सातत्याने दुष्काळग्रस्त असलेल्या जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यातील विलास दहिभाते यांनी आपल्या दीड एकर जमिनीवर चंदनाची लागवड केली. हा अभिनव प्रयोग अनेकांना मार्गदर्शक ठरत आहे. त्यांच्या या प्रयोगाला यश मिळाले असून त्यांच्या एका चंदन झाडाच्या लाकडापासून 42 हजार 700 रुपये उत्पन्न मिळाले आहे. त्यासाठी आवश्यक असणारा विक्री आणि वाहतूक परवाना मिळणारे ते महाराष्ट्रातील पहिले शेतकरी ठरले आहेत.
महाराष्ट्रात गेल्या चार-पाच वर्षांपासून शेतामध्ये चंदन लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. विशेषतः मराठवाडयात व विदर्भात चंदन शेतीचा मोठया प्रमाणात केली जाऊ लागली आहे. चंदन शेतीमुळे पर्यावरण संतुलन राहते, पीक उत्पादनाचा खर्च कमी होतो, शुध्द हवा मिळते, प्रतिकूल हवामानात होणारे नुकसान टाळता येते. त्यामुळेच चंदन शेतीची ही संकल्पना बहुपयोगी ठरत आहे. आज अधिकाधिक शेतकरी चंदन शेतीकडे वळत आहेत. मराठवाडा व विदर्भ या दुष्काळी भागात ही लागवड मोठया प्रमाणात होत आहे. त्यामुळे हा भाग भविष्यात चंदन शेतीच्या माध्यमातून आर्थिक सुबत्तेच्या दिशेने मार्गक्रमण करेल,अशी सुचिन्हे दिसत आहेत.
दहिगव्हाण गावाला मिळाला चंदन विक्रीचा मान
जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यातील दहिगव्हाण गावातील शेतकरी विलास मदनराव दहिभाते हे चंदन शेतीसाठी गेल्या दहा वर्षांपासून सतत प्रसार करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास सातशेहून आधिक शेतकरी चंदन शेतीकडे वळले आहेत.
दहिगव्हाण गावात गट नंबर 12मध्ये दहिभाते यांची शेती आहे. या शेताच्या बांधवार काही चंदनाची नैसर्गिक झाडे आलेली आहेत. आज ही झाडे 14 ते 15 वर्षांची झाली आहेत. विलास दहिभाते यांच्या पत्नी मनीषा यांच्या नावे ही शेती आहे. ही झाडे सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी विलास दहिभाते यांना तब्बल चार वर्षं संघर्ष करावा लागला. दहिभाते यांनी वन विभागाकडे 28 जानेवारी 2016 रोजी चंदन तोडीचा परवाना मागितला. 16 एप्रिल 2019 रोजी वन विभागाने दहिभाते यांच्या परवान्याचा विचार करून चंदन वृक्षतोडीला परवानगी दिली. कायदेशीर आणि अधिकृत परवाना मिळणारे दहिभाते हे महाराष्ट्रातील पहिले शेतकरी ठरले. ही परवानगी मिळाल्यानंतर 19 मे 2019 रोजी वन परिक्षेत्र अधिकारी इटलोट आणि राठोड यांच्या उपस्थिीत दहिभाते यांच्या शेतातील बांधावरील 8पैकी क्र.2 मोजमाप यादीतील झाड परिपक्व असल्याने सदर झाड तोडण्याची परवानगी देण्यात आली.
तोड केलेल्या चंदनाच्या या झाडाच्या लाकडाची प्रत्यक्ष विक्री बुधवार दिनांक 4 मार्च 2020 रोजी लाकडापासून देवघर निर्मिती करणारे व्यापारी गणेश पवार यांना करण्यात आली. त्यासाठी वन विभागाने चंदन लाकूड विक्री वाहतुकीचा परवाना दिली. त्यामुळे चंदन शेतीतल्या अडथळयातील सर्वांत मोठी समस्या सुटली आहे. प्रारंभी उद्योजक सुनील रायठठ्ठा यांच्या हस्ते लाकडाचे विधिवत पूजन करण्यात आले. या प्रसंगी उद्योजक नरेंद्र अग्रावाल, मार्कफील्ड सीड्सचे योगेश उजवणे, महादेव मते, भगवान सांगुळे, किरण शिंदे व विलास दहिभाते व त्यांच्या पत्नी मनीषा दहिभाते उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते दहिभाते दांपत्यास 42 हजार 700 रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
चंदनाला देशात व परदेशातील बाजारपेठेत मोठी मागणी आहे पण चंदन लागवड, तोडणी, विक्री आणि वाहतुकीचे नियम या चक्रामध्ये चंदन शेती अडकली गेली होती. विलास दहिभाते यांनी या अडथळयावर मात करून 'चंदन शेतीतून शाश्वत उत्पन्न' घेता येते, हे दाखवून दिले आहे.
दहिभाते यांच्या चंदन वृक्षाला वन विभागाने तोडणी, विक्री व वाहतुकीचा मार्ग मोकळा करून दिल्यामुळे चंदन लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दहिगव्हाण गावातील प्रल्हाद दहिभाते यांची दोन एकरात चंदन शेती आहे. घनसांगवी तालुक्यातील खालापुरी गावातील तरुण शेतकरी बाबासाहेब गायकवाड यांनी दीड एकरात चंदन झाडाची लागवड केली आहे. जोगलादेवी गावातील भीमराव बळते यांनी एक एकरात 140 चंदनाची लागवड केली आहे, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील खसगी येथील सेवानिवृत्त शिक्षक विठ्ठलराव जाधव यांनी तब्बल सोळा एकरावर चंदन शेती केली आहे. औसा तालुक्यातील दिलीप जाधव यांनी दीड एकरात, तर बुदडा गावातील सागर कारंजे यांनी साडेचार एकरात 1150 चंदन वृक्षाची लागवड केली आहे.
''विलास दहिभाते यांच्यामुळे मी चंदन शेतीकडे वळलो, आज माझ्याकडे चंदनाची 468 झाडे आहेत. सर्व झाडांची उंची 25 फुटांवर गेली आहे. चंदनाच्या लाकडाची अधिकृत विक्री झाल्यामुळे भविष्यात माझ्या चंदन शेतीतून मला मोठा आर्थिक नफा मिळेल, अशी आशा आहे'' असे खालापुरी गावातील चंदन लागवड शेतकरी बाबासाहेब गायकवाड यांनी सांगितले.
शेतकरी बांधवानो, चंदन शेतीकडे वळा
चंदनाच्या लाकडापासून देवघर, फर्निचर, दरवाजा यासह विविध शोभेच्या वस्तू तयार करता येतात. विशेष म्हणजे अंत्यविधीमध्ये चंदन लाकडाला विशेष महत्त्व आहे. चंदनामध्ये औषधी गुणवर्ध आहेत. त्यामुळे चंदनाच्या तेलापासून आयुर्वेदिक औषधे तयार केली जातात, शिवाय सुगंधी अत्तरेही तयार केली जातात.
चंदन शेती ही पर्यावरणाचे रक्षण करणारी आहे. मात्र आजपर्यंत चंदन झाड दुर्लक्षित होते. या झाडाची आता कायदेशीर बंधनातून मुक्तता झाली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी चंदन लागवड करून आपल्या आर्थिक उत्पन्नात भर घालावी.
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/