जेफर्सनच्या वचनांनी आपण लेखनाला सुरुवात केली. जेफर्सनने सुखाची प्राप्ती हा जन्मसिद्ध अधिकार मानला आहे. आपल्या शास्त्रकारांनी हजारो वर्षांपूर्वी त्याला मान्यता दिली आहे. जेफर्सनने या सुखप्राप्तीसाठी लिबर्टी मागितली. राजकीय समाजरचनेचा एक आराखडा ठेवला. अमेरिकेने तो अमलात आणला आणि भौतिक प्रगती केली. आपल्या शास्त्रकारांनी सांगितले की सुखप्राप्तीचा मार्ग बाह्य नियम आणि साधनांवर अवलंबून नाही. तो मार्ग निःष्काम कर्म करण्याचा आहे. सर्वांविषयी आत्मिय भावना ठेवून जीवन जगण्याचा आहे. आणि या मार्गाने प्रत्येकाला जाता येते आणि त्याने तसा प्रयत्न केला पाहिजे. लोकमान्य टिळकांनी याचे सैद्धांतिक विवरण गीतारहस्यात केलेले आहे. म्हणून प्रत्येक हिंदुच्या घरी हा ग्रंथ असावा आणि कर्ममार्गी बनण्यासाठी त्याचे वाचन करावे,
अमेरिकेच्या राज्यघटनेच्या अभ्यासाची सुरुवात थाॅमस जेफर्सन याच्या दि डिक्लेरेशन ऑफ इंडडिपेन्डस (The Declaration of Independence)
याने करावी लागते. त्यातील दुसर्या परिच्छेदाच्या चार ओळींचा मराठी अर्थ असा आहे.
* आम्ही या गोष्टी स्वयंसिद्ध सत्य आहेत, असे मानतो.
* सर्व माणसे निर्मितीने समान आहेत. निर्मात्याने त्यांना कधीही काढून न घेता येणारे काही अधिकार दिलेले आहेत.
* त्यापैकी जीवन, लिबर्टी (स्वातंत्र्य) आणि सुखाचा शोध (Pursuit of happiness) हे आहेत.
जीवन, स्वातंत्र्य आणि सुखाचा शोध ही तीन मूल्ये अमेरिकन जीवनाची मूल्ये आहेत. अमेरिकेचे संविधान या तीन मूल्यांवर आधारित आहे.
थाॅमस जेफर्सनने सुखाचा शोध हा विषय मांडला खरा, परंतु सुख म्हणजे काय? याची फोड जेफर्सन यांनी केली नाही. त्याची आवश्यकता जेफर्सनला वाटली नसावी. याचे कारण असे की मनुष्य जीवनाचा हेतूच मुळी सुखाची प्राप्ती करण्याचा आहे. प्रत्येकाची धडपड अधिकाधिक सुख प्राप्त करून घेण्यासाठी चाललेली असते. कुणीही माणूस मी दु:ख मिळविण्यासाठी धडपडत आहे असे म्हणत नाही. ग्रेट ब्रिटन आणि युरोपमधून जे लोक अमेरिकेत आले, ते सुखाच्या शोधासाठीच आले. हे सुख प्राप्त करण्यासाठी जीवन जगण्याची हमी हवी आणि लिबर्टी म्हणजे सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्तता हवी. असा विचार तेव्हा असल्यामुळे सुखाची वेगळी फोड करण्याची आवश्यकता जेफर्सनला वाटली नसावी.
आजचे अमेरिकन जीवन पाहिले तर ते भूलोकीचा स्वर्ग या शब्दात सांगावे लागते. सुखाच्या ऐहिक गोष्टींची प्रचंड मुबलकता अमेरिकेतील लोकांनी निर्माण केली. आज प्रत्येक माणसामागे चारचाकी गाडी असते. बेकारीची समस्या आपल्यासारखी भीषण नाही. अमेरिकन माणसाचे सरासरी उत्पन्नदेखील प्रचंड आहे. शिक्षण, आरोग्य, निवारा, दळणवळणाची साधने याबाबतीत अमेरिकन माणूस इतर देशातील माणसांपेक्षा कमालीचा सुखी असतो. यासाठी ज्याला ऐहिक सुख प्राप्त करून घ्यायचे असेल, तो अमेरिकेची वाट धरतो.
भारताची सुखाची वाट मात्र वेगळी आहे. ही वाट भगवद्गीतेने सांगितलेली आहे. गीतारहस्य हा लोकमान्य टिळकांचा गीतेवरील भाष्य करणारा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या ' 'सुसुखदुःखविवेक' या प्रकरणात लोकमान्य टिळकांनी सुखाच्या भौतिक मार्गाच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. या मर्यादा स्पष्ट करताना टिळकांनी भौतिक सुखे अनावश्यक आहेत, असे म्हटले नाही. ती आवश्यकच आहेत, परंतु ते जीवनाचे अंतिम लक्ष्य होऊ शकत नाही. हे स्पष्ट करताना त्यांनी याज्ञवल्क्य यांचा संवाद दिला आहे. मैत्रेयी आपल्या पतीला विचारते की, जे धन तुम्ही मला देणार आहात, त्याने मला अक्षयसुखाची प्राप्ती होणार आहे का? याज्ञवल्क्य सांगतात की, जगातील कुठल्याही धनात निरंतर सुख देण्याची शक्ती नाही. मनुष्यापासून सर्व गोष्टी या नाशवंत आहेत. नित्य परिवर्तनशील आहेत. त्यांच्यात निरंतर सुख देण्याचे सामर्थ्य नाही. निरंतर आत्मतत्व आहे. मैत्रेयीने हे आत्मतत्वाचे ज्ञान धनाच्या मोबदल्यात मागितले. लोकमान्य टिळक नचिकेताचेही उदाहरण देतात. यमाने नचिकेताला प्रचंड ऐहिक संपत्ती आणि राज्य देऊ केले. नचिकेता म्हणाला," हे सर्व क्षणिक सुख आहे, त्याऐवजी मला श्रेय आहे ते दे" म्हणजे भौतिक साधने आहेत ती निरंतर सुख देणारी नाहीत, हा त्याचा अर्थ आहे.
'सुखदुःखविवेक'. या प्रकरणात लोकमान्य टिळकांनी सुख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय, सुखाची अवस्था म्हणजे काय, ती कशी प्राप्त करून घेता येते, याचे शास्त्रशुद्ध विवेचन केलेले आहे. सुख म्हणजे काय आणि ते कशात असते, हे सांगण्याच्या भानगडीत जेफर्सन पडलेला नाही. भारतीय मन मात्र नुसता सुख हा शब्द घेऊन थांबत नाही, ते कशात आहे याचा शोध घेऊ लागते. प्रकरणाच्या सुरुवातीलाच लोकमान्य सांगतात की, आमच्या शास्त्रकारांचा हा सिद्धांत आहे की, प्रत्येक मनुष्य सुखाच्या प्राप्तीसाठी आणि दुःख टाळण्यासाठी प्रयत्नशील असतो. लोकमान्यांचे वैशिष्ट्य असे आहे की, विचाराची फोड करीत असताना पाश्चात्य विद्वान यावर काय म्हणाले, याचे एकामागून एक दाखले ते देत नाहीत. त्यांची दृष्टी संपूर्णपणे भारतीय आहे. विदेशी विद्वानांचे दाखले त्यांनी तुलनेसाठी भरपूर घेतले आहेत. त्यातील अपूर्णता ते दाखवीत राहतात. आपल्या शास्त्रकारांची वचनामागून वचने जशी ग्रंथात आहेत, तशी या प्रकरणातही आहेत. लोकमान्यांनी सुखाची व्याख्या कशी केली आहे, हे प्रथम सांगतात, जे आपल्याला इष्ट ते सुख आणि ज्याचा आम्ही द्वेष करतो ते दुःख" ही शास्त्रकारांची एक व्याख्या सांगून पुढे लोकमान्य त्याची फोड करतात.
इष्ट म्हणजे काय? असा प्रश्न निर्माण होतो. इष्ट याचा अर्थ अनुकूल असाही होतो. तहान लागली की पाणी इष्ट असते. म्हणून पाण्याला सुख म्हणता येईल का? असे म्हटले तर पाण्यात डुबणारा सुखात डुबला,असे म्हणण्यासारखे आहे. लोकमान्य पुढे जातात आणि सांगतात की, अनुकूल वेदना म्हणजे सुख आणि प्रतिकूल वेदना म्हणजे दुःख आहे. इथे वेदना याचा अर्थ संवेदना, भावना असा होतो. मनुष्याला सुख आणि दुःख देणार्या या भावना बाह्य कारणामुळेही होतात आणि बाह्य कारणाशिवायही होतात. आजारी पडल्यानंतर जे दुःख होते, ते आंतरिक दुःख असते. लोकमान्य याला आध्यात्मिक सुख-दुःख म्हणतात. पाऊस, वारा, वादळ यातून होणारी दुःखे ही बाह्य कारणांमुळे होतात. या दुःखातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न माणूस सतत करीत असतो. सुख आणि दुःख हे अनुभव आहेत. एकाचा अतिरेक झाला की दुसर्याचा उदय होतो. दुःखातून निवारण झाले की सुख प्राप्त होते. सुख नावाची स्वतंत्र अशी संकल्पना नाही.
दुःख का निर्माण होतं? दुःख निर्माण होण्याचे कारण तृष्णा आहे. तृष्णा म्हणजे आशा, वासना. एखादी गोष्ट प्राप्त करण्याची तीव्र इच्छा. ती प्राप्त झाली नाही तर दुःख होते. आणि ती वस्तू प्राप्त झाली तर सुखाचा अनुभव येतो. परंतु तृष्णेच्या शमनाने प्राप्त होणारे सुख हे शाश्वत सुख नसते. कारण माणसाच्या इच्छा, आकांक्षा, भोगलालसा या कधी संपत नाहीत. त्या उत्पन्न झाल्या की त्याचे निवारण करण्यासाठी माणूस उपाय करतो, त्यामुळे तेवढ्या वेळेपुरती त्या वासना तृप्त होतात. आवडीचा पदार्थ खाल्ला की तेवढ्यापुरते मन तृप्त होते. पुन्हा दुसर्या वेळेस तो पदार्थ खाण्याची इच्छा होते. म्हणून कोणत्याही बाह्य वस्तूत सर्वकाळ सुख देण्याचे सामर्थ्य नसते.
बाह्य वस्तूंचे सुख देण्याचे सामर्थ्य परिस्थितीसापेक्ष असते. उन्हाळ्यात थंड पाण्याने आंघोळ केली की सुख वाटते. कडाक्याच्या थंडीत थंड पाण्याने आंघोळ म्हणजे आजाराला निमंत्रण असते. जुलाब सुरू झाले असता दूध पिणे आरोग्याला घातक असते, परंतु इतर वेळी दूध पिणे आरोग्यवर्धक असते. कोणताही पदार्थ किंवा स्थिती सर्वकाळ सुख निर्माण करु शकत नाही.
हा सुख-दुःखाचा विचार इंद्रियांच्या संदर्भातच केला जातो. कानाला चांगले ऐकायला आवडते, जीभेला चवीचे पदार्थ खायला आवडतात, डोळ्यांना नेत्रसुख करणार्या वस्तू पहायला आवडतात, कामवासना यादेखील शरिराच्या असतात. इंद्रियांचे हे गुणधर्म स्वभावसिद्ध आहेत, ते मारुन टाकता येत नाहीत. बळजबरीने त्यांच्यावर नियंत्रण घालता येत नाही. त्यांचे दमन करणे हा सुखाचा मार्ग नाही. तसेच त्यांचे शमन करणे, ( इच्छा पुर्ण करीत जाणे) हादेखील सुखाचा मार्ग नाही. सुखाने सुख प्राप्त होत नाही. लोकमान्य सांगतात की, श्रीमंत माणसांमध्ये श्रीमंतीच्या अतिरेकामुळे अन्नाचे सेवन करण्याची शक्तीदेखील राहत नाही. परंतु गरीबांत लाकूड पचविण्याचीसुद्धा शक्ती असते.( राजा भर्तुहरीचा श्रोल्क आहे) भगवान गौतम बुद्ध यासाठी सांगतात की, शमनही करु नये, दमनही करु नये, मध्यम मार्ग धरावा. विणेची तार खूप ताणली किंवा सैल सोडली तर विणेतून बेसूर स्वर येतात. हे सांगून भगवान गौतम बुद्ध सांगतात की, उत्तम स्वर देण्याइतपतच विणेची तार ताणावी लागते.
मनुष्य जीवनाचा विचार करता 'सुख पाहता जवाएवढे, दुःख पर्वताएवढे' अशी स्थिती असते. आपल्या शास्त्रकारांनीदेखील ही गोष्ट मान्य केली आहे. दुःख असल्यामुळे त्यातून सुटका करुन घेण्यासाठी सामूहिकपणे कोणी आत्महत्या करीत नाही. आत्महत्या कायदेशीरदृष्ट्या अपराध आहे आणि धार्मिकदृष्ट्या पाप आहे. माणूस कितीही दुःखात असला तरी जीवन संपविण्याचा विचार त्याच्या मनात सामान्यतः येत नाही. त्याचे उत्तर लोकमान्य असे देतात की, मी माणूस आहे, हा आनंद सर्वश्रेष्ठ असतो. हे माणूसपण जपण्यासाठी माणूस आत्महत्या करीत नाही. असे असले तरी काही माणसे आत्महत्या करीत असतात. अभिनेता सुशांत सिंह राजपूत, शेतकर्यांच्या आत्महत्या अशाच गाजतात. या आत्महत्यांचे वैचारिक समर्थन कुणी करीत नाहीत किंवा त्यावरुन कुणी असा निष्कर्ष काढीत नाहीत की समाजजीवन अतिशय दुःखमय झाले आहे.
सुखाच्या भौतिक संकल्पनेत इंद्रियांना सुख देणार्या वस्तू प्राप्त करणे. उदाः- कलर टीव्ही, चारचाकी गाडी, ए सी, अशा अनेक वस्तूंचा यात समावेश करुन घ्यावा लागेल. या वस्तू प्राप्त करून घेण्याच्या इच्छा निर्माण होतात. त्यासाठी पैसा लागतो. अधिक पैसे मिळविण्याच्या मागे माणूस लागतो. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा निर्माण होते. इच्छांच्या मागे धावण्याची त्याला सवय लागते. इच्छा पूर्ण करता करता जिवनाचा शेवटचा टप्पा कधी आला हे त्याला समजत नाही. ज्या सुखाच्या तो मागे लागलेला असतो, त्याचा आनंद तो किती घेतो हा प्रश्न आहे.
आजपासून दोनशे वर्षांपूर्वी रेल्वे गाड्या, मोटारगाड्या नव्हत्या, वीज नव्हती, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू नव्हत्या, म्हणून त्यावेळचा समाज दुःखी होता असे म्हणता येणार नाही. आणि त्यांच्यापेक्षा आज आपण अधिक सुखी आहोत असाही निष्कर्ष काढता येत नाही. भौतिक पदार्थांची सुख देण्याची शक्ती तेवढीच किंमत आपल्याकडून वसूल करीत असते. चारचाकी गाड्या, कारखाने, कोळसा, पेट्रोल, डिझेल यांच्या ज्वलनामुळे तापमान वाढत जाते आणि निसर्ग चक्राचे वेळापत्रक बिघडत जाते. भौतिकदृष्ट्या सुख संपन्न करण्याचा ध्यास अमेरिका आणि पाश्चात्य देशांनी घेतलेला आहे. आपणही त्यांची नक्कल करतो आणि शर्यतीत धावत असतो. डब्ल्यू डब्ल्यू जेकब्स याची 'माकडाचा पंजा' या शिर्षकाची कथा आहे.
श्रीमान आणि श्रीमती व्हाईट असे जोडपे आहे, त्यांना हर्बट नावाचा मुलगा आहे. भारतातून परत आलेला सार्जंट मेरिस माॅरिस त्यांचा मित्र आहे. तो भोजनासाठी आलेला आहे. एका फकिराने त्याला मंतरलेला माकडाचा पंजा दिलेला आहे. पंजाकडे तीन मागण्या मागितल्या असता, तो पूर्ण करतो, पण त्याची किंमत देखील तो वसूल कलतो, असे तो म्हणतो. माझे अनुभव वेदनादायक आहेत असे म्हणून घरात लावलेल्या भट्टीत पंजा फेकून देतो. श्रीमती व्हाईट तो पंजा बाहेर काढते. माॅरिस त्यांना सावध करतो आणि निघून जातो. हर्बट वडिलांना म्हणतो की, पंजाकडे चोवीस हजार डाॅलर मागितले तर त्याने आपल्याला घर घेता येईल. वडिल पंजाकडे इच्छा व्यक्त करतात. हर्बट दुसर्या दिवशी कामाला जातो. दुपारी कारखान्यातून अधिकारी येतात. चोवीस हजार डाॅलरचा चेक देतात आणि सांगतात, "मशीनमध्ये सापडून तुमचा मुलगा गेला, त्याची ही भरपाई." आजची तंत्रज्ञानाची कथा ही अशी माकडाच्या पंजासारखी आहे. इच्छा पूर्ण होतील, पण त्याची किंमत मोजावी लागेल.
यातून मार्ग कोणता? लोकमान्य टिळक या प्रकरणातून तो मार्ग सांगतात. माणसाने वासनांच्या मागे लागू नये. याचा अर्थ इंद्रियांचा द्वेष करावा असाही नाही. याच्या उलट ऐश्वर्य, धनधान्य यांच्या प्राप्तीची इच्छा ठेवावी. संतोषाने ऐश्वर्याचा नाश होतो, असंतोष ऐश्वर्याचे मूळ आहे. याचा अर्थ हावरेपणा ठेवला पाहिजे, समाधानी असता कामा नये, असा होत नाही. लोकमान्य सांगतात की, मनुष्याला जी कर्मे करावी लागतात, ती त्याने आपली सर्व शक्ती लावून केली पाहिजेत आणि हे कर्म करीत असताना त्यातून प्राप्त होणारे फळ अनुकूल अथवा प्रतिकूल असेल याची चिंता करता कामा नये. आपण आपल्या कर्माचे अधिकारी आहोत, कर्माच्या फळाची अपेक्षा आपण ठेवता कामा नये. इंद्रियांचे स्वभाव हे ठरलेले असतात. त्यांना आपल्या आधीन ठेवयाला पाहिजे.आधीन ठेवण्याचे काम मनाने केले पाहिजे.
लोकमान्य सांगतात की, कर्म करीत असताना बुद्धी शुद्ध हवी आणि सर्व लोकांच्या कल्याणासाठी हे कर्म आहे, अशी भावना असावी. केवळ स्वार्थाचा विचार नसावा. कर्मफळाची आशा सोडल्यावर मन प्रसन्न राहील. मनाची प्रसन्नता हेच सर्वश्रेष्ठ सुख आहे. सुख ही मनाची अवस्था आहे. सुख आणि दुःखाची अनुभूती घेणारे शरीर नसते, मन असते, बुद्धी असते आणि त्याही पलीकडे जाऊन आत्मतत्व असते. म्हणून मन प्रसन्न ठेवले पाहिजे. बुद्धीला सारासार विचार करण्याची सवय लावली पाहिजे आणि एकच आत्मा सर्वव्याप्त आहे, ही जाणीव ठेवली पाहिजे. मनाची ही अवस्था प्रत्येक व्यक्तीला निर्माण करता येऊ शकते. आणि त्याचा प्रयत्न ज्याचा त्यानेच करायचा असतो.
जेफर्सनच्या वचनांनी आपण लेखनाला सुरुवात केली. जेफर्सनने सुखाची प्राप्ती हा जन्मसिद्ध अधिकार मानला आहे. आपल्या शास्त्रकारांनी हजारो वर्षांपूर्वी त्याला मान्यता दिली आहे. जेफर्सनने या सुखप्राप्तीसाठी लिबर्टी मागितली. राजकीय समाजरचनेचा एक आराखडा ठेवला. अमेरिकेने तो अमलात आणला आणि भौतिक प्रगती केली. आपल्या शास्त्रकारांनी सांगितले की सुखप्राप्तीचा मार्ग बाह्य नियम आणि साधनांवर अवलंबून नाही. तो मार्ग निःष्काम कर्म करण्याचा आहे. सर्वांविषयी आत्मिय भावना ठेवून जीवन जगण्याचा आहे. आणि या मार्गाने प्रत्येकाला जाता येते आणि त्याने तसा प्रयत्न केला पाहिजे. लोकमान्य टिळकांनी याचे सैद्धांतिक विवरण गीतारहस्यात केलेले आहे. म्हणून प्रत्येक हिंदुच्या घरी हा ग्रंथ असावा आणि कर्ममार्गी बनण्यासाठी त्याचे वाचन करावे, त्याची पोथी करु नये.
- *रमेश पतंगे*