रंगीत वनराई किती खुलून दिसत आहे! आणि ती पाहा परमपावनी गंगा नदी. तिच्या दोन्ही काठांवर किती प्रकारचे पक्षी विसावले आहेत. आणि रंगीत फुलांनी सजलेली झाडे तर पाहा! वैदेही, ही पाहा माझ्या वडिलांची राजधानी – अयोध्या! आपण परत आलो आहोत, अयोध्येला! सीते, या नगरीला प्रणाम कर!"
एषा सा यमुना दूराद्दृश्यते चित्रकानना |
... इयं च दृश्यते गङ्गा पुण्या त्रिपथगा नदी |
... एषा सा दृश्यते अयोध्या राजधानी पितुर्मम || ६ – १२३
अयोध्येकडे जाताना आधी यमुना व नंतर गंगा नदी लागते. या सर्व वर्णानातून अयोध्या नक्की कुठे होती हे लक्षात येते. तमसा व शरयू नदीच्या मधील भूभागात अयोध्या वसली होती. आज फैजाबाद जिल्ह्यातील अयोध्या नगरी म्हणून आपण जी ओळखतो, तिच्या पश्चिमेला ओळीने तमसा, गोमती, व गंगा या नद्या आहेत.