उच्च तात्त्वि अधिष्ठान - भाग 4

विवेक मराठी    17-Feb-2020
Total Views |

छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर हे उच्च तात्त्वि अधिष्ठान जपले. राज्याभिषेकासारख्या अत्यंत आनंदी आणि जल्लोषी वातावरणातही ते कायम होते. त्यामुळेच राज्याभिषेकाच्या निमित्ताने महाराजांनी रायगडावरील वाडेश्वरालाही 'जगदीश्वर' असे संबोधले होते.

सुरतेच्या जाळपोळीत महाराजांनी कुठल्याच धर्मस्थळाला हात लावला नाही, तसेच कुणाही निष्पापाची हत्या केली नाही. इंग्राजांनी त्यांच्या वखारीचे रक्षण करण्यासाठी एक मशीद व एक मंदिर ताब्यात घेतले, ते त्याच अलिखित अभयामुळे! अर्थात वखारीचा प्रमुख स्ट्रॅनशॅम मास्टर व त्याच्या सहकाऱ्यांचे नीतिधैर्यसुध्दा वाखाणण्याजोगे होते. मुघल सुभेदाराच्या (इनायतखान) पळपुटेपणाच्या पार्श्वभूमीवर तर इंग्राजांचे शौर्य व धैर्य अधिकच उठून दिसते.

ह्या स्ट्रॅमशॅम मास्टरने आपल्या वखातीचे रक्षण तर केलेच, तसेच केवळ दोन अडीचशे सैनिक दिमतीला असताना व मराठे सुरतेत धुमाकूळ घालत असताना त्याने सुरतेत आपली ताकद दाखवायला चक्क रूटमार्च काढला! ह्या स्ट्रॅनशॅम मास्टरचे नंतर औरंगझेबानेही कौतुक केले व त्याला बक्षीस म्हणून काय हवे असेही विचारले. पण ह्या मास्टरने स्वतःसाठी काही न मागता आपल्या कंपनीसाठी जकातीत सवलत मागितली. अर्थात औरंगझेबाने ती मान्य केली. इंग्राजांचे हे उदाहरण आपल्यासाठीसुध्दा अनुकरणीय नाही का? असो.


shivaji_1  H x

महाराजांनी आयुष्यभर हे उच्च तात्त्वि अधिष्ठान जपले. राज्याभिषेकासारख्या अत्यंत आनंदी आणि जल्लोषी वातावरणातही ते कायम होते. त्यामुळेच राज्याभिषेकाच्या निमित्ताने महाराजांनी रायगडावरील वाडेश्वरालाही 'जगदीश्वर' असे संबोधले होते ते लक्षणीय वाटले. कारण कोणी 'दिल्लीपती' नाही की 'छत्रपती' नाही, 'जगदिश्वर' हाच सार्वभौम! स्वराज्याचे कर्ते, धर्ते तर महाराजच होते, पण श्रेय मात्र जगदीश्वराला! सर्व काही स्वतःच्या शौर्याने, धैर्याने, चातुर्याने मिळवलेले असूनही 'इदं न मम' असे म्हणून त्यांनी ईश्वरालाच अर्पण केले. राज्याचे ईश्वरी अधिष्ठान त्यातच व्यक्त झाले होते.

 

रायगडावरील त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानाला त्यांनी 'राजगृह' असे संबोधले होते, पण प्रासाद मात्र 'जगदीश्वराचा.'


त्यांनी जो नवा मनू (
'श्री'च्या इच्छेचा) इथे आणला होता, त्याला साजेशीच ही सर्व संबोधने होती. महाराजांचा उच्च तात्त्वि ध्येयवाद व तत्कालीन समाजाची धर्मपरायणाता या दोन्हींशी ती सुसंगत होती.

महाराजांचे तात्त्वि अधिष्ठान किती पक्के होते व त्यातून ज्या प्रेरणा आणि श्रध्दा किती जाज्वल्य होत्या, याचे प्रत्यंतर त्यांच्या मृत्यूनंतरही येते. त्यांच्या आयुष्यात तर लोक त्यांच्याबरोबर व त्यांच्यासाठी लढलेच, त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची व संस्कारांची महती इथले लोक विसरू शकले नाहीत. महाराजांच्या आकस्मित मृत्यूनंतर थोडयाच काळात स्वराज्यावर मुघलांचे सर्वकष आक्रमण झाले. अकबरापासूनचे दख्खन काबीज करण्याचे स्वप्न घेऊन खासा औरंगझेब दक्षिणेत उतरला. दख्खनमध्ये त्या वेळी आदिलशाही, कुतुबशाही व मराठे अशा तीन दखल घेण्याजोग्या सत्ता होत्या. आदिलशाही व कुतुबशाही ह्या मुस्लीम सत्ता असल्या, तरी मुघलांना त्यांच्याबद्दल पूर्वापार तुच्छताच होती. सुन्नी व शिया हा फरक आणि जबरदस्त राजकीय महत्त्वांकाक्षा यामुळे मुघलांना या सत्ता कायमच त्यांच्या डोळयात सलणाऱ्या होत्या. दुसऱ्या बाजूला शहाजीराजांपासून मुघलांना दख्खनमध्ये येऊ द्यायचे नाही अशी भोसले घराण्याची भूमिका होती. त्यामुळेच शिवाजी महारजांनी 'दःखनची पातशाही तो दक्षिणियांचे हाती राहिली पाहिजे' अशी भूमिका घेतली होती. त्यासाठी पूर्वीची भांडणे विसरून त्यांनी ह्या दोन्ही मुस्लीम शाह्यांच्या सहकार्याने एक बडी आघाडीही तयार केली होती. तेही औरंगझेबाला सलत होतेच. महाराज जिवंत असेपर्यंत जळफळत राहण्याशिवाय तो काही करूही शकत नव्हता. पण इ.स. 1680मध्ये महाराजांचे काहीसे अकस्मात निधन झाले आणि औरंगझेबाच्या वेडया महत्त्वाकाक्षेला पंख फुटले! त्याने आपला मोहरा दुर्दैवाने दख्खनकडे वळवला.

दुर्दैवाने म्हणायचे कारण म्हणजे दख्खनऐवजी त्याने पूर्वेकडे आपला मोहरा वळवला असता, तर इंग्राजांचा खात्मा झाला असता आणि संपूर्ण देशच इंग्राजांच्या संभाव्य गुलामगिरीतून वाचला असता. पण राजकीय अपरिपक्वतेमुळे हिंदुद्वेषच त्याला जास्त महत्त्वाचा वाटला आणि तो चुकीच्या - म्हणजे दख्खनच्या दिशेने आला. राजकीय अपरिपक्वता म्हणण्याचे कारण की, पुण्यातून पळालेला त्याचा मामा इ.स. 1663पासून बंगालमध्ये होता आणि इंग्राजांच्या राजकीय उलाढालीविषयी धोक्याचे इशारे आपल्या बादशहाला देत होता. हा मामा बादशहाच्या विश्वासातला होता, अनुभवी होता, पण औरंगझेबाने त्याच्या इशाऱ्यांकडे लक्षच दिले नाही. हे त्याचे आणि तमाम भारतवर्षाचे दुर्दैव! असो.

तर शेवटी औरंगझेब दक्षिणेत आलाच. इ.स. 1681 ते 1689 या 8-9 वर्षांत संभाजी महाराजांनी औरंगझेबाला अनपेक्षित अशी जबरदस्त झुंज दिली आणि मुघलशाही महाराष्ट्रत अडकवून ठेवली. इतकी की काही काळानंतर मराठयांचा नाद सोडून औरंगझेब अजून दक्षिणेकडे सरकला आणि त्याने साम, दाम, दंड, भेद असे सर्व उपाय करून आदिलशाही व कुतुबशाही ह्या दोन्ही मुस्लीम शाह्या जिंकून त्यांचे स्वतंत्र अस्तित्व संपवले. दोन-दोनशे वर्षे अस्तित्वात असलेल्या आणि 'स्वराज्या'पेक्षाही ताकदवान असलेल्या ह्या शाह्या औरंगझेबाने एकेका तडाख्यात संपवल्या. मराठयांची मदत असूनही संपवल्या, पण संभाजी महाराज आणि मराठे अजिक्यच! पुढे दोन-एक वर्षांतच संभाजी महाराज औरंगझेबाच्या हातात सापडले आणि हाल हाल होऊन मरण पावले. रायगडही पडला! राजाराम महाराजांना दूर कर्नाटकात जिंजीला पळून जावे लागले. त्या वेळी मुघलांची सेना होती 5 लक्ष, तर मराठयांची जेमतेम 1.5 लक्ष! मुघलांकडे खजिनाही प्रचंड. त्यांचा बादशहा प्रत्यक्ष रणांगणावर हजर! दुसऱ्या बाजूला मराठयांकडे ना धड सैन्य, ना सेनापती, ना राजा! पगाराची खात्री नाही, साधनसामग्राी पुरेशी नाही, पण महाराजांचा आदर्श मात्र अभंग!

हाच आदर्श, हीच प्रेरणा घेऊन मराठे मात्र लढतच राहिले. थोडीथोडकी नव्हे, तर पुरी 27 वर्षे! त्यांनी औरंगझेबालाच इथे मूठमाती दिली. आपले स्वातंत्र्य राखले! स्वराज्याचे उच्च तात्त्वि अधिष्ठान आणि त्यांच्याशी सुसंगत असा महाराजांचा कारभार यामुळेच असा चमत्कार घडू शकला. 'हे राज्य श्रींच्या वरदेचे आहे. राजेश्रींचे राज्य म्हणजे देवताभूमी' असे उद्गार तत्कालीन कागदपत्रांमध्ये सर्वसामान्य लोकांकडूनही आले आहेत. एवढेच नव्हे, तर खुद्द औरंगझेबाने काढलेले उद्गार ही असेच आहेत. तो म्हणतो, याचेच (शिवाजी महाराजांचे) राज्य यावे, ही खुदाची इच्छा दिसते. म्हणजे औरंगझेबालाही पटलेले दिसते की मराठी राज्य हे ईश्वरी आशीर्वादाचेच राज्य आहे!

महाराजांच्या उच्च तात्त्वि अधिष्ठानामुळे आणि त्यातून निर्माण झालेल्या प्रेरणांमुळे महाराष्ट्र काय व कवढे करू शकला, हे उपरोक्त प्रतिक्रियांतून पुरेसे स्पष्ट होते.