टोपीकरांच्या व्यापाराबरोबरच छुप्या अशा राजकीय महत्त्वाकांक्षा त्यांच्या चांगल्याच लक्षात आल्या. रामचंद्रपंत अमात्यांनी 'टोपीकर' असा परकीयांचा उल्लेख केला आहे. त्यांच्याशी वागण्याची महाराजांची रीत कशी होती, मूलभूत धोरण काय होते हे 'आज्ञापत्रा'मध्ये सविस्तर आले आहे. प्रामुख्याने इंग्रजांची तिरकी व फसवी चाल बघूनच महाराजांनी आपले धोरण ठरवले असावे.
शिवाजी महाराजांचा जन्म इ.स. १६३० सालचा आणि ईस्ट इंडिया कंपनीची (यापुढे फक्त कंपनी असा उल्लेख होईल) महाराष्ट्रातील पहिली वखार सन १६३६ सालची. आदिलशहाच्या मुलखात / परवानगीने कंपनीने दाल्भ्यपुरी उर्फ दाभोळ येथे ही वखार स्थापन केली होती. पश्चिम किनाऱ्यावरील दाभोळ हे फार पुरातन काळापासून एक महत्त्वाचे बंदर होते. या बंदरातून भरपूर माल घेऊन दर वर्षी दोन-तीन जहाजे तांबड्या समुद्राकडे जात, त्याचप्रमाणे २-३ बोटी हर्मूझ बंदराकडे जात. तसेच उलट प्रवासात परदेशातूनही बराच माल येत असे. इंग्रजांना दाभोळचे हे महत्त्व कळले असल्याने अनेक वर्षे धडपड करून त्यांनी तिथल्या वखारीसाठी आदिलशाहीकडून फर्मान मिळवले होते. दाभोळहून कामकाज सुरू केल्यावर त्यांचा राजापूरशी संबंध आला. १६४९ साली त्यांनी तिथेही वखार उघडली. त्याच दरम्यान महाराजांचे स्वराज्यनिर्मितीचे प्रयत्न सुरू होते. स्वराज्यविस्तारासाठी त्यांचे कोकणाकडे लक्ष होतेच. यथावकाश तेही दाभोळ आणि राजापूरकडे गेले.
मिर्जान, कारवार, गिरसप्पा इथून मोहरी, वेलची, सुपारी असा माल राजापुरास येत असे. त्याशिवाय मिरे, लाख, जाडेभरडे कापड असा माल राजापुरातून परदेशी जात असे. युरोपमध्ये या मालाला चांगली मागणी असे. फ्रेंच आणि इंग्लिश व्यापाऱ्यांच्या अहवालावरून ते लक्षात येते. पुढे मुंबई बंदर पोर्तुगीजांकडून इंग्लंडच्या राजाला आंदण म्हणून मिळाले. त्यानंतर इंग्रजांनी सुरतेचे महत्त्व कमी करून मुंबईला जास्त महत्त्व द्यायला सुरुवात केल्यावरही दाभोळ आणि राजापूर या बंदरांचे महत्त्व अबाधितच होते.
१६६१ साली महाराजांनी आदिलशहाकडून राजापूर जिंकून घेतले. त्याआधीच्या पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये इंग्रजांनी सिद्दी जौहरला मदत केली होती. महाराजांच्या पन्हाळ्यावर महाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यात सापडले असताना स्वतःचा झेंडा लावून इंग्रजांनी पन्हाळ्यावर तोफा डागल्या होत्या. खरे तर अफझलखानाचे देदीप्यमान प्रकरण महाराजांच्या खात्यावर यशस्वीरित्या जमा असताना इंग्रजांचे हे धाडस आत्मघातकीच होते. तरी त्यांनी ते केल्यामुळे महाराजांनी त्यांना ह्या राजापूरच्या मोहिमेत जबरदस्त अद्दल घडवली. महाराजांनी त्यांची वखार अक्षरशः खणून काढली. सुमारे पुरुषभरपर्यंत खणून काढली आणि त्यात सापडलेला माल सर्व जप्त केला. त्यांची माणसे (संबंधित व जबाबदार) पकडली आणि व्याघ्रगडावर (वासोटा) डांबून ठेवली. पुढे अनेक महिने त्यांना आपल्या कैदेतच ठेवले. महाराजांचा हा 'देसी तडका' इंग्रजांनी कायम लक्षात ठेवावा असाच होता. पुढे त्यातली काही कैदेतच मरण पावली आणि काही नंतर सुटका झाल्यावर लवकरच!
खरे तर पन्हाळ्याच्या वेढ्यातच महाराजांना इंग्रजांचे अंतरंग पुरते कळून चुकले. टोपीकरांच्या व्यापाराबरोबरच छुप्या अशा राजकीय महत्त्वाकांक्षा त्यांच्या चांगल्याच लक्षात आल्या. रामचंद्रपंत अमात्यांनी 'टोपीकर' असा परकीयांचा उल्लेख केला आहे. त्यांच्याशी वागण्याची महाराजांची रीत कशी होती, मूलभूत धोरण काय होते हे 'आज्ञापत्रा'मध्ये सविस्तर आले आहे. प्रामुख्याने इंग्रजांची तिरकी व फसवी चाल बघूनच महाराजांनी आपले धोरण ठरवले असावे. एरवी साहूकरांचा बहुत मान ठेवणारे महाराज परकीय सावकार, व्यापारी ह्यांच्याबाबत खूप सावध असत.
'दर्यावर्दी सावकार यासही बंदरोबंदरी कौल पाठवून आमदरफ्ती करवावी. सावकारांमध्ये फिरंगी इंगरेज, वलंदेज, फरासीस, डींगमारादी टोपीकर हेही लोक सावकारी करितात परंतु ते वरकड सावकारांसारिखे नव्हत. त्यांचे खावंद प्रत्यक अप्रत्यक (प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष) राज्यच करितात. त्यांचे हुकमाने, त्यांचे होत्साते हे लोक या प्रांती सावकारीस येतात. राज्य करणारास स्थललोभ नाही यैसे काय घडो पाहते. तथापि टोपीकराचा या प्रांती प्रवेश करावा राज्य वाढवावे स्वमत्त प्रतिष्ठावे हा पूर्ण अभीमान. तदनुरूप स्थलोस्थली कृतकार्यही झाले आहेत. त्याहीवरी हटी जात. हातास आले स्थान मेलियाने सोडावयाचे नाहीत. याची आमदरफ्ती आले गेले यैसेची असो द्यावी. त्यासी केवळ नेहेमी जागा देऊ नये. जंजीरे यासमीप या लोकाचे येणे जाणे सहसा होऊ देऊ नये. कदाचीत वखारीस जागा देणे आलेच तर खाडीचे सेजारी समुद्रतीरी न द्यावा तैसी ठायी जागा दिधलीयावरी आपले मर्यादेने आहेत ते आहेत नाही ते समई आरमार दारूगोली हेच त्यांचे बल. आरमार पाठीसी देऊन त्याचे बले त्या बंदरी नूतन कीलाच नीर्माण करणार. तेव्हा तीतके स्थल राज्यातून गेलेच याकरीता जागा देणेच तरी खाडी लांब गाव दोन गाव राजापूरासारखी असेल तेथे फरासीसाच जागा दिल्हा होता. त्या न्याये दोन चार नामांकीत थोर शहरे आसतील त्यामध्ये जागा द्यावा तोही नीच जागा शहराचे आहारी शहराचा उपद्रव चुकवून नेमून देऊन वखारा घालवाव्या त्यासरही इमारतीचे घर बांधो देऊ नये. याप्रकारे राहिल तर बरे नाहीतर यावीणही प्रयोजन नाही. आलो गेले असोन त्याचे वाट नव जावे. आपले वाटे त्याणी न वजावे इतकेच पूरे. गनीमाचे मूलकातील मूलूक मारिल्यामुळे अथवा दर्यावर्दीमूळे साहूकार सापडले तरी मवसर पाहून त्यासी खंड करावा. खंडाचा वसूल घ्यावा तोही त्यास राखून घ्यावा. खंड फारीख जाहल्यावर थोडीबहूत त्याची मेहमानी करून बहूमानी त्यांसी त्याचे स्थलास पाठवून घ्यावे. गनीमाकडील सेवक लोकास जे शासने आहेत ते साहूकार लोकांस उचीत नव्हे.'
- आज्ञापत्र
आज्ञापत्रामध्ये व्यक्त झालेले हे धोरण महाराजांची दूरदृष्टी, अखंड सावधानता, शत्रूंची सखोल माहिती व तिचे अचूक विश्लेषण ह्या सर्व गोष्टी व्यक्त करते. एतद्देशीय राजांमध्ये इतकी विचक्षण दृष्टी असणारा एकही सत्ताधारी आढळत नाही. Flag follows the trade हे आंतरराष्ट्रीय व्यवधान महाराज किती सहजतेने सांगतात! त्याची आजची गरज (Relevance) लक्षात घेतली, तर आपण फक्त चकित होऊ शकतो.
धोरणविषयक लवचीकता हा त्यांच्या कारभाराचा आणखी एक विशेष पैलू. वरील तात्त्विक विवेचनानुसार परकीयांविषयी इतकी सावधानता बाळगणारे महाराज आर्थिक बाबतीत त्यांच्याशी एकदम वेगळे वागताना दिसतात. इंग्रजांनी राजकीय, लष्करी बाबतीत आगळीक केली, म्हणून महाराजांनी त्यांची राजापूरची वखार नुसती लुटलीच नाही तर खणून काढली होती! त्यांची माणसे त्यांनी दीर्घकाळ आपल्या तुरुंगात खितपत ठेवली. त्याबाबत महाराजांनी कोणाचीही कसलीही भीडमुर्वत ठेवली नाही. पण तीच वखार इंग्रजांनी परत राजापुरात घालावी, म्हणून नंतर महाराजांनी कित्येक वर्षे वाटाघाटीसुद्धा केल्या! आपल्या सर्वात मोठ्या लुटीच्या (नुकसानभरपाईच्या) (सुरतच्या) मोहिमेत त्यांनी शक्य असूनही इंग्रजांच्या व डचांच्या वखारींना कसलाही उपद्रव दिला नाही. कारण व्यापारी बाबतीत ह्या परकीयांचा स्वराज्याला खूप उपयोग आहे हे ते जाणत होते. राजकारण आणि अर्थकारण हे जरी एकमेकांत गुंतलेले असले, तरी वेळप्रसंगी एकमेकांपासून त्यांना वेगळे करूनच निर्णय घ्यावे लागतात ही व्यावहारिक लवचीकता त्यांच्याकडे होती, त्याची पावतीही त्यांच्या ह्या शत्रूकडूनच त्यांना मिळाली होती. इंग्रजांचे खाली दिलेले पत्र हा त्या लवचीकतेचा पुरावा आहे.
कंपनीचे सुरतेस पत्र / श १५८७ फा. शु. ११ / इ.स. १६६६ मार्च ७
शिवाजीने अनेक ठाणी घेऊन लुटीचाही त्याचा क्रम चालू आहे असे कळते. परंतु काही काळाने त्यातील कित्येक ठिकाणी स्थिरस्थावर होऊन व्यापाराबद्दलही तो व्यवस्था करेल हे लक्षात घेऊन त्याच्याशी सामोपचाराचे संबंध ठेवावेत, म्हणजे संधी येताच आपल्याला फायदा करून घेता येईल. आज त्यांच्या आरमाराचा प्रतिकार करण्याकरता आम्हास गलबते पाठवता येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. ती लक्षात घेऊन त्याच्याकडून आपल्याला अधिक तोशीश न पोहोचेल अशा बेतानेच आपले वर्तन ठेवावे.
- इंग्लिश फॅक्टरी रेकॅार्ड (१२, पृ. १६९)
या प्रकारची अधिक पत्रे पुढील लेखांतून.