॥ निजरूप दाखवा हो ॥

विवेक मराठी    26-Jun-2020
Total Views |

pandharpur ashadhi ekadas
निजरूप दाखवा हो हरिदर्शनास द्या हो ॥
अवरुद्ध साद माझा प्रतिसाद त्यास द्या हो
आला गजेंद्रमोक्षा तैसे पुनश्च या हो
जळत्या निळ्या विजेची प्रभु एक झेप घ्या हो
नरसिंह होऊनि या घुमवीत गर्जनांसी
शतसूर्य तेज दावा अज्ञात या जनासी
भ्याला समुद्र क्रोधा ते रामचंद्र व्हा हो
पार्थास दाविले ते प्रभु विश्वरूप दावा
मुरलीमनोहरा या, वाजवीत पावा
एका करांगुलीने गोवर्धना धरा हो
राजःभ्रमा पटू द्या प्रत्यक्ष एकवार
श्रीकृष्ण-विष्णु-राम तोची विठू महार
जाळी तनामनासी ती आग शांतवा हो
गदिमांच्या अनेक अप्रतिम अजरामर गीतांमधलं हे एक.
दामाजीपंतांच्या सुप्रसिद्ध कथेवर १९७० साली आलेला चित्रपट 'झाला महार पंढरीनाथ'. मंगळवेढ्याचे नायब तहसीलदार असलेले दामाजीपंत मनाने अत्यंत सहृदय व सश्रद्ध होते. एका वर्षी भीषण दुष्काळामुळे अन्नान्न झालेल्या प्रजेला वाचवण्याकरता त्यांनी स्वतः निर्णय घेऊन सरकारी गोदाम लोकांकरता खुलं केलं.
मंगळवेढ्यात धान्य मिळतंय हे ऐकून परिसरातून लोंढे लागले. बादशहाला हे कळताच त्याने दामाजींना कैदेत टाकलं. पण तिकडे बादशहाच्या दरबारात मळकं फाटकं धोतर, तुटक्या वहाणा, हातात घुंगराची काठी,
खांद्यावर घोंगडं टाकलेलं, कपाळी गंधटिळा व डोईला मुंडासं अशा बावळ्या वेशात एक जण कनवटीला बारकीशी पुरचुंडी लावून आला व म्हणू लागला, "जी म्या विठू महार. धन्यानं लुटलेल्या धान्याचा मोबदला घिऊन आलुया. पयका मोजुन घ्या न पावती करून द्या."
त्याच्या त्या अवताराला नि त्या बारक्या पुरचुंडीला पाहून दरबारी हसू लागले. पण त्याने ती पुरचुंडी दरबारात रिती करायला सुरुवात करताच सगळ्यांचे डोळे विस्फारलेच! मोहरांचा हा ढीग उभा राहिला अन् महार अचानक लुप्तच झाला. बादशहाने दामाजीपंतांना सोडलं. पण "तो कोण होता, त्याला मला भेटायचंय" म्हणत तो मंगळवेढ्याला आला.
आजही मंगळवेढा दामाजीपंताचं गाव म्हणून अोळखलं जातं. तिथे त्यांचा वाडा, मंदिर हे वारकर्‍यांचं, भक्तांचं श्रद्धास्थान आहे. एखाद्या सरकारी अधिकार्‍याचं मंदिर होणं ही बाब आजही एकमेवच ठरावी!
चित्रपटात शाहू मोडक दामाजीपंत व त्यांच्या पत्नीच्या रूपात पद्मा चव्हाण या दोघांचं अत्यंत देखणं, सोज्ज्वळ रूप पाहायला मिळतं. बादशहाला दर्शन देण्याकरता दामाजीपंत आवाहन करतात.. गदिमांनी गीतात वर्णिलेल्या सर्व रूपांत तो त्यांना दर्शन देतो..
राज्य असतं जनतेच्या सुखाकरता. तिला उपाशी ठेवून शिस्त, नियम, कायदे पाळण्याला काही अर्थ नाही, हे धाडसाने व्यवहारात आणणारे दामाजीपंत संत बनले. दामाजीपंतांसारख्या एका सरकारी अधिकार्‍याने यंत्रणेच्या डोळ्यावरचा भ्रमाचा पडदा हटवला आणि लोकांनाही 'श्रीकृष्ण विष्णु राम तोची विठू महार' हे दर्शन घडवलं!
बिदरच्या वेशीवर आजही विठ्ठलाच्या पावलाची खूण आहे. संतांच्या समाजातले भेदाभेद संपवण्याच्या शतकांपासूनच्या प्रयत्नांची ती साक्ष आहे. ती खूण जरूर जतन करायला हवी, पण भेदाचा ठसा मात्र पुसटच नाही, तर पूर्ण अदृश्य व्हायला हवा!