अण्णाभाऊंच्या लेखनप्रेरणा

विवेक मराठी    31-Jul-2020
Total Views |
अण्णाभाऊंचे साहित्य आजही प्रेरणादायी ठरते. इतक्या वर्षांनंतरही त्यांच्या साहित्यकृती, पोवाडे इत्यादी मनावर गारुड घालत आहेत. याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला तर एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे अण्णा भाऊ साठेंची नाळ समाजाशी किंबहुना त्यांनी माणूस केंद्रस्थानी ठेवून लिखाण केले. अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून समाजातील सर्वस्तरीय दुःख-वेदना यांचा सहृदयपणे शोध घेतला आणि आत्मीयतेने तो शोध आपल्या साहित्यातून प्रकट केला. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या लेखनप्रेरणेचे विविध पैलू कसे होते, ते पाहूया.


seva_1  H x W:
 
कोणत्याही कलाकृतीच्या निर्मितीसाठी काहीतरी प्रेरणा आवश्यक असते. केवळ कल्पनेचे इमले बांधून चिरकाल टिकणारी कलाकृती निर्माण होत नाही. अण्णाभाऊंच्या साहित्य कलाकृती, पोवाडे आजही लोकप्रिय आहेत. अण्णाभाऊंचे निधन झाल्यानंतर गेली पन्नास वर्षे त्यांच्या साहित्याचे गारूड समाजमनावर आहे. अण्णाभाऊंच्या साहित्याने अशी कोणती छाप महाराष्ट्राच्या मनावर उमटवली की त्यांच्या साहित्याचे आजही चाहते आहेत? या प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात सांगायचे, तर असे म्हणता येईल की अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून समाजातील सर्वस्तरीय दुःख-वेदना यांचा सहृदयपणे शोध घेतला आणि आत्मीयतेने तो शोध आपल्या साहित्यातून प्रकट केला. उत्तम साहित्यनिर्मितीमागे कळवळा असावा लागतो. कोरडी सहानुभूती शब्दांची रास मांडू शकते, उत्तम कलाकृतीला जन्म देऊ शकत नाही. जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्याचे दुःख बघून हृदयात कळ उत्पन्न होत नाही, तोपर्यंत उत्तम साहित्यकृती निर्माण होणे अवघड असते. अण्णाभाऊंनी आपल्या जगण्यातून, निरीक्षणातून आणि वेळोवेळी आलेल्या अनुभवांतून काळजाला पीळ पडणे म्हणजे काय असते, हे समजून घेतले होते आणि त्यातून त्यांची समाजाकडे, माणसाकडे बघण्याची दृष्टी निर्माण झाली होती. या दृष्टीला आपण आत्मीयता किंवा सामाजिक कळवळा असेही म्हणू शकतो. अण्णाभाऊंनी याच कळवळ्यातून प्रेरणा घेऊन विपुल लेखन केले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आसपासचे जग आणि चर्या जगात जगण्याचा संघर्ष करणारी माणसे, त्यांच्या उत्थानाचा आणि पतनाचा आलेख, माणूसपणा हरवून जनावरांच्या छावण्या झालेला माणूस, कष्टावर, श्रमावर आणि आपल्या घामावर अटळ श्रद्धा असलेला माणूस, श्रद्धा-परंपरा यांची घट्ट वीण अधिक समृद्ध करण्यासाठी झटणारा माणूस, नि:स्वार्थी प्रेमाच्या स्वप्नात रमणारा माणूस ही माणसे अण्णाभाऊंनी पाहिली, अनुभवली आणि त्यांना आपल्या साहित्यातून जन्माला घालून अमरत्व बहाल केले. अण्णा भाऊ साठे यांनी जशी माणसे साकार केली, तशी माणसांपेक्षा सरस वर्तनाची जनावरेही आपल्या साहित्यातून समाजासमोर आणली. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा पट खूप विशाल आहे. या पटावरची प्रत्येक व्यक्तिरेखा खरीखुरी आहे, कारण ती व्यक्ती आधी अण्णाभाऊंनी शोधली, तिची जीवनगती पाहिली, मग त्या व्यक्तीला मानसिकदृष्ट्या जगून पाहिले आणि शेवटी ती अण्णाभाऊंच्या साहित्यात अवतरली.
अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यनिर्मितीमागची प्रेरणा स्पष्ट केली आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करताना आपल्याला अण्णाभाऊंनी विविध पुस्तके लिहित असताना जी मनोगते लिहिली आहेत, त्यांचा आधार घ्यावा लागतो.
 
 
अण्णाभाऊंची मनोगते किंवा कैफियत समजून घेतली, तर अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून काय मांडणी केली आहे आणि त्यामागे कोणत्या प्रेरणा आहेत हे आपल्याला समजून शकते. अण्णा भाऊ साठे यांच्या मनोगतात असंख्य सुप्त बीजे आढळतात. या बीजाची साहित्यातून पेरणी करून ते त्यांना हवा असलेला मानसिक, सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतात. अण्णाभाऊंच्या लेखणाच्या प्रेरणास्थानी माणूस आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. माणसाच्या सुखदुःखाच्या पलीकडे पाहत एकात्म आणि समतायुक्त सामाजिक वातावरण निर्माण व्हावे, म्हणून अण्णा भाऊ साठे यांनी लिखाण केले आहे. अण्णाभाऊंचे साहित्य हे जित्याजागत्या माणसाचे साहित्य आहे. माणूस केंद्रस्थानी ठेवून त्यांनी लेखन केले आहे.
 
 
'फकिरा' कांदबरीच्या कैफियतमध्ये अण्णाभाऊंनी लिहिले आहे - 'प्रतिभेला सत्याचं, जीवनाचं दर्शन नसेल तर प्रतिभा, अनुभूती वगैरे शब्द निरर्थक असा माझा अनुभव आहे. कारण सत्याला जीवनाचा आधार नसला की प्रतिभा अंधारातील आरशाप्रमाणे निरुपयोगी ठरते. मग कितीही प्रयत्न करून त्यात प्रतिबिंब दिसत नाही आणि कल्पकता निर्बळ होते. अगदी पंखविरहित पाखराप्रमाणे. मी तरी अशी भरारी मारण्यात भलताच जड आहे. जशी प्रतिभेला वास्तवाची गरज भासते, तद्वत कल्पकतेलाही जीवनाचे पंख असणे आवश्यक असते आणि अनुभूतीला सहानुभूतीची जोड नसेल, तर आपण का लिहितो याचा पत्ताच लागणे शक्य नाही.' म्हणजेच अण्णाभाऊंनी वास्तव जीवन आणि त्यातून निर्माण झालेल्या समस्या समजून घेत आपले लिखाण सिद्ध करण्यासाठी मनोभूमिका तयार केली आहे. सत्य हे त्या लिखाणाचे अधिष्ठान आहे. सत्याकडे, वास्तवाकडे कानाडोळा करून कल्पकतेचे पतंग उडवू नयेत अशी अण्णाभाऊंची स्पष्ट धारणा आहे. त्याच्या विविध साहित्यकृतींतून हीच धारणा समोर येत असते.
 
 
'वैजयंता' कादंबरीच्या प्रस्तावनेत अण्णाभाऊंनी म्हटले आहे की 'जो कलावंत जनतेची कदर करतो, त्याचीच जनता कदर करते. मी प्रथम शिकून नंतर लेखन करत असतो. माझा माझ्या देशावर, जनतेवर नि तिच्या संघर्षावर अढळ विश्वास आहे. हा देश सुखी, समृद्ध व्हावा, इथे समता नांदावी, या महाराष्ट्रभूमीचे नंदनवन व्हावे अशी मला दररोज स्वप्ने पडत असतात. ती मंगल स्वप्ने पाहात पाहात मी लिहीत असतो. केवळ कल्पकतेचे कृत्रिम डोळे लावून जीवनातील सत्य दिसत नाही. ते सत्य हृदयाने मिळवावे लागते.' लेखक म्हणून अण्णाभाऊंनी कोणत्या मार्गांनी आपला प्रवास केला, याची स्पष्ट दिशा दाखवणारे वरील विधान आहे. अण्णाभाऊ स्वत:ला निर्मनुष्य बेटावर न ठेवता माणसाच्या गलक्यात ठेवतात. काही तज्ज्ञाच्या मते उत्तम साहित्यनिर्मितीसाठी शांतता आवश्यक असते. अण्णा भाऊ साठे याला अपवाद आहेत. कायम माणसांच्या गर्दीत राहून त्या कोलाहलातून साहित्यनिर्मितीची बीजे शोधण्याचे काम अण्णाभाऊंनी केले आहे आणि हे काम करताना सुख, समृद्धीची स्वप्ने पाहिली आहेत. हा देश सुखी व्हावा, पर्यायाने माणूस सुखी व्हावा ही त्यांची तळमळ आहे आणि तीच त्यांची प्रेरणाही आहे. म्हणूनच ते कल्पकतेपेक्षा वास्तवाला, कृत्रिमतेपेक्षा हृदयाच्या हाकेला अधिक महत्त्व देतात.
 
 
'वैर' कांदबरीच्या प्रस्तावनेत अण्णाभाऊ म्हणतात, 'जुन्या चालीरिती दूर कराव्या आणि जुन्या पण लोप पावलेल्या प्रगत प्रथांना पुन्हा पुढे आणावं, हेवेदावे, दुष्टावे, वैर यांचा घोर परिणाम दाखवावा आणि या नवमहाराष्ट्रात प्रेम, सलोखा, यांची वाढ व्हावी, जनता सुखी संपन्न व्हावी आणि महाराष्ट्रात विषमता नष्ट झालेली नि समाजसत्तावादाचा अरुणोदय झालेला आपण पाहावा, अशी श्रद्धा हृदयात घेऊन मी लिहितो.' अण्णा भाऊ साठे यांच्या वरील वाक्यातून आधुनिक काळातील तथागत बोलत आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. समाजातील वैरभाव लयाला जावा आणि प्रेम, सलोखा यांची वृद्धी व्हावी, ही तळमळ केवळ संवेदनशील मनातच जागू शकते आणि त्या तळमळीने समाजातील वैर संपावे यासाठी आदर्श उभे केले जातात. वैराचा घोर परिणाम दाखवून देण्यासाठी अण्णाभाऊंनी आपली लेखणी पणाला लावली आहे. समाज दोषमुक्त, द्वेषमुक्त व्हायला हवा आणि प्रत्येकाला स्वत:चा विकास करून घेण्याची समान संधी उपलब्ध व्हावी, ही अण्णाभाऊंची तळमळ आहे. त्यासाठी अण्णाभाऊ लेखन करतात. अण्णाभाऊंच्या लेखनाच्या प्रेरणा या परिवर्तनाच्या प्रेरणा आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे.
 
 
'बरबाद्या कंजारी' या आपल्या पहिल्या कथासंग्रहाच्या प्रस्तावनेत अण्णाभाऊंनी म्हटले आहे की, 'माझी जीवनावर फार निष्ठा असून मला माणसं फार आवडतात. त्यांची श्रमशक्ती महान आहे. ती जगतात, जगाला जगवतात, त्यांच्या बळावरच हे जग चालतं. त्यांची झुंज आणि त्यांचं यश यावर माझा विश्वास आहे. त्यांना विद्रूप करणं मला आवडत नाही. नव्हे, मला भीती वाटते... माणसांना वैफल्याच्या नावाखाली विद्रूप करू नये असं माझं मत आहे. वैफल्य हे तलवारीवरील धुळीसारखं असतं. ती धुळ झटकून तलवार लखलखीत करता येते. मी जे जीवन जगतो, पाहतो, अनुभवतो, तेच मी लिहितो. मला कल्पनेचे पंख लावून भरारी मारता येत नाही.' अण्णाभाऊ धूळ आणि धार यांच्या आधाराने मानवी जीवन धुळीत मिळालेले नव्हे, तर धारदार असले पाहिजे असे सांगतात. ही धार श्रमाने आणि वास्तवाशी दोन हात करून मिळणार आहे यावर त्यांचा ठाम विश्वास आहे आणि म्हणूनच ते वास्तवाचे चित्रण करतात. जगताना संघर्ष अटळ असला, तरी तो मानवी जीवनात वैफल्य निर्माण करणारा नसावा. वैफल्याचे प्रदर्शन मांडून जीवनाला विद्रूप करण्यापेक्षा वैफल्य दूर करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न झाले पाहिजेत, अशी त्यांची भूमिका आहे.
 

seva_1  H x W:  
'आवडी' कांदबरीच्या प्रस्तावनेत अण्णाभाऊ म्हणतात, 'मी जे जीवन जगत आहे नि जे मी अनुभवले आहे, तेच मी लिहितो. वास्तवाला फाजिल महत्त्व देणारा म्हणून काही मित्र माझ्यावर रागवतात. पण मी त्यांचा राग मानत नाही नि आपला खाक्या बदलत नाही. वास्तव आणि कल्पकता यांचा मेळ कसा घालावा हा एक प्रश्न माझ्यापुढे उभा असतो. माझी माणसं मला कुठं ना कुठं भेटलेली असतात. त्यांचं जगणं, मरणं मला ठाऊक असतं.' जगण्यातील रसरशीतपणा टिपण्यासाठी वास्तवाचा स्वीकार करावा लागतो आणि वास्तवाच्या खडकाला धडका देऊन तो खडक फोडावा लागतो. त्यासाठी कलात्मकता कामी येत नाही, हे अण्णाभाऊंनी अनुभवले होते. त्यामुळे जे पाहिले, अनुभवले तेच त्यांना लेखनास प्रवृत्त करणारे ठरले. आपल्या माणसांना जसे पाहिले, तसेच साकार करताना अण्णाभाऊं वास्तवाचा विसर पडू देत नाहीत. हे वास्तव बदलले पाहिजे ही एक प्रेरणा कायम मनात जागृत असल्यामुळेच अण्णाभाऊ वास्तववादी जीवनाचा सर्वांगांनी वेध घेणारे साहित्य निर्माण करू शकले.
 
 
अज्ञान, दारिद्र्य, विषमता, अंधश्रद्धा, अनारोग्य, व्यसन, दुही, दंभ, इर्षा, मत्सर, असूया, अहंकार, भूक या साऱ्याचे माणसाच्या जीवनावर होणारे परिणाम अण्णाभाऊंनी टिपकागदासारखे टिपले आहेत. मानवनिर्मित समस्या आणि निसर्गाचे प्रहार यामध्ये तग धरून राहण्याची प्रेरणा अण्णाभाऊंना लेखनाची प्रेरणा मिळवून देते, तर परिस्थिती बदलण्यासाठी आवश्यक संघर्ष केला पाहिजे, मात्र संघर्ष हा स्थायिभाव होणार नाही यांची दक्षता अण्णा भाऊ साठे घेताना दिसतात. म्हणूनच अण्णा भाऊ साठेंच्या साहित्यात आपणाला लढणारी झुंझार माणसे दिसतात. पण तो लढाला बाणा हा केवळ परिस्थिती बदलासाठी आहे. परिस्थिती बदलली की सर्वांनाच समान पातळीवरचे जीवन जगण्याची इच्छा आहे.
 
 
अण्णाभाऊंच्या लेखनाच्या प्रेरणा समजून घेण्यासाठी त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू असलेल्या माणसाला समजून घेतले पाहिजे. कारण अण्णाभाऊंनी या माणसांना अनुभवले आणि मगच त्यांना आपल्या साहित्यातून प्रकट केले. माणसाबाबतचा अपार कळवळा प्रकट करताना त्यांना जात, धर्म, व्यवसाय यांची आडकाठी आलेली नाही. मानवी जीवनातील सर्व भेदांच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून जगता येईल असे शाश्वत जग निर्माण व्हावे, अशी अण्णाभाऊंची तळमळ होती आणि या तळमळीने अण्णाभाऊंना सदैव लिहिते ठेवले. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील हा माणुसकीचा झरा चिरंतन आहे. काळाचे संदर्भ बदलले, तरीही त्यांची शाश्वतता कमी होत नाही, कारण ते साहित्य काळजाच्या तळातून जन्मला आले आहे.
 
 
अण्णाभाऊंनी ज्या संवेदनेतून साहित्यनिर्मिती केली, त्यांचे मूल्यमापन करताना बाबूराव गुरव यांनी नोंदवलेले निरीक्षण खूप महत्त्वाचे आहे. गुरव म्हणतात - 'अण्णा भाऊ साठे हे सामाजिक बांधिलकी मानणारे जीवनसन्मुख साहित्यिक आहेत. साहित्य हे समाजपरिवर्तनाचे प्रचंड शस्त्र आहे अशी त्यांची स्वच्छ भूमिका आहे. ही धारणा त्यांना कम्युनिस्ट चळवळीच्या सहभागातून मिळालेली नाही, तर साहित्याच्या अंगभूत सामर्थ्याच्या जाणिवेनेच ती त्यांना मिळवून दिली आहे. कम्युनिस्ट चळवळीचा त्यामध्ये असलेला सहभाग तसा फारच अत्यल्प आहे. अण्णाभाऊ हे साहित्य जगणारे जीवनाचे पाईक व जीवन लिहिणारे जातिवंत साहित्यिक होते.'