इथे भारतासमोर दोन प्रकारच्या संधी आहेत. एक म्हणजे इंटरनेट स्टार्टअप्सची पुढची पिढी. ५जी तंत्रज्ञान इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रयोगांसाठी एक नवीन दालन उघडणार आहे. त्याशिवाय दुसरी संधी आहे ती ५जी तंत्रज्ञानासाठी मोठी बाजारपेठ म्हणून उभं राहण्याची. यामुळे पाश्चात्त्य देश हे नवनवीन कल्पनांचं आणि त्यांच्या निर्मिती आणि वापराचं केंद्रस्थान न राहता भारतासारखा एक युवा देश होऊ शकतो.
अलीकडेच जिओ ही रिलायन्सची उपशाखा विविध कारणांमुळे माध्यमांमध्ये चर्चेचा भाग झालेली आहे. यातलं मुख्य कारण म्हणजे गेल्या काही महिन्यात विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी जिओ या कंपनीत गुंतवणूक करणं. गूगल हे या आंतरराष्ट्रीय कंपनांच्या यादीतील अगदी अलीकडचं नाव. गूगलने रिलायन्सच्या जिओ या प्लॅटफॉर्ममध्ये ४.५ अब्ज डॉलर्स ($४.५ बिलियन) एवढी घसघशीत रक्कम गुंतवणार असल्याचं घोषित केलं आणि फक्त भारतीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय माध्यमांचं लक्ष रिलायन्स जिओकडे एका रात्रीतून वळलं. गूगलने ७.७ टक्के मालकीसाठी जिओमध्ये ही रक्कम गुंतवली आहे. याआधी क्वालकॉम, इंटेल आणि फेसबुक यासारख्या मोठ्या कंपन्यांनीसुद्धा जिओमध्ये अशा प्रकारची गुंतवणूक केलेली आहे. फेसबुकने केलेली गुंतवणूक तर गूगलपेक्षाही जास्त आहे. या सर्व गुंतवणुकीमुळे अर्थातच जिओ हे गेल्या काही महिन्यांत तंत्रज्ञानाशी संबंधित बातम्यांमध्ये अव्वल स्थानावर आहे. पण त्याहीशिवाय आणखी एक गोष्ट आहे, जिच्या संदर्भात जिओचं नाव माध्यमांमध्ये सतत येतंय आणि ते म्हणजे रिलायन्स जिओची ५जी या तंत्रज्ञानात सुरू असलेली घोडदौड.अर्थात जिओ ही ५जीवर काम करणारी भारतातली एकमात्र कंपनी नाहीये. उलट एअरटेल, वोडाफोन आयडिया या टेलिकॉम ऑपरेटर कंपन्यांनी सरकारकडे रिलायन्ससारखंच ५जीच्या स्पेक्ट्रम साठी प्रस्ताव देऊन ठेवलेला आहे. सरकार ने हे प्रस्ताव मागवून पण आता बराच काळ लोटलेला आहे. पण जिओ आणि बाकीच्या कंपन्यांमध्ये असलेला मोठा फरक म्हणजे जिथे बाकीचे टेलिकॉम ऑपरेटर या हुआवे, झेडटीइ, नोकिया यासारख्या तंत्रज्ञानातल्या विदेशी कंपन्यांना घेऊन हा प्रस्ताव सादर करत आहेत, तिथेच जिओ स्वतःला भारतातील पहिलं स्वयंपूर्ण ५जी नेटवर्क प्रोव्हायडर म्हणवून घेण्याचा प्रयत्न करतोय. एवढंच नाही, तर जिओची अमेरिकेत असलेली शाखा लौकरच अमेरिकेत ५जी तंत्रज्ञानाच्या काही टेस्ट्स सुरू करणार असल्याची घोषणा जिओने केलेली आहे. अर्थात तुम्ही जर नीट लक्ष घालून अभ्यास केला, तर असं लक्षात येतं की जिओबरोबरसुद्धा सॅमसंग ही कोरियन कंपनी उभी आहे. तरी बाकी कित्येक नेटवर्क ऑपरेटर्सना ज्या प्रकारे चिनी कंपन्यांच्या भरवशावर ५जीचे प्रस्ताव भारत सरकारकडे सादर करावे लागत आहेत, तशी रिलायन्सची परिस्थिती नाहीये आणि म्हणूनच रिलायन्स जिओ याक्षणी तरी या शर्यतीत पहिल्या स्थानावर आहे असं वाटतंय. आणि हे एका अर्थाने चांगलं आणि वाईट दोन्हीही आहे.
चांगलं यासाठी कारण पहिल्यांदाच भारताच्या कुठल्या तंत्रज्ञानाच्या कंपनीवर जगभरातले मोठे मोठे टेकनॉलॉजी जायन्ट्स आपला पैसा लावताहेत. त्यामुळे 'आत्मनिर्भर' होण्याच्या भारताच्या संकल्पासाठी ५जी ही एक सुवर्णसंधी असू शकते. पण यात वाईट गोष्ट ही आहे की ५जी तंत्रज्ञानाची ही शर्यत फार लवकर मोनोपॉलीच्या - अर्थात एकाधिकारशाहीच्या रस्त्याकडे वळत असल्याची चिन्ह दिसत आहेत. अगदी सोपं उदाहरण द्यायचं तर तुम्ही एक साधा गूगल शोध घ्या - '५जी इन इंडिया.' पहिल्या दहा बातम्यांपैकी दहाच्या दहा बातम्यांमध्ये रिलायन्स जिओचं नाव असेल, पण त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांचा उल्लेख मात्र अगदी मोजून दोन किंवा तीन बातम्यांमध्ये सापडेल, तोसुद्धा 'ऑल्सो रॅन' म्हणूनच. यामागे कारण आहे ते भरभक्कम सूट देऊन जिओने उभा केलेला वापरकर्त्यांच्या समूह. ज्या प्रकारे जिओने या मार्केटमध्ये आल्या आल्या पैसे अक्षरशः ओतले, त्यामुळे इतर दूरसंचार कंपन्यांना आपला गाशा गुंडाळायची वेळ आली. त्यामुळे जिथे वोडाफोन आयडियासारखी सक्तीची सोबत बघायला मिळाली, त्याचप्रमाणे भारती एअरटेलसारख्या कंपनीला भरमसाठ कर्जाच्या डोंगराच्या खाली जातानासुद्धा बघायची वेळ आपल्यावर आली आहे. त्यामुळे ५जीसारख्या नवीन तंत्रज्ञानात ज्या प्रकारची गुंतवणूक करायची गरज आहे, तशी गुंतवणूक करणं जिओ सोडून अजून कुठल्या नेटवर्क ऑपरेटरला शक्य होईल हा प्रश्नच आहे.५जी म्हणजे नेमकं काय?
५जी - अर्थात ५th Generation नेटवर्क ही मोबाइल अर्थात सेलफोन तंत्रज्ञानाची पाचवी पिढी आहे. ऐंशीच्या सुरुवातीच्या दशकात जपानची NTT नावाची कंपनी नेटवर्क आणि टेलिफोनच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणत होती. ही क्रांती होती सेल्युलर नेटवर्क वापरून वायरलेस फोन बाजारात आणणे. थोड्याच काळात मोटोरोला ही अमेरिकन कंपनीसुद्धा या स्पर्धेत उतरली. काय वेगळं होतं या तंत्रज्ञानात? हे तंत्रज्ञान एका मोठ्या क्षेत्रफळाला छोट्या छोट्या कप्प्यांमध्ये - अर्थात 'सेल'मध्ये विभाजित करतं. या सेलमधल्या रेडियो अँटेनांशी रेडियो आवृत्ती अर्थात फ्रीक्वेन्सीवरून मग मोबाइल फोन्स जोडले जातात. परत सेल या एकमेकांशी रेडियो फ्रीक्वेन्सी किंवा केबलद्वारा जोडल्या गेलेल्या असतात. मोबाइल फोन्सना 'सेल्युलर फोन' म्हणण्याचं कारण हेच आहे. मोबाइल फोन नेटवर्कच्या पहिल्या पिढीत बऱ्याच त्रुटी असल्या, तरीही ह्या पहिल्या पिढीच्या मोबाइल फोन्सनी जगभरात जवळजवळ अडीच ते तीन कोटीपेक्षा जास्त ग्राहक मिळवले होते. नव्वदच्या दशकात सेल्युलर नेटवर्कची दुसरी पिढी आली, ज्यात नेटवर्क सिग्नल ऍनालॉगऐवजी डिजिटल रूपात प्रक्षेपित करण्यात येत असत. नेटवर्क सिग्नल डिजिटल केल्याने दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या - पहिली म्हणजे डिजिटल रूपात सिग्नल पाठवत असल्याने संभाषणाची गुणवत्ता कैकपटींनी सुधारली. दुसरी म्हणजे डिजिटल सिग्नल्स असल्याने फक्त बोलणं एवढंच संभाषणाचं माध्यम न उरता, बाकीच्या माध्यमातूनसुद्धा संभाषण करता येणं शक्य झालं. मग यातून मल्टिमीडिया अर्थात छोट्या आकाराचे फोटो किंवा मीडिया फाइल पाठवणं जास्त सोयीचे झालं. मग MMSची क्रांती आली. पण यात एक प्रॉब्लेम होता - विविध प्रकारे डिजिटल डेटा पाठवणं शक्य असलं, तरी ते पाठवण्याची गती अर्थात डेटा स्पीड मात्र फारच कमी होती. अगदी पहिल्या २जी तंत्रज्ञानात तर ही स्पीड १०kbps इतकी कमी होती. पुढे GPRS आणि EDGEमुळे ही स्पीड ५००kbpsपर्यंत गेली, तरी कुठलाही मोठा डेटा अर्थात फाइल्स पाठवणं किंवा अगदी एखादी इंटरनेट साइट उघडणं अशा कामांसाठीसुद्धा ही गती पुरेशी नव्हती.
सन २०००च्या सुमारास तिसऱ्या पिढी अर्थात ३जीबरोबरच दोन गोष्टी घडल्या. एक म्हणजे सेलफोन आणि नेटवर्कची उपकरणं बनवणाऱ्यांमध्ये आलेलं मानकीकरण, ज्यामुळे रोमिंग कॉल्ससारख्या सुविधा सोप्या आणि खिशाला परवडणाऱ्या झाल्या. आणि दुसरं म्हणजे पॅकेट स्विचिंग, ज्यामुळे डेटा स्पीड कैक पटींनी वाढली. ३जीमुळे पहिल्यांदा इंटरनेटवरून फोन कॉल्स करणं (आठवा - स्काइप) किंवा इंटरनेटवर फेरफटका मारणं खूपच सोपं झालं. ३जीने पहिल्यांदा इंटरनेटला सेल्युलर नेटवर्कद्वारा एक फार मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचवलं. पण ज्या गतीने डेटा नेटवर्कचं तंत्रज्ञान बदलत होतं, त्याच्या दुप्पट गतीने इंटरनेटचं साम्राज्य विस्तारत होतं. हा काळ होता सोशल मीडियाच्या सुरुवातीचा. एकाएकी फेसबुक, ट्विटर, यूट्यूब अशा कित्येक कंपन्या लोकप्रिय झालेल्या होत्या, ज्यांना त्या काळाच्या मानाने अपरिमित डेटा स्पीडची गरज पडायची. अर्थात ब्रॉडबँड सेवा वापरून ह्या वेबसाइट्सना भेट देता येणं शक्य होतं, पण जगातल्या एका मोठ्या विकसनशील लोकसंख्येचा इंटरनेटशी संबंध पहिल्यांदा सेल्युलर नेटवर्कमुळे आलेला होता. आणि म्हणूनच ३जी जितक्या लौकर आलं, तितक्याच लौकर ते तंत्रज्ञान जुनं आणि अपुरंही वाटायला लागलं. म्हणून गरज भासू लागली याच्या पुढच्या पिढीची, अर्थात ४जीची.
सुरुवातीच्या काळात भारतातलं मोबाइल तंत्रज्ञान जगाच्या किमान एक पिढी तरी मागे असायचं. पण ४जी येईपर्यंत हे चित्र मात्र बऱ्यापैकी बदललं. याचं कारण होतं भारतातली एक खूप मोठी लोकसंख्या पहिल्यांदा मोबाइल तंत्रज्ञानामुळे इंटरनेटशी जोडली गेली. त्याचबरोबर जगभरातही इंटरनेट सेवा जास्त प्रगत होत होत्या. त्यामुळे त्यांना लागणारी डेटाची गरजसुद्धा कैक पटींनी वाढत होती. २०१०च्या दशकात व्हॉट्स ऍप आलं, इन्स्टाग्राम आलं, नेटफ्लिक्स प्राइमसारख्या इंटरनेट स्ट्रीमिंग सेवा आल्या. व्हिडियो कॉल्स कैक पटींनी वाढले आणि आपल्याला कितीही आवडो अथवा न आवडो, पण टिकटॉकसारख्या सेवांनीसुद्धा लोकसंख्येच्या एका मोठ्या भागाला स्वतःकडे आकर्षित केलं. यामुळे ज्या प्रकारे इंटरनेट स्पीडची गरज वाढू लागली, त्याच प्रकारे इंटरनेट वापरणाऱ्या लोकांची संख्याही वाढायला लागली.तंत्रज्ञानातील आणखी एक नवीन गोष्ट गेल्या चार ते पाच वर्षांत झपाट्याने आपल्या दैनंदिन आयुष्यात शिरकाव करतेय. फक्त हा शिरकाव इतक्या जलद गतीने होतोय की त्याचा खरा प्रभाव अजून आपल्याला लक्षात आलेला नाहीये. हे नवीन तंत्रज्ञान म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्ज. दोन-तीन वर्षांपूर्वी आपल्याला 'अलेक्सा' हे नाव तरी माहीत होतं का? आज मराठीत अलेक्सावर सररास जोक्स नुसते तयार होत नाहीयेत, तर सोशल मीडियावर फार लोकप्रियही होताहेत. अलेक्सा हे एक प्रोडक्ट झालं, पण अशा प्रकारे हळूहळू व्हॉइस कमांड अर्थात फक्त आवाजी सूचनांनी सुरू होणारे घरचे दिवे असोत किंवा तुम्ही-आम्ही दिवसभर हातात मिरवणारे फिटबीटसारखे हेल्थ ट्रॅकर असोत, हे सगळे इंटरनेट ऑफ थिंग्जचेच उपप्रकार आहेत. आणि यातल्या सर्व उपकरणांना आंतरजालाशी संपर्कात राहणं आवश्यक आहे. म्हणजेच आधी घरटी एक कॉम्प्युटर असा जो इंटरनेटचा वापर असायचा, तो हळूहळू २०१०च्या सुमारास प्रतिव्यक्ती एक कॉम्प्युटर (अर्थात मोबाइल फोन) इथपर्यंत आला. आणि पुढच्या ५ वर्षांत घरातल्या आणि आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक उपकरणांपर्यंत पोहोचणार आहे. माझ्या जर्मनीतल्या घरात आजच घरातले दिवे, टीव्ही, साफसफाई करणारा व्हॅक्यूम क्लीनर रोबॉट, अलेक्सा, फिटनेस किंवा हेल्थ ट्रॅकर, पुस्तक वाचायला किंडल अशी नानाविध उपकरणं इंटरनेटला जोडलेली आहेत. भारतातसुद्धा कित्येक घरांमध्ये यातली बरीच साधनं अगोदरच जाऊन पोचलेली आहेत आणि त्यामुळेच ४जी येतंय न येतंय, तेवढ्यातच ते वाढलेल्या मागणीला पुरे पडेनासं होऊ लागलं.
पण ५जी येणार म्हणजे नक्की काय होणार? तुम्ही असा विचार करा की तुम्ही नवीन बांधून झालेल्या एका बिल्डिंगमध्ये घर घेतलंय. तुम्ही तिथे इतक्यातच राहायला गेलाय. त्या बिल्डिंगमधले सगळे फ्लॅट्स अजून भरलेले नाहीयेत. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता नाहीये. रोज भरपूर पाणी येतंय, तुम्ही छान तास तासभर शॉवरखाली आंघोळ करताय. मग हळूहळू एक एक घर भरू लागतं. पाण्याची टाकी सगळ्यांना अपुरी पडू लागते. तुमचं शॉवरच्या पाण्याचा दाब कमी झालाय आणि एक तासाऐवजी तुम्हाला कसंबसं १५ मिनिटं शॉवरखाली उभं राहायला मिळतंय. बस. हेच हळूहळू ४जी या तंत्रज्ञानाबरोबर होतंय. आता विचार करा की बिल्डिंगच्या कार्यकारिणीने आणखी एक टाकी बसवायचा निर्णय घेतला आणि त्यातून एक खास पाइपलाइन तुमच्या घराला जोडून दिली तर जो फायदा तुम्हाला होईल, तोच फायदा ५जी आल्याने सर्वसामान्य जनतेला होणार आहे. तांत्रिकदृष्ट्या सांगायचं झाल्यास ५जीमुळे इंटरनेटची स्पीड १०जीबीपीएस अर्थात १० जीबी प्रतिसेकेंदपर्यंत वर जाऊ शकते. अर्थात ही वरची मर्यादा असून एवढी गती मिळेलच अशातला भाग नाही, तरीही ५जी तंत्रज्ञानामुळे इंटरनेटची गती ४जीच्या तुलनेत कैक पटींनी वाढेल, हे मात्र खरंय.
यातून एका नव्या संधीचं सूतोवाच होतंय, ते म्हणजे ५जी तंत्रज्ञान वापरून पुढच्या काळात घडणाऱ्या इनोव्हेशन आणि नवीन शोधांचं. इथे भारतासमोर दोन प्रकारच्या संधी आहेत. एक म्हणजे इंटरनेट स्टार्टअप्सची पुढची पिढी. ५जी तंत्रज्ञान इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रयोगांसाठी एक नवीन दालन उघडणार आहे. मशीन लर्निंगच्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात एक मोठा अडथळा म्हणजे मोठ्या प्रमाणावर सतत डेटा मिळवणं. ५जीमुळे हा डेटा प्रसारित करणं तुलनेने बरेच सोपं होईल. त्यामुळे मग एज डिव्हाइसेस वापरून या माहितीचं संकलन जास्त सुकरतेने करता येईल. शिक्षण आणि वैद्यकीय या क्षेत्रांत याचा मोठा फायदा होण्याचा संभव आहे. त्याशिवाय दुसरी संधी आहे ती ५जी तंत्रज्ञानासाठी मोठी बाजारपेठ म्हणून उभं राहण्याची. यामुळे पाश्चात्त्य देश हे नवनवीन कल्पनांचं आणि त्यांच्या निर्मिती आणि वापराचं केंद्रस्थान न राहता भारतासारखा एक युवा देश होऊ शकतो.कुठल्याही नवीन तंत्रज्ञानाचा जर एखाद्या राष्ट्राने नीट समजून उमजून उपयोग केला, तर त्या राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक घटकांना त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा होतो, हे गेल्या कितीतरी शतकांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे. अगदी औद्योगिक क्रांतीपर्यंत मागे जायचीसुद्धा गरज नाहीए, भारताचंच उदाहरण घ्यायचं झालं, तरी गेल्या दोन दशकात ज्या प्रकारे भारताने माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीवर आरूढ होऊन जी घोडदौड आरंभली आौऔहे, ती निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. आणि म्हणूनच भारत या मोबाइल तंत्रज्ञानातल्या नवीन पिढीला कशा प्रकारे वापरतो, यावर पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्या होणाऱ्या आर्थिक विकासाची पायाभरणी होईल.