अनेक पटकथांना जन्म देणारी प्रेमकथा - 'इट हॅपन्ड वन नाइट'

विवेक मराठी    29-Apr-2020
Total Views |
**चित्रलिपी***
 
१९३४मध्ये प्रदर्शित झालेला, फ्रॅंक काप्रा दिग्दर्शित 'इट हॅपन्ड वन नाइट'. हा असा पहिला चित्रपट होता, ज्याला त्या वर्षीचे सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री आणि पटकथा हे पाचही महत्त्वाचे अकॅडमी पुरस्कार मिळाले. हा चित्रपट म्हणजे एक हसरी, खेळती, हळुवार प्रेमकथा.

 happened one night trail


१९२९मध्ये सुरू झालेल्या आर्थिक महामंदीच्या काळात हॉलीवूडमध्ये एका नवीन शैलीचा प्रयोग अतिशय यशस्वी झाला. दोन परस्परविरुद्ध आर्थिक आणि सामाजिक वर्गातील नायक आणि नायिका, त्यांच्या मूलभूत विरोधी प्रवृत्तींमुळे निर्माण झालेला संघर्ष, त्यांच्यामधल्या अहंकाराचे द्वंद्व, गैरसमजामुळे मुख्य पात्रांत निर्माण झालेला ताण, दुरावा, तो सुसह्य करणारे मजेदार, तिरकस संवाद, त्यामुळे निर्माण झालेले आकर्षण, त्याची प्रेमात झालेली परिणती आणि शेवटी मिलन, असा प्रवास होता तो.

या शैलीला 'स्क्रूबॉल कॉमेडी' असे म्हणतात. या दोन मुख्य पात्रांत खरे तर एवढा फरक असायचा की पाहताना मनात यायचे - एक आठवडा तरी हे दोघे एकत्र राहणे शक्य आहे का? सगळ्या शक्यतांचा विचार करून उत्तर जरी नकारार्थी असेल, तरी बघणारा प्रत्येक जण शुभ मंगलच्या अक्षता दोघांवर उधळून समाधानाने घरी परत जायचा.

ह्या शैलीतील गाजलेला चित्रपट होता १९३४मध्ये प्रदर्शित झालेला, फ्रॅंक काप्रा दिग्दर्शित 'इट हॅपन्ड वन नाइट'. हा असा पहिला चित्रपट होता, ज्याला त्या वर्षीचे सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री आणि पटकथा हे पाचही महत्त्वाचे अकॅडमी पुरस्कार मिळाले. हा चित्रपट म्हणजे एक हसरी, खेळती, हळुवार प्रेमकथा.


 happened one night trail

चित्रपटाची सुरुवात होते एका बोटीवर. अलेक्झांडर अँड्रूझ या लक्षाधीशाच्या अतिशय लाडक्या पण हट्टी मुलीने, एलीने, आपल्या पित्याच्या मनाविरुद्ध किंग वेस्टली या उडाणटप्पू मुलाशी गुप्तपणे लग्न लावलेय. हा नुसताच खुशालचेंडू नाही, तर त्याचे एलीच्या संपत्तीवर लक्ष आहे, हे तिचे वडील जाणून आहेत. मुलीला समजावून सांगून हे लग्न मोडायचा तिच्या वडिलांचा प्रयत्न आहे.

मला जोपर्यंत आठवतंय तोपर्यंत तुम्ही माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करत आहातती ठणकावते.

कारण तू अतिशय मूर्ख आणि हट्टी आहेसतिचे वडील सुनावतात.
मला हट्टीपणाचा आणि मूर्खपणाचा वारसा मिळालायतिचे उद्धट उत्तर.

त्यांना न जुमानता, नेसत्या कपड्यानिशी एली बोटीतून उडी मारते आणि किनाऱ्यावर येऊन न्यू यॉर्कला जाणाऱ्या बसमध्ये शिरते. तिच्या पाठलागावर असणाऱ्या गुप्तहेरांना हे समजणे शक्यच नसते. एली अँड्रूझ आणि एका साध्या बसमध्ये! अशक्य. बसमध्ये एलीची गाठ पडते एका वृत्तपत्र वार्ताहराशी. पीटर व्हॉर्न हा एका वृत्तपत्राचा वार्ताहर असतो. नोकरीवर असताना अपेयपान केले यासाठी शिक्षा म्हणून त्याला नोकरीवरून बडतर्फ केले असते. खच्चून भरलेल्या या बसमधून जाण्यापलीकडे त्याला पर्याय नसतो. त्याला सीटसुद्धा मिळते ती अगदी शेवटची. कंडक्टरशी वाद घालतानाच एली या सीटवर कब्जा करते. राहिलेल्या या एकाच सीटवर अडचणीत बसण्याशिवाय दोघांकडेही दुसरा उपाय नसतो.

रात्रीच्या जेवणासाठी बस थांबली असताना एलीची पर्स चोरीला जाते. पीटर चोरांच्या मागे धावत जातो, पण त्याला काही त्यांना पकडता येत नाही. स्वतःकडे केवळ चार डॉलर्स राहिले असताना, आपली ओळख द्यावी लागेल म्हणून एलीसुद्धा तक्रार नोंदवायला नकार देते, वर हे सुचवणाऱ्या पीटरवरच डाफरते.



दुसऱ्या
दिवशी न्याहारी घेत असताना उशीर झाल्याने एलीची बस चुकते आणि बरोबर सोबत करायला असतो तो तिच्या प्रत्येक बाबतीत नाक खुपसणारा पीटर. सकाळी वर्तमानपत्रात एलीचा फोटो पाहून ती कोण याची पीटरला कल्पना येते. त्याच्यासारख्या वार्ताहारासाठी ही मोठी गोष्ट असते. पीटरने आपली लबाडी ओळखली आहे हे एलीला समजल्यावर, त्याचे तोंड बंद ठेवण्यासाठी ती त्याला पैशाचे आमिष दाखवते. पीटरला पैशाची गरज असते पण तो लोभी नसतो. लबाड नसतो. त्याला फक्त त्याची नोकरी टिकवण्यासाठी ही स्टोरी हवी असते. माणुसकी हा शब्दसुद्धा तुझ्या कानावर पडला नाही का? केवळ मला मदत कर असे म्हणाली असतीस तरी मी केली असती की!तिच्या केवळ नावाच्या असलेल्या नवऱ्याकडे तिला सुखरूप पोहोचवायचे आणि त्या बदल्यात तिने आपली कथा त्याला सांगायची, असा सौदा ठरतो आणि सुरू होतो त्यांचा एकमेकांच्या साथीने केलेला प्रवास.

जिंदगी की हर डगर है बेखतर
बन गये वो जबसे मेरे हमसफर।

जगण्याचा
रस्ता काही सरळसोट नसतो. अनेक खाचखळगे असतात. मार्ग वैराण असतो, खडतर असतो, पण योग्य सहचर सोबतीला असेल तर प्रवास कधी संपतो, ते लक्षात येत नाही.
एली आणि पीटर दोघांच्या बाबतीत असेच घडते. लोकांच्या नजरेत न येण्यासाठी पीटर आणि एली विवाहित असल्याचे नाटक करतात. पैसे वाचवण्यासाठी त्यांना मॉटेलमध्ये एक खोली घेणे भाग पडते. खोलीच्या मध्ये पडदा बांधून वेळ भागवली जाते. पीटर या पडद्याला 'जेरिकोची भिंत' म्हणतो. ह्या सर्व चटपटीत संवादांना अर्थ आहे. जेरिकोमध्ये बांधलेली भिंत अतिशय भक्कम होती, पण जेव्हा देवाच्या मनात असते, तेव्हा कोणत्याही भिंती राहू शकत नाहीत, असा बायबलमध्ये उल्लेख आहे. ही भिंतसुद्धा कोसळणार, अशी सूचकता या संवादात आहे.


पाठलागावर असलेल्या गुप्तहेरांना चुकवण्यासाठी या दोघांना खूप क्लृप्त्या लढवाव्या लागतात. ह्या चेष्टामस्करीत आणि एकांतात दोन मने नकळत जवळ येऊ लागतात. पीटरचा नाइट ड्रेस वापरणे, नवरा-बायको करतात तशी भांडणे करणे आणि मग ती प्रेमाने मिटवणे, भूक भागवण्यासाठी एकच अंडे दोघांनी मिळून खाणे, प्रसंगी शेतातली गाजरे खाणे हे सर्वच एलीला सुरुवातीला तरी कठीण जाते. त्यातही जवळ असलेले थोडेसे पैसेसुद्धा ती एका गरजू माय-लेकाला देते. हे सर्व खूप लोभस. पीटर हळूहळू गुंतत जातो. खरे तर ती श्रीमंत, तो गरीब, ती हट्टी, लाडावलेली, तर तो तिरसट. दोघांनी एकमेकांच्या प्रेमात पडावे असे काहीही नसते. पण कदाचित हे वेगळे असणे त्यांना एकत्र आणते. प्रेम पैशावर विजय मिळवते.. आयुष्याला अर्थ देणारेसुद्धा प्रेमच असते.
गाडीसाठी लिफ्ट मागण्याचा एक अप्रतिम सीन आहे यात. भाडेखर्चासाठीसुद्धा पैसे नसल्याने पीटर लिफ्ट घ्यायची ठरवतो. अर्थात कितीही प्रयत्न केला, तरी कुणी थांबत नाही. मग एली आपला स्कर्ट हळूच वर करून आपले उघडे पाय दाखवते आणि गाडी थांबते. थोडासा वात्रट सीन आहे हा, पण एलीचा अभिनय एवढा निरागस आहे की त्यापाठीमागे दडलेली खेळकर मुलगी आपल्याला चकित करते आणि हसवतेसुद्धा.
 
 
प्रवासाच्या शेवटच्या रात्री, पैसे जवळ नसतानासुद्धा एका आठवड्यासाठी खोली हवी आहे असे सांगून पीटर एक खोली मिळवतो. आपल्या नवऱ्याकडे परत जायला थोडाच वेळ उरला असताना आपले मन पीटर गुंतत चालले असण्याची एलीला जाणीव होते. स्वतःवरचा संयम झुगारून ती आपले मन पीटरकडे मोकळे करते.
 
 
पीटर प्रगल्भ असतो. त्याला दुनियादारीची कल्पना असते. ती विवाहित, नुसता टिळा असला म्हणून काय झाले! तरीही तिच्यावरचे प्रेम त्याला धैर्य देते. पैशाची व्यवस्था करायला तो बाहेर जातो आणि पैसे नसल्याने एलीला हॉटेल मालकीण बाहेर काढते. पीटर पळून गेला असे समजून ती शेवटी आपल्या वडिलांकडे परत जाते, तर तिने फसवले या कल्पनेने पीटर दुखावतो.

इथे अलेक्झांडर अँड्रूझ मुलीच्या लग्नाचा मोठा घाट घालतात. आपले मन पीटरमध्ये गुंतलेले असूनसुद्धा एली लग्नाला तयार होते. पीटर वडिलांना भेटायला येतो, तेव्हा दहा हजार डॉलर्स या बक्षिसाच्या आशेने हा आला असावा असे सुरुवातीला वाटत असतानाच केवळ प्रवासासाठी झालेल्या साडेएकोणचाळीस डॉलर्सची मागणी करून पीटर या लक्षाधीशाला धक्काच देतो. त्याच्या चांगुलपणाची खात्री पटल्याने ते आपल्या मुलीला भर लग्नमंडपातून पळून जाण्याचा सल्ला देतात आणि पीटर-एलीचे मिलन होते.


cd_1  H x W: 0
 
पीटर आणि एलीचा लग्नाकडे जाणारा हा प्रवास तसा वळणावळणांचा, पण एका अकल्पित वळणावर त्यांना प्रेमाचे दर्शन होते. प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा त्यांचे धैर्य आणि परिस्थितीला पुरून उरणारी लवचीकता त्यांना एकत्र आणते. एका श्रीमंत जहाजावरून एलीचा प्रवास सुरू होतो. बस, गाडी अशा क्रमाने शेवटी पीटरच्या पावलांवर पाऊल ठेवून संपतो.
 
ही तशी परिकथाच, पण आर्थिक तंगीत होरपळणाऱ्या अमेरिकेला आवडली. वरवर विनोदी हलकाफुलका सिनेमा असूनही, काही महत्त्वाच्या थीम्स इथे विचारात घेतल्या आहेत. श्रीमंत एलीचा हा सारा प्रवास पैशाच्या टंचाईत होतो. अन्नासाठीसुद्धा पुरेसे पैसे नसतात. गाजर खाणे हेसुद्धा प्रतीकात्मक. अतिशय साधे अन्न पण पोषक. ते येतेसुद्धा जमिनीच्या गर्भातून. माणूस कितीही श्रीमंत असला, तरीही त्याचे जमिनीशी नाते असते हे इथे सूचित केले आहे.

दुसरी भूक असते ती प्रेमाची, सोबतीची. तिचे प्रेम तिला पीटरच्या रूपात सापडते. खाजगी जहाज, महाग दागिने, उंची वस्त्रे, पक्वांन्ने हे असते एलीचे जग, तर पीटर आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातून आलेला, पण साहसी वृत्ती लपवता येत नाही. एली वडिलांच्या जहाजावरून पळ काढते, तर पीटरला नोकरीवरून बडतर्फ केलेले असतानासुद्धा तो तिला मदत करतो. ही साहसी वृत्तीच त्या दोघांना एकत्र आणते. प्रेमाचे हे दर्शन तसे अकल्पित, त्यामुळे दोघांनाही ते सहज मान्य करता येत नाही. परिस्थितीतील अंतर हे त्यांच्यातील भांडणाचे कारण असते. तरीही प्रेम मात्र कृत्रिम अंतराला दाद देत नाही. खऱ्या प्रेमाच्या बाजूने कुणीतरी उभा राहतो आणि प्रेमी जिवांना भेटवतो, जे कार्य इथे एलीचे वडील करतात.

क्लार्क गेबल आणि क्लॉडेट कोल्बर्ट या दोघांनाही पीटर आणि एली या भूमिकांसाठी उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला. ही थीम गाजली. हिंदी चित्रपटसृष्टीत चोरी चोरी आणि दिल है के मानता नही ह्या चित्रपटांवर 'इट हॅपन्ड वन नाइट' ह्या चित्रपटाचा प्रभाव आहे. हॉलीवूडच्या इतिहासातील हलक्याफुलक्या प्रेमकथांमध्ये ह्या चित्रपटाचा फार वरचा क्रमांक आहे.