संघाचे काम शाखांच्या माध्यमातून चालते. सध्या संघशाखा मैदानावर लागत नाहीत. मैदानावरील संघशाखा बंद आहेत. मैदानावरील संघशाखा बंद होण्याचा संघ इतिहासातील हा चौथा प्रसंग आहे. पहिल्या तीन बंदीप्रमाणे संघाची ही चौथी ऐच्छिक बंदी संघाच्या अस्तित्वरक्षणासाठी नाही. ही बंदी कोरोना विषाणूच्या महामारीपासून समाजाचे रक्षण करण्यासाठी आहे. बंदी असताना समाजाचे रक्षण कसे करणार? असा प्रश्न कुणी विचारल्यास तो योग्य समजला पाहिजे. म्हणून आजच्या संकटाचे स्वरूप काय आहे, हे व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. ते समजून घेतल्याशिवाय कोणतीही तात्कालिक आणि दीर्घकालीन आव्हाने आपल्यापुढे आहेत, हे आपल्या लक्षात येणार नाही.
संघाचे काम शाखांच्या माध्यमातून चालते. सध्या संघशाखा मैदानावर लागत नाहीत. मैदानावरील संघशाखा बंद आहेत. मैदानावरील संघशाखा बंद होण्याचा संघ इतिहासातील हा चौथा प्रसंग आहे. १९४८ सालची पहिली बंदी, १९७५ सालची आणीबाणीची बंदी, १९९३ सालची बाबरी ढाचा पडल्यानंतरची बंदी आणि आता २०२० साली संघानेच आपणहोऊन स्वीकारलेली बंदी, असा हा बंदीचा प्रवास आहे.
पहिल्या तीन बंदी आणि आताची बंदी यांच्यात मूलभूत फरक आहे. पहिल्या तीन बंदी काॅंग्रेस शासनाने संघाला मारून टाकण्यासाठी घातल्या होत्या. तेव्हा संघापुढे आपल्या अस्तित्वरक्षणाचा विषय अग्रक्रमाचा होता. संघस्वयंसेवकांनी त्यासाठी फार मोठा त्याग केला, बलिदान दिले, शासनाचा पराभव करून संघाला विजयी केले. तिन्ही बंदीतील लढे जनताजनार्दनाच्या आशीर्वादाने आणि सक्रिय सहकार्याने यशस्वी झाले आहेत. प्रत्येक बंदीने संघ अधिक मोठा होत गेला आहे.
पहिल्या तीन बंदीप्रमाणे संघाची ही चौथी ऐच्छिक बंदी संघाच्या अस्तित्वरक्षणासाठी नाही. ही बंदी कोरोना विषाणूच्या महामारीपासून समाजाचे रक्षण करण्यासाठी आहे. बंदी असताना समाजाचे रक्षण कसे करणार? असा प्रश्न कुणी विचारल्यास तो योग्य समजला पाहिजे. म्हणून आजच्या संकटाचे स्वरूप काय आहे, हे व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. ते समजून घेतल्याशिवाय कोणतीही तात्कालिक आणि दीर्घकालीन आव्हाने आपल्यापुढे आहेत, हे आपल्या लक्षात येणार नाही.
सगळ्यात पहिले मोठे आव्हान कोरोना विषाणूपासून बचाव करण्याचे आहे. या विषाणूवर आज कोणतीही प्रभावी औषध योजना नाही. अजून लस शोधली गेलेली नाही. संसर्ग टाळणे एवढेच आपल्या हातात आहे. त्यामुळे शासनाने लाॅकडाउन केले आहे. सर्वांना घरी राहायला सांगितले आहे. सामाजिक अंतर ठेवण्याचा आग्रह केला आहे. समाजाचा जागरूक नागरिक म्हणून, कायद्याचे पालन करणारा नागरिक म्हणून प्रत्येकाने ही बंधने पाळणे आवश्यक झाले आहे. 'या वेळचा धर्म शासनाच्या कायद्याचे काटेकोरपणे पालन करण्याचा आहे. जो धर्माचे पालन करतो, त्याचे रक्षण धर्म करतो' हे विधान जगण्याचा हा कालखंड आहे.
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
लाॅकडाउन असल्यामुळे सर्व जण घरी आहेत. लहान-मोठे उद्योग-व्यवसाय बंद आहेत. हातावर पोट असणाऱ्यांची स्थिती 'आता खायचे काय?' अशी झाली आहे. अशा सर्व बांधवांना 'आम्ही तुमच्या मागे उभे आहोत' हा विश्वास देण्याची आवश्यकता आहे आणि स्वयंसेवक विविध प्रकारे सर्व देशभर हे काम करीत आहेत. सरकारी यंत्रणेनंतर जर कुठली बिगर शासकीय रचना काम करीत असेल, तर ती संघस्वयंसेवकांची आहे. २६ एप्रिलच्या बौद्धिक वर्गात मोहनजी भागवतांनी याचा उल्लेख केला आहे. जास्तीत जास्त गरजूंपर्यंत आणि जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचण्याचा संघस्वयंसेवकांचा प्रयत्न आहे. संघशाखा बंद असल्या तरी जनसंपर्क आणि जनसेवेचे काम बंद नाही.
कोरोना महामारीचे संकट किती काळ राहील, हे कुणी सांगू शकत नाही. लाॅकडाउनचा कालावधी ३ मेला संपणार होता, मात्र आता दोन आठवडे वाढविला गेला आहे. थोडी भीती, थोडी खबरदारी यामुळे लोकांनी पहिला लाॅकडाउन स्वीकारला. दुसऱ्या लाॅकडाउनने भीतीची छाया अधिक गडद केली. तिसऱ्या लाॅकडाउनने भीतीबरोबरच अनिश्चितता वाढवली आहे. याचा दोष कुणालाच देता येत नाही. याचे राजकारण करणे हे पाप आहे. संकटच असे आहे की, यातून या गोष्टी अपरिहार्यपणे पुढे येत चालल्या आहेत.
हे संकट जगातील मानवजातीवर आहे. कोरोना विषाणूचा परिणाम आज तरी फक्त माणसावरच होताना दिसतो. प्राणी, पशू आणि वनस्पती यांचे जीवन आनंदात आहे. त्यांचा आनंद आपण अनुभवू शकतो. मनुष्यावरच हा विषाणू का आला? हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. मनुष्याने निसर्गाच्या नियमात हस्तक्षेप करायला सुरुवात केली. कृत्रिम जीव बनवायला सुरुवात केली, निसर्गाला आपला गुलाम बनवायला सुरुवात केली. निसर्गाने एक विषाणू निर्माण करून माणसाला त्याची जागा दाखवून दिली का? जेवढा विचार करावा तेवढे थोडेच आहे.
लाॅकडाउनचा कालावधी सहन करण्याची लोकांची मर्यादा आहे. कोणतीही गोष्ट लोक एका मर्यादेपर्यंत स्वीकारतात. नंतर ती गोष्ट लोक मान्य करत नाहीत. दीर्घकाळ लाॅकडाउन राहिले, तर घरात कामधंदा न करता माणसाने असेच मरून जायचे का? मग त्यापेक्षा बाहेर का पडू नये, जे व्हायचे ते होईल... अशी लोकांची मन:स्थिती तयार होईल. अशी मन:स्थिती तयार होऊ नये, म्हणून संघस्वयंसेवकांना महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागेल. लोकांनी निराश होता कामा नये, हताश होता कामा नये, म्हणून प्रयत्न करीत राहणे आवश्यक आहे. या कामी योगोपचार, धर्मग्रंथाचे पठण, आपल्या थोर पुरुषांचे स्मरण करणे फार आवश्यक आहे. मानसिक बळ वाढविण्यासाठी त्याचा उपयोग असतो.
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
यापूर्वी देशाने अशी परिस्थिती कधीही अनुभवली नव्हती. सर्व देश एकाच वेळी अशा प्रकारच्या भयानक संकटात कधीही सापडलेला नव्हता. आज सर्व काही बंद आहे. त्याचे भविष्यकालीन चांगले-वाईट परिणाम भोगावे लागतील. नोकऱ्यांची संख्या कमी होत जाईल. असलेल्या नोकऱ्या जातील. ज्या व्यवसायात स्थलांतरित मजूर लागतात. ते व्यवसाय पुढील काळात कोलमडून पडतील. मजुरीवर किंवा छोट्या छोट्या कौशल्यावर ज्यांचे पोट भरते, ते बेकार होतील. 'रिकामे डोके हे सैतानाचे घर असते' असे म्हणतात. भविष्यकाळात यामुळे अनेक प्रकारचे प्रश्न उभे राहतील.
आजचे सेवा कार्य ठीक आहे, पण तो पूर्णविराम नाही. भविष्याचा जर विचार केला, तर रोजगार, व्यवसाय, शेती, व्यापार अशा क्षेत्रांत कोणते नवीन प्रश्र्न निर्माण होतील, याचा वेध घेऊन समाजाला बरोबर घेऊन त्यावर कोणती उपाययोजना करता येईल याचे चिंतन केले पाहिजे. हे सर्व प्रश्न समाजाच्या स्थैर्याशी निगडित आहेत.
ज्यांचे रोजगार जातील, ज्यांना नवीन रोजगार मिळणार नाहीत, असा मोठा असंतुष्ट वर्ग समाजात राहील. असा सगळा वर्ग देशतोडू गॅंगचा भक्ष्य बनण्याची शक्यता आहे. शहरी नक्षलवादी या काळात काय करीत आहेत, यावर बारीक लक्ष ठेवायला पाहिजे. त्यांना हातपाय पसरू देण्यास प्रतिरोध कसा करता येईल, याचा विचार केला पाहिजे. मानवी संस्कृतीचा इतिहास हे सांगतो की, नवीन परिस्थितीमध्ये नवीन रचना उभ्या कराव्या लागतात. संघाचे एक गीत आहे - 'नवीन पर्व के लिये, नवीन प्राण चाहिये, नवीन प्राण चाहिये' लाॅकडाउन निर्माण होण्यापूर्वी जसा देश होता, तसा तो अल्पकाळात उभा राहणे फार अवघड आहे.
लाॅकडाउन जेव्हा कधी उठेल तेव्हा उठेल. तेव्हा आपण एका नवीन प्रकारच्या सामाजिक परिस्थितीत प्रवेश करणार आहोत. आर्थिक, मानसशास्त्रीय, आरोग्यविषयक असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उभे राहणार आहेत. यातील तज्ज्ञ मंडळी याचा विचार करत राहतीलच, उपायही सुचवतील. जे समाजहिताचे ते स्वीकारून त्याच्या अंमलबजावणीसाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतीलच.
समाजाची स्थिरता तीन गोष्टींवर अवलंबून असते. त्या तीन गोष्टी अशा - १. परस्परानुकूलता, २. परस्परपूकता व ३. परस्परावलंबित्व. समाजाची रचना कोणतीही असेना का, आर्थिक परिस्थितीत वाटेल ते बदल होईनात का, जोपर्यंत या तीन गोष्टी मजबूत आहेत, तोपर्यंत समाजजीवन स्थिर राहील. हे तिन्ही विषय टोकाचा व्यक्तिवाद नाकारतात. मी माझ्यासाठी, जास्तीत जास्त माझ्या कुटुंबासाठी, मी स्वतंत्र सार्वभौम आहे. अशी सर्व विचारसरणी म्हणजे थोतांड आहे. समाजात जगताना एकमेकांना अनुकूल आणि पूरक बनूनच जगावे लागते. आपण परस्परांवर अवलंबून असतो. एक व्यक्ती सार्वभौमत्वाच्या कितीही बाता मारीत असली, तरी जिवंत राहण्यासाठी लागणारा अन्नाचा एक कण ती घरात तयार करू शकत नाही. म्हणूनच परस्परानुकूलता, परस्परपूकता, परस्परावलंबित्व या भावना समाजात अधिक दृढ कशा होतील, हे बघावे लागेल.
एका अर्थाने आपण भोगवादी समाजजीवनापासून दूर होऊन त्यागमय भोगाच्या समाजरचनेकडे निघालो आहोत. या रचनेमध्ये मी समाजाचा एक भाग आहे, माझे अस्तित्व समाजावर अवलंबून आहे ही भावना जागवावी लागेल. एकमेकांना पूरक बनून जगण्याची सवय लागली, तर पूरक रोजगार उपलब्ध होत जातील. कुठे यंत्र वापरायचे आणि कुठे मानवी श्रमाचा उपयोग करायचा याचा विवेक जागा होईल. आजचे विज्ञानयुग माणसाला माणसापासून दूर घेऊन जात आहे. त्याला यंत्राचे गुलाम बनविते. त्यातून बाहेर पडावे लागेल. संघाची ही चौथी बंदी समाज टिकविण्यासाठी आहे, असे माझ्या अल्पबुद्धीला वाटते, हे मी थोडक्यात या ठिकाणी मांडलेले आहे.
- रमेश पतंगे