योद्धे पत्रकार लोकमान्य टिळक

विवेक मराठी    23-Jul-2020
Total Views |
 सामान्य माणसाला शक्ती देण्याचे काम जर कुणी त्या काळात केले असेल, तर ते लोकमान्यांनी. लोकमान्यांनी त्याला बोलके केले. त्याला आवाज दिला. इंग्रजांसमोर उभे राहण्याचे बळ अंगी दिले. अरे ला का रे करण्याचे सामर्थ्य दिले. त्याला कायदे सांगितले आणि ते कोणासाठी आहेत तेही सांगितले. त्याला त्याच्या विश्वातून त्यांनी बाहेर काढले आणि त्याला आपण कोठे आहोत याची जाणीव दिली. आमच्यावर राज्य करणारे तुम्ही कोण? हे ब्रिटिशांना विचारायचे धाडस त्यांनी या जनसामान्याला दिले आणि तीच त्यांची त्या महासागराला सर्वात मोठी देणगी होती. 


 Warrior Lokmanya_1  

लोकमान्य टिळक हे प्राय: अतिशय विद्वान आणि गरज म्हणून राजकारणी होते, असे मत प्रख्यात तत्त्ववेत्ते आणि माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी व्यक्त केले आहे.

लोकमान्य टिळक यांचे व्यक्तिमत्त्व बहुव्याप्त होते. कोणतेही असे एक क्षेत्र नाही, ज्यावर टिळकांनी आपला प्रभाव पाडला नाही. ते राजकारणी तर होतेच होते, तसेच ते तत्त्वज्ञ होते, गीतेचे भाष्यकार होते, उत्तम गणिती होते, शिक्षणतज्ज्ञ होते, इतिहासकार होते, ते कृषी अर्थतज्ज्ञ होते, ते खगोलशास्त्रज्ञ होते, ते कायदेपंडित होते, ते कामगारांचे नेते होते, स्वातंत्र्यसेनानी होते, ते आधुनिक भारताचे शिल्पकार होते, ते असंतोषाचे जनक होते. इतक्या क्षेत्रांवर एकाच वेळी प्रभाव पाडणारा महामानव म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले पाहिजे. टिळक हे गरज म्हणून राजकारणी असले, तरी ते आवश्यकता म्हणून पत्रकार नव्हते. पत्रकारिता ही त्यांच्या अंगी उपजत होती आणि जनसामान्यांसाठी या पत्रकारितेचा उपयोग करायची प्रेरणा त्यांना त्या काळच्या परिस्थितीमुळे मिळालेली होती. हा जनसामान्य स्वातंत्र्योत्सुक होता. त्याला स्वत:चे राज्य म्हणजेच स्वराज्य हवे होते, मात्र त्याच्याकडे ते मागण्याची ताकद नव्हती. सामान्य माणूस कसा असतो तसाच तो होता. त्याला ती शक्ती देण्याचे काम जर कुणी त्या काळात केले असेल, तर ते लोकमान्यांनी. लोकमान्यांनी त्याला बोलके केले. त्याला आवाज दिला. इंग्रजांसमोर उभे राहण्याचे बळ अंगी दिले. अरे ला का रे करण्याचे सामर्थ्य दिले. त्याला कायदे सांगितले आणि ते कोणासाठी आहेत तेही सांगितले. त्याला त्याच्या विश्वातून त्यांनी बाहेर काढले आणि त्याला आपण कोठे आहोत याची जाणीव दिली. आमच्यावर राज्य करणारे तुम्ही कोण? हे ब्रिटिशांना विचारायचे धाडस त्यांनी या जनसामान्याला दिले आणि तीच त्यांची त्या महासागराला सर्वात मोठी देणगी होती.

टिळकांना सद्य:स्थितीतली उदाहरणे देण्याची हौस होती, त्यासाठी त्यांनी इंग्लिश आणि मराठी भाषांना आपल्या सोबतीला घेतले आणि ते पत्रकार बनले. १८८१मध्ये केसरी मराठीमध्ये आणि मराठा इंग्लिशमध्ये प्रसिद्ध करण्यामागे त्यांना भारतीय समाजमनाची पकड घ्यायची होती. एकाच वेळी अल्पशिक्षित आणि शिकलेल्या समाजाला आपल्याबरोबर घेऊन ते पुढे जाऊ इच्छित होते. त्यांच्यात कामाची उपजत ऊर्जा होती आणि समाजमनावर त्यांची जबर पकड होती. मुंबईत काँग्रेस पक्षाचे अधिवेशन भरणार असता केसरीचे जादा अंक तयार करण्याचे काम त्यांनी मनावर घेऊन केले, तेव्हा त्यांनीच आपल्या स्नेह्यांना सांगितल्याप्रमाणे ते खुर्चीवर सलग ३६ तास बसून काम करत होते. अशी उत्स्फूर्तता सापडणे अतिशय दुर्मीळ आहे. सिंहगडावर जेव्हा त्यांनी 'आर्यांचे मूलस्थान' लिहायला घेतले, तेव्हा ते दोन प्रहरी लिहायला बसले की रात्रीच्या जेवणापर्यंत ते उठायचे नाहीत. केसरीसाठी अग्रलेखाचा कोणताही मजकूर हाताने लिहायचा मात्र त्यांना कंटाळा असे. तोंडी मजकूर सांगायचा आणि लेखनिकाकडून तो पूर्ण झाला की त्यात दुरुस्त्या करून तो कंपोझिंगला देण्याची त्यांची पद्धत असे. पण मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांना गीतारहस्यसारखा पांडित्यपूर्ण ग्रंथ साध्या शिसपेन्सिलीने लिहावा लागला. गीतारहस्यच्या लिहिलेल्या वह्या मंडालेहून ते आले तरी इंग्रजांकडून परत केल्या जाईनात, हे पाहून त्यांना विचारण्यात आले की, जर या वह्या इंग्रजांनी परतच केल्या नाहीत तर तुम्ही काय कराल? तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर त्यांच्यातल्या प्रचंड आत्मविश्वासाचे द्योतक मानावे लागेल. ते म्हणाले की, "मी एक महिना सुट्टी काढून सिंहगडावर जाईन आणि सगळा ग्रंथ परत लिहून काढीन." प्रखर बुद्धिमत्ता, अफाट स्मरणशक्ती आणि तिच्याबद्दलचा जबरदस्त आत्मविश्वास त्यांच्यापाशी असल्यानेच हे शक्य होते.

टिळक आणि खटले तसेच शिक्षा यांचे नाते त्यांच्या पत्रकारितेच्या प्रारंभापासूनच जुळलेले आहे. टिळकांनी जेव्हा वर्तमानपत्र काढायचे ठरवले, तेव्हा त्यांना त्या काळच्या सरकारची आपल्यावर करडी नजर राहणार याची कल्पना होतीच होती. ज्याला सामाजिक काम करायचे आहे त्याला तुरुंगवास हाही ठरलेलाच होता. उगाचच सरकार पक्षाची तळी उचलून या देशात रेल्वे आली - वाहवा, त्यांनी तारायंत्रे आणली - वाहवा, त्यांनी दळणवळण आणले - वाहवा.. असे करून त्यांची फक्त स्तुती करणारी अनेक पत्रे त्या काळातही होती. त्यांचे तेवढेच काम होते. मराठीतही जी काही मोजकी मंडळी या क्षेत्रात आली, त्यांनी हेच गुणगान चालू ठेवलेले होते. शिवाय काठीला सोने लटकवून तुम्ही काशीपर्यंत बिनबोभाट जाऊ शकता हेही पुन्हा सांगितले जात असे. टिळकांना हे अमान्य होते असे नाही, पण ब्रिटिशांनी या देशातून सोनेनाणे आणि जडजवाहीर यांना किती लुटून नेले हे सांगणारी मंडळी तेव्हा खूपच थोडी होती. टिळक हे त्यात होते. स्वदेशाभिमान, स्वाभिमान, स्वत्त्वशीलता आणि समाजाभिमुखता अंगी बाणवून स्वराज्यासाठी जनजागृती करण्याचे काम आपल्याला करायचे आहे, हा ध्येयवाद टिळक आणि आगरकर यांनी ठेवूनच वृत्तपत्राची आखणी केली. २ जानेवारी १८८१ रोजी मराठा हे इंग्लिश वृत्तपत्र, तर ४ जानेवारी १८८१ रोजी केसरी अशी ही दोन्ही भावंडे प्रकाशात आली. त्या आधी या वृत्तपत्राची पायाभरणी म्हणून त्यांनी १८८०मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी 'शालापत्रक' मासिकाच्या जानेवारी १८७२च्या अंकात 'शिक्षकाचे काम' या शीर्षकाने एक लेख लिहिला होता. त्यात त्यांनी ‘हल्ली विद्योचा फार फैलाव झाला, व अभिरुची वाढली असे वाटते, पण ती भ्रांति आहे. केवळ सरकारी चाकरीच्या लोभानेच आमचे लोक विद्या शिकतात, त्यांना विद्येचे व्यसनच काय, पण साधारण आवडही नसते’ असे म्हटले होते. पूर्वी गुरूंविषयी शिष्याच्या मनात पूज्य बुद्धी असे, हल्ली ती नाही, असेही त्यांनी त्यात म्हटले होते. पेरिक्लिस, अलकिबायडेज, सिकंदर वगैरे पुरुषांना देशकार्य करण्यास त्यांचे विद्यादाते गुरूच कारणीभूत झाले, असेही शास्त्रीबोवांनी त्यात लिहिले. टिळक काय किंवा आगरकर काय, त्यांनी हा लेख वाचला असेल यात शंकाच नाही. निबंधमालेमुळे शास्त्रीबोवांचा लौकिक वाढला होता. चिपळूणकर पुण्यात येण्यापूर्वी दोन खासगी शाळा चालू झालेल्या होत्या. त्यापैकी एक शाळा बाबा गोखले यांची होती. पण गोखले यांची वकिली चांगली चालल्याने त्यांनी १९७६मध्ये आपली शाळा बंद केली. अखेरीस शास्त्रीबोवा आणि टिळक, आगरकर, तसेच बाळाजी आबाजी भागवत आणि व्यंकटेश बाळाजी करंदीकर यांनी एकत्र येऊन शाळा काढायचे निश्चिात केले. १ जानेवारी १९८० रोजी ही शाळा न्यू इंग्लिश स्कूल म्हणून सुरू झाली. शास्त्रीबोवांनी ‘आमच्या शाळेत शिक्षकांप्रमाणे विद्यार्थ्यांनाही व्यक्तिस्वातंत्र्य राहील आणि दर तासाला हातात छडी घेऊन वर्गांवरून फिरणारा हेडमास्तरही येथे दिसणार नाही, असे जाहीर केले. शिक्षण प्रसार ही टिळकांच्या जीवनात महत्त्वाची पायरी होती. विशेष म्हणजे या शाळेला वर्षभरातच पाचशेपर्यंत विद्यार्थी मिळाले.

शाळेच्या चालकांनी दुसऱ्याच वर्षी 'केसरी' आणि 'मराठा' ही वृत्तपत्रे काढून एक नवा इतिहास निर्माण केला. दुर्दैवाने शास्त्रीबोवा १७ मार्च १८८२ रोजी निवर्तले. म्हणजेच विष्णुशास्त्रींना जेमतेम दोन वर्षेच विद्यादानाचे कार्य करता आले. केसरीचे जे उद्देशपत्र होते, त्यावर टिळक, आगरकर यांच्याखेरीज चिपळूणकर, माधवराव नामजोशी, वा.शि. आपटे आणि गणेश कृष्ण गर्दे यांच्या सह्या होत्या. केसरीच्या अंकात पहिल्या वर्षी चिपळूणकर, आगरकर आणि टिळक यांचे लेख आलटूनपालटून येत असत. त्या वर्षी इंग्रज सरकारवर टीका फारशी आली नाही, तरी राजकीय प्रतिनिधींची - म्हणजेच पॉलिटिकल एजंटांची मात्र खरडपट्टी काढली जात असे. पहिल्या वर्षी केसरीत आणि मराठातही कोल्हापूर संस्थानासंबंधीच्या बातम्या येऊ लागल्या. बडोदे संस्थानासंबंधातही बातम्या येत असत. कोल्हापूरच्या छत्रपती महाराजांविषयीची माहिती त्यांनी प्रसिद्ध केली. ती केसरीत आली, तशी मराठामध्येही आली. कोल्हापूर संस्थानाचे दिवाण माधवराव बर्वे हेच छोट्या महाराजांचा छळ करण्यात अग्रभागी आहेत, हे त्यांना कळले. ज्यांनी ही माहिती त्यांना दिली, त्यांनी सर्व कागदपत्रे त्यांना नंतर देतो असे सांगितले. छोट्या महाराजांना वेडे ठरवून त्यांच्या संपत्ती उकळण्याचाच हा डाव आहे, असे सांगणाऱ्याने त्यांना सांगितले आणि टिळक काय किंवा आगरकर काय, त्यांनी त्या व्यक्तीवर विश्वाास ठेवून ती माहिती प्रसिद्ध केली. नाना भिडे हे कागदपत्रे दाखवणाऱ्या व्यक्तीचे नाव. माधवराव बर्वे यांनी त्या विषयाच्या प्रसिद्धीनंतर केसरी आणि मराठा या पत्रांचे संपादक म्हणून गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांना नोटिस पाठवून त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करण्यात येत असल्याचे त्यात स्पष्ट केले. तो खटला चालला आणि टिळक आणि आगरकर यांना १२० दिवसांची शिक्षा झाली. पण चांगल्या वर्तणुकीमुळे त्यांना १९ दिवसांची सूट मिळून १०१ दिवस डोंगरीच्या तुरुंगात दिवस कंठावे लागले. पत्रकारितेत प्रवेश केल्यानंतरचा हा पहिलाच प्रसंग होता आणि कोणाच्या सांगण्यावर किती विसंबून राहायचे याचे आकलन त्यांना तेव्हा नव्हते. आगरकरांनी त्यावर 'डोंगरीच्या तुरुंगात १०१ दिवस' ही छोटी पुस्तिकाही लिहिली. त्यात त्यांनी ‘तुरुंगात गेल्याबद्दल आम्हाला कधीच वाईट वाटले नाही, पण तिथले अन्न समोर आले की मात्र वाईट वाटे’ असे त्यात लिहिले आहे. या दोघांची वये तेव्हा अवघी २६ वर्षांची होती. दोघांचा हा तसा पहिलाच तुरुंगवास होता. त्यांची वये तरुण होती. डोंगरीतून त्यांची सुटका झाली, तेव्हा त्यांच्या स्वागताला प्रचंड गर्दी झाली होती. खुद्द महात्मा फुले यांनी त्यांच्या स्वागताचे आयोजन केले होते. पुण्याहून अनेक जण तिथे त्यांच्या स्वागताला गेले होते. पुढे टिळक आणि आगरकर यांच्यात वाद उभा राहिला. त्या वादाच्या परिणामी आगरकर यांनी १८८७च्या सुमारास केसरीला रामराम ठोकला. केसरीचे संपादकपद टिळकांकडे आले. त्यानंतर टिळकांची लेखणी अधिक तेजस्वी आणि प्रखर झाली. केसरीचे संपादकपद त्यांनी हाती घेतले आणि त्यांनी आपल्या वृत्तपत्रातून राष्ट्रीय प्रश्नांची अतिशय परखड भाषेत चिकित्सा सुरू केली.
 

Lokmanya Tilak's Ideology 

महाराष्ट्रावर आधी दुष्काळाचे खूपच मोठे संकट आले. त्यानंतर प्लेगसारखी महामारी आली. या दोन्ही संकटसमयी टिळकांनी जनहिताला अधिक प्राधान्य देऊन आपल्या लेखणीला अधिक तेज:पुंज बनवले. १८८५मध्ये टिळकांनी रायगडावरील श्री शिवछत्रपतींच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले. त्यासाठी पन्नास हजारांचा निधी उभा करण्याचे त्यांनी ठरवले. कोल्हापूरच्या शाहूछत्रपती महाराजांनीही आपण योग्य ती रक्कम द्यायला तयार असल्याचे जाहीर केले. १८७६मध्ये महाराष्ट्रावर आलेल्या दुष्काळाच्या संकटापेक्षा त्यानंतरच्या वीस वर्षांनी, म्हणजे १८९६मध्ये दुष्काळाचे महासंकट आले. टिळकांनी दुष्काळ, दुष्काळाचे स्वरूप, दुष्काळाची कारणे असे एकामागोमाग एक अग्रलेख लिहून समाजाला जागे केले. शेतकऱ्यांनी या स्थितीत काय करायला हवे, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी ‘जमिनीच्या साऱ्याची तहकुबी व सूट’ हा अग्रलेख लिहून शेतकऱ्याकडे काही पिकतच नसेल तर तो बिचारा सारा तरी कसा भरणार, असा सवाल केला. त्यांनी ‘जमीन कसणाऱ्या व सर्व जमीनदारांना मिळून दोघांनाही साऱ्याची माफी मिळवायचा अधिकार आहे. मात्र जमीनदाराने आपल्या कुळास त्याचप्रमाणे तहकुबी अगर माफी दिली पाहिजे’, असा आग्रह आपल्या अग्रलेखातून धरला. या वेळी ‘फेमिन कोड’ - दुष्काळाचे नियम सरकारने जाहीर केले. ते शेतकरी समाजाला कळावेत यासाठी त्यांनी त्यांचे भाषांतर करून ते केसरीतून प्रसिद्ध केले. तेवढेच करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी या नियमांना पुस्तिकेच्या स्वरूपात प्रसिद्ध केले आणि गावोगाव स्वत: जाऊन त्या पुस्तिकांचे वाटप केले. स्वाभाविकच शेतकरी वर्गाला त्यांनी दिलेला हा दिलासा खूपच मोठा होता. शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टी तातडीने केल्या पाहिजेत, ते त्यांनी आपल्या अग्रलेखातून वारंवार स्पष्ट केले.

सध्या महामारीचे दिवस आहेत म्हणून एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायला हवा. सध्याच्या महामारीचा उगम चीनमधून झालेला आहे आणि तेव्हाचा प्लेगही चीनमधूनच आला होता. तो कसा आला ते पाहा. तेव्हाच्या दुष्काळात अन्नाची आवश्यकता होती, म्हणून ब्रिटिशांनी धान्य मागवले ते चीनमधून. ते आले हाँगकाँगच्या माध्यमातून. हाँगकाँगमध्ये हे चिनी उंदीर वाढले. मुंबई गोदीत जेव्हा बोटी लागल्या, तेव्हा उंदरांनी मुंबईत प्रवेश केला. ते पुण्यात आले. आधी मुंबईत आणि नंतर पुणे आणि परिसरात हा प्लेग पसरला. टिळकांनी त्यावर केसरीत लिहिले होते. हे चीनचे कारस्थान असा काही उल्लेख त्या वेळी त्यांनी केला नसला, तरी जो काही निष्कर्ष काढला तो उघड होता. आज आपण वुहानमधून आलेल्या कोरोनाबद्दल बोलतो आहोत. तेव्हाचा दुष्काळ आधी आला आणि पाठोपाठ प्लेग आला. १८९७मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली. त्या वेळी टिळकांनी इंग्रज सरकारच्या चांगल्या उपाययोजनांना विरोध केलेला नव्हता. तेव्हा इंग्रजांचे सैनिक पुण्यातल्या गल्लीबोळात जाऊन जेव्हा महिलांना घरातून बाहेर काढून त्यांची तपासणी करायला लागले, तेव्हा पुण्यात आगडोंब उसळला आणि मग टिळक त्याविरोधात रस्त्यावर उतरले आणि त्यांनी पुण्यातले गल्लीबोळ अक्षरश: पिंजून काढले आणि जिथेतिथे सभा घेतल्या. त्यांनी सरकारी जुलूमशाहीला विरोध केला. त्यातच २२ जून १८९७ रोजी रँड आणि आयर्स्ट या दोघा इंग्रज अधिकाऱ्यांचे खून पडले. इंग्रज सरकारला तेव्हा त्या खुनात टिळकांना अडकवायचे होते. त्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले, पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत. त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात येऊन त्यांना अठरा महिन्यांची शिक्षा झाली. मॅक्समुल्लर यांच्या प्रयत्नांमुळे ती कमी होऊन त्यांना एक वर्षात सोडण्यात आले. ते परतले तरी प्लेग हटला नाही. मात्र टिळक बाहेर असताना जे होते ते शिल्लक राहिले नव्हते. या परिस्थितीत जे झाले ते झाले, असे समजून त्यांनी काही उपाय सरकारला सुचवले. त्यात एक होता तो स्थानत्यागाचा होता. तेव्हा प्लेगची लस टोचण्याचा उपाय पुढे येऊ लागला. नागरिकांनी त्यास विरोध सुरू केला, पण टिळकांनी विरोध केला नाही. आज आपल्याकडे 'क्वारंटाइन' या शब्दाला 'विलगीकरण कक्ष' असा शब्दप्रयोग वापरला जातो. प्लेगच्या काळात टिळकांनी वापरलेला शब्द ‘संसर्गरोध छावणी’ असा होता. किती योग्य शब्द आहे, नाही? त्याच काळात इंग्रजांना विरोध करण्यासाठी टिळक धर्माचा आधार घेतात, असा एक आक्षेप घेतला गेला, पण त्यात तथ्य नव्हते. १८९९च्या जून महिन्यात बेळगावमध्ये प्लेगची लस सक्तीने टोचली जाऊ लागली, तेव्हा त्यांनी म्हटले की लस टोचण्यापासून फायदा नाही असे आम्ही म्हणत नाही. पण टोचलेल्या मनुष्याच्या प्रकृतीवर काय परिणाम होतात हे अजून स्पष्ट कळलेले नाही. एकदा लस टोचल्यावर पुढे किती महिन्यांपर्यंत प्लेग होण्याची धास्ती नसते याचा पक्का निर्णय अजून झालेला नाही. अर्थात टिळकांचा लस टोचण्याला विरोध होता हे म्हणणे अवाजवी ठरते. तेव्हाची आणखी एक घटना आताच्या परिस्थितीशी साम्य दाखवते म्हणून सांगतो. पुण्यातील प्लेग संपला, तेव्हा परगावचे लोक पुण्यात येऊन प्लेगचा फैलाव करतील या सबवीवर सरकारने त्यांनी काही दिवस पुण्याची नाकेबंदी केली. रात्री आठनंतर गावातून बाहेर आणि बाहेरगावातून पुण्यात एकही गाडी सोडली जात नव्हती. जणू काही दिवसा गाड्यांच्या वाहतुकीने आणि रात्री येणाऱ्या-जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या संसर्गाने प्लेग होण्याची भीती नव्हती. असो, हे मुद्दाम आताच्या आणि शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीचे साम्यस्थळ कळावे म्हणून सांगितले. त्या वेळी त्यांनी दिलेली माहिती वाचली, तर शंभर-सव्वाशे वर्षांनंतरही परिस्थिती कशी बदललेली नाही, हे कळते. त्यात ते लिहितात, ‘जितक्या सोयी, तितक्या गैरसोयी. आगगाडीने माणसे आपल्या नियोजित स्थळी लवकर जातात, तर रोगही मुंबईहून काशीस तिसऱ्या दिवशी जातो.’ म्हणजे आताचा कोरोना तर विमानवेगे सर्व जगात कसा पसरला, ते लक्षात यावे. 

seva_1  H x W:  

पत्रकार टिळक तळागाळाशी किती एकरूप झाले होते ते पाहा. त्यांनी त्या काळात प्लेगच्या रुग्णांसाठी एक स्वतंत्र इस्पितळ सुरू केले होते. प्लेगच्या काळात टिळक सर्व वाड्यावस्त्यांवर स्वत: फिरायचे. त्यांच्यासमोर भाषण द्यायचे. एकदा त्यांनी पुण्याच्या बुधवारात सभा घेतली. त्यांच्या या सभेला अठरापगड जातीजमातींचे लोक हजर होते. त्या भागातल्या काही वेश्याही सभेला हजर होत्या. त्यानंतर सुधारकात बातमी आली की, ‘टिळकांच्या सभेला नायकिणी.’ त्यावर टिळकांनी बिनतोड युक्तिवाद केला. सुधारककर्त्यांना टिळकांनी फैलावर घेतले. त्या वेळी त्यांनी लिहिले की, नीतीविषयक प्रश्नांचा आणि सार्वजनिक हक्कांसबंधीच्या प्रश्नांचा भेद केला पाहिजे. पहिल्या बाबतीत मत देण्याचा ज्यास अधिकार नाही, ते दुसऱ्या बाबतीत पूर्ण अधिकारी असतात, हे तत्त्व राष्ट्रीय सभेसही मान्य आहे. ब्राह्मणांच्या सभेत चांभारांनी येऊ नये, असे म्हणणारे ज्याप्रमाणे जुन्या मंडळीत कित्येक लोक आहेत, त्याप्रमाणे लोकांच्या हक्करक्षणाकरिता भरलेल्या सभेत नायकिणींनी येऊ नये म्हणणारी, वर्तनाने नव्हे तर तोंडाने सुधारक बनलेली काही मंडळी आहेत. या मंडळींपेक्षा नीतिमत्तेची आम्हास काही कमी काळजी आहे, असे नाही. पण नागरिक या नात्याने जे हक्क ह्या शहरातील लोकांस असतात, ते चांभारास व ब्राह्मणास, नायकिणीस व पतिव्रतेस सारखेच असतात हे तत्त्व आम्हास मान्य असल्यामुळे भलत्याच ठिकाणी नीतिमत्तेचा डौल मारून हे हक्क कमी करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास ते आम्हास कधीही मान्य होणार नाही. त्यातून हल्लीच्या प्रसंगी या नायकिणींच्या घरांसच जर नोटिसा लागल्या होत्या, तर त्यांची तक्रार ऐकून घेण्यास नको होती काय? त्यांच्यापासून इन्कमटॅक्स घ्यायला तयार, त्यांच्याजवळ व्होट मागण्यास तयार, तर मग नागरिक या रितीने जी काही त्यांची गाऱ्हाणी असतील ती ऐकून घ्यायला का नकोत? इतका रोखठोक विचार त्या काळात दुसऱ्या कोणी केला असेल असे वाटत नाही. तेव्हाची समाजअवस्था आणि समाजव्यवस्था काय होती, तेही टिळकांच्या लिखाणावरून दिसून येते. ते लिहितात, ‘येथे निघालेल्या हिंदू हॉस्पिटलमध्ये लोक पैसे देऊनही रुग्णांना पाठवतात, व सरकारी इस्पितळात जाण्याचा प्रसंग आला असता एखादा विहिरीत उडी मारून जीवही देतो.’ टिळक त्या परिस्थितीवर अतिशय संतापलेले होते. रँड आणि आयर्स्ट यांचे खून होताच इंग्रज सरकारने वृत्तपत्रांवर सूड उगवायला सुरुवात केली. टिळकांचा केसरी हा त्या यादीत सर्वात पुढे. प्लेग प्रकरणात केलेल्या टीकेने रँडचा खून झाला हे सिद्ध करण्यासाठी सरकारने सर्व तऱ्हेचे प्रयत्न केले. सरकारी दहशत वाढल्याने टिळकांनी ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ हा अग्रलेख लिहिला आणि सरकार आणखी पिसाळले. त्यांनी टिळकांवर राजद्रोहाचा खटला दाखल केला. न्यायमूर्ती ऑर्थर स्ट्रॅची यांनी दि. १४ सप्टेंबर १८९७ रोजी त्याचा निकाल दिला आणि टिळकांना अठरा महिन्यांची शिक्षा झाली. ती पुढे बारा महिन्यांची झाली.

टिळकांना शिक्षा झाल्याचे कळल्यावर केसरी आणि मराठा ज्या आर्यभूषण छापखान्यात छापला जात असे, त्या छापखान्याचे प्रमुख हरिपंत गोखले यांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांना नोटिस देऊन उद्याापासून आपले अंक आमच्या छापखान्यात छापले जाणार नाहीत, असे बजावले आणि त्यांना दुसरीकडे सोय करण्यास सांगितले. हरिपंत गोखले यांना काळजी होती ती त्यांच्याच ज्ञानप्रकाशची. त्या वृत्तपत्राचे ते व्यवस्थापक होते. केसरीचे व्यवस्थापक धोंडोपंत विद्वांस यांनी तुरुंगात जाऊन टिळकांच्या कानावर ही हकिकत घातली, तेव्हा टिळक म्हणाले की ठीक आहे, बुधवारात विठ्ठल प्रेसला विचारा, ते छापत असले तर त्यांच्याकडून अंक छापून घ्या. त्याप्रमाणे व्यवस्था झाली. तेव्हाचा एकच अंक मराठा रविवार दि. १९ सप्टेंबरऐवजी दि. २० सप्टेंबरला, म्हणजे सोमवारी निघाला. केसरी मात्र मंगळवारी निघाला. केसरी आणि मराठा वृत्तपत्रांना बाहेरचा रस्ता दाखवल्यावरही अंक व्यवस्थित प्रसिद्ध होत राहिले. पुढे जेव्हा टिळक येरवडा तुरुंगातून सुटून आले, तेव्हा तो मंगळवार असल्याने हे वृत्त केसरीच्या त्या अंकात नव्हते. तरी त्यांची भेट घ्यायला हजारोंच्या संख्येने लोक गोळा झाले. हरिपंत गोखले यांनी आपण केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांना खरे यांच्या सांगण्यावरून बाहेर काढले असे त्यांना सांगितले. टिळकांचे मित्र असलेले दाजी आबाजी खरे वकील असले, तरी गोखले यांना तसा सल्ला देतील हे संभवत नाही. टिळकांनी सुटकेनंतर लगेचच या दोन्ही वृत्तपत्रांचे संपादकपद स्वत:कडे घेतलेले नव्हते. त्यांनी आर्टिक होमचे लेखन हाती घेतलेले होते. पुढे एक दिवस असा आला की मवाळाग्रणी ज्ञानप्रकाशपुढे संकट उभे राहिले. त्या वृत्तपत्राचा अग्रलेख लिहिण्यासाठी संपादक जागेवर नव्हते. दुसरे कोणीही उपलब्ध नव्हते. ज्ञानप्रकाश तेव्हा द्विसाप्ताहिक होते आणि हरिपंत गोखले यांच्याकडे त्याची मालकी होती. नामदार गोखले यांच्या भारत सेवक समाजाच्या वतीने हे पत्र प्रसिद्ध होत असे. स्वत: हरिपंत अग्रलेख लिहिण्याइतके विद्वान नव्हते. त्यांना टिळकांमुळेच तिथे नोकरी मिळालेली होती. अग्रलेखाशिवाय अंक प्रसिद्ध करायचा तर अंकाची बेअब्रू होणार, तेव्हा ती टाळायची तर आता यातून एकच व्यक्ती आपल्याला तारू शकेल असे वाटल्याने हरिपंत हे धाडस करून टिळकांना भेटायला गेले. त्यांना पाहून टिळक म्हणाले, ‘काय काम काढलेत हरिपंत?’ ‘दादा, एक काम होतं’ हरिपंतांनी चाचरत चाचरत त्यांना आपली अडचण सांगितली. टिळकांनी त्यांना ‘तुम्ही आम्हाला तुमच्या छापखान्यातून एका ओळीच्या नोटिशीने काढलेत आणि तुम्ही मला तुमच्या ज्ञानप्रकाशासाठी अग्रलेख लिहायला सांगताय?’ असे म्हटले नाही. ‘तुमचे वृत्तपत्र माझ्यावर सातत्याने टीका करत असते आणि तुम्ही मलाच अग्रलेख लिहायला कसे सांगत आहात’, असेही म्हटले नाही. टिळक त्यांना म्हणाले, ‘या अर्धा-एक तासाने या.’

टिळकांनी सांगितल्याप्रमाणे हरिपंत टिळकांकडे थोड्या वेळाने गेले. टिळकांनी त्यांच्या हातात लखोटा ठेवला. हरिपंत खाली उतरले. सायकलवर टांग मारण्यापूर्वी टिळकांनी लिहिले आहे तरी काय, म्हणून त्यांनी तो लखोटा उघडायचे धाडस केले. त्यांनी अग्रलेख वाचायला सुरुवात केली. त्यांचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. तो अग्रलेख ज्ञानप्रकाशच्या संपादकांच्या भाषेत होता. त्यांच्या शैलीत होता. इथपर्यंत सारे ठीक होते. टिळकांच्या विद्वत्तेची ती किमया होती. पण हा अग्रलेख स्वत:वर टीका करणारा होता हे विशेष आहे. हा जागतिक कीर्तीचा आणि आंतरराष्ट्रीय उच्चांकाचा भाग असेल की एखाद्या संपादकाने दुसऱ्या वृत्तपत्रासाठी त्या संपादकाच्या भाषेत अग्रलेख लिहायचा आणि तोही स्वत:वर टीका करणारा, हे आजच्या जमान्यात कोणताही संपादक करू शकेल अशी शक्यता वाटत नाही. टिळक सुटून आल्यावरही ते लगेच केसरीत लिहायला लागलेले नव्हते. केसरीचे संपादकपदही त्यांनी स्वीकारलेले नव्हते. मात्र पुण्यास आल्यावर त्यांनी एखाददुसरे स्फुट किंवा एखादा अग्रलेख लिहिला होता, पण संपादक ते नव्हते. ४ जुलै १८९९ रोजी त्यांनी पहिला अग्रलेख होता, तो पुनश्च हरि ओम. मंडालेहून आल्यानंतर टिळकांनी या शीर्षकाचा अग्रलेख लिहिलेला नव्हता. अलीकडे हा शब्द वारंवार वापरला जात असला, तरी तो टिळकांनी मंडालेहून सुटून आल्यावर लिहिला होता असे म्हणणे सत्याला धरून होणारे नाही.


seva_1  H x W:

टिळकांनी परदेशी मालाच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर सर्वप्रथम पुण्याने क्रांती घडवली. पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या विनायक दामोदर सावरकर या तरुणाने परदेशी मालावर बहिष्कार टाकण्याचे आंदोलन पेटवायचा निर्धार केला. जे जे विलायती आहे त्याचा त्याचा धिक्कार करा आणि यापुढे कोणतीही विलायती वस्तू आपण खरेदी करणार नाही, अशी प्रतिज्ञा घ्या, असे आवाहनच त्या तरुणाने आपल्या सहाध्यायांना उद्देशून केले. विलायती कपड्यांची होळी करण्याची कल्पना सावरकर यांची होती. या होळी प्रकरणापूर्वी सावरकर टिळकांना भेटलेले होते. त्या वेळी टिळकांनी त्यांना ‘होळी अशी करा की तिच्या ज्वाळा तिकडे विलायतेत दिसल्या पाहिजेत’ असे म्हटले. पुण्याने दि. ७ ऑक्टोबर १९०५ रोजी होळी पेटवली आणि तिच्या त्या धगधगत्या ज्वाळा आकाशातून सर्व देशात पसरल्या आणि देशप्रेमाचा वन्ही चेतवला गेला. फर्ग्युसनचे प्राचार्य रँग्लर र.पु. परांजपे यांनी सावरकर यांना दहा रुपये दंड तर केलाच, तसेच त्यांना वसतिगृहातून काढून टाकले. टिळकांनी या घटनेवर कडाडून शाब्दिक हल्ला चढवला. ‘हे आमचे गुरूच नव्हेत’ हा अग्रलेख (केसरी, १७ ऑक्टोबर १९०५) लिहून टिळकांनी या घटनेला अधिक व्यापक स्वरूप दिले. डेक्कन कॉलेजचे प्राचार्य सेल्बी यांनी आपल्या एका जुन्या विद्यार्थ्याच्या विनंतीस मान देऊन त्यास जे एक पत्र पाठवले, ते नेमस्तांच्या इंदुप्रकाशने सविस्तर प्रसिद्ध केले. त्या पत्राचा संदर्भ देऊन टिळकांनी अतिशय परखड अग्रलेख लिहिला. त्याआधीचे काही आठवडे त्यांनी स्वदेशीसंबंधाने अग्रलेखांची मालिकाच लिहिली होती. ती मालिका तोडून त्यांनी या विषयावर ‘हे आमचे गुरूच नव्हेत’ हा अग्रलेख लिहिला. सेल्बींनी त्या पत्रात म्हटले होते की, ‘स्वदेशी चळवळ देशात हितकारक आहे, पण विद्यार्थ्यांनी या चळवळीत पडू नये.’ त्याचा संदर्भ देत टिळक म्हणतात, ‘चळवळीत पडू नये तर नये. पण सेल्बीसाहेबांनी स्वत: देशी कपडे वापरून (कारण ते स्वत: आमच्या देशाचे अन्न खात आहेत.) किंवा विद्यार्थ्यांस देशी कपडे कॉलेजात वापरण्यास सांगून या चळवळीबद्दल आपली सहानुभूती कधी व्यक्त केली आहे काय? काय म्हणे की, कॉलेजातील विद्यार्थ्यांनी या चळवळीत पडू नये. चेंबर्लेनच्या चळवळीत ऑक्स्फर्ड-केंब्रिजमधील विद्यार्थी पडले नाहीत काय? आमचे विद्याखाते जर स्वतंत्र असते, व निसर्गत:च या देशाचे हितचिंतक विद्वान प्रोफेसर त्यात असते, तर ते सुरेंद्रनाथ बानर्जींप्रमाणे स्वदेशी चळवळीवर व्याख्याने देण्यास गावोगाव फिरले असते. पण परकीय राज्यसत्तेखाली आमच्या कॉलेजातील प्रोफेसरांची इतकी दुर्दशा झाली आहे असे नव्हे, तर विद्यार्थ्यांचीही त्याचप्रमाणे दुर्दशा करण्यास ते प्रवृत्त झाले आहेत; आणि त्यातल्या त्यात विशेष शरमेची गोष्ट ही आहे की, ज्यांनी उदात्त राष्ट्रीय शिक्षण लोकांस स्वस्त देण्याकरिता स्वार्थाचा त्याग करून खासगी कॉलेजे काढली, तेही कालगतीने हाच अंधपरंपरेचा मार्ग स्वीकारून सरकारच्या तंत्राने वागण्यास सिद्ध झाले आहेत.’

या अग्रलेखात कुठेही फर्ग्युसनच्या घटनेचा किंवा विलायती कापडाच्या होळीचा थेट संदर्भ दिलेला नाही. नाही म्हणायला या अग्रलेखाच्या दुसऱ्या भागात टिळकांनी अगदी शेवटी शेवटी संबंधितांच्या लक्षात येईल असे खडे बोल सुनावले होते. त्यात ते म्हणतात, ‘आम्ही जी आपली मुले शाळा आणि कॉलेजे यांत पाठवितो ती त्यांस राष्ट्रीय चळवळीचा बिलकुल गंध लागू नये म्हणून पाठवीत नाही. उलट त्यांस याबाबतीत शिक्षण मिळून त्यांच्या अंगी होईल तितकी राष्ट्रभक्ती जागृत व्हावी असाच त्यांस शिक्षण देण्यांत आमचा हेतू असतो. स्वार्थाने किंवा वर सांगितलेल्या अन्य कारणांनी मोहित होऊन जेव्हा एखादा गुरू शिष्यांस असल्या कामी छळतो, तेव्हा तो गुरूच नव्हे असे आम्ही समजतो; इतकेच नव्हे तर, शिष्याने अशा वेळी गुरूची आज्ञा मोडली तर तो आज्ञाभंगही होत नाही.’ ही होती टिळकांच्या लेखणीची खासियत. 'हे आमचे गुरूच नव्हेत' या शीर्षकाचे त्यांनी सलग तीन अग्रलेख लिहिले. स्वत्वरक्षणावर त्यांनी जसा भर दिला, तसा आधुनिक ज्ञानसंपादनावरही दिला होता. त्यांना परक्या सत्तेचा तिटकारा होता, परकीय असलेल्या ज्ञानाचा नाही.

टिळकांची भाषाशैली कशी होती ते अभ्यासण्यासारखे आहे. आजकालच्या एकूणच विद्यार्थिवर्गाने त्या भाषेचा अभ्यास करायला हवा. त्यांनी अग्रलेखाची जी शीर्षके दिली होती, ती अधिक अर्थपूर्ण आणि धडाडती असायची. 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' या शीर्षकाची नेहमीच सरसकट चर्चा होत राहते. पण इतरही अनेक अग्रलेख असे आहेत, ज्यांची शीर्षके त्या त्या विषयाशी तादात्म्य पावणारी असत. सोपेपणा हा त्या शीर्षकांचा महत्त्वाचा घटक होता. उजाडले, पण सूर्य कोठे आहे?, निकराने एकमुखी मागणी करा, जनाब देहली तो बहोत दूर है, बादशहांस टिळकांची तार आणि तारवटलेले टीकाकार, हा म्हातारचळ का पोरखेळ, प्रिन्सिपॉल, पशुपाल की शिशुपाल!, ग्रहण सुटले!, बादशहा ब्राह्मण झाले, चतकोर भाकरीची गुलामगिरी, डोंगर पोखरून उंदीर निघाला, कराची सूट, बाकीची लूट, देशाचे दुर्दैव, रशियाची रेवडी, दुमजली इमारतीचा पुंडावा, आशेची निराशा, निराशेची आशा, आमच्यावर जुलूम होतो कसा? पुण्यातील पहिली चिमणी, प्राण जावो अथवा राहो, बाँबगोळ्याचे रहस्य, गोळी घाला वा फाशी द्या, हे काही आता थांबत नाही, टोणग्याचे आंचळ... वगैरे. सांगायचा मुद्दा हा की टिळकांनी मराठी भाषेत नवनवे शब्द आणले. नव्या शब्दांना आकार दिला. अलीकडे आपल्याकडे महामारीचा प्रादुर्भाव होताच 'क्वारंटाइन' हा शब्द रूढ झाला. त्याला विलगीकरण कक्ष असा शब्दप्रयोग वापरला जाऊ लागला, पण टिळकांनी त्या प्लेगच्या काळात त्याला शब्द वापरला होता तो ‘संसर्गरोध छावणी’. संसर्ग होऊ नये म्हणून त्या जागेपासून अन्यत्र उभारलेली छावणी, असा त्याचा अर्थ. त्यांच्या सामान्य माणसाला आकर्षित करून घेणाऱ्या भाषेचा डौल काही वेगळाच असे. उदाहरणार्थ, ते जेव्हा सुटून आले, तेव्हा त्यांचे सहकारी असणारे काकासाहेब खाडिलकर यांनी लिहिलेल्या अग्रलेखाचे शीर्षक होते ‘टिळक बंधमुक्त’. टिळकांनी सहज केसरी कार्यालयात चक्कर टाकली आणि खाडिलकरांना विचारले, त्या वेळी त्यांनी ते अग्रलेखाचे प्रूफ त्यांच्यासमोर ठेवले. टिळकांनी तिथला टाक घेतला आणि त्या ‘बंधमुक्त’ या शब्दावर काट मारून त्यांनी तिथे ‘सुटले’ असा सुटसुटीत शब्द वापरला. यावरून त्यांना काय अभिप्रेत होते ते कळते. बंधमुक्त हा सामान्यांना जड जाणारा शब्द नको, त्यापेक्षा सोपा शब्द कोणता असेल तर तो सुटले हा आहे. सहज कळणारे शब्द वापरणे ही त्यांची खासियत होती. १९१६मध्ये जेव्हा त्यांची तिसऱ्या राजद्रोहाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली, तेव्हा लिहिल्या गेलेल्या अग्रलेखाचे शीर्षक होते ‘टिळक सुटले, पुढे काय?’ म्हणजे पुढे काय तेच त्यांना त्यातून स्पष्ट करायचे होते हे दिसते. 

अशीच एक सभा मंडईसमोर झालेली. तिथे बोलताना टिळकांनी सरकारवर तोफ डागताना म्हटले की, ही जी ब्यूरॉक्रसी आहे, ती... पुढे ते एक क्षण थांबले आणि त्यांनी 'ही जी नोकरशाही आहे, तिला धडा शिकवायला हवा' असे म्हटले. त्यानंतर ते जेव्हा केसरी कार्यालयात आले तेव्हा त्यांनी खाडिलकरांना ‘आज काय गंमत झाली’, असे सांगून आपल्याला बोलता बोलता सुचलेल्या शब्दाचे रहस्य सांगितले. एखाद्याा व्यक्तीला नवा शोध लागल्यावर जो आनंद, तसाच तो त्यांना अशा शब्दांच्या वापरातून मिळत असे. टिळकांनी आणलेल्या अशा तीन हजार नव्या शब्दांची सूची केसरी कार्यालयात आजही उपलब्ध आहे. ते एका वेगळ्या लोकयुगाचे निर्माते होते. आपण कशासाठी लिहितो, याचे त्यांनी उत्तम वर्णन केले आहे. ते म्हणतात, ‘आम्ही जे लेख ‘केसरी’त लिहितो, ते केवळ आमच्या राज्यकर्त्यांकरिता नसून आमच्या मनातील तळमळ किंवा जळफळ सर्व मराठी वाचकांच्या मनात उतरावी एवढ्याकरिता आहे.’ ज्यांनी समग्र टिळक हे आठ खंड संपादित केले आहेत, त्यांनी टिळकांच्या भाषेविषयी तिसऱ्या खंडाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे की, टिळकांची भाषा सुगम, ठाशीव, पण जळजळीत व कृतीची प्रेरणा देणारी कशी असे हे या ग्रंथातील कोणताही राजकीय लेख वाचला तरी समजेल. असे हे आठ खंड आहेत आणि ते पुन्हा नव्याने प्रकाशित झाले आहेत.

लोकमान्य किती हजरजबाबी होते, हे त्यांच्या वेगवेगळ्या काळातल्या भाषणांवरून आणि त्यांच्या न्यायालयासमोर झालेल्या जबानीवरुन स्पष्ट होते. चिरोलप्रकरणात त्यांना उलटसुलट असे अनेक प्रशद्ब्रा विचारण्यात आले होते, पण तिथेही अस्खलीत इंग्रजीतून उत्तर देतानाही त्यांनी अनेक भाषाडौलांचा वापर केला. उदाहरणच द्यायचे तर त्यानी एका उत्तरात म्हटले की, खोल्या खोल्या मिळून घर होते, पण खोली म्हणजे घर नाही. किंवा एका खवचट प्रश्नाच्या उत्तरात ते शांतपणे म्हणाले, ‘कालचा कैदी आजचा संसदसदस्य होतो, मग तो संपादक का होणार नाही?’ 

विषय निघालाच आहे, म्हणून त्यांच्या ‘मराठी भाषेची लेखनपद्धति-१’ या १२ जुलै १९०४च्या अग्रलेखाकडे मी लक्ष वेधू इच्छितो. याच विषयावर त्यांचे सलग चार अग्रलेख आहेत. त्यानंतर ४ ऑक्टोबर १९०४ रोजी ‘आमच्या वर्णमालेचा खून’ हा अग्रलेख त्यांनी लिहिला. लेखनपद्धतीविषयी लिहिताना ते म्हणतात, ‘पहिल्याने उच्चारवादी पक्षाचे परीक्षण करू. ज्याप्रमाणे उच्चार करावयाचा तसा शब्द लिहावयाचा म्हटले, तर प्राय: सर्वत्र अनवस्था होण्याचा प्रसंग आहे. उच्चार प्रमाण धरावयाचा तो कोणता? सुशिक्षितवर्गाचा? की अशिक्षितवर्गाचा? सुशिक्षितवर्गाचा म्हणावे तर भाषा बोलण्याचा अधिकार सुशिक्षितवर्गास आहे, आणि अशिक्षितवर्गास नाही, असे मानता येत नाही. शिवाय सुशिक्षितवर्गात तरी बोलण्याची एकच पद्धत कोठे आहे? कोकण आणि देश, यावरील उच्चार निराळे आहेत. इतकेच नव्हे तर घाटावरची, खानदेशी, धारवाडी, मिरज-सांगलीकडील, इंदुरी, ग्वाल्हेरी वगैरे उच्चार निरनिराळे पडतात. आमच्याच देशात ही स्थिती आहे असे नाही, तर विलायतेत इंग्रजी भाषेसंबंधानेही अशीच अवस्था आहे. वेल्स, स्कॉटलंड, आयर्लंड किंवा खुद्द इंग्लंडातील उत्तरकेडील व दक्षिणेकडील परगणे यातील अशिक्षितांचेच नव्हे तर सुशिक्षितांचे उच्चार निरनिराळे होतात.’ 

टिळकांवर एक आक्षेप नेहमी घेतला जातो, तो ते सुधारणांच्या विरोधी होते असा. हा खोडसाळ आरोप आहे. शनिवारवाड्यासमोरच्या अस्पृश्यता निवारणाच्या जाहीर सभेत त्यांनी म्हटले होते की, ‘अस्पृश्यता जर देवाला मान्य असेल तर मग मी देवाला मानणार नाही.’ यापेक्षा आणखी काय हवे? त्यांनी त्या विषयीच्या पत्रकावर सही केली नाही हे सांगितले जाते, पण त्यांनी आपल्यासमोर सध्या स्वराज्य मिळवायचे ध्येय असल्याने या दुसऱ्या कामात आपण स्वत:ला अडकवून घेऊ इच्छित नाही, असे सांगितले. जर मी सही केली तर त्यासाठीच केवळ मला काम करावे लागेल आणि स्वराज्याकडे दुर्लक्ष होईल हे त्यांचे म्हणणे होते. तरीही त्यांनी आपण इंग्लंडहून आल्यावर या पत्रकावर सही करू असे त्यांना स्पष्ट केले होते. ज्यांनी टिळकांचे नीट वाचन केले नाही, अशांकडून हा आरोप केला जातो. टिळकांना या सर्व सुधारणा हव्या होत्या, पण त्या परक्या सरकारकडून व्हाव्यात, असे नाही. कायदा व्हावा, पण त्यांना तो परक्यांचा नको, स्वजनांचा हवा होता. ते म्हणतात, ‘खरी सुधारणा होण्यासाठी शास्त्री व पंडित यांस नव्या परिस्थितीचे आणि नव्या सुशिक्षित वर्गास हिंदू धर्मातील तत्त्वांचे व परंपरेचे ज्ञान करून दिले पाहिजे. दोघांतही एकेक प्रकारची उणीव आहे व ती उणीव भरून काढणे हे खऱ्या सुधारकांचे कर्तव्य आहे.’ खरे सुधारक लोकमान्यच होते. त्यामुळे त्यांच्यावर दोन्ही पक्षातील मंडळी टीका करीत. बालविवाह, जातिभेद, अस्पृश्यता, परदेशगमन बंदी, पुनर्विवाह बंदी या घातूक रूढींवर त्यांनी केवळ टीकाच केली असे नाही, तर त्या त्याज्य ठरवण्याचा कित्ता त्यांनी घालून दिला. दारूबंदी, हुंडाबंदी यासारख्या विषयांवर त्यांनी प्रहार केले आहेत, पण समाजमन त्यासाठी किती आडमुठेपणाने वागते हे आपण टिळकांनंतरच्या शंभर वर्षांनीही पाहतो आहोत. आपल्या मुलांना त्यांनी ‘तुम्ही उद्या जोडे शिवायचा धंदा केलात तरी माझे काही म्हणणे नाही, पण जोडे असे शिवा की, सगळ्यांनी म्हटले पाहिजे की हे जोडे टिळकांनी शिवलेले आहेत.’ यापेक्षा आणखी काय हवे?

टिळकांच्या भाषाशैलीबरोबरच त्यांना त्यांच्या उदारमतवादाबद्दलही मानायला हवे. विरोधी बाजूवर तुटून पडण्यात त्यांचा हातखंडा होता ही गोष्ट तितकीच खरी आहे. टिळक हे गेलेल्या व्यक्तीविषयी अधिक जागरूक असत. गेलेल्या व्यक्तीशी आपले कितीही भांडण असले तरी त्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यांनी एखादाही वावगा शब्द लिहिलेला नाही. वैर असलेच तर ते मृत्यूबरोबर संपते ही त्यांची धारणा होती. मृत्युलेख लिहावेत तर ते टिळकांनी असेच म्हटले गेले असेल तर त्यात नवल नाही. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे उदाहरण घ्या किंवा नामदार गोखले किंवा सर फिरोजशहा मेथा घ्या, या सर्वांचा त्यांच्याशी कुठे ना कुठे खटका उडालेला होता. न्यायमूर्ती रानडे यांनी तर पहिल्या राजद्रोहाच्या खटल्यात टिळकांना जिथे जामीन देता येणे शक्य होते तिथेही तो दिला नाही. इतर अनेक गोष्टींमध्येही त्यांनी टिळकांची एक प्रकारे अडवणूकच केली. तरी रानडे यांच्या निधनानंतर कोणताही व्यक्तिगत वाद न आणता त्यांनी त्यांचा आपल्या अग्रलेखात ‘न्यायमूर्ती हे मार्मिक लेखक, चांगले वक्ते, उत्तम विद्वान, अलौकिक बुद्धिमान, जबर विद्याव्यासंगी, असाधारण कल्पक आणि सरळ मनाचे व शांत स्वभावाचे होते हे सर्वास महशूर आहे. पण कमलाची खरी योग्यता ज्याप्रमाणे पाकळ्यांच्या आकारात, रंगात किंवा मार्दवात नसते, त्याच्या सुगंधीपणात असते, तद्वत माधवरावजींच्या खऱ्या लोकप्रियतेचे व मोठेपणाचे बीज ज्यास पाहणे आहे, त्याने वरील गुणांखेरीज दुसऱ्या काही गोष्टींचा विचार केला पाहिजे.’ हे दुसरे गुण कोणते ते सांगताना त्यांनी म्हटले की, त्या वेळी महाराष्ट्र देश थंड गोळा होऊन पडला होता. या थंड गोळ्यास कोणत्या तऱ्हेने ऊब दिली असता तो पुन्हा सजीव होईल व हातपाय हलवू लागेल याचा रात्रंदिवस विचार करून अनेक दिशांनी, अनेक उपायांनी, अनेक रीतींनी त्यास पुन्हा सजीव करण्याचे दुर्धर काम अंगावर घेऊन त्याकरिता जिवापाड जर कोणी मेहनत केली असेल तर ती प्रथम माधवरावजींनीच केली असे म्हटले पाहिजे. व आमच्या मते हेच त्यांच्या थोरवीचे किंवा असामान्य मोठेपणाचे मुख्य चिन्ह होय.’

seva_1  H x W:  

टिळकांचे अगदी जवळचे स्नेही म्हणजे गोपाळ गणेश आगरकर. ज्यांच्याबरोबरच्या संबंधात नंतर वितुष्ट आले आणि दोघेही परस्परांशी अगदी नळावरच्या भांडणासारखे भांडले, पण आगरकर गेल्यावर डोळ्यांमधून अश्रूंच्या धारा वाहत असताना त्यांनी आगरकरांचे मोठेपण सांगणारा अग्रलेख लिहिला. त्यांच्या या अग्रलेखाचे शीर्षक होते ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटीतील पाचवा मृत्यू! प्रि. गोपाळ गणेश आगरकर’ टिळकांनी विशेष असा मृत्युलेख लिहिला तो एका पोलीस अधिकाऱ्यावर. १ ऑगस्ट १९०५च्या केसरीत त्यांनी ‘मि. ब्रुइन यांचा मृत्यू!’ हा अग्रलेख लिहिला. हेच ते ब्रुइन, ज्यांनी रँड आणि आयर्स्ट यांच्या खुनात टिळकांना अडकवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. ब्रुइनसाहेबांची काम करण्याची काय विशेष तऱ्हा होती, हे त्यांनी या अग्रलेखात सांगितले आहे. गुन्हा पकडणे हा त्यांचा धंदा आहेच व ते काम प्रामाणिकपणे करावयाचे असल्यास त्यासाठीही लोकांत मिळूनमिसळून वागण्याची जरूर आहे. हे काम ब्रुइनसाहेब चांगल्या रीतीने बजावत होते, हाच आमच्या मते त्यांच्या अंगचा विशेष गुण होय, व याकरिता त्यांच्या मृत्यूबद्दल आम्ही खेद प्रदर्शित करीत आहो.’ हे काहीच नाही, ब्रुइनसाहेबांमागे सात मुले आणि पत्नी होती. मुलांपैकी दोघे पोलीस खात्यातच होते. पण जेव्हा ब्रुइन यांच्या पत्नीने आपण आपल्या मुलीसह विपन्नावस्थेत कसे राहतो आहोत आणि शिवणकामावर कशी गुजराण करीत आहोत याचे वर्णन पत्राद्वारे टिळकांना कळवले आणि पाचशे पौंड पाठवल्यास आपला चरितार्थ चांगला चालू शकेल, असे त्यात म्हटले, तेव्हा टिळकांनी कोणताही मागलापुढला विचार न करता पाचशे पौंडांची रक्कम त्या महिलेला पाठवून दिली होती, हे विशेष होय. फिरोजशहा मेथा हे तर मवाळांचे अग्रणी आणि नामदार गोखले यांचे अस्सल समर्थक. पण ते गेल्यावरही त्यांनी त्यांचे चांगले गुण तेवढेच लिहिले. खुद्द गोखले हे तर टिळकांचे राजकीय विरोधक. त्यांनी टिळकांना अडवायची एकही संधी सोडली नाही, तरी त्यांच्याविषयी लिहिताना त्यांनी गोखले यांच्याबद्दल एकही उणादुणा शब्द लिहिला नाही. उलट त्यांचा होता होईल तेवढा गौरवच केला. 

टिळक कसे होते, तर ते सिंहासारखे होते. जिथे स्वराज्यद्रोही शक्ती आहेत, तिथे ते तुटून पडणे हे त्यांच्या स्वभावधर्मात होते. कोणाचीही भीडमुर्वत ठेवायची नाही हे त्यांचे धोरण होते. त्यांच्या अंगी असामान्य धैर्य होते यात शंकाच नाही. पोलीस अधिकारी मुंबईचे पोलीस सुपरिंटेंडंट हॅरि ब्रुइन याच्याकडे १८९७मध्ये रँडच्या खुनाचा तपास दिलेला होता. त्याने टिळकांना गाठले. रँडचा खुनी कोण हे टिळकांना नक्की माहीत असणार याबद्दलची त्याला खात्री होती. तथापि लोकमान्यांचा समाजावर असणारा प्रभाव आणि त्यांची प्रतिष्ठा यामुळे ब्रुइनला एकदम टिळकांना तसे विचारण्याचे धाडस झाले नाही. त्याने अतिशय चलाखपणे टिळकांना म्हटले की, ‘मिस्टर टिळक, तुमच्यासारख्या मोठ्या लोकांनी मनावर घेतलं तर रँडचा खुनी आम्हाला सहज सापडू शकेल आणि पुणे शहरावर या खुनानं लागलेलं लांछन दूर होईल.’

टिळकांनी त्यावर ताडकन उत्तर दिले, ‘रँडचा खून होणं म्हणजे पुणे शहरावर लांछन आहे असे मला अजिबात वाटत नाही. उलट रँड हेच पुणे शहरावरचे लांछन होते. मला या खुनाबद्दल काही माहिती नाही. समजा माहिती मिळाली तरी मी ती तुम्हाला सांगणार नाही. मी काही तुमचा खबऱ्या नाही. तुमचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष गुप्तहेर होऊन इतरांचा विश्वासघात करणं मला जमणार नाही.’

गेल्या काही वर्षांपासून पत्रकारितेत आम्ही शोधपत्रकारिता आणि विकास पत्रकारिता हे विषय शिकवतो. अनेकांना त्याबद्दलची माहितीही असते, पण या दोन्ही बाबतीत जर कोणी पाया रचला असेल तो लोकमान्य टिळकांनी, असे कोणी सांगत नाही किंवा आम्हाला त्याबद्दलची माहिती असत नाही. शोध पत्रकारिता काय आहे? त्यासाठी मी उदाहरण देतो ते क्रॉफर्डचे. हा क्रॉफर्ड १८६३च्या सुमारास रत्नागिरीस जिल्हाधिकारी होता. तिथे त्याने सॉ मिल नावाचा एक लाकूड कापायचा उद्योग काढला. ब्रह्मदेशातून उंची लाकूड मागवायचे आणि ते इमारतींसाठी आणि जी.आय.पी. रेल्वेसाठी विकायचे, असा हा धंदा होता. त्याने त्यासाठी लोकांकडून पैसे म्हणजेच भागभांडवल उभे केले आणि त्याने या कारखान्यात काही विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या. पुढे ही मुले मुंबईस जाऊन सुतारकीचा चांगला व्यवसाय करू लागली. पण पुढे त्याने आपला हात या धंद्यात मारायला प्रारंभ केला. लोकांचे पैसे बुडाले. तेव्हा त्याचे हे प्रकरण फार गाजले नाही. तेव्हा केसरी नव्हता आणि इतर वृत्तपत्रांना ती समज नव्हती. हाच क्रॉफर्ड पुढे पुण्याचा अधिकारी बनून आला, तेव्हा टिळक आणि क्रॉफर्ड यांचा कुठेही संबंध आला नव्हता. ही गोष्ट १८८८मधली आहे. म्हणजे केसरी प्रसिद्ध होऊ लागल्यानंतर ७ वर्षांनी. टिळकांच्या हाती केसरी नुकताच आलेला होता. क्रॉफर्डसाहेबाच्या विरोधात तोपर्यंत सरकारकडे भ्रष्टाचाराच्या २०-२५ तरी तक्रारी दाखल झाल्या. सरकारने त्याची दखल घेतली नाही. तो भ्रष्टाचाराने बदल्या करीत असे. लोकांकडूून पैसे घेऊन त्यांच्या ठरावीक जागेवर बदल्या करणे हे त्याने आरंभले. किंबहुना असे म्हणता येईल की आज समाजात जे काही आपल्याला आढळते आहे, त्याचा उगम या क्रॉफर्ड साहेबापासूनच झालेला आहे. तो केवळ भ्रष्टच होता असे नाही, तर तो स्त्रीलंपटही होता. टिळकांनी त्याच्या विरोधात २१ ऑगस्ट १८८८ रोजी पहिला अग्रलेख लिहिला. त्यानंतर त्यांनी सलग चार अग्रलेख लिहिले. त्यानंतरचा अग्रलेख ‘हाच न्याय काय?’ हा होता. विशेष हे की तेव्हाचा ब्रिटिशांचा टाइम्स ऑफ इंडिया क्रॉफर्डसाहेबाच्या बाजूने उभा राहिला. एकटा केसरी क्रॉफर्डला फोडून काढत होता. अखेरीस या क्रॉफर्डला अटक करण्याचे आदेश निघाले. त्या वेळी क्रॉफर्डने पेरलेल्या माणसांकडून त्याला ही माहिती मिळाली आणि त्याने पळ काढण्यासाठी तेव्हाचे भांबुर्डा म्हणजेच आताचे शिवाजीनगर स्टेशन गाठले. तो एका खांबाला चिकटून डोळ्यावर हॅट ओढून गाडीची वाट पाहात उभा होता. तो गाडीत बसला आणि भायखळ्याला उतरून समुद्राच्या दिशेने निघाला असता त्याला अटक करण्यात आली. तो समुद्रमार्गे श्रीलंकेला पळून जाणार होता. पोलीस त्याच्या मागावर पुण्यापासूनच होते. या काळात ज्यांच्याकडून पैसे घेऊन बदल्या करण्यात आल्या होत्या, त्या आठ मामलेदारांना अटक करण्यात आली होती. ब्रिटिश सरकारने त्यांना तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे वचन दिलेले होते, पण टिळकांनी लाच घेणारा जितका दोषी, तितका देणाराही दोषी, असे सांगून सरकारला धारेवर धरले. क्रॉफर्ड अटकेत गेलाच, त्याचबरोबर स्वदेशी मामलेदारही शिक्षेस पात्र ठरले. हा टिळकांच्या शोध पत्रकारितेचा मोठाच विजय होता. किंबहुना असे म्हणता येईल की देशातल्या शोधपत्रकारितेचा हा पहिला विजय होय.

पुण्यातील पहिली चिमणी हा अग्रलेख हे विकास पत्रकारितेचे उत्तम उदाहरण आहे. या अग्रलेखाचे पहिलेच वाक्य कोणाही पुणेकराने खूश व्हावे असे आहे. ते लिहितात, ‘सुमारे शंभर वर्षांपूर्वी आमच्या शहराचा दक्षिणेतच काय, पण साऱ्या हिंदुस्थानभर मोठा नावलौकिक होता. त्या काळी वीरश्री, वैभव, देशाभिमान आणि धर्माभिमान इत्यादि गोष्टी या शहरात जितक्या जागृत होत्या, तितक्या हिंदुस्थानच्या कोणत्याही भागात नव्हत्या, त्यामुळे व्यापार आणि संपत्तीही येतेच वास करावयास आली होती.’ ही पुण्यातील पहिली चिमणी म्हणजे पुणे स्टेशनमागे अगदी कालपर्यंत उभी असलेली राजाबहादूर गिरणी. त्यांनी या संदर्भात जे एक वाक्य लिहिले होते, ते आजही किती लागू पडते ते लक्षात घ्या. ते लिहितात, ‘पुण्याच्या आसपास जेव्हा शेकडो चिमण्या उभ्या राहतील, तेव्हाच पुण्यास पूर्वीचे वैभव प्राप्त होईल. विलायतेहून जो रेशमी कपडा येथे येतो त्याचे रेशीम येथून जाते. नुसता कपडा पाहिला तर तो येथेही तयार होतो, पण त्यास जो तजेला असायला हवा तो येथे तयार होणाऱ्या कपड्यास असत नाही. म्हणून आपल्याकडे चांगली यंत्रे हवीत. ती जरूर तर परदेशातून आणून येथे चांगल्या कपड्याचे उत्पादन झाले तर या देशाचा माल परदेशी जाईल आणि आपली भरभराट होईल.’ विकास पत्रकारिता म्हणजे तरी दुसरी काय? मला वाटते ही दोन उदाहरणे पुरेशी आहेत. त्यांनी साखर उद्योगावर तेव्हा लिहिले होते. उत्तम प्रतीची साखर आपल्याकडे झाली, तर आपल्याला मॉरिशसकडे पाहायला नको, असेही त्यांनी लिहिले होते. पैसा फंड हे त्यांच्या सहकाराचे उत्तम उदाहरण आहे. एक एक पैसा गुंतवून त्यांनी तळेगावचा काच कारखाना सुरू केला. माणूस अन माणूस आपल्या विकासात सहकारी पद्धतीने जोडून घेण्याचे काम तेव्हा लोकमान्यांनी केले होते. सहकारी उद्योगाचे हे पहिलेच उदाहरण होय. त्यामुळेच आज आपण त्यांचे केवळ नामस्मरण करून चालणार नाही, तर त्यांच्या मार्गाने जाण्याचा निश्चय केला, तर आपली प्रगती हमखास होईल यात शंका नाही.

इतक्या अचाट धैर्याचा आणि अफाट बुद्धिमत्तेचा महापुरुष पुन्हा होणे नाही. त्यांच्या या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने त्यांना साष्टांग दंडवत. 

('मंडालेचा राजबंदी' या पूर्वी प्रकाशित, तसेच 'टिळक पर्व' या आगामी ग्रंथांचे लेखक.)
९८२२५५३०७६