@निलेश साठे
कोविड - १९ या महाभयंकर आजाराने जगभर थैमान घातले आहे. याची लागण झाली असता यावर होणारा खर्च हा अफाट आहे, मग तुम्ही सरकारी रुग्णालयात जा अथवा खाजगी. यासाठीच इर्डाने 'कोरोना कवच' नावाच्या आरोग्य विमा पॉलिसीची घोषणा केली. या लेखात पाॅलिसीच्या वैशिष्ट्यांविषयी अधिक जाणून घेऊया.
कोविड-१९ने जगात हाहाकार माजवला आहे. आजमितीस जगात जवळपास १.७० कोटी लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे आणि ६.६५ लाख जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. भारत सरकारने याचे गांभीर्य वेळीच ओळखले आणि कोरोनाचा प्रादुर्भाव नगण्य दिसत होता, तेव्हाच लॉकडाउन अमलात आणल्याने भारतात कोरोना केसेसची वृद्धी बरीच नंतर दृष्टोत्पत्तीस आली. आजमितीस भारतात जवळपास १५.४० लाख रुग्ण दिसून आले असून ३४ हजारावर मृत्युमुखी पडले आहेत.
मात्र जसे जसे कोरोनाचे रुग्ण वाढू लागले, तसे हा आजार किती आणि कसा खर्चीक आहे याची रुग्णांच्या कुटुंबीयांना जाणीव होऊ लागली. ८ ते १५ दिवसांचे विलगीकरण, सरकारी व्यवस्थेमध्ये असेल तर खर्च कमी पण मनस्ताप जास्त आणि हॉस्पिटलमध्ये करायचे असेल तर मनस्ताप कमी पण खिसा रिकामा होतो, याची जाणीव व्हायला लागली आणि अशा वेळेस इर्डाने 'कोरोना कवच' नावाच्या आरोग्य विमा पॉलिसीची घोषणा करून अशा प्रकारच्या विम्याची गरज भागवली. १० जुलै २०२०ला या पॉलिसीची केवळ घोषणाच करून इर्डा थांबली नाही, तर साधारण विमा कंपन्यांना आणि केवळ आरोग्य विमा विकणाऱ्या विमा कंपन्यांना (एकूण ३०) कोरोना कवच हा विमा प्रकार विकण्यास बाध्यही केले. इर्डाचे अध्यक्ष आणि इर्डामधील आरोग्य विमा विभागातील अधिकारी यासाठी अभिनंदनास पात्र आहेत.
केवळ १५ दिवसांत दोन लाखाहून अधिक कोरोना कवच पॉलिसी विकल्या गेल्या, ही बाबच अशा पॉलिसीची किती गरज होती हे दर्शविते. तेव्हा जाणून घेऊ या या पॉलिसीच्या वैशिष्ट्यांविषयी.
प्रत्येक विमा कंपनीची कोरोना कवच पॉलिसी ही किमान समान गुणधर्म असलेली पॉलिसी असेल. उदा., किमान विमा रक्कम ५०,०००, तसेच विमाधारकाचे कमाल वय ६५, पॉलिसीची मुदत साडेतीन, साडेसहा किंवा साडेनऊ महिने, पंधरा दिवसांचा प्रतीक्षा कालावधी अशा अटींवर इर्डाने प्रत्येक विमा कंपनीने कोरोना कवच ही विमा पॉलिसी बेतून संभाव्य विमाधारकांना उपलब्ध करून देण्याची सक्ती केली. आठवडाभरात जवळपास सर्वच विमा कंपन्यांनी अशी पॉलिसी बाजारात विक्रीसाठी आणली आणि ८-१५ दिवसांतच २ लाखाहून अधिक पॉलिसीजची विक्री झाली.
न्यू इंडिया ऍशुरन्स कंपनीने बेतलेल्या कोरोना कवच पॉलिसीची माहिती घेऊ या.
ह्या पॉलिसीची विमा रक्कम ५०,००० ते ५ लाख रुपये असून १८ ते ६५ वयोगटातील कुणाही व्यक्तीला यात सहभागी होता येते. मुदत १०५, १९५ किंवा २८५ दिवस घेता येत असून, विमा घेतल्यानंतर सुरुवातीच्या १५ दिवसांत कोरोनाची लक्षणे आढळल्यास विमा निरस्त होतो. मात्र १५ दिवसांनंतर विमेदारास कोरोनाची लागण झालेली आढळल्यास, विमा रकमेपर्यंतचा हॉस्पिटलमधील सर्व खर्च विमेदारास कॅशलेस पद्धतीने परस्पर हॉस्पिटलला दिला जातो, शिवाय ऍम्ब्युलन्सचा २,०००पर्यंतचा खर्चही मिळतो. महत्त्वाचे म्हणजे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वीचा १५ दिवसांचा आणि हॉस्पिटलमधून घरी आल्यावर ३० दिवसांपर्यंतचा जो औषधपाण्याचा खर्च असेल, त्याचाही परतावा मिळतो. मेडिक्लेम विमा प्रकारात असलेली हॉस्पिटलमधील खोलीच्या भाड्याची मर्यादा या पॉलिसीत नाही. तसेच 'आयुष' - म्हणजे आयुर्वेदिक, युनानी किंवा होमिओपॅथिक औषधे घेतल्यास, त्याचाही संपूर्ण खर्च मिळतो आणि टेलिमेडिसिनचा खर्चही मिळतो. हॉस्पिटलमध्ये दाखल न होता घरीच औषधोपचार केल्यास प्रत्येकी १५,००० रुपये मिळण्याची सोय या विमा पॉलिसीत आहे. पॉलिसी संपूर्ण कुटुंबासाठी (स्वतः, पत्नी/पती, अज्ञान मुले, वय ६५खालील आई, वडील, सासू, सासरे या सगळ्यांचे फॅमिली कव्हर) फॅमिली फ्लोटरखाली घेता येते. चाळीस वयाखालील व्यक्तीस १ लाख विमा रकमेच्या २८५ दिवसांच्या विमा संरक्षणासाठी विमा हप्ता केवळ ७०० रुपये आहे आणि तोही एकदाच भरायचा आहे. मुदत १९५ किंवा १०५ दिवस घेतल्यास, विमा हप्ता ७०० रुपयांहूनही कमी येतो.
मधुमेह, हृदयरोग, मूत्ररोग असल्यास आणि तसे स्व-घोषित केले असल्यास कुठल्याही वैद्यकीय तपासणीशिवाय कोरोना कवच ही विमा पॉलिसी मिळते, पण अशा व्यक्तींना विम्याचा हप्ता ३०% जास्त भरावा लागतो.
फॅमिली फ्लोटर घेतल्यास ५%, तसेच ऑनलाइन विमा घेतल्यास १०% सूट मिळते.
विशेष म्हणजे आरोग्य सेवेशी निगडित असणाऱ्या व्यक्तींसाठी प्रीमियममध्ये ५% खास सवलत दिलेली आहे आणि त्यांच्या कुटुंबीयांनासुद्धा ही सवलत मिळते.
प्रीमियमच्या १५% अधिक रक्कम भरल्यास, हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर विमा रकमेच्या ०.५% रक्कम रोज रोख मिळण्याचीही सोय या पॉलिसीत उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशी रक्कम जास्तीत जास्त १५ दिवसांसाठी मिळू शकते.
कोरोनाचे रुग्ण रोज वाढतच आहेत आणि जोवर कोरोनावर खात्रीशीर औषध निघत नाही, तोवर आपल्या चुकीने किंवा आपली काहीही चूक नसतानाही आपणास हा आजार होऊ शकतो आणि म्हणूनच प्रत्येकाने कोरोना कवच या विमा योजनेचा लाभ घेतला पाहिजे.
(लेखक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे वित्त सल्लागार, तसेच इर्डा (IRDA) अर्थात विमा नियामक आणि विकास प्राधिकरण या भारतातील विमा क्षेत्रावर कायद्याचे नियंत्रण ठेवणाऱ्या मंडळाचे माजी सदस्य आहेत.)