आत्मभानाने मिळाली उभारी

विवेक मराठी    23-Oct-2020
Total Views |

लॉकडाउनचा सवर्च क्षेत्रावर परिणाम झाला, कुठलेही क्षेत्र यातून सुटले नाही. त्याचा दुष्परिणाम म्हणजे अनेकांच्या नोकऱ्या, व्यवसाय इत्यादींना याचा जबरदस्त फटका बसला. एकंदर साऱ्यांचीच आर्थिक घडी विसकटली. कुटुंबाची जबाबदारी, भविष्याची चिंता, काहीतरी करण्याची ऊर्मी रोहनला स्वस्थ बसू देत नव्हती. मराठी चित्रपट सृष्टीत त्याचा चालू असलेला स्ट्रगल, त्याची पावती म्हणून रंगभूमीने त्याच्या कलेचा सन्मान म्हणून दिलेले पुरस्कार अशी सर्व पार्श्वभूमी असताना 'मच्छी विक्री'चा व्यवसाय करण्याचे निशिचत केले. दोन्ही क्षेत्रांतील त्याची प्रामाणिक मेहनत, मिळत असलेले यश या त्याच्या प्रवासाबद्दल त्याच्याशी मारलेल्या गप्पा.

filim_1  H x W:
मार्च महिन्यात भारतात कोरोना महामारीचा शिरकाव झाला. हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग हा महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक ठरला. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाउन जाहीर केला. आरोग्याच्या दृष्टीने हा उपाय अनिवार्य असला, तरी सगळे व्यवहार ठप्प झाले. कुठलेही क्षेत्र यातून सुटले नाही. त्याचा दुष्परिणाम म्हणजे अनेकांच्या नोकऱ्या, व्यवसाय इत्यादींना याचा जबरदस्त फटका बसला. एकंदर साऱ्यांचीच आर्थिक घडी विसकटली

 

 
चंदेरी दुनियेवरही लॉकडाउनचा मोठया प्रमाणावर परिणाम झाला. ही चंदेरी दुनिया जरी चमचमाती दिसत असली, तरी स्ट्रगल करूनच या दुनियेत आपले स्थान कमवावे लागते. नशिबानेच एखाद-दुसरा एका रात्रीत स्टार होतो, पण प्रकाशझोतात येण्यासाठी बऱ्याच जणांना वर्षानुवर्षे बराच संघर्ष करावा लागतो. आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत करणारे बरेच कलाकार या इंडस्ट्रीत आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे रोहन पेडणेकर.

एकांकिका, नाटक, पटकथा लेखन, संवादलेखन, अभिनय अशा चित्रपट सृष्टीतीळ सर्व आयामांमध्ये आपले योगदान देणारा हा हरहुन्नरी कलाकार. लॉकडाउनमुळे इंडस्ट्रीही पूर्णपणे बंद झाली होती. आर्थिक स्रोत बंद झाले होते. कुटुंबाची जबाबदारी, भविष्याची चिंता, काहीतरी करण्याची ऊर्मी रोहनला स्वस्थ बसू देत नव्हती. विचारचक्र झपाटयाने चालूच होते, अशातच त्याचे वडील करीत असलेला सुकी मच्छी विक्रीचा व्यवसाय करण्याचे त्याने मनाशी पक्क केले. मराठी चित्रपट सृष्टीत त्याचा चालू असलेला स्ट्रगल, त्याची पावती म्हणून रंगभूमीने त्याच्या कलेचा सन्मान म्हणून दिलेले पुरस्कार अशी सर्व पार्श्वभूमी असताना 'मच्छी विक्री'चा व्यवसाय करण्याचे निशिचत केले. दोन्ही क्षेत्रांतील त्याची प्रामाणिक मेहनत, मिळत असलेले यश या त्याच्या प्रवासाबद्दल त्याच्याशी मारलेल्या गप्पा

जानेवारीपर्यंत स्टार प्रवाहवर चालू असलेल्या, बाबासाहेब आंबेडकर या मालिकेत सहस्रबुद्धे हे पात्र साकारत होतो. मार्च महिन्यापासून लॉकडाउन सुरू झालं आणि सर्वच जग ठप्प झालं. लॉकडाउन संपून पुन्हा सगळं व्यवस्थित सुरू होईल, या आशेवर तीन महिने काढले. लॉकडाउनच्या निमित्ताने एक मोठी सुट्टी मिळाली. या सुट्टीच्या आनंदात सगळ्या हौस-मौजी झाल्या. सोशल मीडियावर पाककलेचं उधाण आलेलं, त्याला मीही अपवाद नव्हतोच. लॉकडाउन काळात समाजातील तफावत प्रकर्षाने जाणवली. एकीकडे लोकांना पाककलेचे उधाण आलेलं आणि दुसरीकडे खायला अन्न नाही म्हणून अनेकांचा जीव जात होता. या काळात आणखी एक शोकांतिका पाहायला मिळाली, जगणं जेवढं मुश्कील, त्याहून मरणं अधिक मुश्कील झालं आहे, हे माध्यमांतून पाहायला येत होत.

 

एवढा मोठा काळ फक्त घरी बसून राहण्याची ही पहिलीच वेळ. सामाजिक स्थितीचं विदारक चित्र, आपण ज्या इंडस्ट्रीत आहोत, ती काही ठरावीक रक्कम महिन्याला आपल्या अंकाउंटमध्ये जमा होईल अशी नाही, तर आपण जेव्हा काम करू तेव्हाच आपल्याला पैसे मिळणार, असे बेभरवशी (अशाश्वत) क्षेत्र. त्यातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता इंडस्ट्री काही लवकर सुरू होण्याची चिन्हं दिसत नव्हती. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे, मी सामान्य घरतला मुलगा, त्यामुळे गडगंज संपत्ती नाही किंवा बचतही जेमतेमच. लॉकडाउन आणखी वाढला, तर आपला चरितार्थ कसा चालणार? भविष्याची चिंता? इत्यादी प्रश्न सतावू लागले. या प्रश्नांनी मी खचलो नाही, तर जिद्द ठेवून आपणही यातून उभे राहू शकतो, हा आत्मविश्वास उराशी बाळगून तीन जूनला 'सुकी मच्छी विक्री'चा व्यवसाय सुरू केला.

सुकी मच्छी करण्याचा व्यवसाय करण्याचेच का ठरवलं, यावर रोहन म्हणतो, ''तसं हाच व्यवसाय करावा असं सुरुवातील ठरवलं नव्हतं. नुसतंच बसून राहता, कुणापुढेही लाचार होता, स्वतःला उभं राहायचं आहे तर स्वतःच काही तरी केलं पाहिजे, हे आत्मभान जागृत ठेवलं. बरेच सिझनल व्यवसाय करावे असं डोक्यात येऊन गेलं, पण सुकी मच्छीचा व्यवसाय करू या, यावरच येऊन थांबलो.

पूर्वी माझे बाबा नोकरी करून सुकी मच्छी विक्रीचा व्यवसाय करत होते. घरात आधीपासून या व्यवसायाची माहिती होती. त्यामुळे आत्मविश्वास होता की हा व्यवसाय मला व्यवस्थित जमू शकतो. मी मूळचा वेंगुर्ल्याचा, त्यामुळे मालवणी माणूस आणि मासे याच अतूट नातं. सुरुवातीला राज्य सरकारने बीकेसीच्या मैदान विक्रिसाठी खुलं केलं होतं, तेथेच मी सहकाऱ्यांना घेऊन सुकी मच्छींचा स्टॉल लावला. पण तिथे म्हणावा तसा व्यवसाय होत नव्हता. व्यवसाय वाढीसाठी काय करावं, याचा विचार करत होतो. मी काही चित्रपट सृष्टीतील ओळखीचा चेहरा नाही की माझ्या अपीलने लगेच माझी व्यवसायवृद्धी होईल.


filim_2  H x W:

आजच्या आधुनिक काळात सोशल मीडियासारखं प्रभावी साधन नाही. त्या माध्यमातून आपण अनेक लोकांपर्यंत आपण करीत असलेल्या व्यवसायाची माहिती देऊ शकतो. तेव्हा नुकताच सुशांतसिंग राजपूत याचं आत्महत्या प्रकरण चालू होतं, अनेक कलाकार डिप्रेशनखाली जात होते. आत्महत्यांचं प्रमाण वाढत होतं. तेव्हा मी जो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला, व्हा माझ्या व्यवसायाची माहिती पोहोचवणं हा उद्देश होताच. पण माझ्या कलाकार मित्रांना खचून जाऊ नका. खडतर का होईना आपली वाट बदला आणि जीवनाचा प्रवास चालू ठेवा. मनुष्यजीव हा एवढा क्षुल्लक नाही, त्याचं मोल जाणा आणि आपला जीवनप्रवास सुखकर करा.' हा संदेशही द्यायचा होता. रंगभूमीत आपल्या कलेचा आदर होतोच. आपल्याला अनेक सन्मानचिन्हं मिळत असतात. पण खडतर वेळेत ते पुरस्कार म्हणजे ऊर्जा वाढवणारे एक स्रोत आहे, याकडे बघून आपलं जीवनध्येय ठरवा. माझा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. अनेक कलाकार मित्रांनी तो आपल्या फेसबुक वॉलवर शेअर केला. अनेक जणांनी कौतुकाची थाप आणि व्यवसायवृद्धीसाठी बळ दिलं.

या क्षेत्रात माझा चांगला संपर्क आहे. माझ्या एका शब्दावर अनेकांनी मला आर्थिक मदत केली असती हे जरी खरं असलं, तरी केव्हा ना केव्हा त्याची परतफेड करावीच लागणार आहे, मग आताच आपण मेहनत करून स्वतःचा व्यवसाय करावा; मला तुमचे पैसे नकोत, तर मी विकत असलेलं प्रॉडक्ट खरेदी करा, हीच माझ्यासाठी मोठी मदत होईल हे आवाहन मी व्हिडिओतून केलं. त्याला भरभरुन प्रतिसाद मिळाला, ते मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. माझ्या मित्रपरिवाराने प्रचंड साथ दिली.

या भक्कम आधारावरच मी व्यवसाय विस्तार करण्याचं धाडस करू शकलो. चार सप्टेंबरपासून मी ताजे मासे विक्रीचा व्यवसायही सुरू केला. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. प्रभादेवी ते दहिसर असा ग्राहकवर्ग आहे. स्टोअरकरून मासे विक्री करता ज्या दिवशी मासे डिलीव्हर करायचे आहेत, तेव्हाच ताजे मासे आणून देतो. ग्राहकांची कुठलीही फसगत होता कामा नये याचा आणि विश्वासार्हता टिकवून ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न असतो. त्यासाठी म्हावरा दयार्चा हे पेज सुरु केलं आहे. ही सूत्र पाळली गेली असल्यामुळे ग्राहक दुसऱ्यांदाही माझ्याकडेच ताज्या माशांची ऑर्डर देतो. या व्यवसायासाठी दिनक्रमाचं चक्र उलटं फिरवावं लागलं. पण त्या मेहनतीचं फळ मला आज मिळत आहे. मिळालेल्या नफ्यातील काही रक्कम सामिजक भान म्हणून गरजूंना मदत केली. या व्यवसायामुळे चित्रपट सृष्टीतील अनेक जणांची माझी चांगले संबंध तयार झालेत. हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकारही माझ्याकडून मासे खरेदी करतात.


filim_1  H x W:

चित्रपट सृष्टी आणि मच्छी विक्री ही दोन्ही वेगळी क्षेत्रं. दोन्ही क्षेत्रांतील व्यवसायिक संदर्भ, तेथील राहणीमान, एंकदरीत दोन्ही वेगवेगळी टोकं त्याचा मेळ कसा साधणार? या विषयावर रोहन याची सीमारेखा अगदी लख्ख आहे. दोन्ही क्षेत्रांत जमीन-अस्मानाचं अंतर आहे. त्यासाठी चित्रपट सृष्टीतील लावलेले मुखवटे काढता आले पाहिजे. तो अंहकार ठेवून इतर कुठलाही व्यवसाय करता येणार नाही. आणि दुसऱ्या व्यवसायातून मिळणाऱ्या यशाचा माज ठेवून चित्रपट सृष्टीत आपण टिकू शकणार नाही, याचं भान ठेवलं तर दोन्ही क्षेत्रांत काम करणं कठीण नाही. आताही माझे पटकथा लेखन चालूच आहे. 

सा. विवेकच्या माध्यमातून मी माझ्या कलाकार मित्रांना एवढंच सांगू इच्छितो की, तुम्ही परिधान केलेले मुखवटे वेळप्रसंगी तुम्हाला काढता आले पाहिजेत. कलाकार हादेखील एक माणूस आहे आणि त्या माणसाला पोट आहे. आणि पोट भरण्यासाठी कोणतंही काम करावं लागलं तर लाज बाळगू नका. हातात हात धरून बसू नका, खचू नका. कुणीतरी येईल आपल्याला आर्थिक मदत करील, यातून सावरेल, या आशेवर राहू नका. स्वतःला जगायचं आहे तर स्वतःलाच उभं राहावं लागेल. कोणावरही अवलंबून राहू नका, आत्मनिर्भर बना.

चित्रपट सृष्टीत माझंही बरं चाललेलं होत. लॉकडाउन नसतं, एवढा रिकामा वेळ मिळाला नसता, तर मी व्यवसाय सुरू करावा हे आता तरी ठरवलं नसतं. संकटात संधी असते, ती शोधावी लागते. आपलं आत्मपरीक्षण करून आपल्या क्षमता ओळखल्या पाहिजेत. आज दोन्ही क्षेत्रांतील माझी कामं व्यवस्थित चालू आहेत. याच महिन्यात माझ्या व्यवसायाचा पुढचा टप्पा 'रेडी टू इट' खास मालवणी पद्धतीचे रुचकर पदार्थ घेऊन येणार आहे. दोन-तीन वर्षांत हॉटेल सुरू करण्याचा मानस आहे. बरीच स्वप्नं पाहिली आहेत, प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मेहनत, जिद्द, चिकाटी आणि असंख्य लोकांचा पाठिंबा शुभाशीर्वाद आहेतच.