॥ जाई वटीत फुलली ॥

विवेक मराठी    16-Jun-2020
Total Views |

pandharpur ashadhi ekadas

मालनींच्या ओव्यांचे विषय अगणित आहेत. त्यात देवदेवताही अनेक येतात. पण त्या ओव्या बहुतेक सकाम आहेत. संकटनिवारण कर, मूल होऊ दे, दारिद्र्य जाऊ दे, तुला मी पूजते, दर्शनाला येते, नवस करते वगैरे. एका विठ्ठलाचाच याला अपवाद दिसतो. विठ्ठलावर मालनींचं निष्काम, निर्हेतुक प्रेम आहे. त्याच्याविषयी अपार जिव्हाळा आहे. त्यांना त्याच्याकडून काहीच नकोय. कटीवर हात ठेवून त्यांची गार्‍हाणी ऐकून घेणारा, मनमोकळेपणाने ज्याला सारं सांगता येतं असा तो त्यांचा जिवलग सखा आहे.
घराघरातल्या मालनींना - अगदी पंढरीला न गेलेल्यांनाही पंढरपूर, विठोबा, पंढरीची वाट याबद्दल अगदी तपशीलवार माहिती आहे. भागवत संप्रदायाचं वैशिष्ट्य हे की त्यात कसलंच अवडंबर नाही. कसली शास्त्रं नाहीत. सामान्य माणूस त्याच्या बोलीभाषेत त्याला भजतो. त्याच्या अंगणात फुलणार्‍या तुळशीने त्याला पूजतो. त्याच्याकरता सर्वांसोबत मुक्तपणे नाचतो, गातो, फुगड्या खेळतो. वारीची आनंदयात्रा म्हणजे भक्तीचं मुक्तांगण असतं. तिथला हा मोकळा आनंद मालनींना वारंवार चाखावा वाटला नाही तरच नवल!
दारी येणारे वासुदेव, देवळातले कथेकरी बुवा, वारी करून आलेल्या जाणत्या महिला यांच्याकडून कथा ऐकता ऐकता मालनीच्या दृष्टीसमोर पंढरी उभीच राहते. ती गाऊ लागते -
पंढरी पंढरी ऽ
न्हायी पाहिली अजून ऽ ऽ
हायी कोनत्या ऽ ऽ बाजूनं ऽ
पंढरी पंढरी ऽ
ईथनं ऽ कीती लांब ऽ ऽ
तिथं सोनियाचा खांब ऽऽ
 
पंढरीची वाट चालायची कल्पनाच तिला मोहवून टाकते. तिला मुळी ती वाट खडतर वाटतच नाही. उलट अोच्यातल्या जाईच्या कळ्या तिथे जाईतो टवटवीत उमलतील इतकी अलगद अन् जलद ती जाणार आहे, असंच तिला वाटतं.
 
पंढरीची वाट ऽ
ही तं ऽ चालाया चांगली ऽ ऽ
जाई वटीऽत फुलली ऽ ऽ
यवडी पंडरीऽ पंडरीऽ
दुरून दिसती निशानाची ऽ ऽ
टाळ मुरुदुंग ऽ झनकाराची ऽ ऽ
 
दुरूनही तिला भगव्या पताकांचा नाचरा प्रवाह दिसतो आहे. टाळ-मृदुंगाचा नाद तिला एेकू येतो आहे. एरवी इतक्या कुलदैवतांना जाऊन पाहून आलेली ही मालन कधी न देखल्या पांडुरंगाचा एवढा ध्यास का घेऊन बसली आहे, असं तिला कुणी पुसतं. ती त्यामागचं कारण सांगते आणि "बस, मला जायचं आहे.. मला सोबत नको, सामान नको, पूजासाहित्य नको" असं सांगते आणि तिथे जाऊन तिला काय मिळणार आहे, हेही सांगतेय.
 
पंढरीला जावं ऽ जावं ग ऽ माझ्या मनी ऽ
मव्हनी ऽ टाकीली ऽ बाई देवा विठ्ठलानी ऽ
त्यानेच माझ्यावर अशी मोहिनी टाकलीय की मी तिकडे खेचलीच जाते आहे.
पंढरीला जाया ऽ नगंऽ कुनाची सोबत ऽ
देवा विठ्ठलाच्या ऽ जाते कळसाला बघत ऽ ऽ
पंढरीला जाया ऽ न्हायी लागत ऽ न्हाया धूया ऽ ऽ
विठ्ठल ऽ रुकमीनी ऽ हैत रावूळी बाबबया ऽ ऽ
पंढरीच्या राया ऽ न्हायी कायी बी ऽ लागत ऽ
सये तुळशी बुक्क्याची ऽ हाय त्याला ग ऽ आगत ऽ
त्याचं शिखर पाहात ही इतकी दूर एकटी जाणार आहे. हे धाडस, हा आत्मविश्वास तिला कसा आला असेल? आपल्या घरी तर जायचं. कशाला आंघोळपांघोळीची ब्याद सोबत? तिथे गेल्यावर मायबाप न्हाऊ घालतीलच की मायेने.. इथून काही न्यावं तरी कशाला? तिथेच मिळणारा तुळस बुक्का याचीच तर त्याला आवड आहे..
पंढरपुरात ऽ गऽ
मी तं देखीलं ऽ शीखर ऽ ऽ
काय सांगू ऽ सये ऽ
मन झालं ऽ माझं ऽ थीर ऽ ऽ
पंढरीला जाऊन आपलं मन 'स्थीर' होणार आहे, हे उद्दिष्ट तिच्या मनात स्पष्ट असलेलं पाहून खरंच नवल वाटतं! पण तो दिसला की ती जाणार आवेगाने, लाडाच्या लेकीसारखीच! नुसता आदराने माथा टेकणार नाही. ती तर लेक आहे. ती कुशीत शिरणार आहे!
चरणांवर माथा ऽ पोटात घाली डुयी ऽ
पंढरीराया माझ्या ऽ तूच मला सरवे कायी ऽ ऽ
तो तिचं सर्वस्व आहे. त्याने एकदा पोटाशी धरलं की तिला सारं भरून पावणार आहे!
कधी एखाद्या लेकबाईला खूप खूप बोलायचंय.. तिला ते क्षणभर पायावर डुई ठेवून निघणं मुळी पटतच नाहीये.
चरणावरी माथाऽ ठेवीते रागं रागंऽ ऽ
इटेवरल्या पांडुरंगा ऽ डोळे उघडून बघ ऽ ऽ
तिचा दुःखभार इतरांपेक्षा मोठा आहे हे त्याला कळत कसं नाही? एकदा डोळे उघडून पाहावं तरी त्याने..
पण तो जाणत नाही असं कधी झालंय? तो सर्वांचे कोड पुरवतो. त्याने हिला खास वेळ दिलाय..
दरशनाला जाते ऽ मला राऊळी रात झाली
देवा माझ्या इठ्ठलानं ऽ मला गूजाला बसवली ऽ ऽ
माझी इनती इसवली ऽ ऽ
 
खास तिला थांबवून घेऊन, तिला मनमोकळं बोलू देऊन तिच्या सगळ्या शंका निरसल्या. तिची समजावणी केली. तिच्या सार्‍या खंती शांतवल्या. तिची इनती, तिचं गार्‍हाणं विझलंच!
 
माहेरी आलेल्या लेकीला डोईला तेल घालायच्या निमित्ताने आईने जवळ बसवून घ्यावं नि एकीकडे बोलता बोलता, तेल घालता घालता तिच्या मस्तकाबरोबर काळजातही थंडावा उतरत जावा...
तसंच की हे