सोयाबीनचे गहिरे संकट

विवेक मराठी    12-Jul-2020
Total Views |
राज्यात मोठ्या प्रमाणात पेरा झाला, पण बहुतांश शेतकरी आज बोगस सोयाबीन बियाणांमुळे उद्भवलेल्या दुबार पेरणीच्या संकटामुळे त्रस्त आहेत. अगोदरच प्रचंड हालअपेष्टांनी युक्त जीवन जगणार्‍या बळीराजाला दुबार पेरणी करावी लागत आहे. दुबार पेरणी-पुन्हा नांगरणी-वरखरणी-पुन्हा पेरणी हे दुष्टचक्र आहेच, शिवाय मातीलाच पुन्हा 'जीवनकळा' भोगाव्या लागत आहेत. 

Bogus soybean seeds_1&nbs


शेतात पिकणारे धान्य हेच शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचे साधन असते. पेरा करूनही ते अंकुरले नाही, तर शेतकर्‍यांवर मोठे संकट कोसळते. सद्य:स्थितीत महाराष्ट्रावर हे संकट ओढवले आहे. यंदाच्या खरीप हंगामात पेरा करूनही न अंकुरणारे सोयाबीनचे बोगस बियाणे हे महाराष्ट्रावरचे गहिरे संकट ठरले आहे. यामुळे शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. मनोधैर्य खचून दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारने वेळीच लक्ष घालून बोगस बियाणांच्या कंपन्यांना लगाम घातला पाहिजे.

पाऊसपाणी, हवामान, हंगाम आणि शेतकरी यामध्ये एक अद्वैत नाते आहे. या नात्यामध्ये आता दुरावा निर्माण होत आहे. कधी दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ, तर कधी गारपीट आणि दुबार पेरणी हे स्वप्नभंग सोबत घेऊन शेतकरी वावरत, खुरडत आणि सरपटत राहतो. त्यात लॉकडाउनमुळे शेतकरी व शेती उद्योग मोठ्या अडचणीत सापडला आहे. या संकटाशी मुकाबला करत शेतकरी वर्षभराचे नियोजन करून पीक लागवड करताना दिसतोय. खरीपाच्या पेरणीपूर्वी योग्य वेळी पाऊस पडल्याने शेतकरी आनंदित झाला होता.

राज्यात मोठ्या प्रमाणात पेरा झाला, पण बहुतांश शेतकरी आज बोगस सोयाबीन बियाणांमुळे उद्भवलेल्या दुबार पेरणीच्या संकटामुळे त्रस्त आहेत. अगोदरच प्रचंड हालअपेष्टांनी युक्त जीवन जगणार्‍या बळीराजाला दुबार पेरणी करावी लागत आहे. दुबार पेरणी-पुन्हा नांगरणी-वरखरणी-पुन्हा पेरणी हे दुष्टचक्र आहेच, शिवाय मातीलाच पुन्हा 'जीवनकळा' भोगाव्या लागत आहेत.

seed_1  H x W:
आज संपूर्ण जगात सोयाबीनचे उत्पादन करणे खाद्यतेलाच्या दृष्टीने व विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळेच सोयाबीनला पाश्चात्त्य देशांमध्ये कामधेनू, चीनमध्ये मातीतील सोने म्हणून संबोधले जाते. सोयाबीनची अधिक उत्पादकता मिळणारे स्थिर भाव व इतर पिकांच्या तुलनेत कमी रोग व किडीचा प्रादुर्भाव जास्त नसल्यामुळे महाराष्ट्रातील शेतीमध्ये सोयाबीन पिकाने महत्त्वाचे स्थान प्राप्त केले आहे.

मराठवाडा व विदर्भ ह्या दोन भागांमध्ये सोयाबीन उत्पादनास पोषक आणि अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सोयाबीनचे भरघोस उत्पादन घेतले, तर विदर्भातील अकोला, वर्धा, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आदी जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचा पेरा होतो. सोलापूर, कोल्हापूर, पुणे या ऊसपट्टयातील शेतकरी आता सोयाबीनकडे वळताना दिसताहेत. मात्र यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सदोष प्रतीच्या सोयाबीन बियाणांमुळे राज्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील पेरणी वाया गेली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊनही अद्यापही कृषी विभागाला म्हणावी तशी जाग आली नाही.

आपल्या राज्यात महाबीजसह पन्नासहून अधिक बियाणे कंपन्या सोयाबीन बियाणाची विक्री करतात. काही कंपन्या शेतकऱ्यांना सीड प्लॉट देतात. त्या माध्यमातून शेतकरी मोठ्या प्रमाणात बियाणे तयार करतात. कंपन्या हे बियाणे शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. अहमदनगर आणि बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन बियाणे तयार होते. मराठवाड्यात नांदेड, परभणी, उस्मानाबाद, लातूर या ठिकाणी बियाणे तयार होते. बियाणे निर्मितीत राज्य सरकारच्या महाबीज कंपनीचा मोठा वाटा आहे. मागील वर्षी परतीचा पाऊस मोठया प्रमाणात झाला होता. त्यामुळे सोयाबीनचे उत्कृष्ट व दर्जेदार बियाणे तयार झाले नाही. त्यामुळे मध्य प्रदेशातील बियाणे कंपन्यांनी महाराष्ट्रात शिरकाव केला.

सोयाबीन उत्पादनात अग्रेसर असलेल्या विदर्भ-मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील नगर, सोलापूर, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यांतही सोयाबीनचे बियाणे अंकुरले नाही.

हतबल शेतकर्‍यांच्या व्यथा

सोयाबीन अंकुरले नाही, म्हणून शेतकर्‍यांवर दुबार-तिबार पेरणी करण्याची वेळ आली. सोलापूर जिल्ह्यातील नरहरी व सोजर ढेकणे या ८० वर्षीय शेतकरी दांपत्याने दुबार पेरणी केलीय. बैलजोडी आणि मजुरांचा खर्च परवडत नाही, म्हणून ढेकणे दांपत्याने पेरणीचे चाडे स्वतःच्या खांद्यावर घेऊन काळ्या आईची पुन्हा ओटी भरली. दुबार पेरणीच्या संकटामुळे मराठवाड्यातील दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत.


Bogus soybean seeds_1&nbs

शेतकरी संदीप येरोळकर

खरीपात कमी कालावधीचे पीक घेऊन दोन पैसे हातात येतील, या एकाच आशेवर पदरमोड करून सोयाबीन पेरलेल्या लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ गावातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संदीप येरोळकर आपल्या व्यथा सांगताना म्हणतात, "माझ्या आणि आईवडिलांच्या नावाने १३ एकर जमीन आहे. पाण्याची व्यवस्था नाही, शेत करावे म्हटले तरी पुरेसे भांडवल नाही. यंदा वेळेवर पाऊस पडला. त्यामुळे १३ एकरावर सोयाबीनचा पेरा केला. त्यासाठी महामंडळाच्या महाबीज कंपनीच्या ३३५ नंबर बियाण्याची पेरणी केली. पेरणी व इतर खर्च पाहता सुमारे ८० हजार रुपये खर्च आला. पेरणी करूनही आठ दिवस झाले असले, तरी सोयाबीनचा दाणा कुठेच उगवला नाही. दुकानदाराकडे तक्रार केली, बियाणे काय? माझ्या दुकानात तयार होतात काय? अशी दुकानदाराकडून उडवाउडवीची उत्तरे आली. कृषी विभागाकडे तक्रार करावी म्हटले तर 'कोरोना'मुळे गावातून बाहेरही पडता येत नाही. कृषी अधिकार्‍यांना बाहेर पडण्याचा अधिकार असतानाही तेही पंचनामा करण्यासाठी आले नाहीत. सांगा, आम्ही तक्रार कुणाकडे करायची? डोक्यावर बँकेचे कर्ज आहे. पेरणीला लाखांपर्यंत खर्च झाला. अशा परिस्थितीतही हातउसने करूनही १३ एकरावर पुन्हा सोयाबीनची पेरणी केली आहे. सोयाबीन हातात पडेपर्यंत काही खरे नाही. असे हे शेतकीचे वास्तव स्थिर नाही. शेतीवरील पडलेले संकट झेलत नवे स्वप्न पाहतोय. नैराश्य दूर होण्यासाठी वेळवर पाऊस पडला तर ठीक आहे, नाहीतर पुन्हा स्वप्नभंग पाचवीलाच आहे."

येरोळ गावातीलच सतीश शिवराज सिंदाळकर यांची अशीच केविलवाणा व्यथा आहे. सतीश यांनी आपल्या ८ एकर शेतात तीन वेळा सोयाबीनची पेरणी केली आहे. सतीश सांगतात, "मोठ्या मेहनतीने पहिली पेर केली. पहिली पेर उगवली नाही, म्हणून दुसरी केली. पुन्हा संकट उभा राहिले. पुरेशी ओल असून ही सोयाबीन अंकुरले नाही. शेतीशी निष्ठा ठेवून पुन्हा तिसर्‍यांदा पेरा केला. आता कुठे रानावर सोयाबीन दिसू लागले आहे."

औसा तालुक्यातील नागरसोगा गावातील प्रल्हाद जवळगे या शेतकऱ्याने दोन एकरावर सोयाबीनचा पेरा केला, पण तो उगवला नसल्याने या शेतकऱ्याला पुन्हा दुबार पेरणी करावी लागली. पेरणीसाठी २० हजाराहून अधिक खर्च झाला असल्याचे जवळगे यांनी सांगितले.


Bogus soybean seeds_1&nbs
प्रल्हाद जवळगे

उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथील शेतकरी सुधीर पोतदार सांगतात, "जळकोट शिवारात माझी शेती आहे. दर वर्षी मी घरचेच बियाणे पेरत असतो, परंतू गेल्या वर्षी सोयाबीन काढणीला आले, तेव्हा सलग तीन आठवडे मुसळधार पाऊस पडला. यामध्ये रानावर असलेले सोयाबीन काळे पडले. यंदा हे निकृष्ट बियाणे न पेरता बाजारातून ग्रीनगोल्ड कंपनीचे ३३५ या जातीचे बियाणे २५८० रुपयांत ३ किलोची बँग याप्रमाणे पाच बँग घेतल्या होत्या. समाधानकारक १०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतर या बियाणांची पेरणी केली, पण पेरलेले बियाणे २५ टक्केच उगवले. यामुळे या वर्षीचा ही खरीप वाया जातो की काय? या भीतीने आलेले सोयाबीन मोडून दुबार पेरणी करावी लागली. या संकटामुळे माझी मेहनत तर वाया गेलीच, शिवाय मोठे आर्थिक नुकसान झाले आहे."

अकोला जिल्ह्यातील अकोली जहागीर येथील शेतकरी गजानन धर्मे सांगतात, "विदर्भात कपाशीबरोबर सोयाबीनची पेरणी केली जाते. खरीपाच्या सुरुवातीला शेतकरी आर्थिक संकटात होता, त्यात शेतकर्‍यांना पीककर्जदेखील मिळाले नाही, अशा परिस्थितीत शेतकर्‍यांनी पेरणी केली. असंख्य शेतकर्‍यांचे सोयाबीन उगवले नाहीत, त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी पदरमोड करून, कर्ज काढून पुन्हा सोयाबीन पेरणीची सोय लावली आहे."

अमरावती जिल्ह्यातील लाडकी गावातील विधवा महिला शेतकरी कमल ढोके सांगतात, "मी अल्पभूधारक विधवा महिला शेतकरी आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने मोर्शी येथील सातपुडा कृषी केंद्रातून सोयाबीनचे बियाणे घेतले. ह्या बियाणाची शेतात पेर केली, पण आठ-पंधरा दिवस उलटून गेले, तरी सोयाबीन उगवले नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित दुकानदाराकडे तक्रार करूनही त्यांनी दखल घेतली नाही. मला नुकसानभरपाई मिळावी म्हणून कृषी अधिकारी, राज्याचे कृषी मंत्री यांच्याकडे मी लेखी तक्रार केली असून मला त्वरित भरपाई मिळावी."

कारवाई म्हणजे निव्वळ फार्स

सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याचे हजारो शेतकर्‍यांनी तक्रार केली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सरकारला जाब विचारला असला, तरी हा जाब कायद्याच्या कसोटीवर टिकणारा नाही, असे शेतकरी संघटनेचे मराठवाड्यातील पदाधिकारी सुधीर बिंदू यांचे मत आहे. या संदर्भात सुधीर बिंदू पुढे म्हणतात, "सध्या बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीसह मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. बियाणे उगवणे हे फक्त आर्थिक नुकसानीपुरते मर्यादित नसून त्यामुळे शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगाम वाया जातो. आता पुन्हा पेरणी करावी लागत असल्याने उत्पादकतेच घट निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे शेतकर्‍यांचे रब्बीचे नियोजन ही बिघडून जाण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाने सदोष बियाणे प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सरकारला जाब विचारला आहे. सरकारने गडबडीत कंपन्यांवर नुकसानभरपाई वसूल करून फौजदारी कारवाई करण्याची घोषणा केली असली, तरी तो निव्वळ फार्स आहे.

बियाणे कंपन्यांवर करण्यात आलेली कोणतीही फौजदारी कारवाई कायद्याच्या कसोटीवर टिकणारी नाही. कारण देशात सध्या अस्तित्वात असलेल्या एकाही बियाणे कायद्यात अशी तरतूद नाही. बियाणे कंपन्यांवर फौजदारी कारवाईची तरतूद नसल्याने ह्या कारवाया न्यायालयात टिकणार नाहीत. तसेच शेतकऱ्यांना नुकसानभरपाईबाबत कुठलीच तरतूद नसल्याने त्याबाबतही फारसे काही शेतकऱ्यांच्या हाती लागणार नाही. सरकारची कारवाईची घोषणा म्हणजे फक्त शेतकऱ्यांच्या रोषातून मोकळे होणे व आपल्यावरील जबाबदारी कंपन्यांवर ढकलून मोकळे होणे एवढाच दिसतो.

या सर्व तक्रारीत सर्वाधिक तक्रारी शासनाच्या महाबीजविरुद्ध आहेत. आपल्याच कंपनीविरुद्ध असणाऱ्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन सरकारने सोयाबीन न उगवलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर शास्त्रज्ञांचे पथक तातडीने पाठवून त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने मागवून या शेतकऱ्यांना अशा पध्दतीने नुकसानभरपाई देता येईल."

शेतकर्‍यांनो, वेळीच काळजी घ्या

"दर वर्षी राज्यात सोयाबीन बियाणे उगवण्यासंदर्भात चर्चा सुरू असते. यंदाही ही चर्चा अधिक प्रमाणात होत आहे. शेतकर्‍यांनी सोयाबीन पेरताना शास्त्रीय माहिती आणि विशेषतः सोयाबीन पिकाचा दीर्घ अनुभव असलेल्या शेतकर्‍यांकडून मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे" असे जालना जिल्ह्यातील पत्रकार, शेतकरी सोमनाथ कन्नर यांनी सांगितले. सोमनाथ पुढे सांगतात, "सोयाबीन हे कमीअधिक पावसाचे प्रमाण सहन करू शकणारे कोडगे पीक असले, तरी ते उगवण्याच्या बाबतीत फार संवेदनशील आहे. सोयाबीनची पेरणी करताना जमिनीत योग्य वाफसा असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अतिमहत्त्वाचे म्हणजे सोयाबीनची पेरणी करताना तिफन किंवा पेरणी यंत्रांचे फन जास्त खोल न लावता बी ३ ते ५ सें.मी.पेक्षा जास्त खोल किंवा वर पडता कामा नये, याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यायची असते. ती काळजी शेतकरी घेत नाहीत. विशेषतः ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्राद्वारे पेरणी करताना काही ड्रायव्हर हायड्रॉलिकच्या साहाय्याने पेरणी यंत्र सतत खाली-वर करत असतात. त्यामुळे बियाणे खोल पडण्याचा धोका असतो. त्याचबरोबर सोयाबीनची पेरणी करताना ट्रॅक्टरचा चालण्याचा वेग ताशी ५ कि.मी. इतका संथ असावा. पण लवकर काम उरकण्याच्या घाईपोटी ट्रॅक्टर बेसुमार पळवला जातो. मुख्य म्हणजे शेतकर्‍यांनी पेरणीपूर्वी किमान १५ दिवस आधी बियाणे खरेदी करावे. अशा वेळी शेतकऱ्यांचे कर्तव्य आहे की, बियाणाच्या प्रत्येक बॅगवर डोळे झाकून विश्वास न ठेवता प्रत्येक बॅगमधील किमान १०-१० दाणे काढून ते जमिनीत किंवा ओल्या कापडात ठेवून उगवून बघावेत. त्याला 'जर्मिनेशन - म्हणजे उगवण क्षमता - तपासणे' म्हणतात. एकूणच बी पेरण्याआधीच नीट काळजी घेतली, तर पंचनामे होण्याची वाट बघत बसण्याची गरज पडत नाही."

शेतकर्‍यांचे जीवन असे अस्थिर आहे. परिवर्तनाच्या ओघात शेतीत यंत्र-तंत्र-रसायने आले असले, तरी, शेती आणि शेतकऱ्यांसमोर निकृष्ट बियाणांसारख्य असंख्य समस्या प्रश्नांकित आहेत.