बहुजनवादी अर्थशास्त्र - चाकोरीबाहेरचा विचार

विवेक मराठी    04-Mar-2020
Total Views |

 

युरोपीयांच्या आरमारी सामर्थ्यामुळे समुद्र व जमीन या दोन्ही ठिकाणी आपली कोंडी होते, हे महाराजांच्या लवकरच लक्षात आले. राजकीय आणि व्यापारी असे आपले दोन्ही हितसंबंध मार खातात हे त्यांना जाणवले. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी जावळी काबीज केल्यानंतर एक वर्षातच महाराजांनी नौदल निर्मितीला प्रारंभ केला. जे इतर राज्यकर्त्यांना शतकानुशतके जमले नाही, ते महाराजांनी समुद्राशी संपर्क आल्यानंतर अवघ्या काही वर्षांतच प्रत्यक्षात आणले, हे त्यांचे द्रष्टेपण.


shivayan_1  H x

 

गेल्या काही लेखांमध्ये आपण महाराजांच्या बहुजनवादी अर्थशास्त्राचा परिचय करून घेतला. हा बहुजनवादी दृष्टीकोन ठेवताना महाराजांनी रूढ 'वतनदारी' पध्दतीऐवजी 'वेतनदारी' पध्दत अवलंबण्याचा काही अंशी यशस्वी प्रयोग करून पाहिला. पण महाराजांचे वेगळेपण केवळ तेवढयापुरतेच मर्यादित नव्हते. त्यांनी केवळ 'वतनदारी'पुरताच चाकोरीबाहेरचा विचार (Out of the box thinking) केला नाही, तर इतरही आर्थिक विषयांबाबत केला. या व पुढील काही लेखांमध्ये आपण या 'चाकोरीबाहेरच्या' कल्पनांची दखल घेऊ.

 
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 
 

व्यापारवृध्दी

महाराजांचे लक्ष राज्याच्या सर्वांगीण उन्नतीकडे होते. केवळ शेतीवर कर बसवून किंवा त्याची पुनर्रचना करून राज्याचे आर्थिक स्वास्थ्य बळकट होणार नव्हते. ह्या पारंपरिक मार्गाला इतर काही गोष्टींची जोड देणेही आवश्यक होते. व्यापारवृध्दी हा त्यातील एक मार्ग. व्यापारवृध्दीशिवाय राज्य भरभराटीला येणार नाही, ह्याची त्यांना खात्री होती. त्यामुळे व्यापारवृध्दीसाठी त्यांनी व्यापाऱ्यांना अनेक सोयी, सवलती व जकातीत सूट दिल्याची बरीच उदाहरणे आढळतात.

 

 

राजकारण व अर्थकारण ही हातात हात घालूनच चालली पाहिजेत, ह्याचे त्यांना जागरूक भान होते. रामचंद्रपंत अमात्यांच्या 'आज्ञापत्रा'त महाराजांचे व्यापारविषयक धोरण सूत्ररूपाने आले आहे -

 

 

'साहुकार म्हणजे राज्याची व राजश्रींची शोभा, साहुकारामुळे राज्य आबादान होते न मिले ते वस्तुजात राज्यामध्ये येते. राज्य श्रीमंत होते. पडिले संकट प्रसंगी पाहिजे ते कर्जवाम मिळते. तेणेकरून आले संकट परिहार (निवारण) होते. साहुकारांच्या संरक्षणामध्ये बहुत फायदा आहे. याकरिता साहुकाराचा बहुमान चालवावा. कोण्हेविषयी त्यावर जलल (जबरदस्ती) किंवा अपमान न होऊ द्यावा. पेठापेठात दुकाने वरवा (बेगमी, साठा, संग्राह) घालून हत्ती, घोडे, पशमिना, जरमिना (उंची कापड) जरबाब (जरतारी वस्त्रे) आदिकरून विशेष वस्तुजात यांचा उदीम चालवावा. हुजूरबाजारमध्येही थोर थोर सावकार आणून ठेवावे. वर्षसंबंधे तैसेच लग्नादि महोत्सवे त्यांचे योग्यतेनुरूप प्रतिष्ठेने बोलवून आणून वस्त्रेपास्ते देऊन समाधान करीत जावे. परमुलकी जे जे सावकार असतील त्यांची समाधाने करून ती आणावीत. त्यासी अनुकूल पडे व ती असतील तेथेच त्यांचे समाधान रक्षून, आपली माया त्यास लावून, त्यांचे मुतालीक आणून त्यास अनुकूल ते जागा, दुकाने देऊन ठेवावे तसेच दर्यावर्दी सावकार यांसही बंदरोबंदरी कौल पाठवून आमदरफ्ती करवावी.' - सभासद.

 

यातील दर्यावर्दी/परदेशी सावकार (व्यापारी, भांडवलदार) यांची थोडी पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे. त्यातून महाराजांची लढाऊ आणि व्यापारी नौदलांची कल्पना अधिक चांगल्या रितीने स्पष्ट होईल.

 

सोळाव्या शतकात फिरंग्यांचे/परकीय व्यापाऱ्यांचे, त्यांच्या युरोपीय देशांचे पूर्वेकडील सागरी साम्राज्य आफ्रिकेतील मोझांबिकपासून आग्नेय आशियातील मोलकसमधील तैर्नातीपर्यंत पसरले होते. मलाक्का, गोवा, दीव व होर्मुझ ही या व्यापारी मार्गावरील महत्त्वाची ठाणी त्यांच्या ताब्यात होती. आपले स्वतःचे आरमार उभारून परकीय फिरंग्यांची समुद्रावरील आरमारी/व्यापारी सत्ता उलथवून टाकावी अशी कल्पनासुध्दा महाराजांव्यतिरिक्त भारतातील एकाही समकालीन राज्यकर्त्याला सुचलीसुध्दा नव्हती. भारताबाहेरच्या आशियातील इतर सत्ताधाऱ्यांचीही अशीच अवस्था होती. पोर्तुगीज राजाने मिरी, सुंठ, मसाल्याचे पदार्थ, नीळ यांचा व्यापार स्वतःची मक्तेदारी म्हणून राखून ठेवला होता. पोर्तुगीज नागरिक व इतर देशांतील लोक अन्य गोष्टींचा व्यापार करू शकत, पण त्यासाठी त्यांना पोर्तुगीज सरकारचा परवाना अगर दस्तक (कार्ताझ) घ्यावा लागे. त्यामुळे भारतीय व्यापाऱ्यांचे स्वातंत्र्य धोक्यात आले होते. फिरंग्यांचे एतद्देशीय व्यापाऱ्यांशी वेळोवेळी जे तह/करार झाले, त्यावरून त्या व्यापाऱ्यांना मसाल्याच्या पदार्थांशिवाय अरबी घोडे, बंदुकीची दारू, सिंदूर, सोरा, लोखंड, पोलाद, पितळ, तांबे, जस्त इ. पदार्थांचा व्यापार करण्याचेही स्वातंत्र्य राहिलेले नव्हते. युध्दसामुग्राी निर्माण करण्याकरता सिंदूर, सोरा इ. पदार्थांचा व्यापार करावा लागे. अशा प्रकारे फिरंग्यांनी भारतीयांना आरमारी सत्ता निर्माण करणेसुध्दा अशक्यप्राय केले होते.

 

सोळाव्या शतकात फिरंग्याच्या (मुख्यतः पोर्तुगीजांच्या) भारतीय सागरातील प्रवेशानंतर अरबांनी युरोपचा व्यापार स्वतःच्या हातून घालवला होता. 17व्या शतकात वलंदेजादी युरोपीयांच्या भारतीय सागरातील प्रवेशानंतर अरबांनी पुन्हा आपले आरमार उभारण्यास प्रारंभ केला होता. मस्कतचा इमाम पुन्हा प्रबळ होऊ लागला होता.

 

युरोपीयांच्या आरमारी सामर्थ्यामुळे समुद्र व जमीन या दोन्ही ठिकाणी आपली कोंडी होते, हे महाराजांच्या लवकरच लक्षात आले. राजकीय आणि व्यापारी असे आपले दोन्ही हितसंबंध मार खातात हे त्यांना जाणवले. जंजिऱ्याच्या सिद्दीसारख्या जवळच्या शत्रूचाही आपण निःपात करू शकत नाही, ही खंतही त्यांना होतीच. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी जावळी काबीज केल्यानंतर एक वर्षातच महाराजांनी नौदल निर्मितीला प्रारंभ केला. जे इतर राज्यकर्त्यांना शतकानुशतके जमले नाही, ते महाराजांनी समुद्राशी संपर्क आल्यानंतर अवघ्या काही वर्षांतच प्रत्यक्षात आणले, हे त्यांचे द्रष्टेपण.

 

व्यापारी मार्ग आणि बंदरे ह्यांच्यावर आपले प्रभावी नियंत्रण असल्याशिवाय आपला व्यापार-उदीम भरभराटीला येणार नाही, ही जाण खास महाराजांची. व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी डोंगरी किल्ले जिंकणे किंवा निर्माण करणे, परदेशी व्यापारासाठी व्यापारी नौदल (Merchant Navy) निर्माण करणे व त्याला संरक्षण देण्यासाठी युध्दनौका व सागरी किल्ले, गोद्या बांधणे अशी प्रभावी साखळी किंवा साखळयाच महाराजांनी निर्माण केल्या व राखल्या. महाराजांनी युध्दविषयक दोन सूत्रे आयुष्यभर सांभाळली. एक म्हणजे 'ज्याचा अश्व त्याची लढाई ' आणि दुसरे म्हणजे 'ज्याचे आरमार, त्याचा समुद्र. ' ही दोन्ही सूत्रे त्यांनी त्यांच्या बारकाईच्या निरीक्षणातून आणि त्यांच्या S.W.O.T. Analysisच्या कौशल्यातून निश्चित केली असावीत. S - Strength, W - Weakness, O - Opportunity, T -Threat या चारही घटकांचा साकल्याने व तौलनिक अभ्यास करून जे विश्लेषण केले जाते, त्याला SWOT Analysis असे म्हणतात, प्रत्येक गोष्टीचा साकल्याने/सम्यक विचार करणे आणि त्यातून काहीतरी, विलक्षण, जगावेगळे उत्तर किंवा उपाय शोधणे ही तर महाराजांची खासियत होती.

 

शिव खेरांच्या उद्गारांची इथे आठवण येते - 'महान माणसे वेगळया गोष्टी करीत नाहीत, तर नेहमीच्याच गोष्टी वेगळया पध्दतीने करतात.'