आंबा उत्पादकांसमोरची आव्हाने आणि संधी

विवेक मराठी    08-Apr-2020
Total Views |


हापूस ही कोकणाची ओळख! कोकणाच्या मुख्य अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक.. कोकणात चार लाख एकरावर हापूसची लागवड आहे. हापूसची सुमारे तीन हजार कोटीची उलाढाल आहे. या अर्थव्यवस्थेवर काही लाख शेतकऱ्यांचा व त्यांच्याकडे काम करणाऱ्या मजुरांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. सध्या या आंब्यालाही कोरोनाचे ग्रहण लागले आहे. या संकटामुळे आंब्याचे गणित बदलले आहे. हा आंबा वेळेत बाजारपेठेत नाही आला, तर लागवडीसाठी केलेला खर्चही निघणे मुश्कील होणार आहे.


mango_1  H x W:

देशाचे राष्ट्रीय फळ असलेल्या आंब्याला आपल्या संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे. जगभरात आज सुमारे सव्वाशे देशांमध्ये आंबा पिकतो. आंबा पिकवण्याचा बाबतीत आपल्या देशात महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील हापूस आणि केशर आंब्यांची चव जगभर चाखली जाते. हापूस आणि केशर या दोन्ही जातींच्या आंब्यांना भौगोलिक निर्देशांक (जीआय) मानांकन मिळालेले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हापूस बागायतदारांची संख्या मोठी आहे. रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतदेखील आंब्याचे चांगले उत्पादन घेतले जाते. हापूस ही कोकणची खास ओळख असली, तरी कोकणात रायवळ, राजापुरी, तोतापुरी, रत्ना, सिंधू, पायरी, गोवा मानकूर या जातीच्या आंब्यांचीही लागवड केली जाते. कोकणातील आंब्याच्या अर्थकारणात आजपर्यंत दलाल आणि व्यापारी यांचेच वर्चस्व राहिले आहे. 'मूळ आंबा उत्पादक उपाशी आणि व्यापारी, दलाल तुपाशी' अशी गत आहे.

अवकाळी पाऊस, उष्णता, थंडी याचे कमी-अधिक होणारे प्रमाण, वातावरणात होणारे बदल या साऱ्या संकटांना गेल्या आठ-दहा वर्षांपासून विशेषतः कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी सामोरे जाताना मेटाकुटीला येताना दिसतोय. दरसाल असे संकट कोणत्या ना कोणत्या रूपाने येत आहे. आता कोरोनाच्या महामारीने आंब्याची संपूर्ण निर्यात ठप्प झाली आहे. कोकणात सध्या हापूसच्या एक कोटीहून अधिक पेट्या पडून असल्याचे सांगण्यात येत आहे.

mango_1  H x W:


सांगा
, आता आम्ही कसे जगायचे?

कोरोनाच्या संकटामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या संकटामुळे हातातोंडाशी आलेला आंबा बाजारात पोहोचू शकला नाही. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या कुटुंबांवर झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आंब्यासाठी लागणारी खते, फवारणी, मशागत यांचा आंबा उत्पादकांना करावा लागणारा खर्च कितीतरी पटीने वाढला आहे. यासाठी शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागते. एवढे करूनही यंदा आंबा हाती लागला नाही. त्यामुळे "सांगा, आता आम्ही जगायचं कसं?" हा एकच मूक आक्रोश आंबा उत्पादक शेतकरी करीत आहे.


देवगड तालुक्यातील हापूस उत्पादक शेतकरी वैभव घाडी सांगतात, "मी एक सामान्य शेतकरी आहे. जांभा दगडावर चार एकरावर माझी हापूस आंब्याची बाग आहे. झाडावरच पिकलेले आंबे खाली पडत आहेत. जमिनीवर अक्षरशः आंब्याची रास दिसून येत आहे. यंदा आंब्याला मोहोर आला.. त्यानंतर लगेच अवकाळी पाऊस झाला. फवारणी केली.. बाग वाचवली. आता दारात पुन्हा कोरोनाच्या रूपाने अस्मानी संकट उभे राहिले आहे. त्यामुळे आमचे जगणेच बदलले आहे. माझा आंबा कोणी घेईल की नाही? हा मोठा प्रश्न आहे. कोणी घेतला तर वाहतुकीचे व्यवस्थापन कसे करायचे? माझे संपूर्ण कुटुंब आंब्यावर अवलंबून आहे. दर वर्षी आंब्यातून पाच-सहा लाखांचे उत्पन्न मिळायचे. यंदा आंब्यासाठी केलेला खर्च निघणे अवघड आहे."


वेंगुर्ला तालुक्यातील अनसूर येथील विजय कृष्णा सरमळकर यांची व्यथादेखील अशाच स्वरूपाची आहे. "मी सहा एकरावर हापूस आंब्याची लागवड केली आहे, शिवाय करार पद्धतीने दुसऱ्यांच्या शेतात आंब्याची लागवड केली आहे. दलाल कवडीमोलाने आंबा मागतोय. दलालामार्फत विकलेल्या आंब्याची पट्टी (पैसे) मिळणे कठीण झाले आहे. सध्या आंबा झाडावरच पिकतोय. पिकलेला आंबा जमिनीवर पडून अक्षरशः सडून जातोय" असे विजय सरमळकर यांनी सांगितले.

विजय कृष्णा सरमळकर

mango_1  H x W:

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगमेश्वर येथील सुमेध सावरकर यांचा आंबा प्रक्रिया कारखाना आहे
. ते सांगतात. "कोरोनाच्या संकटामुळे कच्च्या मालाचा पुरवठा झालेला नाही. प्रक्रिया उद्योगावर याचा परिणाम झालेला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे."


नाशिक जिल्ह्यातील शेतकरी गंगाधर जाधव यांची दिंडोरी येथे 50 एकर
, तर निफाड येथे सहा एकर अशा एकूण ५६ एकरावर केशर आंब्याची बाग आहे. किनवट तालुक्यातील संतोष तिरमन्नवार यांच्याकडे केशरची ५०० झाडे आहेत, तर पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील अवसरी गावातील किसन बाबू मोरे या शेतकऱ्याची अडीच एकरावर केशर आंबा बाग आहे. "केशर आंबा परिपक्व होण्यास आणखी दीड महिना जाईल. त्यामुळे आम्हाला लॉकडाउनचा फटका बसला नाही" असे तिन्ही शेतकऱ्यांनी सांगितले.


अनिल पडवळ यांची परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील कालेश्वर येथे 12 एकरावर केशरची बाग आहे. ते सांगतात, "माझा आंबा आतापर्यंत कधीही बागवानाला विकला नाही. स्वतः आंबा पिकवतो आणि स्वतःच्या कौशल्याने मालाची विक्री करतो. मे महिना अखेरपर्यंत केशर बाजारात येईल" असे पडवळ सांगतात. पण तोपर्यंत लॉकडाउन शिथिल झाले पाहिजे, असेही पडवळ सांगतात. पडवळ यांच्याकडे कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेले रायपिंग चेंबर (आंबा पिकविण्यासाठीचे यंत्र) आहे. रायपिंग चेंबरमध्ये इतर शेतकऱ्यांचा माल ते पिकवून देतात.

"सध्या कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटाला सामोरे जाताना दिसतोय. हापूस आंब्याला औरंगाबाद, नाशिक, परभणी, नांदेड, अमरावती, नागपूरच्या बाजारपेठेत मोठी मागणी असते. या भागातील ग्राहकांना थेट हापूस आंबा उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या हापूस आंब्याची विक्री करायची आहे, अशा शेतकऱ्यांनी माझ्याशी ७५८८५२५८५८ या क्रमांकावर संपर्क साधावा" असे आवाहनही अनिल पडवळ यांनी केले आहे.

कोकण भूमी प्रतिष्ठानचा पुढाकार

संकटात सापडलेल्या हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा आंबा थेट मुंबई-पुण्यातील ग्राहकांना मिळण्यासाठी कोकण भूमी प्रतिष्ठानने महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून वितरणाची जबाबदारी घेतली आहे, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी सांगितले.

प्रतिष्ठानने कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे काही गट तयार केले आहेत. गटामुळे रत्नागिरी, राजापूर, देवगड, दापोली येथील हापूस आंबा मुंबई-पुण्यातील सोसायटीमध्ये उपलब्ध होणार आहे. सोसायटीमधील आंबा वितरणाची जबाबदारी सोसायटीच्या स्वयंसेवकांनी घेणे आवश्यक आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई, कल्याण या शहरांतील सोसायट्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी एका सोसायटीमधून किमान तीस पेट्यांची मागणी आवश्यक आहे. ज्यांना हापूस आंबा हवा आहे, त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा -
ठाणे-कल्याण-डोंबिवली - (अभिषेक उतेकर - ९९२३७८१०६९), मुंबई शहर-वसई-विरार (संजय धामापूरकर - ९१६७३४९१११), मुंबई उपनगर, नवी मुंबई (दिप्तेश जगताप - ९३२४३८१४५२), पुणे-पिंपरी-चिंचवड (अविनाश चाळके - ९७६६३९७६६४).
 

mango_1  H x W: 

या अभिनव प्रयोगामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. अशा स्वरूपाची मदत शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. या कामात ज्यांना स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे, अशा व्यक्तींनी दिप्तेश जगताप यांच्याशी (९३२४३८१४५२) संपर्क साधावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

"शासनाने प्रथम कोकणातील हमीभावाप्रमाणे आंब्याची खरेदी करावी, त्याचबरोबर ५०० कोटी रुपयांचे पँकेज जाहीर करून, ही मदत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करणे गरजेचे आहे. या भागात आंब्यावर प्रक्रिया करणारे असंख्य कारखाने आहेत. या कारखान्यांनी पूर्ण क्षमतेने काम केले, तर मोठ्या प्रमाणात हापूसच्या रसाचे उत्पन्न घेता येईल. शासनाने हा आमरस खरेदी करून, पौष्टिक आहार म्हणून त्याचा शाळेत समावेश केला, तरच इथला आंबा उत्पादक शेतकरी आणि प्रक्रिया करणारा छोटा मोठा उद्योजक जगेल" असे कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी सांगितले.

देवगड हापूस उत्पादक संघाचे प्रयत्न

देवगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात हापूसचे उत्पादन घेतले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून देवगड आणि हापूस असे एक समीकरण झाले आहे. या संकसमयी देवगड तालुका हापूस आंबा उत्पादक संघ काही पावले उचलत आहे.

"सध्या देवगड तालुक्यातील हापूस आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. परिणामी तालुक्यातून आंबा निर्यातीसमोर आव्हाने आहेत. असे असले, तरी यावर उपाययोजना म्हणून आम्ही महाराष्ट्रातील मोठ्या शहरांतील सोसायट्यांच्या संपर्कात आहोत. सोसायटीमधला ग्राहक आमच्याशी कसा जोडला जाईल, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. हा ग्राहक जर आमच्याशी जोडला गेला, तर तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न काही अंशी सुटू शकतील" असे देवगड तालुका हापूस आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष अजित गोगटे यांनी सांगितले.

मंदीतील संधी

आपल्या देशाच्या निर्यातीवर कोरोनाचा फटका कसा बसला आहे आणि या मंदीच्या काळात कोणत्या संधी आहेत या संदर्भात शेतीमाल आयात- निर्यातदार सल्लागार गोंविद हांडे सांगतात, "कोरोनामुळे संपूर्ण जग आर्थिक मंदीच्या संकटात सापडले आहे. आपल्या देशातील शेतीमाल निर्यातीला याचा मोठा फटका बसला आहे. आफ्रिका, आखाती आणि युरोपीय देशांत टोळधाडीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आखाती व युरोपीय देशांत आपल्या देशातून आंबा, द्राक्ष व इतर शेतीमाल निर्यात करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सध्या आपल्या राज्यातून दुबईत ९ कंटेनर आंब्याची निर्यात झालेली आहे. या काळातही निर्यातीची संधी ओळखून नियोजन केल्यास महाराष्ट्रातून हापूस आंब्याची निर्यात होऊ शकते."

कोकणातला आंबा उत्पादक शेतकरी नेहमीच दलाल आणि व्यापारी यांच्या कचाट्यात सापडत असतो. व्यापाऱ्याचा व्यवहार शेतकऱ्यांच्या हातात आला पाहिजे. त्यासाठी हांडे यांनी आपल्या मनातल्या काही कल्पना सांगितल्या.

) देशांतर्गत व देशाबाहेरील बाजारपेठ काबीज करण्यासाठी आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट स्थापन करणे. गटाच्या माध्यमातून विपणनाचे सर्व प्रश्न सुटू शकतात.

) जोखमीच्या काळात गटाच्या माध्यमातून उत्पादनाचे योग्य व्यवस्थापन करणे.

) आंबा हे फळ नाशिवंत आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात, बाजारपेठ असलेल्या गावात शीतगृहाची उभारणी करणे. वेअरहाउसिंग, पॅकहाउस, बाजार, वाहन आदी सुविधा शेतकऱ्यांच्या बांधावर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

) आंब्यापासून शाश्वत उत्पन्न घेण्यासाठी प्रक्रिया उद्योगाला चालना देणे.

) कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात आंब्यासाठी मार्केटची उभारणी करणे.

) प्रत्येक शेतकऱ्यांला 'मँगोनेट' प्रणालीशी जोडणे व त्याचा फायदा मिळवून देणे.

) शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीमाल विक्रीच्या नवतंत्र प्रणालीचा अभ्यास करून, त्या पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करून शेती व्यवसायाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे.

) प्रत्येक आंबा उत्पादकाने आपल्या आंब्याचे ब्रँडिंग करणे.

वरील मुद्द्यांचा सखोलपणे अभ्यास करणे गरजेचे आहे. कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर यातील काही उपाययोजना करता येणे शक्य आहे. एकूणच कोकणातील आंबा उत्पादकाला दिलासा देण्यासाठी शासनाच्या मदतीचा हात हवा आहे, असे प्रकर्षाने जाणवते.

९९७०४५२७६७