कोरोनाभोवतीचे संशयाचे धुके

विवेक मराठी    09-Mar-2020
Total Views |

कोरोनो या विषाणूमुळे जगभरात अचानक आरोग्य आणीबाणी जाहीर झाली आहे. कोरोनासारखा एक विषाणू जगभरात थैमान घालेल असे काही महिन्यांपूर्वी कुणाला वाटलेही नाही. चीनमध्ये आरोग्य व्यवस्था बळकट असतानाही एखादा विषाणू अचानक कसा बाहेर कसा येऊ शकतो? त्यामुळे संशयाची सुई चीनकडे जात आहे.

Novel Corona Virus_1 

कोरोना या विषाणूने आज संपूर्ण जगाची झोप उडवली आहे. याची सुरुवात चीनपासून झाली असली आणि या विषाणूने बाधित रुग्ण सर्वप्रथम वुहानमध्ये आढळले असले, तरी आता तो चीनच्या भिंती पार करून जगभरातील जवळपास 80 देशांमध्ये पसरला आहे. या देशांमध्ये मिळून एकूण रुग्णांची संख्या एक लाखांहून अधिक असून आतापर्यंत जवळपास 3000हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे याचे सामाजिकच नव्हे, तर आर्थिक परिणामही गंभीर स्वरूपात दिसून येऊ लागले आहेत. ज्या ज्या देशांबरोबर चीनचे व्यापारसंबंध जास्त प्रमाणात आहेत अशा दक्षिण कोरिया, इराण यांच्यासारख्या देशांना कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात झालेला दिसत आहे. इराणसारखा देश भौगोलिकदृष्ट्या चीनपासून बराच लांब आहे. पण इराणमध्ये चीनमधून अनेक आरामदायक वस्तूंची आयात मोठ्या प्रमाणावर केली जाते. तसेच इराणमधून चीनमध्ये जाणार्‍या-येणार्‍या लोकांचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे इराणमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. इतकेच नव्हे, तर जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन यांसह अनेक युरोपीय देशांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. अमेरिकेसारख्या आरोग्यव्यवस्था भक्कम असलेल्या देशांतही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. एवढेच नव्हे, तर या विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे अमेरिकेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. भारत हा तर चीनचा शेजारी देश आहे. सुरुवातीच्या काळात भारतात याचा प्रसार झाला नव्हता. पण गेल्या दोन-चार दिवसांत भारतात झपाट्याने हा संसर्ग फैलावत चालल्याचे दिसत आहे. त्यामुळे इतर देशांचे ज्याप्रमाणे धाबे दणाणले आहेत, तशीच स्थिती भारतातही दिसून येत आहे. भारत सरकारने आणि आरोग्य प्रशासनाने झपाट्याने आणि सजगतेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. एकंदरीतच, जगभरात अचानक आरोग्य आणीबाणी जाहीर होईल आणि कोरोनासारखा एक विषाणू जगभरात थैमान घालेल, याची साधारणतः तीन-चार महिन्यांपूर्वी कोणी कल्पनाही केलेली नव्हती. पण आज कोरोनामुळे जागतिक विकासाचा दर जवळपास दोन टक्क्यांनी घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जगातील मोठमोठ्या देशांतील शेअर बाजारात गेल्या आठ-दहा दिवसांत मोठी पडझड दिसून आली आहे. भारतात तर या पडझडीमुळे अनेक गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. चीन हा जगाची उत्पादनाची फॅक्टरी असल्यामुळे आणि कोरोनामुळे तेथे उद्योगधंदे बंद ठेवले जात असल्यामुळे जगभरातील सप्लाय चेन किंवा पुरवठासाखळी पूर्णपणे विसकळीत झालेली आहे आणि काही अंशी ती ठप्पही झाली आहे. परिणामी 2008सारखी जागतिक मंदीची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

 

जैविक अस्त्राचा दावा आणि कोरोना

ही संपूर्ण भीतिदायक परिस्थिती पाहिली, तर साहजिकच असा प्रश्न निर्माण होतो की, अचानक कोरोना हा विषाणू आला कोठून? या संदर्भात अचानक ‘कॉन्स्पिरसी थिअरीज’ पुढे येऊ लागल्या आहेत. सगळ्यांची संशयाची सुई चीनकडे जात आहे. याचे कारण चीनमध्ये आरोग्य व्यवस्था बळकट असतानाही एखादा विषाणू अचानक कसा बाहेर येतो आणि तो जगभरात पसरतो, यावर विश्वास ठेवण्यास अनेक जण तयार नाहीत. त्यातूनच काही जणांनी कोरोना विषाणूचा प्रकोप हा चीनच्या जैविक अस्त्राचा (बायलॉजिकल व्हेपनचा) एक भाग असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, कोरोनामुळे ज्या देशांना अधिक फटका बसला आहे त्यामध्ये चीन, इराण यांसारख्या देशांचा समावेश आहे. त्यामुळे ही अमेरिकेची चाल तर नाही ना, असाही प्रश्न काही जण उपस्थित करत आहेत. याबाबतचे वास्तव यथावकाश समोर येईल; पण आजची प्राथमिकता ही आहे की जगाने एकत्र येऊन या संकटाचा मुकाबला करणे.

 

तथापि, या सर्व संशयकल्लोळामध्ये एक प्रबळ दावाही मांडला गेला आहे आणि त्याकडे सहजासहजी दुर्लक्ष करून चालणार नाही. हा दावा केला आहे डॉ. फ्रान्सिस बॉयल यांनी. त्यांनी टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीला मध्यंतरी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमधून त्यांनी जगाला हादरे देणार्‍या काही गोष्टी समोर आणल्या. कोरोना व्हायरसच्या उगमाचे वेगळे सिद्धान्त त्यांनी पुढे आणले. त्यांच्या मते, चीन गेल्या 10 वर्षांपासून जैविक अस्त्रांचा विकास करत आहे. वुहानपासून 20 मैल अंतरावर चीनची एक प्रयोगशाळा असून तेथे जीवतंत्रज्ञानावर संशोधन केले जाते. या प्रयोगशाळेमध्ये संहारक जैविक अस्त्र विकसित केले जात असताना हा कोरोना विषाणू अनवधानाने लीक झालेला आहे. या दाव्याला आधार देणार्‍या काही गोष्टीही बॉयल यांनी मांडल्या आहेत. त्यानुसार, कोरोनाचा प्रसार होऊ लागल्यानंतर, हा विषाणू मासळी बाजारातून पसरल्याचे चीनने सुरुवातीला म्हटले होते. तथापि या विषाणूने बळी पडलेल्या व्यक्ती या वुहानमधील चीनच्या प्रयोगशाळेच्या परिसरातील आहेत. त्यांचा मासळीबाजाराशी संबंध नाही. याचे कारण चीनमध्ये मांसाहाराची परंपरा वर्षानुवर्षांपासून आहे. ज्या सजिवाची पाठ सूर्याकडे नाही अशा सर्वांचे मांस चिनी लोक भक्षण करत असतात. कित्येक शतकांपासून तेथे मांजरांपासून पालींपर्यंत अनेक पशुपक्ष्यांचे सेवन केले जाते. त्यामुळे एखाद्या प्राण्यापासून या विषाणूचा संसर्ग झाला आहे हा दावा पटणारा नसून तो जैविक अस्त्राची चाचणी करत असतानाच लीक झालेला आहे, असे डॉ. बॉयल यांचे म्हणणे आहे. वुहानमधील या प्रयोगशाळेचा संचालकही या विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेला आहे.


Novel Corona Virus_1  
 

जीवितहानी

डॉ. बॉयल यांनी या संशयास्पद मांडणीबरोबरच काही शास्त्रीय बाबीही समोर आणल्या आहेत. त्यानुसार सार्ससारखा यापूर्वीचा कोरोना व्हायरस आणि आताचा विषाणू यांमध्ये गुणात्मक फरक आहे. आताच्या कोरोनाची तीव्रता जास्त आहे. त्यामुळेच या विषाणूने बाधित झालेल्या रुग्णांचा मृत्युदरही पूर्वीच्या कोरोना श्रेणीतील विषाणूने बाधित रुग्णांच्या तुलनेने अधिक आहे. चीनकडून हा दर 3 टक्के असल्याचे सांगितले जात आहे, पण तो 15 टक्क्यांपर्यंत असल्याचे पुढे येत आहे. चीनमध्ये या विषाणूसंसर्गाने नेमके किती लोक मरण पावले आहेत, त्यांचा नेमका मृत्युदर काय आहे, हे नेमकेपणाने समोर येत नाहीये. जी माहिती समोर येत आहे ती सेन्सॉर्ड आहे. याचे कारण चीनमध्ये सोशल मीडियावर सरकारी निर्बंध आहेत. त्यामुळे त्यातून बाहेर येणारी माहिती ही शासनमान्यच असते. कोणती माहिती बाहेर द्यायची, कोणती द्यायची नाही हे तेथील साम्यवादी एकाधिकारशाहीवादी शासनच ठरवते. परिणामी, आज जी तपशीलवार माहिती समोर येत आहे, ती चीनमधून अन्य देशांत गेलेल्या लोकांकडून, हाँगकाँगकडून येत आहे. त्यामध्ये अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. या सवार्ंचा लसावि काढला असताना चीन आजघडीला कोरोनाबळींची जितकी संख्या जगाला सांगत आहे, त्यापेक्षा निश्चितच जास्त लोकांना या महाभयंकर विषाणूने गिळंकृत केलेले आहे.

 

उद्योग-व्यवसायांवर कुर्‍हाड

या विषाणूमुळे चीनला किती मोठा फटका बसला आहे याचे एक सर्वात मोठे उदाहरण म्हणजे नासाने अलीकडेच जारी केलेले उपग्रह छायाचित्र. या चित्रातून असे दिसून आले आहे की, चीनमध्ये आजघडीला जगातील सर्वात कमी प्रदूषण होत आहे. याचे कारण चीनमध्ये आज उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर बंद पडलेले आहेत. एका अंदाजानुसार हा आकडा 70 लाख इतका आहे. चिनी शासनाकडून ‘वर्क फ्रॉम होम’चे आदेश दिले गेले असले, तरी आयटी क्षेत्राशी संबंधित व्यक्ती ते करू शकतात. उत्पादन क्षेत्रातील लोकांना कारखान्यातच जावे लागते. पण आज तेथे कोणीही कामगार कारखान्यात जाण्यास तयार नाहीये. त्यामुळे चीनमधील उत्पादनप्रक्रिया ठप्प झाली आहे. याचाच परिणाम जगाच्या पुरवठा साखळीवर झाला आहे. अमेरिका-युरोपमध्ये अनेक उद्योगधंदे असले, तरी त्यांना लागणारा कच्चा माल, सुटे भाग पुरवणारा चीन हा जगातील सर्वात मोठा देश आहे. अशा देशातील उद्योगधंदे बंद पडल्यामुळे याचे परिणाम सर्वदूर होताना दिसत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे बंद पडत चाललेले असताना, लोकांनी घराबाहेर पडणे, मॉलमध्ये जाणे जवळपास बंद केलेले असताना संपूर्ण चीनमध्ये केवळ 3000 जणांचाच मृत्यू झाला असेल यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. या विषाणूचा मृत्युदर निश्चितच जास्त असणार आहे.

 

आणखी एक गोष्ट म्हणजे, डॉ. बॉयल यांच्या मते कोरोनाची लागण झाली आहे की नाही याची लक्षणे समजण्यासही तुलनेने बराच वेळ लागतो. यापूर्वीच्या कोरोना व्हायरसची लक्षणे रुग्णामध्ये दिसू लागणे आणि त्याला विषाणूमुक्त करणे यासाठी साधारणतः 14 दिवस लागायचे. पण या विषाणूची बाधा झालेल्यांना ‘क्वारंटाइन’ करण्यासाठी 24 दिवस लागताहेत. त्यामुळे हा कोरोनाचा विषाणू नसून तो वेगळाच काहीतरी प्रकार आहे असे डॉ. बॉयल यांचे म्हणणे आहे. चीनकडून सातत्याने माहिती दडवण्याच्या प्रयत्नांमुळे डॉ. बॉयल यांच्या म्हणण्याला पुष्टीच मिळत चालली आहे.

 

आता प्रश्न निर्माण होतो की, चीन या विषाणूबाधितांविषयीची माहिती का दडवत आहे? चीनला आज जागतिक महासत्ता बनायचे आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये चीनचे विकास प्रकल्प सुरू आहेत. चीनने आपली सामरिक शक्तीही कमालीची वाढवली आहे. लवकरच चीन हा जगातील दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार आहे. अशा स्थितीत आपला कमकुवतपणा जगासमोर आणण्याची चीनची इच्छा नाहीये. त्यामुळेच अन्य लोकशाही देशांकडून जशी माहिती समोर येत आहे, तशी चीनकडून येताना दिसत नाहीये. पण त्यामुळेच चीनभोवतीचे संशयाचे धुके अधिकाधिक गडद होत चालले आहे.

 

वास्तविक, यापूर्वीही अमेरिकेने या संदर्भातील काही पुरावे सादर केलेले होते. चीनने जैविक अस्त्रांची निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे, हे 1993मध्येच अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी सांगितले होते. त्यामागे स्पर्धात्मकता हे कारण होते. अशा प्रकारची संहारक अस्त्रांची निर्मिती करण्याची स्पर्धा शीतयुद्धाच्या काळापासून सुरू झालेली होती. ही स्पर्धा धारदार बनू लागल्यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर या संदर्भातील करार करावा लागला. अमेरिकेने 1989मध्ये जैविक अस्त्रविरोधी कायदाही संमत केला. पण तरीही जैविक अस्त्रांसाठीची चढाओढ संपली नाही. याचे कारण जैविक अस्त्रामुळे शत्रुराष्ट्राशी युद्ध न करता आणि लष्कर-दारूगोळा-क्षेपणास्त्रे आदींवर खर्च न करता त्यांच्या लक्षावधी लोकांना मारता येते. पण हा अत्यंत दुर्दैवी आणि महाविनाशकारक प्रकार आहे. चीनसंदर्भात केले जाणारे दावे जर खरे असतील किंवा त्यामध्ये तथ्य आढळले, तर संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये त्याविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे. आज जरी या विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सामूहिक एकजूट गरजेची असली, तरी या विषाणूूशी लढाई संपल्यानंतर या संपूर्ण संशयकल्लोळाचा शेवट व्हायलाच हवा.

 

लेखक परराष्ट्र धोरण विश्लेषक आहेत.