ठाकरे यांचा भगवा दणका

विवेक मराठी    11-Feb-2020
Total Views |

 ज्या क्षणाची हिंदू जनतेला प्रतीक्षा होती, तो क्षण 9 फेब्रुवारी 2020 रोजी मुंबईकरांनी अनुभवला. राज ठाकरे यांनी नागरिकत्व कायदाला पाठींबा देण्यासाठी विशाल मोर्चा काढला. वर्तमानपत्रांनी त्याचे वर्णन 'भगवे वादळ' या शब्दात केले. राज ठाकरे यांनी मोर्चात सहभागी झालेल्या तमाम हिंदूंना म्हणजे राष्ट्रवादी नागरिकांना उद्देशून भाषण केले. या भाषणाचे महत्त्वाचे अंश वर्तमानपत्रांतून आले आहेत. असंख्य लोकांनी दूरदर्शनवरून हे भाषण प्रत्यक्ष ऐकलेदेखील आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीतील हे भाषण आहे. बाळासाहेब जसे म्हणत असत की, दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर देऊ, तेच शब्द राज ठाकरे यांनीदेखील वापरले.

raj_1  H x W: 0

जनतेला अशा सणसणीत भाषणाची भूक होती. जनतेची भूक काय आहे, हे यापूर्वी 'विवेक'मधील आणि 'तरुण भारत'मधील अनेक लेखांतून मांडलेले आहे. राज ठाकरे यांना ही भूक बरोबर समजली. वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत, हे ज्या राजनेत्याला समजते, तो राजकारणात पुढे जातो. विधानसभा निवडणुकीत मनसेचे पानिपत झाले. शरद पवारांची संगत भोवली. राज ठाकरे यांना फार लवकर शहाणपण सुचले. मराठीचा मुद्दा एका मर्यादेपर्यंत योग्य असतो. तोच एक मुद्दा धरून राजकारणात पुढे जाता येत नाही. त्यासाठी हिंदुत्वाचा विषय स्वीकारावा लागतो. हिंदुत्व या एका शब्दात मराठा, कुणबी, आग्री, कोळी, मातंग, चर्मकार, माळी, अशा सतराशे साठ जाती येतात. त्या सर्वांना बांधून ठेवणारे हिंदुत्वाचे बंध फार ताकदवान आहेत. राजकारण करताना याचे भान ठेवावे लागते. राज ठाकरे यांनी योग्य वेळी, योग्य विषयासाठी शक्ती प्रदर्शन करणारा मोर्चा काढला, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

 

काही दिवसांपूर्वी मनसेने आपला झेंडा बदलला आणि शिवमुद्रा असलेला भगवा झेंडा स्वीकारला. भारताचा रंग भगवा आहे. तो कुणी एका पक्षाने दिलेला नाही, एका संघटनेने दिलेला नाही, संघानेदेखील दिलेला नाही. भारताचा हा प्राचीन भगवा रंग संघाने नम्रपणे स्वीकारला. या देशातील मूर्ख बुध्दिवाद्यांना भगव्या रंगात सांप्रदायिकता दिसते, धार्मिकता दिसते, आणखी काही काही दिसत असते. याला पुरोगामी दृष्टीदोष म्हणतात. काही दृष्टीदोष औषधोपचाराने बरे होतात, काही दोषांसाठी शस्त्रक्रिया कराव्या लागतात. पुरोगामी दृष्टीदोषाला कोणतीही शस्त्रक्रिया किंवा औषध नाही. आपले भाग्य थोर की, या देशातील सर्वांना या रोगाची लागवण झालेली नाही. भगवा रंग हा प्रत्येकाच्या हृदयात अंकित झालेला आहे.

हा भगवा रंग धारण करणे, ही साधी गोष्ट नाही. 'ज्याचे मन लागले नाही हाताशी। तेणे भगवे हाती धरु नये।' असे तुकाराम महाराज सांगून गेले. भगव्याचा अर्थ होतो, त्याग. त्याग कशाचा? त्याग सर्व भोगलालसेचा. मनाची अशी अवस्था तयार करणे की, मी जे काही पाहतो आणि ज्या ज्या गोष्टींचा मी उपयोग घेतो, या सर्व गोष्टी ईश्वरनिर्मित आहेत. त्यामुळे त्यावर सर्वांचा सारखा अधिकार आहे. मी उपभोग घेताना त्याचा त्यागपूर्ण उपभोग घेईन. भगव्याचा आणखी अर्थ असा होतो की, सर्व वासनांपासून विरक्ती. कशातही मन अडकवून ठेवायचे नाही. आपण मुक्त राहायचे. कोणत्याही बंधनात राहायचे नाही. याला आपल्याकडे मायेचे बंधन म्हणतात. हा माझा, तो परका, अशी भावना ठेवायची नाही. 'हे विश्वाचे अंगण, आम्हा दिले आहे आंदण' या भावनेने जगायचे. म्हणून तुकोबा राय म्हणतात, भगवे धारण करीत असताना शंभर वेळा विचार करा. त्या कापडाचे वजन काही नाही, पण त्याच्या मूल्याचे वजन पेलणे येऱ्यागबाळयाचे काम नाही.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

राजकारणात जेव्हा भगवा स्वीकारला जातो तेव्हा त्याचा अर्थ होतो, स्वाभिमान, आपली मूल्यपरंपरा जपणे, आपल्या संस्कृतीचे संवर्धन करणे, सर्वांना न्याय देणारे शासन निर्माण करणे, कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करणे, जातीभेद आणि धर्मभेद यांना दूर करणे, स्त्रियांचा सन्मान करणे, अशा सर्व गोष्टी राजकारणात जेव्हा भगवा येतो तेव्हा त्या भगव्याबरोबर या गोष्टी येत असतात. वर दिलेल्या सर्व गोष्टी भगव्याच्या सहचर आहेत. त्याशिवाय भगव्याला काही अर्थ नाही.

raj_1  H x W: 0

राज ठाकरे यांनी हा भगवा स्वीकारला आहे. याचा अर्थ असा झाला की, हा देश, त्याचा मूळ स्वभाव, त्याची मूळ संस्कृती, आणि प्रवृत्ती या सर्वांचा स्वीकार राज ठाकरे यांनी केला आहे, असे आपण मानूया. असेही मानूया की, राजकारणाच्या सोयीसाठी घेतलेली ही भूमिका नाही. उद्या राजकारणाच्या दृष्टीने जर ही भूमिका गैरसोयीची झाली तर पुन्हा ध्वज बदलला जाईल, असे होणार नाही. एवढा विश्वास राज ठाकरे यांना हिंदू जनतेला द्यावा लागेल.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 

मनसे स्थापन झाल्यापासून राज ठाकरे यांच्या भूमिका कोणत्या कोणत्या राहिल्या, याचा इतिहास येथे गिरविण्याचे कारण नाही. भूतकाळ विसरायचा असतो, तसेच भूतकाळातील चुका वर्तमानकाळात सुधारुन भविष्याकडे वाटचाल करायची असते. राज ठाकरे यांचा मोर्चा भव्य झाला. त्याचे धक्के जिथे जिथे बसायला पाहिजेत तेथे तेथे बसलेले आहेत. यामुळे मोर्चावर उलटसुलट प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि येतही राहतील. अशा प्रतिक्रियांची शहाणा राजकारणी जेवढी दखल घ्यायची आहे तेवढीच घेतो.

महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रात हिंदुत्वाची फार मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होते, असे म्हणतात. याचा अर्थ इतिहास पूर्वी जसा घडला तसेच घडतो असे नाही. परंतु काही वेळेला आश्चर्यकारकरित्या त्यात साम्य आढळते. 1986सालापासून रामजन्मभूमी मुक्ति आंदोलन वेग धरु लागले. विश्व हिंदू परषिदेने ते जनआंदोलन केले. संपूर्ण हिंदू समाज आंदोलनात ढवळून निघाला. हिंदू समाजात अशा प्रकारची राष्ट्रीय जागृती पहिल्यांदाच होत होती. हिंदू आपल्या हिंदुपणाच्या रक्षणासाठी उभा राहत होता. शेकडो वर्षाची झोप मोडत चालली होती. मी कोण आहे, माझी अस्मिता कशात आहे, रामाशी माझे नाते काय आहे, माझ्या अस्मितेसाठी मला संघर्ष का केला पाहिजे, या सर्व गोष्टी त्याला हळुहळू उमगू लागल्या.

हे जसे अस्मिता जागरण होते तसेच ते राजकीय जागरणदेखील होते. ज्यांनी या राजकीय जागरणाचा लाभ करुन घ्यायला पाहिजे होता, ती मंडळी गांधीवादी समाजवादाचा राग आळवीत बसली होती. हिंदू समाजाला गांधीवादी समाजवादाशी काही देणेघेणे नव्हते. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना लोकमताचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत, हे चटकन समजले. रामजन्मभूमी मुक्ति आंदोलनात शिवसेना कुठेच नव्हती, परंतु त्याचा राजकीय लाभ करुन घेण्यात शिवसेना सर्वात पुढे होती. शिवसेनेने मराठीचा मुद्दा बाजूला ठेवला आणि हिंदुत्वाचा मुद्दा घेतला. बघता बघता शिवसेना महाराष्ट्रव्यापी झाली. एक प्रबळ हिंदू राजकीय शक्तीच्या रुपात तिचा अवतार झाला. काळाची ती गरज होती. ज्यांनी ही गरज भागवायची ते झोपून राहिले आणि जे जागे होते, त्यांनी ही गरज पूर्ण केली.

इतिहासाची पुन्हा पुनर्रावृत्ती होईल का? त्याला अनेक जर-तर आहेत. राज ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे नव्हेत, हे लोकांना समजते. पण समजा, काय वाट्टेल ते होवो, हिंदुत्वाचा मुद्दा आला की, म्यानातून समशेर बाहेर काढली जाईल, अशी भूमिका सातत्याने घेतली गेली तर हिंदू समाजाची अभिव्यक्तीची गरज यामुळे भागेल. धरसोड वृत्ती ठेवली तर काही खरे नाही. याचा अर्थ हिंदू समाज नेतृत्वाविना अनाथ राहील, असे नाही. कोणी तरी कुठे तरी उभा राहील किंवा उभा केला जाईल, जो ही गरज भागवेल.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

राजकारणाचा पुढचा कालखंड हिंदू कालखंड राहणार आहे. आणि तो तसाच राहील. त्याला विरोध करण्यासाठी वेगवेगळया प्रकारची मंडळी एकत्र येत जातील. जशी आता एकत्र होत आहेत. ते पडद्यामागे राहून संविधानाची भाषा बोलून, वेगवेगळया गटांना हिंसेला प्रवृत्त करतील. मुसलमानांना त्यांनी लक्ष्य केले आहे. त्यांची अपेक्षा आहे की, मुसलमानांनी दंगे सुरु करावेत. त्यात जर मुसलमान दगावले तर त्याचे त्यांना काही सोयरेसुतक नाही. बंदुकीचा दारुगोळा याशिवाय या लोकांचा त्यांना काही उपयोग नाही.

हिंदुत्वाची ही राजकीय लढाई हिंदू विरुध्द मुसलमान किंवा अन्य अल्पसंख्य अशी नाही. ही लढाई या देशात जन्मलेल्या प्रत्येकाला त्याची सांस्कृतिक, वांशिक, आणि मूल्यात्मक ओळख करुन देण्याची लढाई आहे. गोल टोपी, आखूड पायजमा आणि काळा बुरखा ही अरबी संस्कृती आहे. तिच्या गुलामीत का राहायचे? पांढरे कपाळ आणि झगे ही युरोपची संस्कृती आहे, तिचा आपला संबंध काय? आपण आपल्या मूळाकडे गेले पाहिजे. आम्ही मूलतः सगळे भारतमातेची संतान आहोत. जननी जगन्माता भारत ही आमची आई आणि आम्ही सर्व तिची लेकरे आहोत. हीच ओळख आपली आहे. हिंदुत्वाची राजकीय लढाई ही केवळ हिंदू शासन आणण्याची लढाई नाही. तर खऱ्या अर्थाने राष्ट्रीय शासन आणण्याची लढाई आहे. राज ठाकरे या लढाईत उतरले आहेत. त्यांनी सातत्य राखून वाटचाल करावी, एवढीच माफक अपेक्षा त्यांच्याकडून आहे.