धुळे जिल्ह्यातील बोरीस गावातील शेतकरी विजय देवराम बेहरे या शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत तीन एकरात सीताफळाची यशस्वी लागवड केली असून त्यातून सहा लाखांचा निव्वळ नफा कमवला आहे. त्यांची ही कथा इतर शेतकर्यांसाठी प्रेरणादायक ठरत आहे.
आज शेतीवर विविध संकटे घोंघावत आहेत, ही शेती उन्नत करण्यासाठी विविध पातळ्यांवर कामे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शेती व्यवसायाला फळबागांची जोड अतिशय फायदेशीर ठरत आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही बारमाही चांगला मिळणारा भाव आणि निर्यातीसाठी दिली जाणारी चालना यामुळे फळबागांची लागवड यशस्वी ठरत आहे.
आपल्या राज्यात हवामान कधीही सारखे नसले, तरी विविध भागांत विविध फळे प्रसिद्ध आहेत - उदा., कोकणात आंबा, काजू, पश्चिम महाराष्ट्रात द्राक्षे, पेरू आणि डाळिंब, उत्तर महाराष्ट्रात केळी, विदर्भात संत्रे. आपल्या राज्यात माळरान, डोंगरउतार, तर काही ठिकाणी सपाट प्रदेश आहे, अशा ठिकाणी फळबाग लागवाडीला मोठा वाव आहे. कोरडवाहू जमिनीला सीताफळ लागवड एक प्रकारे वरदानच ठरत आहे. राज्यातील असंख्य शेतकरी सीताफळ लागवडीतून आर्थिक उन्नती साधत आहेत.
सीताफळ ठरले वरदान
धुळे शहरापासून ३५ किलोमीटरवर अंतरावर बोरीस हे जवळपास साडेपाच हजार लोकसंख्येचे गाव. गावातील जमीन ढोबळमानाने हलकी, मध्यम प्रतीची व काळी कसदार या तीन प्रकारांत मोडते. गावातच बेहरे कुटुंबीयांची सहा एकर शेती आहे. या कुटुंबीयांतील विजय बेहरे यांनी घटते पर्जन्यमान, बदलते हवामान, माती परीक्षण, पाण्याची उपलब्धता आणि पीक बदलाचा अभ्यास करून कमी पाण्यात आणि कमी कालावधीत येणारे नगदी पीक म्हणून सहा वर्षांपूर्वी सीताफळ लागवडीचा धाडसी निर्णय घेतला. आज हा त्यांचा निर्णय त्यांच्या शेतीसाठी वरदान ठरला आहे. अधिकाधिक उत्पादन आणि दर्जेदार फळनिर्मिती यामुळे बेहरे यांच्या सीताफळास बाजारपेठेतही योग्य भाव मिळाला आहे.
आपल्या यशाचे गमक उलगडताना विजय बेहरे म्हणाले, "मी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. लहान भाऊ दीपक हा प्राध्यापक आहे. मी पुढे शिकून नोकरी पत्करावी अशी घरातल्या लोकांची इच्छा होती. पण मला लहानपणापासूनच शेतीची आवड होती. वडील देवराम यांचे कष्ट मी जवळून अनुभवले होते. वडिलांच्या प्रेरणेमुळे मी शेतीत उतरलो. आपली शेती प्रयोगशील कशी करता येईल? यासाठी मी चिंतन करू लागलो. त्यासाठी यशस्वी शेतकर्यांच्या भेटी घेऊ लागलो, अशा शेतकर्यांच्या शेतीतले प्रयोग पाहून मी भारावून गेलो आणि पुढे शेतीचा लळा लागला. आजच्या काळात शेती परवडत नसली, तरी ती किफायतशीरपणे केली तर त्यातून योग्य आर्थिक नफा मिळवू शकतो, हे मला अभ्यासातून, शेती कार्यशाळेतून लक्षात आले. शेतीतील अनिश्चितता लक्षात घेऊन मी २०१४ साली तीन एकरावर सीताफळ लागवड केली. जमिनीवर दहा बाय दहाचे अंतर ठेवून सीताफळाची (MMK गोल्डन जातीची) एक हजार रोपे लावली. सतत दोन वर्षे रोपांची योग्य जोपासना केली.
या काळात औषध फवारणी आणि छाटणीकडे विशेष लक्ष दिल्यानंतर सीताफळाची उत्तम वाढ होऊन तिसर्या वर्षी फळविक्री करण्यास सुरुवात केली. सीताफळ लागवड ते विक्रीपर्यंतचा खर्च वजा करता सहा लाखांचा फायदा मिळाला. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने हा नफा मिळत चालला आहे."
"सीताफळ हे जरी कोरडवाहू फळ असले, तरी व्यापारी तत्त्वानुसार या पिकांकडे पाहिल्यास भरपूर नफा मिळतो, असे माझ्या लक्षात आले, त्यामुळे अनेक शेतकरी माझी बाग पाहण्यासाठी येत असतात, जे शेतीकडे निराशेने पाहतात अशा शेतकर्यांना फळबाग लागवड करण्यासाठी सल्ला देत असतो" असेही बेहरे यांनी सांगितले.